Jan 26, 2022
स्पर्धा

अधुरी एक कहाणी 6

Read Later
अधुरी एक कहाणी 6

आपण मागील भागात पाहिले की, मिस्टर अमोल हे त्या मुलीच्या कॉलेजमध्ये जाऊन तिची चौकशी काढली.. तेव्हा तिथे समजले की, तिचे नाव अवंतिका होते आणि ती मेडिकल स्टूडंट होती.. तिने आत्महत्या केली होती.. मग त्यांनी तिच्या क्लासची आणि वर्गातल्या मुला मुलींची घेतली.. आता पुढे..

राजने सांगितल्याप्रमाणे रोहनला ऑफिसमध्ये बोलावून घेतले.. तसा रोहन आला..
"तू अवंतिकाला कधीपासून ओळखतोस.." अमोल

"लहानपणापासून ओळखतो सर.. ती आमच्याच गावांमध्ये राहत होती.." रोहन

"मग तिच्याबद्दल तुला जे काही माहिती आहे ते सांग.." अमोल

"हो सर.. अवंतिका एक लाघवी व हुशार मुलगी होती.. आई बाबांची एकुलती एक.. तिचे वडील ती शाळेमध्ये असताना हे जग सोडून गेले.. त्यानंतर तिच्या आईने खूप कष्ट करून तिला शिकवले होते.. अवंतिका दिसायला सुंदर आणि स्वभावानेही खूप गोड मुलगी होती.. माझ्या वर्गात असल्यामुळे आमची तशी छान मैत्री देखील होती.. इथे होस्टेलला देखील तिच्या आईने माझ्या विश्वासावर पाठवून दिले होते.. ज्या हॉस्टेलमध्ये तिने आत्महत्या केली तिथे तिच्यासोबत माझी बहीण देखील राहत होती.. त्या चौघीजणी रूममध्ये राहत होत्या.. माझी बहीण अवंतिका पेक्षा दोन वर्षांनी लहान होती.. पण एकाच गावातील असल्यामुळे त्यांची तशी छान मैत्री होती..

त्या चौघी कुठे जायचे झाले? काही करायचे झाले की एकत्र मिळून करत होते.. अगदी त्यांची घट्ट मैत्री झाली होती.. पण नंतर काय झाले? हे मला देखील माहित नाही.. अवंतिकाला आत्महत्या का करावीशी वाटली? याची मला काहीच कल्पना नाही.. तिने आत्महत्या केल्यावर माझ्या बहिणीचे शिक्षणसुद्धा आम्ही बंद केले आणि तिचे लग्न लावून दिले.." रोहन

"अवंतिकाच्या आईने तुझ्यावरती जबाबदारी दिली होती.. तर ती तू व्यवस्थित का पार पडली नाहीस? तू तिच्याकडे लक्ष का दिले नाहीस?" अमोल

"सर मी लक्ष देत होतो.. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे माझे लक्ष होते.. पण ते अवंतिकाला काही आवडले नाही.. एका क्षणी ती माझ्याशी खूप भांडली आणि तू काही माझा बाॅडीगार्ड नाहीस.. असे तिने मला ठणकावले.. त्यामुळे मी थोडे लक्ष देणे कमी केले.." रोहन

"तिची आणखी कुणाशी जवळीक होती का? तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? कोणावर संशय वगैरे.." अमोल

"नाही सर.." रोहन

"बरं.. तुमची बहिण आणि तिच्या रूममध्ये राहणाऱ्या दोन मैत्रिणी यांची चौकशी करायला उद्या त्यांना बोलावून घ्या.." अमोल

दुसऱ्या दिवशी रोहन तिच्या बहिणीला आणि त्या दोन मैत्रिणीला घेऊन ऑफिसमध्ये आला.. अमोलनी त्यांना बसायला सांगितले आणि रोहन च्या बहिणीला विचारले, "अवंतिका बद्दल तुम्हाला जी काही माहिती असेल ती सगळी माहिती सांगा.."

