Login

अधीर मन झाले..(भाग ६१)

अधीर मन झाले..कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, ओवी आणि संभव यांचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. आता पाहुयात पुढे...

थोड्याच वेळात ओवी आणि संभवला घेऊन गाडी बंगल्याच्या गेट मधून आत आली. नंदा ताईंनी पुढे येवून ओवीच्या गृहप्रवेशाची तयारी केली होती.

"ओवी... ओवी उठ अगं. आपण पोहोचलोय आता घरी." ओवीच्या डोक्यावर अलगद थोपटत संभव बोलला. ओवीच्या डोळ्यांत इतकी झोप होती की झोपेतून उठायची तिची अजिबात इच्छा नव्हती. डोळे किलकिले करत तिने बाहेर पाहिले. संपूर्ण बंगल्याला केलेल्या रोषणाईत तिचे डोळे दिपले. आपण कुठे आहोत, हे क्षणभर तिला समजेना.

समर आणि कार्तिकी देखील गाडीतून खाली उतरले.

"ओवी, काय गं काय होतंय? बरं वाटतं नाही का?" काळजीपोटी संभवने विचारले.

"अरे खूप झोप येतीये मला. त्यात डोकं खूप जड झालंय रे." ओवी उत्तरली.

"स्वाभाविक आहे ना. दोन तीन दिवस खूपच दगदग झाली ना. त्यात शांत झोपही नाही. म्हणून होतंय असं."

"पण ठीक आहे, थोडावेळ झोपल्यामुळे आता थोडं तरी बरं वाटतंय." ओवी म्हणाली.

तेवढ्यात चिन्मयीला कॉल आल्यामुळे ती घाईतच गाडीच्या बाहेर येऊन थोडी साईडला गेली.

गेल्या दोन तीन  दिवसांपासूनच्या धावपळ आणि जागरणामुळे ओवीला प्रचंड थकवा जाणवत होता. डोके, अंग जड पडले होते. काहीही करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. सरळ झोपून घ्यावे असे मनातून तिला वाटत होते. पण सगळे प्रसन्न आणि आनंदमय वातावरण, सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद तसेच दिव्यांच्या रोषणाईत उजळलेले घर पाहून क्षणात तिचा थकवा दूर झाला. त्यातच साडी, दागिने या सर्वांची सवय नसल्याने तिची चिडचिड होत होती.

"ओवी...किती थकल्यासारखी दिसत आहेस आणि तुझ्या केसांचं बघ काय झालंय." ओवीची खिल्ली उडवत हसतच संभव बोलला.

"गप्प बस एवढं काही झालं नाही. ही हेअरस्टाईल, साडी, दागिने या सगळ्यांमुळे किती त्रास होतोय तुला नाही समजणार. अक्षरशः कोणीतरी बांधून ठेवलंय मला असं वाटतंय. सवय नाही रे या सगळ्याची. असं झालंय कधी या सगळ्यातून बाहेर पडतीये."

"ह्मममम, समजू शकतो पण इतक्यात कंटाळलीस?"

"तसं नाही रे, पण समजून घे ना. एखादी गोष्ट नवी असते तोपर्यंत वाटू शकतं ना असं."

"हो गं, पण मी कुठे काय म्हणालो. आणि तसंही आम्हा पुरुषांसाठी तुम्हा बायकांना असं साज शृंगारात बघणं म्हणजे एक पर्वणीच. दोन तीन दिवस झाले हे सुख माझ्या नशीबी आहे बघ. "

संभवच्या या बोलण्यावर ओवीच्या चेहऱ्यावर लाजेची कळी खुलली.

"खरं सांगू संभव, हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं रे मला. तुझ्या मांडीवर खरंच खूप शांत झोप लागली होती." नजर चोरत ओवी बोलली.

"ह्या प्रवासाचं काय घेऊन बसलीस. अजून खूप प्रवास करायचाय आपल्याला सोबत, तेव्हा आपण फक्त दोघेच असू. बाकी कोणीच नाही." ओवीकडे पाहून डोळा मिचकावत संभव बोलला.

