आपण मागील भागात पाहिले की, सुजित, प्रशांत, प्रणित आणि आकाश चौघेजण परीक्षा संपली म्हणून चार दिवसांसाठी गोव्याला निघाले होते.. प्रणितने अक्षयकडून कार घेतली होती आणि ते चालले होते.. सगळे व्यवस्थित चालू असताना मध्येच त्यांची कार बंद पडली.. आता पुढे..
प्रणितने एका टू व्हीलर वरून जाणाऱ्या व्यक्तीला विचारले की, "दादा इथे गॅरेज कुठे आहे का?"
"इथून पाच किलोमीटर अंतर गेल्यावर एक गॅरेज आहे.. तिथे तुम्ही जा.." ती व्यक्ती
"बरं थँक्यू.." प्रणित
आता पाच किलोमीटर अंतरापर्यंत कार कशी घेऊन जायची? याचा ते विचार करत होते.. धक्का देऊन तर काही जाऊ शकत नाही आणि तिथला नंबरही कोणाला माहित नाही.. त्या व्यक्तीला देखील माहीत नव्हता.. आता पुढे काय करायचे? या विचारात ते चौघे इकडे तिकडे बघत बसले होते..
इतक्यात त्यांना एक ट्रक येताना दिसला.. मग त्यांनी हात करून ट्रकला थांबवले आणि त्या ड्रायव्हरला विचारले, "दादा आमची गाडी पंक्चर झाली आहे.. तुमच्या ट्रकला जोडून गॅरेज पर्यंत घेऊन जाल काय?"
"गॅरेज कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला?" ट्रक ड्रायव्हर
"पाच किलोमीटर अंतरावर आहे.." सुजित
"बरं जोडा मग गाडी ट्रकला आणि चला.." ट्रक ड्रायव्हर
त्यांनी ट्रकला एका दोरीने कार बांधली.. आणि सगळेजण जाऊन ट्रकमध्ये बसले.. ट्रक ड्रायव्हर जाड आणि धिप्पाड होता.. त्याने डोळे मोठे करून बघितले की सगळे घाबरून जायचे.. त्यामुळे हे चौघेही थोडे दबकतच त्या ट्रकमध्ये जाऊन बसले.. एक तर जागा सुनसान आणि त्यात असा ट्रक ड्रायव्हर सगळे घामाघूम झाले होते..
ट्रक ड्रायव्हरने ट्रक चालू केले आणि एकदम जोरात गाणी लावली.. एकदम गाण्याचा आवाज ऐकून आकाश ओरडला.. ते बघून ट्रक ड्रायव्हर, "काय झाले.." असे मोठ्याने म्हणाला.. "काही नाही, काही नाही.." आकाश थोडा घाबरतच म्हणाला..
थोड्यावेळाने तेथे एक गॅरेज त्यांना दिसले.. मग त्यांनी ट्रक थांबवायला सांगितले आणि गॅरेज मध्ये जाऊन त्यांना कार बिघडल्याचे सांगितले.. त्यानंतर त्यांनी ट्रक ड्रायव्हरचा निरोप घेतला.. ट्रक गेल्यानंतर त्यांना थोडे हलके वाटले आणि गाडी दुरुस्त करण्यासाठी गॅरेजमध्ये ठेवून ते थोडे इकडे तिकडे फिरू लागले..
एकतर ती ओसाड जागा होती.. गावापासून बराच लांब होती आणि हायवेपासून थोडी आत होती.. त्यामुळे तेथे त्यांना काहीच मिळणार नव्हते.. आता किती उशीर होणार? किती वेळ लागणार? याची कुणालाच कल्पना नव्हती.. बराच वेळ झाला तरी गाडी काही दुरुस्त होत नव्हती.. आता सगळ्यांनाच कंटाळा आला होता आणि भूक पण लागली होती.. पण आता करणार काय?
दुपार होऊन गेली.. आता मात्र कुणाला राहवेना.. भूक तर जाम लागली होती.. सगळे फक्त एकमेकांकडे बघत होते.. पण काय करणार? इतक्यात गाडी दुरुस्त झाली म्हणून गॅरेटचा मालकाने हाक मारली.. सगळ्यांना खूप आनंद झाला.. त्यांनी गॅरेजवाल्याला पैसे दिले आणि गाडी घेऊन ते सुसाट हायवेला लागले.. एखादे हाॅटेल बघून सगळ्यांनी पोटभर जेवण केले आणि मग गोव्याकडे रवाना होऊ लागले..
