( मागील भागात आपण वाचलं एका अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेने कोमलचं आयुष्य बदलून गेलं.. काय होती ती घटना वाचा पुढे..)
ठरल्याप्रमाणे मग नवरा मुलगा आणी त्याचे नातेवाईक कोमलच्या बाबांना भेटायला आले, कोणत्याही प्रकारचा मानपान न स्विकारता त्यांनी थेट विषयाला हात घातला, " आम्हाला ०२ दिवसांपूर्वी एक फोन आलेला, फोन केलेल्या व्यक्तीने मला भेटायला बोलावले होते, प्रत्यक्षात भेट झाल्यावर त्याने तुमच्या मुलीसोबत (शीतलसोबत) असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे, हे ऐकल्यानंतर माझी या लग्नाच्या बाबतीत पुढे जाण्याची इच्छा नाही " एवढं सगळं एका वेळीस सांगुन त्याने लग्नाच्या बाबतीत नकार दर्शविला..
कोमलच्या घरच्यांची अवस्था पायाखालची जमीन सारकल्यागत झाली, कोणालाही खरेच वाटेना; "तुमचा नक्की काहीतरी गैरसमज झालेला आहे, आपण निवांत चर्चा करून हा प्रश्न सोडवू " इति कोमलचे बाबा..
पण त्याची काहीही ऐकण्याची मनस्थिती नाही हे पाहुन घरच्यांचा नाईलाज झाला, जास्त वेळ न घालवता तो तिथुन निघुन गेला. इकडे अजूनही घरातले एकमेकांच्या तोंडाकडे पहात राहिले, नंतर वडिलांनी शांतपणे शीतलला समोर बसवून तिला घडलेल्या प्रसंगाबद्दल विचारले. शीतल सुरवातीला थोडी घाबरून गेली पण घरच्यांची झालेली अवस्था पाहून तिने थोडी हिम्मत एकवटत सांगितलं, " हो हे खरं आहे की मला एक मुलगा आवडतो, परंतु तुमचे आशिर्वाद आणी संमती असल्याशीवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही " अससुध्दा सांगितले ; सरतेशेवटी घरच्यांचा या सर्व प्रकारास विरोध असल्याने शीतलला झालेला सर्व प्रकार विसरून नव्याने सुरवात करावी लागली, पुढे थोड्याफार अडचणींना सामोरे जात वर्षभरात तिचं दुसऱ्या ठिकाणी लग्न लाऊन दिल गेलं..
वरील घटनेचा कोमलच्या मनावर फार परिणाम झाला, एकतर शीतल मोठी ताई असल्याने असं काही करेल असे वाटले नव्हते, अजुन दुसरी बाब अशी की शीतलच्या अशा वागण्यामुळे आधीच शिस्तप्रिय असलेले आई बाबा आता अजुन जास्त प्रमाणात कठोर झाले होते, त्यामुळे कोमल आणी शीतल वर अनेक निर्बंध नकळतपणे लादले गेले. कोमलचे तर शालेय शिक्षण पुर्ण होतं नाही तोवर लगेचच स्थळ पहायला सुरवात केली जाऊ लागली.
नुकतेच कोमलला निशांतच्या रूपाने कुणीतरी पहिल्यांदा आवडू लागलं होतं, कुणाशीतरी आपण बोलावं अस वाटु लागलं होतं परंतु त्याचदरम्यान झालेल्या या सर्व घटनाक्रमाकडे पाहताना तिने स्वतःला सावरत घरच्यांना न आवडणारी कोणतीही गोष्ट न करण्याचा निर्णय घेतला, आपल्या कडून काहीही चुक होणार नाही याची पुरेपूर काळजी ती घेऊ लागली होती. सगळं काही मनाविरुद्ध होत असूनही कोमलचा नाईलाज होतं होता, आणी ती पुनः पुन्हा कठोर राहण्यासाठी मनाची समजुत घालत होती, एक दिवस पुन्हा निशांतने मेसेज केला, यावेळी कोमलला राहवलं गेलं नाही तिने यावेळी त्याला उत्तरं द्यायचं ठरवलं आणी मोबाईल मध्ये लिहण्यास सुरवात केली..
(क्रमशः)
===================================
काय बरं लिहलं असेल कोमलने?? वाचा पुढील भागात ..
कथा आवडल्यास कंमेंटद्वारे नक्की कळवा, लेखकाच्या नावाशिवाय हा लेख कुठेही पब्लिश करू नये.
© स्वप्नील घुगे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा