अधीर मन झाले..(भाग २२)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
समर आणि कार्तिकीचा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडला. काही वेळातच कार्तिकीची पाठवणी देखील होणार होती. सासरी जाताना प्रत्येक मुलीच्या मनाची होणारी घालमेल कार्तिकी स्वतः आज अनुभवत होती.

एकीकडे माहेरच्या गोड आठवणींचा ठेवा तर दुसरीकडे पापणी पल्याड दडलेला भविष्यातील सोनेरी स्वप्नांचा हिंदोळा, कार्तिकीला खुणावत होता. पण सध्या तरी तिला पापणीमध्ये बंद असलेल्या सोनेरी स्वप्नांना कवेत घेण्यासाठी भविष्याच्या दिशेने पुढचे पाऊल पुढेच टाकावे लागणार होते; परंतु असे असतानाही तिची पावले मात्र माहेरच्या ओढीने जागेवरच थबकली होती.

तिच्या मनात जणू असंख्य प्रश्नांचा कोंडमारा झाला होता.  वडीलांच्या मिठीची ऊब तिला हवीहवीशी वाटत होती. आईचा पदर सोडून तिला दूर जाऊ वाटेना. प्रयत्न करूनही पावले मात्र अडखळत होती. कसेबसे मनाला समजावत सर्वांचा निरोप ती घेत होती. अशातच तिच्या पाठवणीच्या या नाजूक प्रसंगी तिची सिक्रेट पार्टनर... तिची बहीण... मैत्रीण... अगदी सर्वकाही असणारी ओवी, तिला मात्र दृष्टीस पडेना. गर्दीतही तिची नजर ओवीलाच शोधत होती. पण ओवी काही तिला कुठेच दिसेना. न राहवून तिने विचारलेच, तेव्हा कुठे सर्वांना ओवी तिथे नसल्याचे समजले.

सर्वजण 'ओवी गेली तरी कुठे?' हा विचार करत होते. अशातच सार्थक आणि संभव ओवीला शोधायला गेले.

"अचानक कुठे गेली ही मुलगी?" संभव म्हणाला.

"अरे पण सगळे तिकडे असताना ही एकटी बाजूला का आली असेल?" स्वराजने मनातील शंका बोलून दाखवली.

"अरे पण माझं लक्ष होतं तिच्याकडं, काही वेळापूर्वी ती तिथेच होती. ती कधी बाजूला गेली हे मी पाहिलंच नाही रे आणि विशेष म्हणजे कोणालाही न सांगता ती कुठे जाऊ शकते?"

"डोन्ट वरी... असेल ती इथेच कुठेतरी चल त्या बाजूला शोधुयात." स्वराज बोलला.

"वेट.. ह्या बाजूला आवाज येतोय कसला तरी. तिकडे जाण्याआधी एकदा इकडे चेक करुयला हवंय." म्हणत संभव घाईतच त्या दिशेला जायला वळला.

थोडं पुढे होऊन संभवने हलकेच डोकावून पाहिले तर ओवी जिन्यात रडत बसली होती.

घाईतच तो पुढे गेला.

"ओवी...तू रडत आहेस?" संभवने विचारले.

"नाही." घाईतच तोंड फिरवून डोळे पुसत ओवी बोलली.

"अगं तिकडे वहिनी तुला शोधत आहे. सगळे किती घाबरले आहेत तिकडे. अचानक तू दिसेनाशी झाली आणि सगळेच काळजीत पडलेत आणि तू एकटीच अशी का बसलीस इकडे?" संभवने विचारले.

"काही नाही... असंच." ओवी उत्तरली.

"काहीच नाही तर मग एकटी अशी इकडे येऊन रडत का आहेस?"

"मग आता ह्या अशा प्रसंगी मी हसायला हवंय का? जाऊ द्या तुम्हाला नाही समजणार ओ काही." असे बोलून ओवीने तोंड फिरवले."

ओवीचे संभव सोबतचे असे रुडली बोलणे स्वराजला आवडले नाही. त्याने पाठमोऱ्या संभवच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला.

"स्वराज तू जाऊन सांग बाहेर की ओवी आहे इथेच म्हणून. उगीच काळजी करत बसतील सगळे. मी ओवीला घेऊन येतो." संभव म्हणाला.

