अधीर मन झाले..(भाग २४)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
मोहित्यांची लेक आता देशमान्यांची सून झाली होती. लग्नासारख्या पवित्र बंधनात समर आणि कार्तिकी अडकले होते. पण या एका नात्यामुळे या दोन्ही कुटुंबातील आणखी दोन मने जुळू पाहत होती.

संभव आणि ओवी यांची प्रेमकहाणी सुरू होण्याच्या मार्गावरच होती. दोन मने आपसूकच जवळ येऊ पाहत होती. संभवच्या मनात ओवीने नकळतपणे घर केले होते. त्याच्या मनानेही त्याला आता कौल दिला होता. परंतु, ओवीला मात्र अजूनतरी  तिच्या मनातील भावनांचा थांग लागला नव्हता. असे असले तरी तिला संभवचे वागणे मनातून कुठेतरी आवडत होते. त्यामुळे तीही आपसूकच मग त्याच्याकडे ओढली जात होती. त्याच्या विषयी तिच्या मनात खूप आदर निर्माण झाला होता.

न बोलताही आता मनाची भाषा जणू मनाला समजू लागली होती. पण मग सार्थकचे काय? एकीकडे ओवी आणि संभव एकमेकांकडे खेचले जात होते तर दुसरीकडे सार्थक ओवीमध्ये गुंतत चालला होता. संभव आणि ओवी मधील वाढती मैत्री सार्थकला खटकत होती.

त्यातच आता ओवी कार्तिकीची पाठराखीण बनून तिच्यासोबत तिच्या सासरी गेली होती. हेदेखील सार्थकला आवडले नव्हते. इकडे संभव मात्र वेगळ्याच दुनियेत होता. ओवीचे त्याच्या नेजरेसमोर असणे, सध्या ही इतकी लहान गोष्ट देखील त्याला स्वर्ग सुखाचा आनंद देत होती.

आता पुढचे अजून तीन दिवस ओवी कार्तिकी सोबत तिच्या सासरी असणार होती. त्यामुळे संभवचा आनंद खरंतर गगनात मावत नव्हता. पण अचानक ओवीच्या मैत्रिणीचा फोन आला आणि सगळेच प्लॅनिंग तिला बदलावे लागले.

ओवीला आता दुसऱ्या दिवशी लगेचच तिच्या घरी जावे लागणार होते. त्यामुळे संभव मनातून नाराज झाला. पण आता ओवीला तिच्या घरी सोडवून देण्यासाठी नेमके जाणार कोण? यावर चर्चा सुरू असतानाच संभवची मात्र ओवीसोबत जाण्याची धडपड सुरू होती. त्याने तसे बोलून सुद्धा दाखवले पण प्रदीप काका त्याला नाही म्हणाले. त्यामुळे तो नाराज झाला.

"काका अरे जातो की मी. माझं थोडं काम पण आहे त्या बाजूला, मग तसेच ओवीलाही तिच्या घरी सोडतो." संभव बोलला.

"सोनू..अरे बरं नाही दिसत ते बाळा." प्रदीप काका म्हणाले.

प्रदीप काकांसह संभवला घरातील काही लोक सोनू नावाने हाक मारत.

"बरं नाही दिसत म्हणजे? मी नाही समजलो काका." आश्चर्यकारकरित्या संभवने प्रश्न केला.

"अरे! म्हणजे तिच्यासोबत कोणीतरी मोठं गेलेलं बरं, म्हणून म्हटलं." प्रदीप काका बोलले.

"म्हणजे मी लहान आहे असं म्हणायचं आहे तर तुला?" नाराजीच्या सुरात संभव बोलला..

"अरे तसं नाही रे बाबा." कपाळावर आठ्या आणत प्रदीप काका उत्तरले.

"तू पण ना काका. खरंच तो काय लहान आहे का रे आता. त्याचं काम आहे तिकडे तर त्या कामात हेही काम होईल आणि मी चांगलं ओळखतो ओवीच्या घरच्यांना, ते असा काहीबाही विचार करणारच नाहीत." संभवची बाजू घेत समर बोलला.

"बरं जा बाबा...पण सावकाश जा आणि फोर व्हिलर घेऊन जा. वेळ लागला तरी चालेल. हवंतर स्वराजला पण ने सोबत. तेवढंच तुला येताना सोबत होईल." प्रदीप काका म्हणाले.

प्रदीप काकांचा होकार कानी पडताच संभवची कळी खुलली. त्याने लगेचच स्वराजला देखील त्याच्यासोबत येण्यासाठी विचारले.

"स्वराज आपल्याला वहिनीच्या माहेरी जायचं आहे. पटकन् आवरुन ये. थोड्या वेळात निघायचं आहे." संभव म्हणाला..