संभवच्या अशा बोलण्याने ओवी अजूनच घायाळ होत होती.  काही मिनिटांची ती प्रायव्हसी देखील त्यांना हवीहवीशी वाटत होती. कधी एकदा लग्नानंतरचे सर्व सोपस्कार पार पडतात आणि एकमेकांच्या मिठीत शिरतो असे झाले होते दोघांनाही.

तेव्हढ्यात स्वराज धावतच गाडीजवळ आला.

"ओ रोमिओ ज्युलिएट, उतरा की आता. की बँड बाजा बोलावू पुन्हा एकदा काय राव तुम्ही पण, किती ताटकळत ठेवलंय सगळ्यांना?" खोचकपणे स्वराज बोलला.

"तरीच म्हटलं व्हीलनची एन्ट्री कशी नाही झाली अजून." हळू आवाजात संभव पुटपुटला.

"काही म्हणालास का?"भुवया उंचावत थोडं संशयास्पस सुरात स्वराजने प्रश्न केला.

"नाही नाही तुम्हाला काहीच म्हणालो नाही साहेब. आमची एवढी हिम्मत." हसतच संभवने  म्हणाला.

"बरं मग काही हरकत नाही. या लवकर." म्हणत स्वराज समरच्या बाजूला जाऊन उभा राहिला.

"आवर ओवी, नाहीतर ह्याला आणखी टोमणे मारण्याची आयती संधीच मिळेल." संभव बोलला.

घाईतच मग ओवीने केस, दागिने, साडी सगळं ठीकठाक केलं.

"अरे काय हे दादू, किती वेळ वाट पाहतोय. आम्हाला घरी येऊन जमाना झाला. तुम्ही कोणत्या स्पीडने आलात?" गमतीच्या सुरात स्वराज बोलला.

"अरे, कार्तिकीमुळे सावकाश यावं लागलं रे. तिच्या ह्या अवस्थेत घाईने कसं येणार तूच सांग." समर बोलला.

"अरे हो, ते मी विसरलोच होतो. वहिनी पण तुम्ही ठीक ना?" काळजीच्या स्वरात स्वराजने कार्तिकीला प्रश्न केला.

"तुम्हाला कशी वाटतेय?" हसतच कार्तिकी उत्तरली.

"एकदम ठणठणीत. आता आमचा दादू आहे काळजी घ्यायला, आहे म्हटल्यावर काहीच टेन्शन नाही. म्हणून तर माझ्या हातात दुसऱ्या कारची किल्ली दिली आणि ही गाडी त्याने स्वतः घेतली. यालाच म्हणतात खरं प्रेम वहिनी. काश मुझे भी मेरा प्यार जल्द से जल्द मिल जाये."

"ते तर मिळायचं तेव्हा मिळेलच रे, पण लग्न झाल्यावर समजेल तुला. तोपर्यंत खेच आमची, नंतर तू आमच्याच तावडीत आहेस हे विसरू नकोस."

"नाही रे बाबा, ते विसरुन कसं चालेल. पण ह्या दोघांना गाडीतून खाली उतरायचं नाही की काय? मस्त गप्पा मारत बसलेत."

"उतरतील हो, जरा दोन मिनिट एकटं सोडा की त्यांना."

"आता दोन तास सोबतच होते की. अजून किती एकटं सोडायचं?" संभवची खेचायची एकही संधी स्वराज सोडत नव्हता.  

"काय रे तुम्हाला दोघांना यायचंच नाही का बाहेर?" काचेवर नॉक करत स्वराज बोलला.

ओवी आणि संभव मात्र हे सर्व एन्जॉय करत होते.

"तुला काय एवढी घाई रे. जरा थोडं वेट कर. तिला रिलॅक्स तर होवू दे आधी." संभव म्हणाला.

"ओके बॉस. पण आवरा रे पटापट. आता आयुष्यभर पुढे गप्पाच मारायच्या आहेत. तेव्हा आम्ही काही येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला. पण आता चला. भूका लागल्यात सगळ्यांना. तुम्हाला दोघांना जेवू घातल्या शिवाय आम्हाला भेटणार नाही जेवायला." स्वराज बोलला..

"बघा आता कोणाचं काय तर कोणाचं काय." गाडीतून खाली उतरत हसतच संभव बोलला.

साडी, दागिने सांभाळत ओवी हळूच गाडीतून खाली उतरत होती.

