अधुरी एक कहानी ( टिम- व्हॉट्स इन द नेम)

Love story Ira championship trophy Story of one girl who sacrificed life for her love

अधुरी एक कहाणी 

© आर्या पाटील

(काल्पनिक) 

**********************

लडाखच्या बर्फाच्छादित डोंगरदर्‍यातून निघालेल्या बसने श्रीनगरची वाट धरली.रस्त्याच्या दुर्तफा पसरलेला बर्फाचा गालिचा,अनेक मजली इमारतीप्रमाणे दक्षिणेकडून उत्तरेकडे चढत जाणारा भूभाग,दूरवर पसरलेले चिनार वृक्ष, डोंगरउतारावर असलेली बर्त्सेसारखी झुडपे न्हाहाळत तो निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होता.

तो मेजर राजवीर मोहिते...... तिशीतील तरुण.भारतीय लष्करात मेजरपद भूषविणारा मराठी मातीचा सुपुत्र. शूरवीरांची भूमी असलेली सातारा त्याचीही जन्मभूमी... कठोर परिश्रम,अचाट देशभक्ती,पूर्वजांचा देशसेवेचा वारसा यांच्या जोरावर त्याने सैन्यदलाचे कठिण प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जम्मू काश्मिरच्या अतिशय संवेदनशील सीमाभागात त्याची पहिली पोस्टिंग झाली. तेथे आतंकवाद्यांच्या विरोधात अनेक कारवाया त्याने यशस्वीपणे पार पाडल्या. त्यानंतरची पोस्टिंग झाली लडाखच्या भारत-चीन सीमेवर. सध्या तेथेच कार्यरत असलेला तो वर्षभराच्या प्रदिर्घ कालावधीनंतर आज रजा घेऊन आपल्या घरी निघाला होता. आईवडिल, पत्नी आणि तीन वर्षांची लेक त्याच्या वाटेवर डोळे लावून बसले होते. पण त्याने मात्र कूच केली होती श्रीनगरच्या दिशेने. श्रीनगरला उतरून त्याने बस बदलली. 

श्रीनगरपासून काही अंतरावर असलेल्या बेलगाम या छोटेखानी गावात बस थांबली.बसमधून उतरत गावात प्रवेश करतांना त्याचे मन भूतकाळाच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागले." पाच वर्षे झाली इथून जाऊन पण इथली सुंदरता तसूभरही कमी झाली नाही." तो स्वगत झाला.निसर्ग देवतेने जणू सौंदर्याची आरासच मांडली आहे येथे.. डोंगरमाथ्यावर असलेले,चारी बाजूंनी चिनार वृक्षांनी सजलेले ते सुंदर गाव म्हणजे त्याच्या गतकाळातील आठवणींचेही नंदनवन.पण... पण म्हणतात इथल्या सौंदर्यालाही शाप आहे लाल रक्ताचा.. 

अगदी कुसुमाग्रजांनी म्हटंल्याप्रमाणे " रक्त आमुच्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते" 

त्याचा गतकाळही तसाच होता. सुंदर पण विरहाच्या वेदनेने नटलेला.. त्याच आठवणीत तिथल्या शहारलेल्या थंडीतही त्याला दरदरून घाम फुटला. डोक्यावरचा घाम टिपत त्याने गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका छोटेखानी दुमजली घरात प्रवेश केला.

त्याला पाहून ५० वर्षांची 'शबाना' आनंदाने म्हणाली," आयो बेटा.. बहोत देर लगाई आने में." 

आपल्या दोन्ही हाताने त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवला तोच बारा वर्षांची शहनाज धावत येऊन त्याला बिलगली. सबंध दिवस त्याने त्यांच्यासोबत आनंदाने घालवला जणू जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असावेत अश्या ओढीने. शबानाने राजवीरसाठी त्याच्या आवडीचा बेत आखला. त्याला कुठे ठेवु अन् कुठे नको असे काहिसे झाले होते तिला. होणारच ना तिचं लेकरू आज कितीतरी दिवसांनी घरी आलं होतं. जाती-धर्माच्या पलिकडलं सुंदर नातं...'आई- मुलाचं'नात...... 

शहनाजनेही रक्षाबंधनाच्या वेळेची राखून ठेवलेली राखी त्याच्या हातावर बांधली. त्यांचा हक्काचा वेळ त्यांना दिल्यानंतर त्याने परतीची तयारी केली. त्याला निरोप देतांना शबानाच्या हृदयातील गतकाळाच्या आठवणींचे ढग दाटून आले अन् क्षणार्धात अश्रू बनून बरसू लागले.