"मी कशाला यायला हवंय, उगीच कबाब में हड्डी कशाला बाबा?" संभवची खेचत स्वराज बोलला.

"नको आता जास्त भाव खाऊस. जा चेंज करून ये पटकन्." संभव म्हणाला.

"अरे पण खरंच बोलतोय मी. छान संधी आलिये तर जाता जाता मस्त गप्पा मारता येतील तुम्हा दोघांना. फ्रेंडशिप वाढवण्याची हीच संधी आहे बघ. मी सोबत असल्यावर तुम्ही दोघेही बोलणार नाहीत." स्वराजने त्याचे मत सांगितले.

"असं काही नाही होणार. आता जास्त कंक्लूजन काढत बसू नकोस. पाच मिनिटात रेडी हो. तू येत आहेस. " संभवने आता हुकूमच सोडला.

"बरं बाबा...तू नाहीच ऐकणार, माहितीये मला. आलोच लगेच. तू पण आवर.. की असाच येतोयेस?"

"हो..येतो ना... ह्याच अवतारात. काय तू पण."

थोड्याच वेळात दोघेही आवरुन खाली आले. ओवी देखील बॅग घेऊन तयारच होती.

ओवी निघाली आणि कार्तिकीचा चेहराच पडला. आता पुन्हा ही रडायची म्हणून ओवी तिच्या पासून बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करू लागली.

"वकील साहेबांच्या आई कुठे आहेत? प्लीज सांगाल का मला?" ओवीने संभवला विचारले.

"फक्त वकील साहेबांचीच नाही गं...माझी पण आई आहे ती." मस्करीच्या मूडमध्ये संभव म्हणाला.

"हो माहितीये मला. पण कुठे आहेत त्या, कळेल का?"

"माझ्या माहिती प्रमाणे आई किचनमध्ये आहे. जिन्याच्या बाजूने राईट टर्न घेतला की समोरच किचन आहे. थोडं पुढे गेल्यावर लगेचच दिसेल."

"ओके दिलेल्या माहितीसाठी मनापासून थँक्यू." म्हणत ओवी किचनमध्ये जायला वळली.

"दी... एकच मिनिट हा... तुझ्या सासूबाईंना भेटून आले मी." म्हणत ओवी नंदा ताईंना शोधत किचनमध्ये गेली.

"अगं ओवी काय गं बाळा... कालच आलीस आणि आज लगेच निघालीस ना. मगाशीच बोलले हे मला. तू जाणार आहेस म्हणून." नंदा ताई म्हणाल्या.

"काय करू काकू. जावंच लागेल ओ मला."

"हो गं समजू शकते मी. आधी करिअर आणि मग बाकी सगळं. पण ओवी...आता पुढच्या वेळी येशील तेव्हा चांगली मोठी सुट्टी काढून ये बरं का. खूप घाईतच जावं लागतंय आज तुला." नंदा ताई म्हणाल्या.

काहीही न बोलता ओवीने फक्त हसून प्रतिसाद दिला. ओवीच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू होते. नंदा ताईंच्या हे बरोबर लक्षात आले.

"काय गं... काय झालं? काही बोलायचं आहे का तुला?"

"नाही...कुठे काय?" इकडे तिकडे नजर फिरवत ओवी उत्तरली.

"ह्ममम...आता समजलं. कार्तिकीची काळजी वाटतीये ना तुला?" नंदा ताईंनी प्रश्न केला.

काहीही न बोलता ओवीने नजर खाली झुकवली. नंदा ताईंच्या बोलण्याने ओवीचे डोळे पाणावले. कारण न बोलताही त्यांनी तिच्या मनातील अगदी अचूक ओळखले होते.

ओवीची रिॲक्शन पाहून नंदा ताईंना देखील खात्रीच पटली.

"ओवी अजिबात डोळ्यांत पाणी आणू नकोस आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नकोस." ओवीचे डोळे पुसत नंदा ताई बोलल्या.

"अगं हे आता तिचंच घर आहे. नवीन नवीन रुळेपर्यंत तिला थोडं अवघडल्यासारखं होईल; पण तू जेव्हा पुढच्या वेळी येशील ना तेव्हा तूच सांग मला तिच्यातील बदल. आता तू अशी अचानक निघालीस ना त्यामुळे तिचा चेहरा पडला आहे. पण तू हवं तेव्हा तिला भेटायला येवू शकतेस. कसं जाऊ? सारखं सारखं बहिणीच्या सासरी जाणं बरं दिसत नाही. हे असे विचार मनात सुद्धा आणायचे नाहीत. समजलं." हसत हसत नंदा ताई बोलल्या.