पोट भरल्यामुळे आता सगळ्यांना थोडे बरे वाटत होते.. सगळेच जाम खुश होते आणि आता त्यांनी घाटसुध्दा पार केला होता.. थोड्याच वेळात त्यांची गोव्यामध्ये एन्ट्री होणार होती.. सगळे अगदी गाणी म्हणत, टाळ्या वाजवत गोव्याकडे चालले होते.. त्यांच्या प्लॅनिंग नुसार ते दुपारी पोहोचणार होते.. पण गाडी खराब झाल्यामुळे त्यांना गोव्यात पोहोचायला रात्र झाली..
आता फायनली ते गोव्यामध्ये येऊन पोहोचले.. बरीच रात्र झालेली होती.. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले आणि मग राहण्यासाठी लॉज शोधू लागले.. ते सुट्टीचे दिवस असल्यामुळे त्यांना लवकर लाॅज कुठे भेटेना.. त्यात त्यांचा बराच वेळ गेला.. शेवटी एका ठिकाणी कशीबशी त्यांना एक रूम मिळाली.. सगळेच खूप दमले होते.. साधारण आठ-नऊ तासाचा प्रवास.. पण त्यांचा दिवस सगळा गेला.. गाडी बंद पडल्यामुळे सगळेच थोडे नाराज होते.. पण आता गोव्यात येऊन पोहोचले होते त्यामुळे त्यांची ती नाराजी कुठल्याकुठे पळून गेली.. गोव्यात पोहोचल्यावर पहिल्यांदा त्यांनी घरी फोन करून कळवले..
रूमची सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून तिथे आधार कार्ड वगैरे जमा करून थोडे पैसे भरून त्यांनी आपापले सगळे सामान रूम मध्ये आणून ठेवले.. मग सगळ्यांनी आंघोळ वगैरे करून ड्रेस चेंज करून एक फेरफटका मारायला बाहेर पडले.. तसे सगळेच दमले होते.. पण गोवा म्हटल्यावर त्यांना एक वेगळाच हुरूप आला होता.. त्यामुळे कोणी कंटाळा करून रूममध्ये झोपले नाही.. थोडा आजूबाजूचा परिसर फिरून येऊ म्हणून बाहेर पडले..
फेरफटका मारून रूममध्ये यायला बराच वेळ लागला.. आल्या आल्या सगळेजण अंथरुणावर पडले.. सगळेच दमले असल्यामुळे त्यांना पडल्यापडल्या झोप लागली.. पण आकाशला नवीन जागा असल्यामुळे झोप येत नव्हती.. तो इकडे तिकडे बघू लागला..
तो तसाच पडून राहिला आणि त्याचे लक्ष आरशाकडे गेले, तर तिथे त्याला एक आकृती दिसली.. त्याने थोडे निरखून पाहिले तर तिथे कोणीतरी असल्याचे त्याला जाणवले.. त्याने आजूबाजूला पाहिले तर तेथे कोणीच नव्हते.. आणि आरशात प्रतिबिंब दिसत होते.. तो एकदम घाबरला आणि ओरडला.. त्याच्या आवाजाने मुले उठून बसली..
"काय रे आक्या, काय झालं ओरडायला? झोप की आता.. कसली झोप लागली होती आणि उठवलास.." प्रणित.. सगळे जण त्याच्याकडे बघितात तर तो घामाघूम झाला होता.. "अरे आक्या काय झालं?"
"तिथे आरशामध्ये.." घाबरलेल्या आवाजातच आकाश म्हणाला..
"आरशामध्ये काय?" सुजित
"तिथे कोणीतरी आहे?" आकाश
प्रणित उठून तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हते.. "दारू पिलास का काय? झोप आता.." असे म्हणून सगळे त्याला ओरडत झोपी गेले.. आकाश पण तोंडावर पांघरून घेऊन देवाचे नाव घेत झोपला..
"काय असेल ते? कोण असेल ती व्यक्ती? असे एक ना अनेक विचार करत आकाश झोपी गेला..
आरशामध्ये काय होते? ते आपण पुढील भागात पाहू..
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा