अधुरे स्वप्न 2

Ya saglyacha kimay chya bhav vishwavar kay parinam zala asel te baghuya kathechya pudhchya bhagat

अधुरे स्वप्न २
अष्टपैलू लेखक महासंग्राम
पहिली फेरी _ कथामालिका


उदास झालेले प्रदीप आणि नवीन तिथून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर अचानक गावावरून आलेले किमयचे बाबा त्यांना भेटले.

त्यांच्या हातात असलेला केक आणि त्यांचे उदासलेले चेहरे बघताच त्यांना नेमके काय घडले असेल याची कल्पना आली.

मित्रांचं किमय वरचं प्रेम त्यांना कळत होतं पण  किमय मात्र वाढदिवस साजरा करणार नाही हे त्यांना पक्क माहीत होतं. पोरांच्या चेहऱ्यावर "किमय नी का  असं केलं असेल?"हा प्रश्न त्यांना उघड उघड दिसत होता.

"पोरांनो ,तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण खरं सांगू का आजवर किमय नी कधीच त्याचा वाढदिवस साजरा केला नाही. बाळांनो, दुर्दैवी आहे रे पोर! तो जन्माला आला आणि त्याची आई गेली, याचं दुःख सतत त्याच्या मनाला सलत असते त्यामुळे आजपर्यंत कधीच त्याने वाढदिवस साजरा केला नाही. मीही चुकलोच बाळांनो, कळत नकळत का होईना त्याच्या आईच्या जाण्याच्या दुःखात मी एवढा गुरफटून गेलो की किमयवर माझ्याकडून अन्याय होतोय हे मला कळलेच नाही."

त्याच्या बाबांकडून खरं कारण कळल्यावर प्रदीप आणि नविनच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला. अन पुन्हा त्याच्याविषयी एक वेगळेच करुणामयी मित्र प्रेम त्यांच्या मनात दाटून आले. पुन्हा चुकूनही कधी त्याला दुखवायचं नाही याची त्या दोघांनी नेहमीच काळजी घेतली.

बघता बघताच बारावीचं वर्ष आलं. सगळेच जोमाने अभ्यासाला लागले. किमय तर अगदी झटझटून अभ्यासाला लागला. कोणत्याही अन्य शिकवणीशिवाय त्याने स्वतःच फार मेहनत घेतली.

निकाल लागला, किमय  शाळेतूनच नव्हे तर पूर्ण तहसील मधून पहिला आला होता. डॉक्टर बनण्यासाठी लागणाऱ्या पीसीबी ग्रुप मध्ये मात्र त्याला 92 टक्के मिळाले. अगदी थोड्या मार्काने त्याचे मेडिकलचे ऍडमिशन हुकले. त्यामुळे त्याने आयुर्वेदाचा पर्याय निवडला.


एका नामांकित आयुर्वेद कॉलेजमध्ये त्याचे पुढचे शिक्षण सुरू झाले. किमयचा  मूळचा भिडस्त स्वभाव अन त्यातल्या त्यात त्याच्या स्वभावातला विखार यामुळे कोणाशीही त्याची मैत्री लवकर व्हायची नाही. पटकन कुणाशीही जुळवून घेणे त्याला जमायचे नाही. आपण आणि आपले काम भले असा तो आपल्याच कोषात राहायचा. काही मोजकेच पण त्याला समजून घेणारे अशाच मुलांशी तो मैत्री करायचा.

इथे तो मन लावून सगळे शिकून घेऊ लागला. त्याच्या पॅथीचे जेवढे सखोल ज्ञान त्याला मिळवता येईल तेवढे मिळवायचा तो प्रयत्न करू लागला. त्याच्या एकलकोंडेपणाचा त्याला त्याच्या अभ्यासासाठी फायदाच व्हायचा. इतर मुलं-मुली जेव्हा मौज मस्ती करत राहायचे तेव्हा तो आपला वेळ अभ्यासात सत्कारणी लावायचा. गुळाभोवती जसे मुंगळे जमा होतात तसेच त्याच्या हुशारीमुळे आणि त्याला असलेल्या सखोल ज्ञानामुळे आपोआपच वर्गमित्र त्याच्याशी मैत्री करू लागले.

असं कोणाच्याही भानगडीत न पडणारा किमय पण वर्गातली एक हसरी दिलखुलास सगळ्यांशी आपण होऊन मैत्री करणारी मुलगी मधुरा हिचं त्याला विशेष आकर्षण वाटायचं. 

"हॅलो  कसा आहेस तू, नीट आहेस ना"असं ती जेव्हा त्याला पण विचारायची तेव्हा त्याला ते खूप वेगळं वाटायचं.