"काकू...आम्ही एकमेकींपासून कधी दूर राहिलोच नाही ओ. लहानपणापासून कुठेही गेलो तरी कार्तिकीसोबत ओवी असणार नाही असे कधी झालेच नाही. नात्यात सगळे आम्हाला चिडवायचे, भविष्यात लग्न करून सासरी जाल तेव्हा कसे होणार तुमच्या दोघींचे?  विशेष करून कार्तिकी दीला खूप बोलायचे. कारण एकच, तिचा शांत स्वभाव. आता खरंच ती वेळ जेव्हा आली तेव्हा खूप वाईट वाटतंय. जमेल का तिला सगळं निभावून न्यायला... याबद्दल थोडी काळजी वाटते; पण तुम्ही समजून घ्याल ना तिला? उलट उत्तर देणं काय असतं हे माहीतच नाही ओ तिला. थोडं काही झालं की ओवीकडे धावत येणारी, मोठी असूनही प्रत्येक गोष्टीत ओवीकडून सल्ले घेणारी...खूप हळवी आहे ओ माझी दी. म्हणून काळजी वाटते तिची बाकी काही नाही."

ओवीचे बहिणीबद्दलचे हे प्रेम पाहून नंदा ताईंना देखील गहिवरून आले. खरंच कार्तिकी मोठी की ओवी? असा क्षणभर नंदा ताईंना प्रश्न पडला.

"तुला एक सांगू ओवी...मला मुलीची खूप आशा होती गं. एक तरी मुलगी असावी, असं मनातून खूप वाटायचं; पण सोनूच्या रूपाने दुसराही मुलगाच झाला आणि त्यावेळी खूप त्रास करून घेतला मी स्वत:ला. खूप रडले. मुलगी झाली नाही म्हणून देवाला कोसलं.
पण तेव्हा कोणीतरी बोललं होतं, 'अगं मुलगी नाही म्हणून कोणी रडतं का...उलट भविष्यात सूनांच्या रुपात दोन दोन लेकी भेटणार तुला. लेक असती तरी लग्न करून सासरीच गेली असती पण तू किती भाग्यवान आहेस, भविष्यात तुझ्या लेकी तुझ्याकडे येतील. ही अभिमानाची गोष्ट नाही का?'
अजूनही ती वाक्य आठवतात बघ मला. एक लेक तर आता मिळाली मला. येत्या काही वर्षात दुसरीही लेक घरी येईल. मग तूच सांग किती आनंदाची गोष्ट असेल ही माझ्यासाठी. कार्तिकीच्या रूपाने माझी इतक्या दिवसांची लेकीची हौस पूर्ण झाली बघ. तू अजिबात काळजी करू नकोस. तिला या घरात कधीच कोणता त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी."

ओवीचा हात हातात घेत नंदा ताईंनी तिला कार्तिकीच्या बाबतीत विश्वासपूर्ण शब्दांत हमी दिली. नंदा ताईंसोबत बोलून ओवीला खूपच हलके वाटत होते. आता कार्तिकीची तिला इतकी काळजी वाटत नव्हती. कारण नंदा ताईंच्या रुपात सासू नाही तर आईच मिळाली होती जणू कार्तिकीला. याची आता ओवीलाही खात्री पटली. कारण संसार करताना सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे सासूचे पात्र. एकदा का सासू समजून घेणारी असली की मग संसार सुरळीत होणार यात मुळीच शंका नाही. आता नंदा ताईंसारखी सासू असल्यावर कार्तिकीची तर चिंताच मिटली होती.

'ह्या दोघींचं नेमकं काय सुरू आहे?' संभव तोंडातच पुटपुटला आणि पाठोपाठ तोही मग किचनमध्ये आला. नंदा ताईंना आणि ओवीला असं हातात हात घेऊन बोलताना संभवने पाहिलं आणि त्याची पावले जागेवरच थबकली.

'कशी आहे ना ही मुलगी! ज्याच्या सोबत बोलते त्याचं मन जिंकते ही.' आपसूकच संभवच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. हाताची घडी घालून तसाच तो भिंतीला खांदा टेकवून उभा राहिला.

"अरे वा...साक्षात भावी सासू सून इतक्या प्रेमाने बोलताना मला दिसत आहेत. अहाहा...किती भारी फिलिंग आहे रे हे सोन्या." पाठीमागून हळून येऊन संभवच्या कानात स्वराज बोलला.

"आलाच का तू...चल..उशीर होतोय. म्हणत संभवने किचनमध्ये एन्ट्री केली.

"आई अगं काय चाललंय तुमचं. इथे गप्पा मारत बसलात का. आम्ही केव्हाची बाहेर वाट पाहतोय तुमची."

"हो रे झालंच. ओवी.. ये गं बाळा दोन मिनिटं." म्हणत नंदाताई ओवीला घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या.

