अधुरे स्वप्न ४
अष्टपैलू लेखक महासंग्राम
कथा मालिका फेरी एक
मानसी हळूहळू मोठी होत होती. दिवसागणिक तीच्या गुण वैशिष्ट्यांनी तिचं रूप अजूनच उजळून येत होतं. तिचं लडिवाळ बोलणं, तिची हुशारी, तिचं गोंडस दिसणं या साऱ्यांमुळे ती शाळेत सुद्धा सगळ्या शिक्षकांची आवडती होती.
सगळ्या गोष्टीत भाग घेऊनही अभ्यासात सुद्धा तीअव्वल नंबर वर असायची त्यामुळे ती शिक्षकांच्या गळ्यातलं ताईतच होती. तिच्या बोल घेवड्या स्वभावाने मित्र-मैत्रिणी मध्ये सुद्धा तिचाच बोलबाला असायचा.
मानसी जशी जशी मोठी मोठी होत होती तसा किमय आपल्या स्वप्नांचे बीज रोपण मानसीच्या मनात करत होता. महत्त्वकांक्षेचे नवनवे पैलू तो तिला दाखवत होता.
मोठमोठ्या व्यावसायिक उद्योजक यांच्या कथा तो तिला नेहमीच ऐकवत राहायचा. मुलींचं या क्षेत्रा त कमी प्रमाणात असणं आणि त्यासाठी मानसीने ती कसर भरून काढायसाठी एक व्यावसायिक बनावं असं तो तिला नेहमी सांगायचा.
"बेटा तुला पण असं मोठं यशस्वी उद्योजक बनायचं आहे ,तुला खूप मोठा बिझनेस करायचा आहे ,मला तुला एक यशस्वी व्यवसायिक म्हणून बघायचं आहे."
तिच्या चिमुकल्या डोळ्यात तो त्या स्वप्नांचं बीज पेरायचा अन् त्याची लाडकी लेक मानसी त्या स्वप्नांच्या बिजाला सत्यात उतरवण्याचे स्वप्न बघायची.
मिताली ची स्त्री रोगाची आयुर्वेदिक प्रॅक्टिस अतिशय भरात होती. मिताली चा बोल घेवडा स्वभाव, स्त्रियांच्या मनातलं गुपित शिताफीने उकलून घेण्यात ती वाक् बगार होती. त्यामुळे तिच्या पेशंटला तिच्याविषयी आपलेपणा वाटायचा .मनमोकळेपणाने आपल्या मनातील गुज त्या मानसीला सांगायच्या आणि त्याचाच फायदा मानसीला त्यांच्या उपचारासाठी व्हायचा. शिवाय तिचा आयुर्वेदाचा अभ्यासही तेवढा दांडगा होता.
"मिताली, मला तुझं फार कौतुक वाटते. किती सुंदर संवाद साधतेस तू तुझ्या पेशंटशी, जणू काही तू त्यांच्या जीवनाचा एक भाग आहेस, किती मोकळेपणाने त्या तुझ्याजवळ आपलं मन उलगडतात ना. आणि तू सुद्धा किती अभ्यास पूर्ण त्यांच्या प्रत्येक समस्येची उकल करतेस. आय एम रियली प्राउड ऑफ यू."
"किमय, हे सगळं मला तूच शिकवले आहेस. आजाराच्या मुळाशी जाऊन त्याची उकल कशी करायची, त्याच्यावर आयुर्वेदाच्या सिद्धांताने कसा विचार करायचा, हे मी हे मी तुझ्याकडून शिकले ना..! पांचभौतिक चिकित्सेसाठी तर तूच मला गुरुस्थानी आहेस. आणि तू जेव्हा माझे एवढे कौतुक करतोस ना तेव्हा अगदी भरून पावल्या सारखं वाटते."
"हे यश माझं नसून तुझं आहे किमय, ही स्वप्न मला तूच दाखवली आहेस आणि त्या स्वप्नांच्या वाटेवर चालताना तुझी मला अखंड साथ आहे म्हणून तर हे सारे शक्य होऊ शकलं ना!"
असेच एकमेकांच्या कर्तबगारीचं भरभरून कौतुक करत दोघांचे सहजीवन अतिशय उत्तम रित्या चाललं होतं.
किमय ची प्रॅक्टिस मात्र तेवढी भरात नव्हती.चांगलं नॉलेज असूनही त्याचा रुक्ष स्वभाव आणि विखारी बोलणं यामुळे पेशंट त्याच्याकडे यायला बिचकायचे. पण त्याची प्राध्यापकाची नोकरी सुरू असल्याने त्याला फारसा काही फरक पडत नव्हता.
तसेही पती-पत्नी दोघेही जेव्हा व्यस्त असतात तेव्हा मुलांकडे दुर्लक्ष होतं. दोघांपैकी एकाने तरी मुलांकडे लक्ष द्यायला हवं असं त्याचं मत होतं. स्वतःच बालपण जेव्हा तो आठवायचा तेव्हा त्याची स्थिती अगदी हलाहलाचे घोट पचवल्यासारखी व्हायची. आपल्या वाट्याला जे करंटे पण आलं त्याची झळही आपल्या लेकीला बसू नये याची तो पुरेपूर काळजी घ्यायचा.
