अधुरे स्वप्न 5

Aaj *kimay herbal pharma* che launching hote.Mitali Ani Mansi doghinchyahi chehryavar kimay chya adhurya swapnanchya purtatecha aanand zalkat hota.

अधुरे स्वप्न ५
अष्टपैलू लेखक महासंग्राम
पहिली फेरी कथा मालिका


   आपल्या पुढच्या प्रोजेक्टला मूर्त रूप देण्यासाठी किमयने जागेचा शोध सुरू केला. काही दिवसातच त्याला अगदी मनाजोगती अशी जागा मोक्याच्या ठिकाणी मिळाली. जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने अगदी हवा तो भाव देऊन त्याने ती जागा खरेदी केली.


पुढे एका चांगल्या आर्किटेक्टच्या मदतीने त्याने त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट चा प्लान तयार केला. त्याच्या स्वप्नपूर्तीच्या प्रोजेक्टचा जो आराखडा होता त्याची अंदाजे किंमत ऐकल्यानंतर आपण या दृष्टीने पाऊल टाकावं की नाही असं पहिल्यांदा त्याला वाटलं. पण मुळातच अतिशय महत्त्वकांक्षीध असलेला किमय आपल्या विचारांवर ठाम राहिला.

आर्थिक बॅकग्राऊंड त्याचा तेवढासा स्ट्रॉंग नव्हता. पण त्याने आणि मितालीने स्वतःच्या कष्टा मधून बरीच मिळकत मागे टाकली होती. पण प्रोजेक्टचा खर्च एवढा अवाढव्य होता की लोन घेण्या वाचून पर्याय नव्हता.
सगळे सोपस्कार पार पाडत मग त्याने बँकेमधून लोन घेतले.


या सर्व प्रक्रियेदरम्यान मिताली सोबतच त्याची लेक मानसीला तो सुद्धा सामील करून घ्यायचा. तिच्या भावी स्वप्नांच्या वाटचालीच्या दिशेने पूर्व पायाभरणी ती त्याला वाटायची.

"आपल्यासारख्या सामान्य माणसाला जर मोठे स्वप्न बघायचे असतील तर काही प्रमाणात कर्ज घेतल्याशिवाय त्या स्वप्नांची पूर्ती होऊ शकत नाही" हे हे वाक्य तो नेहमीच बोलायचा.


पोरीला व्यावसायिक  बनवायचं म्हणजे पुढे बँकेशी  संबंध येणारच तर त्याची सुरुवात आतापासूनच कां नाही? असा विचार करत त्याच्या प्रत्येक व्यवहाराच्या वेळी लेकीला घेऊन जायचा. तिथल्या संपूर्ण चालणाऱ्या व्यवहाराची तिला इत्यंभूत माहिती द्यायचा.


त्या प्रोजेक्टचे काम जोमाने सुरू झाले. किमय आणि मिताली दोघांनीही त्या प्रोजेक्टसाठी स्वतःला अगदी झोकून दिले होते . घेतलेल्या लोनचे ईएमआय भरण्यासाठी दोघेही अगदी जिवाचे रान करत होते.प्रोजेक्टचे काम अर्ध्यावर आले अन् अचानकच सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला.


सारे जग अगदी ठप्प पडले. पैशांची आवकही थोडी कमी झाली. मिताली ला स्थिर पगार असल्याने बरे होते पण खाजगी प्रॅक्टिस चा ओघ मात्र थोडा कमी झाला होता. त्यातल्या त्यात लॉक डाऊन मुळे प्रोजेक्टचे काम अक्षरशः बंद पडले होते. ऐन भरात असलेला प्रोजेक्ट थंड बस्त्यात पडला होता.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर अगदी हाहाकार  माजवला होता. अनेक जवळची नात्यातली मंडळी सुद्धा या लाटेत काळात आड गेली होती.

हळूहळू लाट ओसरली पण आयुष्यावरच्या तिच्या पाऊलखुणा विरायला अजून थोडा वेळ होताच. पूर्ववत सगळे सुरू झाले होते पण प्रत्येक गोष्टीची पहिलेची रया मात्र अजून आली नव्हती.


पुन्हा नव्या जोशाने त्या उभयतांनी प्रोजेक्टवर लक्ष घालणे सुरू केले. प्रोजेक्टचे काम तर जोरात सुरू होते पण सगळीकडेच असलेली बाजारातली मंदी त्याचा फटकाही त्या दोघांच्या येणाऱ्या उत्पन्नावर झाला होता. मधल्या काळात थोडे थकलेले ईएमआय चे हप्ते भरता भरता फारच ओढाताण होत होती.