"संभव... काय पाहतोय मी हे! तुझ्यापेक्षा तर आत्या फास्ट निघाली. तू बस असाच आणि चार दिवसांनी जा पुन्हा ड्युटीवर जॉईन हो. म्हणजे मग झालं सगळं इथेच थांबायचं."

"गप रे... असं काही नाहीये. पण आई ओवीला घेऊन आत का गेली असेल?"

"थांब मी विचारून येतो आत्याला. मग सांगतो तुला." हसतच स्वराज बोलला.

"ह्ममम... मार पाणचट जोक." संभव बोलला.

"भाऊजी.. ओवी कुठे आहे ओ?" तेवढयात कार्तिकी तिथे आली.

"अगं वहिनी... ती आई सोबत आत गेलीये." संभव उत्तरला.

"हे बघ ओवी... छान ब्लाऊज शिवून घे ह्या साडीवर. कॉलेज मध्ये काही फंक्शन असेल तेव्हा नक्की नेस हा ही साडी." ओवीच्या हातात एक पिशवी देत नंदा ताई बोलल्या.

"काकू कशाला हो साडी वगैरे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद भेटला, तोच पुरेसा आहे हो माझ्यासाठी."

"अगं प्रथा असते गं बाळा तशी. नवरीसोबत आलेल्या करवलीला मोकळ्या हाताने पाठवायची पद्धत नाही आपल्यात. आता घाईत तुला जावं लागतंय म्हणून मी माझ्याकडची साडी दिली तुला. नाहीतर समरला सांगून हवा तसा ड्रेस घ्यायला पाठवणार होते मी तुला. थोडं समजून घे आ; पण ही साडी सुद्धा नक्की आवडेल तुला. मला खात्री आहे. माझी चॉईस तुला आवडली की नाही सांग मला नंतर."

"हो काकू...नक्की सांगेल. आशीर्वाद द्या." म्हणत ओवी नंदा ताईंच्या पायाशी वाकली.

'हे काय सुरू आहे सगळं. मी स्वप्नात तर नाही ना.'  मनातच संभव विचार करू लागला.

"सोनू... सावकाश जा आणि राज येतोय ना तुझ्या सोबत?"

"हो आई. हे काय तयारच आहे तो."

"बरं जा...उशीर नका करू आता आणि ओवी परवा सत्यनारायण पूजा आहे बरं का गं. तसा फोन करूच आम्ही.  फक्त तुला आताच स्पेशल निमंत्रण देते मी. नक्की ये बरं का." हसतच नंदा ताई बोलल्या.

"हो काकू...नक्की येईल मी. चला येऊ मग मी." ओवी म्हणाली.

"हो हो.. सोनू सावकाश चालव रे गाडी." नंदा ताई बोलल्या.

घरातील मोठ्यांचा निरोप घेऊन मग ओवी जायला निघाली. कार्तिकीचे डोळे मात्र पाणावले होते.

"दी... येते मी परवा. काळजी करू नकोस हा आणि छान राहा. अशी उदास नको राहुस. स्माइल..हस जरा. चल येते मी...बाय, घरी पोहोचल्यावर कॉल करते." म्हणत ओवी गाडीत बसली.

ओवीच्या अशा मन मोकळ्या स्वभावाने एकाच दिवसांत तिने सर्वांचे मन जिंकले होते.

गाडी गेटच्या बाहेर पडून नजरेआड होईपर्यंत सगळे तसेच उभे होते. ओवी गेल्यावर कार्तिकीला रडूच आवरेना. नंदा ताईंनी आणि मेधा मावशीने मग तिची समजूत घातली.

गाडी रस्त्याला लागली पण ओवी मात्र शांत शांतच होती. खिडकीतून बाहेर पाहत ती उदासपणे बसली होती. संभव समोरच्या आरशातून अधूनमधून ओवीला न्याहाळत होता.

'अरे... बोल ना तू तिच्यासोबत.' नजरेतूनच खाणाखुणा करत स्वराज संभवला म्हणाला.

'काय बोलू मी आता?' संभव देखील नजरेतून उत्तरला.

'तेही मीच सांगू का आता?' स्वराज म्हणाला.

"प्लीज दोन मिनिट साईडला गाडी थांबवता का?" अचानक ओवी बोलली.

"का गं काय झालं? त्रास होतोय का काही?"

"नाही ओ... तुम्ही थोडी साईडला घ्या ना आधी गाडी." ओवी म्हणाली.

संभवने लगेचच गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली.

क्रमशः

काय कारण असेल? ओवीने अशी मध्येच गाडी थांबवायला का सांगितले असेल? जाणून घेऊयात पुढील भागात. त्याआधी आजचा हा भाग कसा वाटला ते जरूर सांगा.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all