आजपर्यंत कोणत्याच मुलीशी त्याने आपणहून मैत्री केली नव्हती. आज एखादी मुलगी स्वतःहून त्याच्याशी बोलत होती. नकळतच त्याच्या मनात 'कुछ कुछ होता है' सारखं व्हायला लागलं.

बोलता बोलता कधीही तिचा विषय निघाला की किमय अगदी उत्साहात येऊन बोलायचा. कधीही कोणाही बद्दल काहीही न बोलणारा किमय मधुराचा विषय निघाला की फारच उत्साहित व्हायचा. त्याच्यातला हा बदल त्याच्या मित्रांना जाणवला आणि ते सगळे मधुरा वरून त्याला चिडवू लागले.


अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर असं काहीसं त्याच्या बाबतीत झालेलं. का कोण जाणे पण मधुरा बद्दल त्याला आकर्षण वाटू लागलं.

मधुराची मात्र गोष्टच वेगळी होती. ती सगळ्यांशी सारख्याच मोकळेपणाने बोलायची ,दिलखुलास हसायची. तिच्या त्या मोकळ्या बोलण्याचा तसा कोणी वेगळा अर्थ काढायचे नाहीत. कारण तो तिच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. पण तिच्या या स्वभावाचं किमयला फार अप्रूप वाटायचं. तिचं हसणं बघून जणू ती आपल्यासाठीच हसत आहे असं त्याला वायायचं. तसेही 'हसली की पोरगी फसली' असा जनरल फंडा असतो तसेच तो मानून चालायचा.


मधुरा मात्र मनाने अगदी नितळ होती. तिच्या मनात कुणाबद्दलच काही विशेष भाव नव्हता. सगळ्यांशी ती सारख्याच आपुलकीने बोलायची. पण जेव्हा तिला कळलं की सगळेजण किमयला तिच्या नावाने चिडवतात तेव्हापासून तिच्या मनात नकळतच त्याच्याबद्दल अढी निर्माण झाली.
किमयशी तर तिने बोलणेच बंद केले. आणि त्याचा ती राग राग करू लागली.

एकदा तर त्याने तिला काही नोट्स मागितले ,तिने ते त्याला दिले पण तिच्या बोलण्यातला विखार बघून तो मात्र चरकलाच.

मधुरा तशी स्वभावाने खराब नव्हतीच पण आपल्या मोकळ्या बोलण्याचा कुणी गैरफायदा घेते हे तिला पटत नव्हतं . तिला किमय बद्दल काहीच वाटत नव्हते त्यात तिचा तरी काय दोष होता?त्याचाच परिणाम ती त्याच्याशी अगदीच फटकून वागू लागली.


किमय मात्र याचा वेगळाच अर्थ घेऊन बसला. आधीपासूनच प्रेमाच्या बाबतीत पारखे असलेल्या त्याला मधुराचे वागणे फारच खटकले. पुढे मधुरा एका दुसऱ्याच मुलाच्या प्रेमात पडल्यावर तर त्याचा प्रेमावरचा विश्वासच उडाला.

पण खरी गोष्ट अशी होती की मधुराला किमयबद्दल तशा कधी भावनाच नव्हत्या. ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली होती तो तिचा बालपणापासूनचा मित्र होता. नेहमीच्या संपर्कातून ते कधी एकमेकांकडे आकर्षित गेले आणि कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्यांचे त्यांनाच कळले नव्हते पण तो मुलगा बिझनेस बॅकग्राऊंड असल्याने मधुरा फक्त पैशामुळे त्याच्या प्रेमात पडली अशीच किमय ची भावना होती.

"काही नाही रे प्रेम बीम सगळं झूठ असतं बरं ,पोरींचं खरं प्रेम फक्त पैशावर असतं, कुणाच्या भावना ,कुणाचं मन पायदळी तुडवलं जाईल याचा कधी त्या विचारच करत नाहीत" मित्रांशी बोलताना हे वाक्य तो वारंवार बोलायचा

"अरे, मधुराचं नाव काढलं की तुझा अगदीच नूर पालटायचा म्हणून आम्ही तुला तिच्या नावाने चिडवायचो. पण तिच्याकडून मात्र आम्हाला कधीच तसा रिस्पॉन्स दिसला नाही. तुला ती आवडली म्हणून तू तिला आवडलाच पाहिजे असं कुठे असतं का." असं मित्रांनी त्याला खूपदा समजवून पाहिलं पण त्याच्या मनाने तिच्याबद्दल जो ग्रह केला होता तो मात्र कायमच राहिला.

या सगळ्याचा किमयच्या भाव विश्वावर काय परिणाम झाला असेल ते बघूया कथेच्या पुढच्या भागात

© डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे
 मुक्तमैफल

🎭 Series Post

View all