"हळू उतर गं. साडी अडकेल बघ पायात." कार्तिकी बोलली.

"काय हे वहिनी, किती काळजी ती बहिणीची. आता तुमचे लाडके भाऊजी आहेत ना त्यांच्या बायकोची काळजी घ्यायला. मग कशाला एवढं टेन्शन घेताय. आता फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या. बहिणचं सगळं टेन्शन तुमच्या भाऊजींवर सोडा." पुन्हा एकदा स्वराज बोलला.

"हो ना. भाऊजी तर आहेतच पण माझेही काही कर्तव्य आहे की नाही?"

"ऑफ कोर्स. पण चला आता लवकर. सगळेच जण केव्हाची वाट पाहत आहेत तुमची." म्हणत स्वराज पुढे निघून गेला.

"ओवी, फायनली तू आलीस! अजूनही असं वाटतंय हे सगळं स्वप्न आहे. खरंच माझा विश्वास बसत नाहीये या सगळ्यांवर." कार्तिकी बोलली.

"दी... खरंतर माझाही विश्वास बसत नाहीये. असं वाटतंय मी नेहमी प्रमाणे एखाद्या कार्यक्रमासाठीच आले की काय इकडे."

दोघींच्याही गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात चिन्मयी फोन कॉल संपवून आली. तीही मग त्यांना जॉईन झाली. त्यात मग पुढची पाच मिनिटं अशीच वाया गेली. हे दोघेही आपापल्या बायकांची वाट बघत तसेच बाजूला उभे होते.

"संभव मला एक भीती वाटतेय रे." ओवी आणि कार्तिकीवर एक कटाक्ष टाकत समर बोलला.

"कसली भीती रे?"

"ह्या दोघी बहिणी आता एकत्र आल्या म्हणजे आपला पत्ता कट तर नाही ना होणार? काही केल्या ह्या आपल्याला भावच देत नाहीत यार." समरने मनातील भावना व्यक्त केल्या.

"शक्यता नाकारता येत नाही दादू. पण तुझं ठीक आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यातील गुलाबी दिवस मस्त एंजॉय केले पण आता माझं काय? अजून आमची गाडी शून्यातच आहे. त्यात आताच ही माझ्याकडे दुर्लक्ष करतेय. आता तूच सांग माझे दुःख तुझ्यापेक्षा किती मोठे आहे."गमतीच्या सुरात संभव म्हणाला.

"कसले दुःख? काय बोलत आहात तुम्ही?" पुसटसे जे कानावर पडले त्यावरून अंदाज घेत ओवीने प्रश्न केला.

"कुठे काय? तो आमचा थोडा वेगळा विषय सुरू होता." संभव म्हणाला.

"हो का?"

"हो मग. तसंही तुम्ही बोलत असताना आम्ही विचारलं का तुम्ही काय बोलता म्हणून?" समर बोलला.

"पण आम्ही तुमच्यासारखं असं एकमेकींच्या कानात खुसुरफुसुर करतच नव्हतो बरं का." बहिणीची बाजू पकडत कार्तिकी बोलली.

"बघ संभव, मी म्हणालो ना, हे असंच होणार आता ह्यापुढे. माझी मेहुणी आणि तुझी मेहुणी मिळून आपली पुरती वाट लावणार हे फिक्स आहे."

"आता नाही वाटतं उशीर होत, गप्पा पुरे, चला पटकन्." कार्तिकी बोलली आणि ओवीचा हात पकडून ती ह्या दोघांना मागे टाकत पुढे जायला निघाली.

"बघ संभव, लग्न झाल्यावर हे असं असतं. नवऱ्याचं तोंड बंद कसं ठेवायचं हे बायकोला चांगलं ठाऊक असतं. तूही शिकून घे आता आणि तसंही हळूहळू सगळं आपोआप शिकशीलच म्हणा तू." हळू आवाजात संभवच्या कानात समर बोलला.

"तुझ्या भावना मी अगदीच समजू शकतो रे." हसतच संभव बोलला.

"हसू नकोस. तुलाही कळेलच हे लवकर. मग तेव्हा सर्वांत आधी माझ्याकडेच येशील."

