Login

अधुरी एक कहाणी (भाग ०१)

The Story Is Based on a Silent Girl, and her Incomplete Story

सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस असल्याने हवेत थोडा गारवा जाणवत होता. रोजच्या पेक्षा लवकर आवरून गाडीची वाट पहात कोमल स्टँड वर उभी होती. शाळा घरापासुन दुर असल्याने शाळेला बस ने जावं लागतं असे. नावाप्रमाणेच कोमल अगदी नाजूक होती, लांबसडक केस , गोरा वर्ण, उंच, सडपातळ बांधा, सडसडीत नाक , कायम केसांची लांब वेणी असायची.  जितकं छान अन टापटीप तिचं राहणं होतं तितकाच छान आणी शांत स्वभाव देखील होता. स्वतःहुन कधी कुणाच्या वाटेला जायचं नाही, उगाच कोणाच्या भानगडीत पडायचं नाही, आपल्या दुनियेत फार समाधानी होती ती. पटकन कुणाच्या नजरेत न येता पण छान राहाता येतं हे तिला छान जमायचं. 

तिचा हाच स्वभाव निशांत ला आवडला होता. आजकाल तिच्या येण्या-जाण्याकडे निशांत लक्ष ठेऊन असायचा, रोज शाळेत गेल्यावर वर्गातील खिडकीतून तिच्याकडे पहात राहायचा, ती ब वर्गात तर हा क वर्गात शिकत होता. पण वेळ मिळेल तस काही न काही निमित्ताने हा तिच्या वर्गात दाखल व्हायचा कधी मित्रांना भेटण्याच निम्मित करून तर कधी डबा खायच्या बहाण्याने वर्गात जायचा. कोमलच्या हळु हळु हे लक्षात येऊ लागलं, मुलींना निसर्गाने एक अदृश्य शक्ती दिलेली असते आपल्याकडे कोण कसं बघत आहे हे त्यांना बरोबर कळत असतं. पण मुळात कुणाच्या वाटेला जायचं नाही अशा स्वभावाने तिने यात फारसे लक्ष घातले नाही. दिवसामागुन दिवस निघुन गेले, पुढे हळु हळु शालेय क्रीडा स्पर्धा आणी त्यानंतर वार्षिक परीक्षा असं झाल्यावर शाळेला सुट्टी लागली न कोमल हे सगळं विसरून गेली.

पुढील वर्षी शाळा सुरू झाल्यावर अचानक तोच चेहरा कोमलच्या वर्गात दाखल झाला, "असं मधेच वर्ग बदलता येतो का गं?" कोमल ने मैत्रिणीला विचारलं , पण तिला काही सांगता आलं नाही. इकडे निशांतच कोमल कडे नजर चुकवुन पाहणं , उगाच काहीतरी विषय काढुन तिच्या इतर मैत्रिणीसोबत बोलणं असं चालु असायचं. एक दिवस शाळेत येत असताना अचानक कोमलच्या फोन मध्ये सुप्रभात असा मेसेज आला, खाली नाव पाहिलं तर निशांत असं लिहलं होत, तिला उगाच विषय वाढवायचा नसल्याने नेहमीप्रमाणे तिने दुर्लक्ष केलं आणी उत्तर न देता फोन ठेऊन दिला. 

समोरून काही उत्तर न आल्याने निशांत विचार करत राहिला, "तिला आवडलं नसेल तर??, उगाच मेसेज केला; तिने चिडुन भांडण केलं तर??" असं काहीतरी मनात येऊ लागलं, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे निशांत थोडं मनोमन सुखावला होता.

खरं सांगायचं तर त्याला ती मनापासुन आवडत होती, तिने बोलावं म्हणुन त्याने त्याचा वर्ग देखील बदलुन घेतला होता; इतकच करुन न थांबता ती जिथे शिकवणीला जाते त्या ठिकाणी शिकवणी सुद्धा लाऊन घेतली. कदाचीत कुठेतरी भेट होईल आणी भेटीच रूपांतर मैत्री मध्ये होईल असं त्याला वाटायचं. पण कोमल शी मैत्री करणं इतकं सोपं नव्हतं हे एव्हाना त्याच्या चांगलंच लक्षात आलं होतं. 

(क्रमशः)
===================================
पुढील भागात वाचा निशांत आणी कोमल यांचं बोलणं होतं का? ते एकमेकांना भेटतील का!!

कशी वाटतं आहे कथा? कंमेंट द्वारे जरूर कळवा, लेखकाच्या नावाशिवाय पोस्ट कुठेही शेअर करू नये.

© स्वप्नील घुगे

🎭 Series Post

View all