"मिताली काम तर पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले पण हे थकलेले ईएमआयचे हप्ते भरताना मात्र फारच ओढाताण होते नाही? अगदी एखादं अवजड शीव धनुष्य आपली ताकद नसतांना पेलायला गेलो की काय असं वाटतंय अलीकडे."

त्या गोष्टीचा ताण खरंतर मितालीलाही होताच पण उसणं अवसान आणून ती त्याला धीर द्यायची.

"कशाला एवढी चिंता करता तुम्ही? हो आपण दोघं आहोत ना ,एकदा प्रोजेक्ट सुरू झालं की बघा मग कसलीच ददात राहणार नाही. तुमच्यासारख्या हिम्मतवान माणसाने हिम्मत हारली तर मी कुणाकडे पाहायचं बरं? मला पूर्ण विश्वास आहे सगळं नीट होणार."

तिने धीर दिला की तो पूर्ववत व्हायचा आणि पुन्हा उत्साहाने कामाला लागायचा. पण वर वरून तो दाखवत नसला तरी आत मधून कर्जाची चिंता मात्र त्याला भेडसावत असायची.

आता तर प्रोजेक्ट अगदी पूर्णत्वाला आला होता. पुढच्याच महिन्यात उद्घाटन करण्याचा मानस त्याने मिताली जवळ व्यक्त केला होता.


"बस आता अगदी थोडा फायनल टच दिला की आपलं सगळं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. आपलं स्वप्न सुद्धा आपल्या एखादया अपत्या सारखं असते नाही का? अगदी त्याचं बीज रोपण केल्यापासून तर ते पूर्णत्वाला जाईपर्यंतचा सगळा प्रवास अगदी बाळ जन्माला येणार हे माहीत झाल्यापासून तर त्याच्या जन्मापर्यंतच्या प्रवासासारखा असतो.आता आपलं हे दुसरे अपत्य तर जन्माला आल्यातच आहे बस आता त्याच्या बारशाचा विधी तेवढा बाकी राहिलाय. तोही लवकरच पूर्ण करूयात नाही का!"

"हो ना अगदी खर आहे तुम्ही म्हणता ते ,खरंच स्वप्नाच्या पूर्तीचा आनंद काही वेगळाच असतो नाही का..!"

असंच  दोघांचं इतक्यात तर सर्व बोलणं त्या नवीन प्रोजेक्ट बद्दलच असायचं अगदी पुढच्या महिन्यातली तारीख उद्घाटनासाठी ठरवली गेली.


आज किमयचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा केलेला त्याला अजिबात आवडायचा नाही. त्यामुळे फक्त बर्थडे विश करून मिताली आणि मधुरा गप्प बसल्या.


किमयला  आज सकाळपासूनच फार अस्वस्थ वाटत होतं. अगदी गळल्यासारखं, चक्कर आल्यासारखं, मधातूनच दरदरून घाम फुटणं. अशी लक्षणे त्याला जाणवत होती. मधामधात तो थोडा हायपोग्लायसेमिक व्हायचा त्यामुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष करून फक्त ग्लुकोज इंटेक त्याने सुरू ठेवले. तरी त्याची अस्वस्थता काही केल्या कमी होईना. पण त्याने घरी याची काहीच भणक सुद्धा लागू दिली नाही.


संध्याकाळी मात्र तो मिताली आणि मानसीला म्हणाला, आज माझा वाढदिवस नाही का साजरा करणार तुम्ही.

आजवर कधीही वाढदिवस साजरा न करणारा किमय ने अशी इच्छा व्यक्त करताच माय लेकी दोघी अगदी चकित  झाल्या. पटापट दोघी बाजारात गेल्या ,त्याच्यासाठी नवीन कपडे घेऊन आणले, केक आणला, खायचं घेऊन आणलं आणि अगदी धडाक्यात त्याचा बर्थडे त्यांनी साजरा केला. आज तिघे फारच खुश होते. खुशीतच दिवस सरला.


रात्रीही किमयची  अस्वस्थता काही कमी झालेली नव्हती. कशीतरी रात्र निघाली पण सकाळी उठून जेव्हा तो वॉशरूमला गेला  तेव्हा त्याला इतकं अस्वस्थ वाटलं की हे सगळं शुगर लेवल लो झाल्यामुळे नक्कीच नाही हे त्याला जाणवलं.


"मिताली मला अजूनही अस्वस्थ वाटत आहे मी येतो थोडं बाजूला कार्डिओलॉजिस्टला दाखवून असं म्हणून तो घरातून बाहेर पडला.