" आज सानिया होती तो......" जड अंतःकरणाने त्या म्हणाल्या. 

छोटी शहनाजसुद्धा आईला जाऊन घट्ट बिलगली. राजवीरच्या डोळ्यांतूनही दोन अश्रू ओघळले. पण जाग्यावरच ते टिपत तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला," अम्मी, हम सबको उसीके लिए खुश रहना है!" 

त्या मायलेकींना राजवीरचे म्हणणे पटले. डोळे टिपत हसतमुखाने त्याला निरोप दिला.

जम्मू काश्मिर पासून दिल्ली, दिल्ली ते मुंबई, मुंबईहून सातारा आणि तेथून त्याचा गावी असा लांबच्या पल्ल्याचा प्रवास बेलगामच्या आठवणीचा थांबा घेत सुरु झाला.....

५ वर्षांपूर्वी सैन्यदलाचे प्रशिक्षण पूर्ण करून २५ वर्षांचा, सळसळत्या रक्ताचा' राजवीर मोहिते' जम्मू काश्मिरच्या संवेदनशील सीमाभागात सैनिक म्हणून रुजू झाला. त्याची छावणी बेलगाम पासून काही अंतरावरच होती. राकट शरिरयष्टीचा, गव्हाळवर्णाचा, निधड्या छातीचा राजवीर तेवढ्याच मृदू मनाचा होता. त्याच्या मनाला भूरळ घातली ती येथील निसर्गसौंदर्याने... जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निसर्गाच्या कुशीत जाऊन क्षणभर विश्रांती घ्यायला तो विसरायचा नाही. 

त्या दिवशी असाच फिरता फिरता तो बेलगामला पोहचला. थंडीचे दिवस होते. सूर्यदेवतेचा नेहमीचाच लपंडाव सुरु होता. प्रकाशाच्या बदलत्या छटा त्या निसर्गाला आणखीन सुंदर बनवत होत्या. एव्हाना हिमवृष्टीही सुरु झाली. डेरेदार वृक्षांवरून ओघळणारे बर्फाचे थर बघण्यात तो इतका मश्गूल झाला की मावळणाऱ्या सूर्याचीही त्याला कल्पना आली नाही. हळूहळू अंधार होऊ लागला तसा तो भानावर आला. 

त्याच दरम्यान हिमवृष्टीने चांगलाच जोर धरला. अंधार असल्याने कुठे जावे हे ही दिसेना. तोच त्याचा पाय घसरला आणि गडबडत तो हिमशिखरावरून खाली कोसळू लागला. पाठोपाठ बर्फाच्या राशी त्याचा पाठलाग करत होत्या. तो हळूहळू त्या बर्फाखाली गाढला जाऊ लागला. तो जीवाच्या आकांताने धडपडत होता,ओरडत होता पण त्या धडपडीत पाय मात्र अजून खाली रुतत होते. तोच गडद अंधारातून बॅटरी घेऊन कोणीतरी धावत त्याच्या दिशेने आले.त्या दोघींनी सारं बळ एकवटत त्याला बाहेर काढले. त्याचे पाय पूर्णपणे अधू झाले होते. धड चालताही येईना. 

दोघींनी आधार देत त्याला घरात आणले. एका कोपऱ्यात शेकोटी पेटवली होती. शेकोटीजवळच त्याचा बिछाना अंथरला. त्याला झोपवत त्याच्या अंगावर उबदार पांघरुण घातले. एक वीस वर्षांची तरुणी त्याच्या पायांना मॉलिश करू लागली. तिच्या आईने लागलीच सूप बनविले आणि त्याला पाजले. त्यांच्या या प्रयत्नांनी त्याला खूप बरे वाटत होते. ती रात्र त्याने तिथेच काढली. सकाळी त्या दोघी उठायच्या आधी तो उठला. लष्करी छावणीची आठवण येताच तो पटकन भानावर आला. त्यांना साधं धन्यवाद बोलावं हेही त्याच्या लक्षात आले नाही. वायुवेगे तो छावणीवर पोहचला. तोवर त्याची शोधाशोध सुरु झाली होती.

तो सारा दिवस थकव्यातच गेला.सामान आवरतांना त्याला त्याचं पॉकेट मिळेना. तेच शोधत असतांना एक सैनिक त्याला भेटण्यासाठी कोणीतरी आले असल्याची बातमी घेऊन आला.

" आपल्याला येथे कोण ओळखत असेल?" स्वत:शीच बोलत तो त्या व्यक्तीजवळ पोहचला. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रात्री त्याला मृत्येच्या दाढेतून वाचविणारी एक मुस्लिम तरुणी होती.

 पाठमोर्‍या उभ्या असलेल्या तिला राजवीर म्हणाला,

" कौन है आप? क्या काम है आपका?" त्याच्या रांगड्या आवाजाने ती दचकली. 

नजर खाली रोखत तोंड त्याच्याकडे वळवत ती म्हणाली,

" साहब... मैं सानिया... कल आप आपका पॉकेट वही घर में छोड आये... वही लौटाने आई हूँ!"असे म्हणत तिने पॉकेट पुढ्यात धरला. तिच्या गोड आवाजात तो क्षणभर सारं विसरला.

" साहब.... ये आपका पॉकेट." म्हणत तिने त्याच्या हातात तो ठेवला आणि परतीचा रस्ता धरला. तिच्या अनाहुत स्पर्शाने तो शहारला.. ती निघून गेली होती पण अजूनही तो त्याच आवाजात अन् स्पर्शात हरवला होता. चेहरा स्पष्ट दिसला नाही पण तिच्या आवाजाने त्याच्या हृदयात एक हवीहवीशी ओढ निर्माण केली.

" आपण त्यांचे आभार मानले पाहिजे" हा बहाणा काढत दुसऱ्या दिवशी तो सानियाच्या घरी पोहचला.

" कोई घर में है?" असे म्हणत त्याने दरवाजाला थाप मारली. मागच्या परसबागेत काम करणारी सानिया मातीने भरलेल्या हाताने दरवाजाजवळ आली. तिला पाहताच तो जाग्यावरच खिळला.

हिमसृष्टीची राणी शोभावी एवढ्या श्वेतवर्णाची,दाटसर भूवया, नाकीडोळी रुबाबदार, अंगावर सैलसर जरतारी विणकामाने नटलेलं 'फिरन', डोक्याला गुलाबी रंगाचा मखमली कसबा बांधलेली ती त्या भूमीची सौंदर्यवतीचं जणू..आणि हा राजकुमार तिच्या सौंदर्यात आकंठ बुडाला. तोच तिची सातवर्षांची छोटी बहिण शहनाज आली. राजवीरला आर्मीड्रेस मध्ये पाहून ति चांगलीच घाबरली. सानियाला बिलगून रडू लागली. तिच्या आवाजाने शबाना धावत बाहेर आली. शहनाजला शांत करत आत घेऊन गेली.इकडे राजवीरला काहीच कळेना.

सानियाने त्याला बसण्याची विनंती केली. बसल्यानंतर सानियाकडे घडलेल्या घटनेची विचारणा केली असता त्याला जे समजले ते अनपेक्षित होते. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तिच्या वडिलांना त्यांच्यासमोरच लष्कराच्या जवानांनी कंठस्नान घातले होते आणि त्याचाच धसका छोट्या शहनाजने घेतला होता.

" तो आपको बहोत गुस्सा आया होगा?" तो कणखर आवाजात म्हणाला.

" हाँ, गुस्सा तो बहोत आया.... लगा वो बंदूक लेकर सारी गोलियाँ अब्बाके सीने में खुद ही डाल दूँ! अब्बाने जो किया वो बहोतही शर्मनाक है जिसकी किमतआजभी हमें चुकानी पड़ रही है! देशद्रोही का कलंक शायद मरने के बादही मिटेगा!" भरल्या स्वरात ती म्हणाली. 

"आपल्याला संकटातून वाचवणारी ती खरचं देशद्रोही असेल." तो स्वगत झाला. या घटनेचा छडा लावायचाच हा विचार करून तो निघाला.

खूप गोष्टींची शहानिशा केल्यावर त्याला कळले की तिघीही निर्दोष आहेत. त्यांना या गोष्टीची काहिच कल्पना नव्हती.

आपल्याला जीवनदान देणाऱ्या त्या निष्पाप तिघींना अभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी तो धडपडला किंबहूना त्याने तो मिळवूनही दिला. शहनाजच्या मनातील आर्मीमॅनची भीती नाहीशी करत तो तिचा जवळचा मित्र बनला. यासाऱ्यांत सानियाच्या मनात त्याच्यासाठी हक्काची जागा निर्माण झाली होती. ज्या हक्काने तो त्यांच्यासाठी सारं करत होता त्याच हक्काने ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. मनमोहक सौंदर्य ल्यालेल्या धरणीपरी ती अन् तिच्यावर ओतप्रोत पसरलेल्या आकाशापरी तो... हळूहळू फुलणारी त्यांची प्रीत.जात,पात,धर्म,भाषा यासाऱ्यांच्या पलिकडली. रोजच ते भेटत होते. एकमेंकाशिवाय त्यांचा दिवसच सरायचा नाही...