"ऑफ कोर्स, तूच माझं दुःख समजू शकतोस हे माहीत आहे मला. चल आता." म्हणत दोघेही घरात जायला निघाले.

"आय थिंक तुझं लग्न ओवी सोबत झालंय ना संभव. ना की माझ्यासोबत. मग तू माझ्यासोबत काय करतोस? जा तुझ्या बायकोच्या बाजूला जाऊन उभा राहा." कार्तिकीला ऐकू जाईल अशा आवाजात खोचकपणे समर बोलला.

"Lकाहीही न बोलता कार्तिकी हळूच बाजूला झाली. तिची चूक तिच्या लक्षात आली. दाताखाली जीभ चावत गालातल्या गालात हसत ती समरच्या बाजूला जाऊन उभी राहिली.

"पण काहीही म्हण संभव, वरात हवी होती यार. तुझ्या वरातीत नाचायची इच्छा अपूर्ण राहिली." नाराजीच्या सुरात स्वराज बोलला. "

तीन दिवस नाचला की, ते काय थोडं होतं?" संभव बोलला.

"ते काहीही असले तरी वरात ती वरातच यार. त्याशिवाय लग्न पूर्ण झाल्याचा फील येत नाय राव." स्वराज बोलत होता.

"हो ना, अगदी बरोबर बोललात तुम्ही." न राहवून मध्येच चिन्मयी बोलली.

स्वराजने चमकून तिच्याकडे पाहिले.

"म्हणजे तुलाही आवडतो डान्स? पण नाचता येतं का?"

"मग काय फक्त तुम्हालाच नाचता येतं!"

यावर काहीही न बोलता स्वराजने गप्प बसणेच पसंत केले.

"संभव, यार कर ना काहीतरी."

"सगळं मान्य आहे रे, पण वहिनीची अवस्था लक्षात घेता वरात कॅन्सल केली, माहितीये ना तुला!"

"आय नो..पण, नाही वरात निदान थोडा वेळ घरातील म्युझिक सिस्टीमवर गाणी लावून नाचुयात का? प्लीज मामा मामींना एकदा विचार ना तू. ते नाही म्हणणार नाहीत." मनातील इच्छा स्वराजने बोलून दाखवली.

"आता तर तुला खूप भूक लागली होती आणि लगेच नाचावंसं वाटतंय. कसा आहेस रे तू?" संभव बोलला.

"हो पण तरीही नाचावसं वाटतंय. काय करू?"

यावर चिन्मयीला मात्र हसू आले.

"नक्की कसला आनंद आहे रे हा? एकदा सांगशील." चिन्मयीवर एक कटाक्ष टाकत स्वराजची खेचत संभव बोलला.

"जाऊ दे, सोड विषय. चल जाऊयात." नजर चोरत आणि विषय टाळत गंभीर स्वरात स्वराज बोलला.

"बरं लगेच तोंड पाडू नकोस. एक काम कर, तू दादूला विचार एकदा." संभव बोलला.

"अरे, काय सुरू आहे तुमचं? चला बरं पटकन्. जे काही बोलायचं ते गृह प्रवेशानंतर. ओवी, संभव चला बरं पटकन्. आधीच खूप उशीर झालाय. घरात आल्यावर पण पुन्हा मग तुमचे खेळ काही संपायचे नाहीत." स्वराज समर सोबत काही बोलणार त्याआधीच नंदा ताई बोलल्या.

"संभव यार..फक्त थोडावेळ, प्लीज." पुन्हा एकदा स्वराज बोलला.

"आई दोन मिनिट थांब गं. ये दादू हा बघ काय म्हणतोय?"

स्वराजची इच्छा मग संभवने समरला सांगितली. समरने लगेचच नंदा ताईंपर्यंत ही बातमी पोचवली.

"काही नाही आ. आधी तुझ्या बायकोची अवस्था बघ. मग वरातच होऊ दिली असती ना." नंदा ताई बोलल्या.

"आई, अगं फक्त थोडा वेळ. जाऊ दे ना त्यांची इच्छा आहे तर. पुन्हा पुन्हा ही वेळ येते का गं?" समर बोलला.

क्रमशः

नंदा ताई देतील का परवानगी?  जाणून घेऊयात पुढील भागात.