Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अधुरे स्वप्न१

Read Later
अधुरे स्वप्न१

अधुरे स्वप्न१
अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी पहिली- कथा मालिका

 


                        किमय जन्माला आला न त्याच वेळी त्या प्रसूती मधे त्याची आई गेली. नियती च्या या अजब खेळत या लहानग्या जीवाची जणू कुचंबणा च झाली. त्याच्या जन्माचा ना कुणाला आनंद झाला, ना अप्रूप वाटले. याउलट  कमनशिबी,आईच्या जीवावर उठलेले पोर म्हणूनच त्याची अवहेलना झाली.

                   सामान्य  कुटुंबीय असलेले त्याचे आई वडील. खाऊन पिऊन सुखी समाधानी. वडील, आई वडिलांचे एकुलते एक अपत्य तर आई तिच्या पाच सहा भावंडांमध्ये धाकटी..! त्यामुळे पोटची लेक जाऊनही तिकडच्या कुणी लेकीच्या या आईविना लेकाची कधी मायेने विचारपूस केलीच नाही. याउलट लेक गेल्यानंतर त्यांचे या घराशी जणू संबंधच संपल्या गत झाले होते.

किमय च्या जन्माआधी मोठा भाऊ अक्षय आणि बहीण प्रतीक्षा यांचा जन्म झालेला. किमय च्या रुपात अजून एक पुत्र त्या दाम्पत्याला लाभला होता जी खरं तर आनंदाची गोष्ट होती पण त्याच्या आईच्या जाण्याने जो दुःखाचा पहाड तिथं कोसळला होता त्यासमोर त्याच्या जन्माचा आनंद कुणाला झाला नव्हता अन् नकळत एक उपेक्षित जीणे त्त्याच्या वाट्याला आले होते.


त्याच्या आईच्या जाण्याचे दुःख त्याच्या बाबांसाठी खूप मोठे होते ,आपल्या या दुःखात आपले नकळत का होईना त्या लहानग्या कडे दुर्लक्ष होत आहे याची जाणीव त्यांना कधी झालीच नाही. एकतर त्यांनी त्यानंतर कधी दुसरे लग्न केले  नाही. लहानगा किमय समोर आला की त्यांना पत्नीची आठवण व्हायची अन् मग  ते त्याला मुद्दाम टाळू लागायचे.नाही म्हणायला मोठा दादा, ताई आणि आजी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे आणि जपायचे पण आई वडिलांच्या मायेची पोकळी जी त्याच्या जीवनात राहिली ती राहिलीच!


गोरा गोमटा,लडिवाळ किमय आईच्या तोंडवळ्यावर गेलेला मुळातच खूप गुणी आणि हुशार...! पण आई वडिलांच्या प्रेमापासून त्याचे वंचित असणे यामुळे त्याच्या स्वभावात एक प्रकारची कटुता भरून राहिलेली. देव वगैरे काही नाही जगात. "मी देवाचे काय वाईट केले  म्हणून देव माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेऊन गेला? "असा सहज प्रश्न वारंवार त्याला पडायचा. सहजा सहजी कुणावर त्याचा विश्वास नाही बसायचा. एक असुरक्षिततेची भावना त्याच्या मनाला सतत पोखरत असायची. 


"बिच्चारा ,आईच्या प्रेमाला पारखा झाला,नका त्रास देऊ रे त्याला. "असं सहज जरी कुणी बोललं  तरी ते त्याला लागायचं. उगीच त्याची अशी कुणी कीव करावं हे त्याला अजिबातच पटायचं नाही.


जसजसा तो मोठा होत गेला त्याच्या  व्यक्तिमत्त्वाच्या कक्षा रुंदावत गेल्या .त्याची अतिशय कुशाग्र बुध्दी, ताच्या स्वभावातील तुटकपणा  यामुळे  इतर कुठेही न गुंतता यशाचे नव नवे पायदान तो चढू लागला. त्याच्या अशा अव्वल असण्याने शिक्षकांच्या गळ्यातील तो  ताईत बनला अन् प्रत्येकच परीक्षेत तो यशाची नवी शिखरे गाठू लागला. पण एवढे सगळे होऊनही त्याच्या स्वभावातील विखार मात्र तसाच राहिला.


चौथा आणि सातवा वर्ग दोन्ही च्या स्कॉलरशिप मधे तो तहसील मधून पहिला आलेला. यावेळी तर त्याचे दहावीचे वर्ष होते. तो जोमाने  अभ्यासाला लागला होता. एका छोट्या गावात राहून कसलीही शिकवणी न लावता तिथेही त्याने उत्तम यश संपादन केले होते.

