आधुनिक दुर्गा

लेख


आधुनिक दुर्गा

नेहमीप्रमाणेच कमरेवर एका बाळाला आणि एका दहा वर्षाच्या मुलाचा हात धरून ती कोणाचीतरी वाट बघत होती. तेवढ्यात एक रिक्षा आली आणि तिच्या मुलाला बसवून ती निघून गेली. कशीबशी साडी सावरत होती. केसांचा तर जणू चिमणीचा खोपा करून आली.
शालिनी तिला रोज बघत होती. शालिनी आठ पंधरा दिवसांपूर्वीच एका नवीन फ्लॅटमध्ये रहायला आली होती.
शाळेच्या बसची वाट बघणाऱ्या अनेक जणी स्टाॅपवर येत असत. सगळ्या उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत घरातील वाटत होत्या. पण, ती मात्र अगदीच गबाळ्यासारखी यायची. मुलाला नंतर भराभर पावले टाकीत निघून जायची.
खूप दिवसांपासून शालिनीला तिच्याशी बोलायचे होते. पण, कशी सुरूवात करावी ते कळत नव्हते.
एके दिवशी भाजीच्या दुकानात त्यांची समोरासमोर भेट झाली. परत तोच अवतार. जणु तिला स्वतः साठी वेळच नव्हता मिळत. शालिनी साठी ही संधी चालून आली होती.

हाय, "मी शालिनी."

नमस्कार,"मी रेखा."

"मी इथे समोरच्या सोसायटीत राहायला आली आहे. तुम्ही कुठे राहता."

मी, ते , तिकडे.

"काय झाले? कुठे राहता तुम्ही?"

ती काहीही न बोलता जायला लागली.

"रेखा , रेखा. एकेरी नावाने उल्लेख केला तर चालेल का? मला तुझा फोन नंबर मिळेल का?"

"हो देते ना ! आणि हो मला फक्त रेखा म्हटले तरी चालले. चला आता मी निघते. घरी खूप काम पडलं आहे."

असे म्हणत ती निघून गेली.

नंतर तिची आणि शालिनीची फारशी भेट झाली नाही.
अचानक एके दिवशी शालिनीची तब्येत खराब झाली.
स्वयंपाक करायची ताकद सुध्दा नव्हती.

तिला अचानक रेखाची आठवण आली. लगेच फोन लावला.

"हॅलो, रेखा आहे का?"

हो मीच बोलतेय ताई. काय काम होते.

रेखाच्या बोलण्यात आपलेपणा होता.