मग रोहनची बहिण प्रिया म्हणाली, "अवंतिका खूप चांगली मुलगी होती सर.. अगदी सुरुवातीपासूनच आमची चौघींची छान मैत्री जमली होती.. अगदी मनातले सगळे आम्ही एकमेकांशी शेअर करत होतो.. मनात काहीच ठेवून घेत नव्हतो.. अभ्यास असो किंवा शॉपिंग असो किंवा जेवण असो सगळं काही एकत्रच करत होतो.. आमची दंगामस्ती कायम सुरू होती आणि अभ्यासही तितकाच जोमाने सुरू होता.. सगळं सुरळीत चालू होतं.. पण आमच्या मैत्रीला कोणाची तरी नजर लागली बघा.."

" का? काय झालं?" अमोल

"तिच्या आयुष्यात सुयश नावाचा एक मुलगा आला.. सुरुवातीला आमचाही मित्राचा होता.. एक श्रीमंत बापाचा मुलगा.. तो दिसायला हँडसम होता.. अभ्यासातही हुशार.. तसा तो आमचा सिनियर.. पण त्याची नजर फक्त अवंतिकावर होती.. सुरुवातीला त्यांचे कॉलेजमध्ये फक्त बोलणं होई.. नंतर नंतर ते दोघे हळूहळू चोरून बाहेर देखील भेटू लागले.. त्यातच त्यांचे एकमेकांवर प्रेम झाले.. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते.. सुयशला अवंतिका अगदी सुरुवातीपासून आवडत होती.. पण अवंतिकाला सुयश मात्र नंतर नंतर सहवासाने आवडू लागला.. अवंतिकाला त्याच्या शिवाय दुसरे काहीच दिसेना.. दिवस रात्र फक्त त्याचाच विचार करत होती.." अवंतिकाची दुसरी मैत्रीण जयश्री म्हणाली..

"अच्छा, सुयश तर.." अमोल

" हो तर कॉलेज चुकवून ते पिक्चरला जायचे, बागेत फिरायला काय जायचे? अवंतिका इतकी हुशार मुलगी तिचा अभ्यासातून लक्षच निघाले होते.. इतकी जबाबदार मुलगी अशी बेजबाबदार झाली होती.. तो सुयश कसा होता? त्याचा स्वभाव कसा होता? याची काहीच आम्हाला माहिती नव्हती.. आम्ही प्रत्येकवेळी अवंतिकाला अडवण्याचा प्रयत्न केला.. तिला समजवण्याचा प्रयत्न केला.. पण तिने आमचे काहीच ऐकले नाही.." अवंतिकाची आणखी एक मैत्रीण निशा म्हणाली..

"सर.. ती आमच्या गावची होती.. तिच्या आईला मी काही सांगेन म्हणून ती माझ्याशी काही बोलत देखील नव्हती.. आम्हाला तिची काळजी वाटत होती.. पण तिने गैरसमज करून घेतला.. कधी अगदी मनमोकळेपणाने बोलणारी अवंतिका कुठे तरी हरवून गेली होती? मनात काहीबाही साठवून ठेवत होती.. तिला काही विचारले की ती ओरडायची.. सुयशशी गोड गोड बोलायची आणि आमच्याशी रागात.. आम्हालाही तिचा राग यायचा.. पण आपलीच मैत्रीण आहे म्हणून आम्ही काही मनावर घेत नव्हतो.. फक्त आम्हाला इतकीच काळजी होती ती चुकीचे पाऊल टाकू नये.." प्रिया

"मग पुढे काय झाले? सुयशने तिला धोका दिला.. की तिचा खून केला?" अमोल

"नाही सर.. एक दिवशी तर खूप विचित्र घडले.. अवंतिका रडतात रूमवर आली.. आम्ही तिला खूप विचारलं.. पण तिने काहीच सांगितले नाही.." जयश्री

"मग काय झालं?" अमोल

क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..