आता पुढच्या शिक्षणासाठी त्याची रवानगी तालुक्याच्या गावी होणार होती. एरवी त्याचे बाबा त्याला जवळ घेऊन त्याचा लाड करत नव्हते पण त्याच्यासाठी सगळ्या सुख सुविधा पुरवण्यासाठी ते तत्पर होते. त्यांनी लगेच तिथल्या कनिष्ठ महाविद्यालयात त्याची एडमिशन करून दिली. त्याची योग्य व्यवस्था लावून त्याला ते तिथे ठेवून ते निघाले. बाबांनी आज पहिल्यांदा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला  अन् त्यांच्या डोळ्यात त्याच्यासाठी असलेले पाणी बघून  नकळत तो त्यांच्या कुशीत शिरला .

आज पहिल्यांदा त्याला पित्याचे प्रेम,त्यांचा प्रेमळ आश्वासक स्पर्श याची जाणीव झाली होती अन् आजवरच्या दुःखाची बोच अंशभराने का होईना पण कमी झाली होती. आता तो अतिशय जोमाने अभ्यासाला लागला होता.डॉक्टर बनायचे त्याचे स्वप्न त्याला सत्यात उतरवायचे होते.

सुरवातीला या नव्या जागी स्थिर स्थावर होतांना त्याला बराच त्रास झाला होता. एकतर खेडेगावातून आल्याने त्याचे अतिशय साधे राहणीमान,त्याची बोलतांना हेल काढून  बोलायची सवय ,त्याच्या स्वभावातील तुटकपणा सगळ्यांसाठी हसण्याचा विषय होते.
 सुरुवातीला तर त्याला अगदी तो अजब बंगल्यातील प्राणी असल्याचा फील यायचा पण हळूहळू  या सगळ्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करायला शिकला.एकटेपणा त्याच्या खरं तर स्वभावातच भिनला होता पण तरीही वर्गातील एका चांगल्या मुलाने त्याच्याशी मैत्रीचे बंध जोडले अन् काही प्रमाणात का होईना तो हळूहळू प्रवाहात येऊ लागला.


त्याची बुद्धिमत्ता, त्याची चिकित्सक वृत्ती त्याचा प्लस पॉइंट ठरली अन् काही  दिवसातच त्याच्यावर हसणारी मुलं त्याच्याशी मैत्री करायला धडपडू लागली.काही दिवसातच तो वर्गातील अव्वल मुलगा समजला जाऊ लागला.


त्याच्या मित्र प्रदीपशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध बनू लागले. प्रदीप आणि नवीन आधीपासूनच चांगले मित्र होते. हळूहळू किमयची सुद्धा या दोघांशी चांगलीच गट्टी जमली. लाजरा बुजरा किमय आता वर्गातल्या सगळ्यांशीच बोलायला लागला.


प्रदीप ,नवीन आणि किमय यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होऊ लागली. किमयचा वाढदिवस जवळच होता. प्रदीप आणि नवीने किमय घरापासून दूर असल्याने त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं. दोघांनी मिळून अगदी जय्यत तयारी केली. संध्याकाळी दोघेही किमयच्या 
रूम वर पोहोचले. पोहोचताच दोघांनीही एका सुरात" हॅपी बर्थडे टू यू ,हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर किमय हॅप्पी बर्थडे टू यू" असं गातच एन्ट्री केली. प्रदीप च्या हातात असलेला केकचा बॉक्स पाहून  किमय चिडून गेला.

"बंद करा हे सगळं मला नाही आवडत बर्थडे सेलिब्रेट करायला..!"

त्याचा तो आविर्भाव पाहून प्रदीप आणि नमिता अगदी गोंधळून गेले.

"अरे असा काय करतोस आम्ही मित्र ना तुझे, मग आम्ही नाही तर कोण सेलिब्रेट करणार बरं, एवढाही हक्क नाही का रे आमचा तुझ्यावर?"

"हे बघा मित्रांनो प्रश्न तुमच्या मैत्रीचा नाही, तुमचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे, पण वाढदिवस मी कधी सेलिब्रेट करत नाही आणि कधी करणारही नाही. प्लीज का ते कधी विचारू नका."

तुम्हाला वाईट वाटेल पण आणलेला हा केक परत घेऊन जा आणि पुन्हा कधी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नका, एक मित्र म्हणून एवढे कराल माझ्यासाठी?" 

त्याच्या या अविर्भावाने पुढचे बोलणेच खुंटले होते. मित्राने अटच अशी टाकली होती की प्रदीप आणि नवीन आले पावली परत गेले.

काय झाले असेल नेमके याची उत्सुकता दोघांनाही लागून राहिली होती पण नेमके कारण कळण्याचा मार्गच खुंटला होता.

काय झाले असेल पुढे, या घटनेचा त्यांच्या मैत्रीवर काही परिणाम झाला असेल का हे बघूया कथेच्या पुढच्या भागात


© मुक्तमैफल
डॉ. मुक्ता बोरकर -आगाशे

 


           


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mukta Borkar- Agashe

Private Practitioner

मी एक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असून मला कथा आणि कविता लिहिण्यात अभिरुची आहे.

//