त्याचदरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या सीमेपलिकडून कारवाया सुरु झाल्या.त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी राजवीरसह काही जवानांना सीमाभागात तैनात करण्यात आले. सानियाला भेटायचीही उसंत मिळाली नाही आणि तो निघून गेला...

तो गेला अन् सानियाच्या जीवनात भयानक वादळाची चाहूल लागली.. कितीतरी दिवस त्याच्यावाटेवर डोळे लावून ती बसली होती. त्या वादळाची भीषणता अन् राजवीरची काळजी यासाऱ्यांत ती अगतिक होत होती. पाहता पाहता पंधरा दिवस लोटले पण तो काही आला नाही. त्याला काही झालं नसेल ना? ही कल्पना तिला आतून छळत होती. त्याच्याशिवाय जगण्याची इच्छा जणू मरत चालली होती. 

राजवीरसाठी देशकर्तव्य महत्त्वाचे होतो. सीमेवरील बालेकिल्ला लढवता लढवता त्याला तिचा विसर पडला होता.शेवटी जवानांच्या शौर्याला यश आले. पाकिस्तानी सैन्य मागे हटले. परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर जवान आपल्या छावणीवर परतले. परत आल्यानंतर मात्र राजवीरला सानियाची प्रकर्षणाने आठवण येऊ लागली. तिची काय अवस्था झाली असेल काळजीने?आपण तिला न सांगताच गेलो. असा विचार करत लागलीच सानियाच्या घरी पोहचला. 

घराजवळच्या झाडाखाली ती तिच्याच तंद्रीत बसली होती. प्रेमचं ते....वाऱ्याची झुळुक त्याच्या येण्याची चाहूल घेऊन आली. तो डोळ्यांत दिसताच ती वेगाने त्याच्याकडे धावली. त्याला मिठी मारत ती रडू लागली.

" साहब... कहाँ चले गए थे आप? अगर आप को भी कुछ हो जाता तो कैसे जिंदा रहँती मैं!"

ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण त्याला वाक्याचा अर्थ लागला नाही..

" सानिया, I love you. तुमने मुझे जो दुसरा जीवन दिया है उसकी राणी बनोंगी?" तिच्या पुढ्यात बसत हातात बर्फाचा गोळा घेत तो म्हणाला.

भारतमातेचा सुपुत्र तो...त्याला मातीचीच जास्त ओढ म्हणूनच हिमशिखरावरील सफेद मातीवजा बर्फ उचलत त्याने प्रेम कबुल केले.

त्याचं हृदय कधीच तिचं झालं होतं फक्त शाब्दिक होकार बाकी होता. आणि आज मात्र तिने तो दिला. त्याच्या हातातला तो बर्फ तिने ओंजळीत घेतला आणि त्याच्या प्रेमाचा स्विकार केला... 

कितीतरी वेळ त्या झाडाखाली ते दोन जीव एकमेकांत विसावले. राजवीरच्या आनंदाला तिच्या प्रीतीची भरतीच आली होती म्हणूनच की काय तिच्या आर्त डोळ्यांत लपलेले गूढ भाव त्याला ओळखता आले नाहीत... तिच्या माथ्यावर प्रेमाची स्पर्शखूण देत तो परतला. पण ती मात्र तेथेच बसून होती किती तरी वेळ...

जर त्या वेळेस तिच्या मनातील ते बोचरं दुःख ओळखता आलं असतं तर?" या विचारत असतांना गाडी थांबली.

त्याच्या आठवणींच्या गाडीनेही भूतकाळ सोडत वर्तमानाचा रस्ता धरला. आज वर्षभराने गावात आलेल्या राजवीरचे गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले.आता नजर वेध घेत होती ती तिची 'सानियाची'...

घरात येताच त्याच्या पत्नीने वैशालीने त्याचे औक्षण केले. आईने भाकरतुकडा उतरवत त्याची द्रिष्ट काढली. आईवडिलांना नमस्कार करत तो आत शिरला.

" वैशू, सानिया कुठे आहे? दिसत नाही." बॅग ठेवत तो म्हणाला.

तोच ती आली. सानिया त्याची तीन वर्षांची मुलगी... तिला जवळ घेत तो तिच्यात विसावला.एवढ्या दिवस तरसलेली बापाची माया आज लेकीच्या बोबड्या बोलाने तृप्त होत होती. रात्रीची जेवणं झाल्यावर रुममध्ये गेला. वैशालीच्या हक्काचा वेळ तिला देत तिच्या आनंदाचाही भागीदार झाला. वर्षभराच्या आठवणी एका रात्रीत थोड्याच संपणार होत्या. बोलता बोलता तिचा डोळा लागला. तो मात्र अजूनही जागाच होता. भूतकाळातील आठवणींचा प्रवास पूर्ण व्हायचा होता. तो उठला आणि कपाटात जपून ठेवलेलं सानियाचं पत्र बाहेर काढलं. 

