अधुरी एक कहाणी (भाग ०२)

Based on a Girls life and Her Incomplete Story

(मागील भागात आपण पाहिलं , कोमलला भेटण्यासाठी चालु असेलेले निशांतचे वेगवेगळे प्रयत्न चालु होते, पण कोमलने त्याकडे दुर्लक्ष केलं , आता वाचा पुढे...)

निशांतच मेसेज करणं सुरूच होत, आधी शुभ सकाळ आणी शुभ रात्री यावर थांबणारे मेसेज आता एखादी कविता अथवा शेरो शायरी पर्यंत पोहचले होते, कोमल नेहेमीप्रमाणे बघुन दुर्लक्ष करत होती. एक-दोन वेळेस तिने मैत्रिणीमार्फत सांगूनही पाहिलं पण निशांतवर त्याचा काही परिणांम झाला नाहीं. 

शिकवणी मध्ये कोमलची एक मैत्रीण होती, कोमलला ती जवळची वाटायची कोमल आपलं गाऱ्हाणं तिच्यासोबत शेअर करायची, अभ्यास किंवा घरातील गोष्टी शेअर केल्यावर कोमलला बर वाटायचं. एक दिवस शिकवणी चालु असताना पाटील सरांनी एक प्रश्न विचारला, निशांतने हात तर वर केला पण त्याला उत्तर सांगता आलं नाही; तोच प्रश्न त्यांनी मग कोमलला विचारला ; हे सारं अनपेक्षित असल्याने कोमल थोडी गोंधळली पण नंतर परत स्वतःला सावरत तिने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निशांतला विचारलेला प्रश्न आपल्याला विचारल्यावर थोडी चिडलीच होती ती पण तिचा नाईलाज होता.

असं एकदाच झालं असतं तर ठिक होतं, पण पुढे वारंवार असं होऊ लागला, पाटील सर शिकवणी मध्ये दर आठवड्याला परीक्षा घ्यायचे आणी जो पहिल्या ०३ मध्ये येईल त्याचं नाव फळ्यावर लिहायचे. दुसऱ्याच आठवड्यात झालेल्या परीक्षेत कोमल आणी निशांतला चांगले गुण मिळाले नियमाप्रमाणे दोघांची नावं फळ्यावर लिहली गेली. आता मात्र कोमलला हे सारखे घडणाऱ्या संयोगाबाबत शंका येऊ लागली होती. कुणीतरी हे जाणुन-बुजुन करतंय असं तिला वाटु लागलं होत. 

कसं असतं , एखादी नावडती गोष्टसुद्धा कालांतराने सतत समोर असल्याने किंवा संपर्कात आल्याने आवडायला सुरवात होते, कोमलच नेमकं तसच होत होतं. एरवी निशांतच तिच्याकडे पाहणे, तिला मेसेज करणे, तिच्या मैत्रिणीच तिला त्याच्या नावाने चिडवणं हे सगळं तिला अचानक कुठेतरी आवडायला लागलं होतं. खोलवर मनात कुठेतरी ते हवंहवंसं वाटु लागलं होतं. पाटील सरांच्या शिकवणीत सरांच प्रश्न विचारणे असो किंवा फळ्यावर नाव लिहणे असो आता तिला पाहिल्यासारखं चीड येतं नव्हती उलट मनापासुन चेहऱ्यावर एक हास्य उमटवून जायचं. आणी कोमल एखाद्या स्वप्नात हरवल्यासारखी त्या दुनियेत रमून जायची.हे सगळं घडत असताना एक दिवस घडलेल्या अनपेक्षित घटनेने कोमलचं आयुष्य बदलवून टाकलं .

कोमलपेक्षा मोठ्या असलेल्या बहिणीचा म्हणजे शीतलचा नुकताच साखरपुडा पार पडला होता, सगळं काही छान चालु होत, पुढे सगळे लग्नाच्या तयारीत मग्न असताना एक दिवस अचानक नवऱ्या मुलाकडून "हे लग्न होऊ शकत नाही " , असा निरोप आला. कोणाचाच यावर विश्वास बसत नव्हता; कोमलच्या बाबांनी लगेचच फोन लाऊन नवऱ्या मुलाला भेटायला बोलावलं. पुढे काय वाढुन ठेवलं आहे?? याची कुणालाच कल्पना नव्हती, ती रात्र कुणालाच झोप लागली नाही ...
(क्रमशः)
=====================================

(काय बरं झालं असेल नेमकं? जाणुन घेण्यासाठी वाचा कथेचा पुढील भाग....)

कथा आवडत असल्यास कंमेंटद्वारे नक्की कळवा, लेखकाच्या नावाशिवाय लेख कुठेही पब्लिश करू नये. 

©स्वप्नील घुगे

🎭 Series Post

View all