किमय डॉक्टर कडे तर गेला पण त्याची अस्वस्थता इतकी वाढली होती, डॉक्टर आले आणि त्यांनी पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की हा तीव्र हार्ट अटॅकचा झटका आहे. त्यांनी त्यावर काही उपाययोजना सुरू करण्याआधी च तो कोलॅ‌प्स झाला. अगदी क्षणात सगळं संपलं


डॉक्टरांनी त्याच्या निकटवर्तीय मित्रांना फोन करून त्याबद्दल कळवलं. काही किमयच्या पार्थिवाकडे गेले तर काहीं घरी गेले. मितालीला हे सगळं सांगावं कसं? सगळ्यांसमोरच मोठा प्रश्न होता.


"मिताली किमय आत्ताच हार्ट अटॅक ने गेला."

"नाही कसं शक्य आहे हे? हो आत्ताच ते घरून चालत डॉक्टर कडे गेलेत आणि तुम्ही सांगताय की त्यांना अटॅक आला. नाही नाही हे शक्य नाही."


मितालीला हे समजवणं, तिच्या मनाची त्यासाठी तयारी करणं फारच अवघड होतं. आणि का नसावं? अगदीच शॉकिंग होतं हे तिच्यासाठी अन् लेकिसाठी.

कुठल्याही स्त्रीवर उद्भवू नये असा प्रसंग तिच्या आयुष्यात आला होता. कळत होतं पण मन ग्वाही देत नव्हतं. काय करावं ,काय नाही तिचं मन अगदी सैरभैर झालं होतं.


आधीपासूनच अखंड डोळ्यातून वाहत असलेल्या अश्रुधारा ....
अन् किमयचे पार्थिव घरी येताच तिने फोडलेला हंबरडा सगळ्यांचे काळीज कापीत गेला होता.

तिला कसं आवरावं, तिचं सांत्वन कोणत्या शब्दात करावं सगळ्यांपुढेच मोठा प्रश्न होता.

लेक मानसीची अवस्था ही काही वेगळी नव्हती. अजाण, अल्लड, किशोरवयीन पोर ती. त्याही अवस्थेत आपल्या आईला सावरायचा प्रयत्न करत होती. अगदी दगडालाही पाझर फुटावा असा प्रसंग होता तो.

तेराव्यापर्यंत लोकांची साथ होती, नातेवाईक येऊन जाऊन विचारायचे पण या पुढची वाट मात्र आपल्यालाच एकटीला चालायची आहे हे मितालीला आता कळून चुकले होते.

किमयचे दुसऱे अपत्य त्याचे *अधुरे स्वप्न*आता तिला खुणावत होते.

या अति महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ला तिने सोडून द्यावे, या प्रोजेक्टमुळे च किमयचा बळी गेला. असा सल्ला सगळेच तिला देत होते.

पण एका महत्त्वाकांक्षी नवऱ्याची तितकीच महत्त्वाकांक्षी बायको होती ती.

तिने ठरल्यावेळी नवीन प्रोजेक्टचे उद्घाटन केले. तिने तेवढ्यात जिद्दीने आणि जोमाने त्या प्रोजेक्टवर काम करणे सुरू केले.

एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केली की सहकार्यासाठी अनेक हात पुढे येतात त्याचा अनुभव तिला काही दिवसातच आला.


किमयने  काढून ठेवलेल्या मोठ्या एलआयसी मुळे असलेल्या लोनचा बराच भार हलका झाला होता. आणि आता तर मितालीने पूर्णपणे स्वतःला झोकून दिले होते.

लेकीलाही तिने व्यावसायिक शिक्षण देऊन एमबीए करायला लावले. लेकीच्याही मनात आपल्या लाडक्या पित्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची सुप्त इच्छा होतीच.

तिने तिच्या वडिलांनी स्वतः मेहनत घेऊन तयार केलेले काही आयुर्वेदिक औषधी योग कल्प त्यांची निर्मिती करून त्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून आपल्या प्रिय पित्याचं अधुर स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं होतं.


आज *किमय हर्बल फार्मा* चं लॉन्चिंग होतं.
मिताली आणि मानसी दोघींच्याही चेहऱ्यावर किमयच्या अधुऱ्या स्वप्नाच्या पूर्ततेचा आनंद झळकत होता.

किमय सुद्धा वरून समाधानाने बघतच होता की .....,
त्याचे  *अधुरे स्वप्न* पूर्ण होताना....!


© डॉ. मुक्ता बोरकर आगाशे
     मुक्तमैफल

🎭 Series Post

View all