त्या प्रवासाला नागमोडी जीवघेणं वळण देणारं ते पत्र.... पत्र वाचतांना त्यातील प्रत्येक शब्द अश्रू बनून त्याच्या डोळ्यांतून वाहत होता.

त्या दिवशी प्रेमाच्या आणाभाका घेऊन तो निघून गेला तिचं दुःख न जाणता...

तो सरहद्दीवर गेल्यावर तिच्या जीवनात आलेलं भयानक वादळ... दहशतवाद्यांनी शहनाजला ओलिस ठेवले. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन लष्कराच्या गोटातील गुप्त बातम्या, गुप्त हालचाली त्यांना पोहचवण्याची सक्ती केली. तिला हेच राजवीरला सांगायचे होते पण तिचा तसा एक प्रयत्न निरपराध शहनाजचा जीव घेऊन गेला असता.

शहनाजच्या गळ्यावर सुरा ठेवत राजवीर राहत असलेल्या लष्करी लावणीची खडान्‌खडा माहिती सानियाकडून जबरदस्तीने काढून घेतली. जवान बेसावध असतांना हल्ला करण्याचा कट रचला. पण त्यांचा हा कट सानियानेच उधळून लावला. एका पत्राद्वारे तिने राजवीरला होणाऱ्या हल्ल्याची कल्पना दिली. प्रसंगावधान राखत जवानांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. असे एकदा नाही तर तीनवेळा झाले. पत्र कोण देतय याचा सुगावा लागत नव्हता.आपल्यापैकीच कोणीतरी दहशतवाद्यांना गुप्त माहिती पुरवत आहे याचा संशय राजवीरला आला. आणि ती व्यक्ती सानियाच आहे हे समजल्यावर मात्र त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. 

एक दिवस तिला भेटण्यासाठी गेलेल्या त्याला तिच्या हालचालींचा संशय आला.जंगलात दहशतवाद्यांच्या छावणीकडे जात असतांना तिचा पाठलाग केला... तिला दहशतवाद्यांशी बोलतांना बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.दहशतवाद्यांवर गोळीबार करत तो पुढे सरकला. त्यांनी ही त्याला प्रतिउत्तर द्यायला सुरवात केली. तोच सानिया बालेकिल्ल्यासारखी त्याच्या समोर उभी राहिली .त्याच्या अंगावर येणारी प्रत्येक बंदुकीची गोळी सानियाने स्व:ताच्या शरिरावर झेलली. शरिराची चाळण झाली. शुभ्र हिमावर तिच्या लाल रक्ताचा सडा सांडला. तोच भारतीय सैन्येची एक तुकडी बंदुकीच्या गोळ्यांचा मारा करत त्या दहशतवाद्यांवर तुटून पडली. साऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालत शहनाजची सुटका केली. सानियाची चिठ्ठी त्याच्या हातात दिली. घडलेल्या साऱ्या घटना, तिची अगतिकता, तिनेच पाठवलेली पत्रे, दहशतवाद्यांच्या छावणीची माहिती सारं सारं त्या पत्रात होतं.पत्र हातात पडायच्या आधीचं त्याने तिला देशद्रोही घोषित केले होते हे आठवून राजवीरच्या डोळ्यांतून अश्रुधारा ओघळू लागल्या. धावत जाऊन त्याने सानियाला आपल्या कुशीत घेतले पण तोपर्यंत सारं संपल होतं.त्याचं प्रेम देशासाठी बलिदान देत अमर झालं होतं.. त्याला परत एकदा जीवनदान देत कायमचं सोडून गेलं होतं.....

तोच त्याच्या पाठीवर हात ठेवत वैशूने त्याला त्याच्या आठवणींतून भानावर आणले चिठ्ठी बघत ती म्हणाली,

" तुमच्या डोळ्यांत नेहमीच सानिया भेटते मला... निरागस अन् तुमच्यावर अमाप प्रेम करणारी..."

तिचे ते शब्द ऐकून पुन्हा राजवीरचा कंठ दाटून आला तिच्या मांडीवर डोके ठेवत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.....

हिमसृष्टीच्या राजकन्येची अधुरी प्रेमकहाणी अमर झाली.....

समाप्त. 

*********************

कथा आवडल्यास नक्की लाइक करा आणि प्रतिक्रिया कळवा.