"अगं रेखा ,मला जरा जेवणाचा डबा मिळेल का?"
माझी तब्येत जरा खराब झाली आहे

शालिनीने लगेच तिला जेवणाच्या डब्याविषयी चौकशी केली.
रेखाने कोणतेही आढेवेढे न घेता तिने संध्याकाळचा डबा तयार करून स्वतः घेऊन आली. व डबा देऊन काहीही न बोलता निघून गेली.
रेखाच्या हातात जादू होती.जणू ती एक उत्तम अन्नपूर्णा असल्याने स्वयंपाक खुप उत्तम झालेला होता.
जेवण झाल्यावर शालिनी विचार करु लागली.
आजही काहीही न बोलता रेखा निघून गेल्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे शालिनीला जाणवले व तिने लगेच रेखाला फोन लावला पण रेखाने कामात व्यस्त असल्याने फोन उचलला नाही.
शालिनी अस्वस्थ झाली.तिला झोपच येईना.उद्या आपण रेखाशी बोलायचं असं ठरवून ती झोपली.
अलार्मच्या आवाजाने शालिनी उठली. प्रातर्विधी चहा ,आंघोळ व देवपूजा करून बाहेर पडली तोच तिची नजर रेखावर पडली व नजरानजर होताच
शालिनीताई,"मी काल कामात व्यस्त असल्याने तुमचा फोन घेऊ शकली नाही.क्षमा करावी."
मी दुपारी तुमच्या घरी येते मग आपण निवांत बोलू.सध्या मी घाईत आहे असे सांगून लगबगीने निघून गेली.शालिनी तिच्याकडे एकटक पाहतच राहिली.
बाहेरचे काम आटोपून शालिनी घरी आली. स्वयंपाक केला.पतिराजांना डबा दिला,जेवण केले व नंतर स्वयंपाकघर आवरले.भांडी धुऊन हाॅलमध्ये टिव्ही समोर येऊन बसली.पण तिचं मन लागेना.
रेखा कधी येते आणि कधी तिच्या बोलते असं तिला वाटत होतं.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.शालिनीने दार उघडले तर समोर घामाघूम झालेली रेखा उभी होती.
ताई,मला थोडा उशीर झाला असं म्हणत चेहऱ्यावरचा घाम पदराने पुसत होती.
शालिनीने रेखाला आत यायला सांगून रेखाला बसविले व किचनमधून पाणी आणून दिले.
एका दमात ग्लासभर पाणी रिकामे करून रेखाने तृष्णा तृप्ती झाल्याने उसासा टाकला.
\" कसं बोलावं व काय बोलावं हेच शालिनीला समजेना.\"
अगं,रेखा काल तु माझा फोन उचलला नाही.काही समस्या,अडचण आहे का? असं विचारताच रेखा गडबडली.
थोडावेळ शांत होती.
शालिनीने रेखाच्या खांद्यावर हात ठेवला व धीर दिला तेव्हा रेखा मनातलं बोलू लागली.
ताई,मी माझ्या आईवडीलांची एकुलती एक लाडकी लेक व घरची परिस्थिती अत्यंत साधारण होती.
माझे वडील ॲटो चालवायचे व आमचा घर संसार चालायचा पण अचानक एक दिवस वडीलांना अटॅक आला व माझे पितृछत्र हरवले.
वडिलांच्या निधनानंतर एक वर्षाच्या आत माझे लग्न झाले.अत्यंत आनंदाने सासरी आली.पती राजेश शासकीय कार्यालयात कारकून होते व प्रामाणिकपणे नोकरी करुन चरितार्थ चालवित होते.
माझ्या लग्नानंतर माझी व सासूसासऱ्यांची खुप काळजी घेत होते.
आमच्या संसारवेलीवर एक फुल उमलले.मुलगा झाला. सर्वांना आनंद झाला. संसाराची नाव छान हेलकावे घेत होती. त्यात दुसऱ्या मुलाची चाहूल लागली. पण हा आनंद फक्त पाचच वर्षे टिकला.
"सकाळी राजेश डबा घेऊन ऑफिसला जात असतांना रोडवर भरधाव ट्रकने राजेश ला उडविले.
राजेश आम्हांला कायमचा सोडून गेला.माझी परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.माझे स्वप्न अधुरेच राहिले होते.वडिल नाही,पती नाही.
त्यातच सासू सासरे दोघांच्याही मनावर खुप मोठा आघात झाला."
"घरातला एकमेव कमावता कर्ता पुरुष अचानक गेल्याने आता कसे होईल या विचाराने मन सुन्न झाले तसेच तरूण मुलगा गेल्याने सासू सासरे अंथरूणाला खिळले होते."
" माझ्याकडे मदतीसाठी येणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात मला कामूक वासना जाणवत होत्या."
माझ्यासमोर माझं संपूर्ण आयुष्य, दोन लहान मुले व त्यांचें भविष्य,सासू सासरे,त्यांचे आजारपण इत्यादी अनेक प्रश्न असल्याने मी माझे मन घट्ट केले व कोणत्याही परिस्थितीत न डगमगता कामे करून जीवन जगण्याचे ठरविले.
"सुरवातीला दोन घरचा स्वयंपाक करीत होती व त्यातून मिळणाऱ्या पैशातून सर्व खर्च भागवित होती.
मुलगा व सासू सासऱ्यांना जपत होती.हळूहळू त्यांचीही प्रकृती सुधारली.दोघेही नातवाला सांभाळू लागले."
"माझ्या हातात चव आहे,जादू आहे हे सोसायटीत समजल्याने व प्रामाणिक असल्याने मला हळूहळू कामे मिळत गेली."
"आज माझ्याकडे दहा घरची कामे आहेत.पैसा मिळत आहे.मुलगा चांगल्या शाळेत शिकत आहे..
सासूसासरे आनंदात आहेत.स्वत:चे घर आहे.
आज मी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे पण..............?"
ताई,सर्व काही असूनही आज माझ्या हक्काचं माणूस जवळ नाही म्हणत जोरजोरात रडू लागली.
शालिनीने तिला समजावले व तिच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले व आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याचे वचन दिले.
आजच्या युगात संकटाला न घाबरता सर्व आघाड्यांवर खंबीरपणे मात करून जगणारी रेखा ही एक दुर्गाच आहे.
रेखा सारख्या समस्त रणरागिणींना,मातृशक्तिंना त्रिवार वंदन.

©®सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर औरंगाबाद.