मिताली तिच्या कार्यक्षेत्रात अतिशय व्यस्त असल्याने मानसीच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याने स्वखुशीने अंगावर घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला लेकीचा व लेकिला त्याचा प्रेमळ सहवास जास्तीत जास्त लाभायचा.
कॉलेजच्या कामासाठी जेव्हा त्याला परगावी जावं लागायचं तेव्हा मानसी अतिशय हिरमुसली व्हायची.
"पप्पा तुम्ही कशाला जाता तिथे, तुम्हाला जायलाच हवा का? पण जायचं असेल ना तर तुम्ही लवकर परत या."परगावी जाताना ती त्याला बजावत राहायची. तो वापस येईपर्यंत ती त्याची चातकासारखी वाट पाहायची.
मानसीचे सारे विश्वच तिच्या पप्पांनी व्यापून टाकले होते. त्या बापलेकीचं
सोबत असणं हा त्यांच्या भाव विश्वाचा अनमोल ठेवा होता.
मधल्या काळात आयुर्वेद व्यासपीठ सारख्या आयुर्वेदाला वाहिलेल्या संस्थेशी तो जोडल्या गेला संस्थेच्या बऱ्याच कामांचा व्याप त्याच्यावर घातला गेला. संपूर्णपणे आयुर्वेदाला वाहिलेल्या संस्थेशी जोडले गेल्याचा आनंद किमय ला होताच.
"किमय या जिल्ह्यात जर या चळवळीची पाळंमूळं रोवायची असतील तर या संस्थेच्या अध्यक्षपदी तुला विराजमान व्हावे लागेल. तेव्हाच कुठे ही चळवळ जोर धरेल आणि त्याचा वटवृक्ष निर्माण होईल." असं म्हणत
बघता बघताच त्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा त्याला देण्यात आली.
त्यानिमित्ताने व्यासपीठचे वर्कशॉप आयोजित करणे, चर्चासत्र घेणे, जनरल प्रॅक्टिस मध्ये ओपीडी लेवलला आयुर्वेद कसं वापरता येईल यावर सेमिनार घेणे अशा अनेक कामांमध्ये तो हिरिरीने भाग घ्यायचा.
त्याच्या भागातील व्यासपीठाचे कार्य पूर्ण नेण्यात त्याचा मोलाचा सहभाग होता. अनेक जागी गेस्ट लेक्चर देण्यासाठी सुद्धा त्याला आमंत्रित केलं जायचं.
सगळं अगदी सुरळीत सुरू असताना अचानक प्राध्यापक पदाविषयीचे काही नियम कठोर झाल्याने त्याचा फटका बऱ्याच प्राध्यापकांना बसला. त्यातच कारवाईचा भाग म्हणून काही प्राध्यापकांना कामावरून काढण्यात आले. नेमक्या त्या प्राध्यापकांमध्ये किमयचा सुद्धा समावेश होता.
ह्या निर्णयामुळे मात्र त्याचे भाव विश्व पार बदलून गेले होते. मुळात प्राध्यापकाची नोकरी त्याला आवडायची . त्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाचं भांडार रीतं करण्यासाठी, ते ज्ञान पुढे प्रवाहित करण्यासाठी प्राध्यापका एवढी चांगली नोकरी दुसरी कोणतीच नाही असं त्याचं ठाम मत होतं. तो थोडा हिरमुसला. आता वयाच्या या टप्प्यावर पुन्हा नोकरी शोधण्याची वेळ त्याच्यावर आली होती.
जवळपासच्या कॉलेजेस मध्ये त्यांनी विचारणा केली. पण या भागात त्या पोस्टला दिले जाणारे वेतन अगदीच अत्यल्प होते. एवढ्या कमी पगारावर नोकरी करून आपण आपल्या शिक्षणाचं अवमूल्यन तर करत नाही ना? असं त्याला बरेचदा वाटायचं.
मग त्याचं दुसरं मन म्हणायचं "अरे नेहमी तू पैशाचाच विचार करशील का? त्या पैशापेक्षाही आपण विद्यार्थ्यांना जे ज्ञानदानाचे कार्य करतो, त्यांच्यात आयुर्वेद रुजवतो हे जास्त मोलाचं आहे.
शेवटी त्याने मनाचा कौल मान्य केला आणि जवळच्याच कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या नोकरीची नव्याने सुरुवात केली. सोबतच त्याला मिळणाऱ्या सवडीचा सदुपयोग करत आयुर्वेदासाठी स्वतःच्या लेव्हलवर
काहीतरी भरीव करण्यासाठी पावले उचलण्याच्या दृष्टीने सुरुवात केली.
आयुर्वेदिक औषधांची वेगळी रस शाळा स्थापन करण्याचे त्याने ठरविले. त्याला असलेल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत काही औषधी कल्पनांचे निर्माण करण्याची ही त्याची योजना होती. एवढं सगळं करायचं म्हणजे पैसा आणि जागेची निकड होतीच. आता त्याची वाटचाल सुरू होती त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गाने....!
पुढे काय झालं ते बघूया कथेच्या पुढच्या भागात.
© डॉ.मुक्ता बोरकर आगाशे