"हो." म्हणत स्वराज लगेचच तिकडे गेला.

"सो सॉरी ओवी..तुला दुखवायचे नव्हते अगं मला आणि तू असं तोडून का बोलतेस? तू समजते तसे काही नाहीये अगं. मला समजतंय तुला आता ह्याक्षणी काय वाटत असेल ते." अत्यंत भावूक सुरात संभव बोलला.

"तुम्हाला नाही समजू शकत.. इवन जगातील कोणत्याच पुरुषाला ते कधीच समजू शकणार नाही मग तुम्हाला तरी कसं समजणार. जिथे आपण जन्माला आलो, जिथे लहानाचे मोठे झालो, जिथे हसलो, खेळलो, बागडलो, ज्यांच्यासोबत अर्धं आयुष्य घालवलं.. ते घर, घरातील माणसं एका क्षणात असं दूर करताना काय वाटत असेल त्या मुलीला हे कधीच नाही समजणार तुम्हाला." बोलता बोलता ओवी रडत होती.

ओवीचे हे असे बोलणे संभवच्या काळजाला जाऊन भिडत होते. तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून संभवच्या मनात कालवाकालव होत होती. अर्थातच तिचे म्हणणे त्याला पटत होते. कारण खरंच अशा प्रसंगी त्या मुलीला काय वाटते ते फक्त तिलाच माहिती.

ओवी कितीही नाही म्हणाली तरी संभवला जणू तिचे मन वाचता येत होते. विषय जास्त न वाढवता त्याने तिची समजूत काढली.

"बरं...नसेल मला समजत काही पण आता सध्या मला फक्त इतकंच समजतंय की आपल्याला तिकडे जायला हवंय. तुमची दी तुमची वाट पाहत आहे. इवन सगळेच शोधत आहेत तुम्हाला.

न राहवून संभवने कोणताही विचार न करता अगदी निर्मळ मनाने ओवीचे अश्रू अलगद पुसले.

संभवच्या या अशा वागण्याने ओवीला आणखीच रडू कोसळले.

"अगं नको ना रडू ओवी. तुला वहिनीने जर असं रडताना पाहिलं ना तर त्यांचेही मग पाऊल निघणार नाही." समजावणीच्या स्वरात संभव बोलला.

"माहितीये मला. म्हणूनच स्वतःला आवरू शकले नाही आणि इकडे निघून आले. तिला असं रडताना मी नाही पाहू शकत. ती रडायला लागली लागली की मलाही मग रडू येतं आणि सगळ्यांसमोर रडायला मला बिलकूल आवडत नाही." ओवी म्हणाली.

"अच्छा..हे कारण आहे होय. असं बाजूला निघून येण्याचं; पण मग आता मी तर पाहिलं तुला रडताना... आता कसं करायचं?" हसतच संभव बोलला.

"तसे ओवी ने रुमालाने डोळे पुसत चेहरा ठिकठाक करण्याचा प्रयत्न केला.

"आणि खरं सांगू...मला ना तुम्हा मुलींची एक गोष्ट बिलकुल आवडत नाही."

'कोणती?' रोखातच संभवकडे पाहत नजरेतून ओवीने प्रश्न केला.

"आधी इतका सारा वेळ घेऊन तयारी करायची..सुंदर असा मेक अप करायचा आणि नंतर रडून क्षणात तो पाण्यात घालवायचा."

संभवचे बोलणे ऐकून ओवीच्या चेहऱ्यावर स्मित फुलले.

"आणि आणखी एक गोष्ट सांगू?" संभवने विचारले.

"नको म्हटल्यावर तुम्ही थांबणार आहात का?" ओवी म्हणाली.

"हो तेही आहेच म्हणा." हसतच संभव बोलला. ओवीलाही मग हसू आले.

"हसू नका आता बोला."

"रडताना तू अजिबात छान दिसत नाहीस. त्यामुळे खरंच कोणासमोर कधीही रडू नकोस." ओवीचा मूड चेंज करण्यासाठी संभवचे पुरेपूर प्रयत्न सुरू होते.

संभवच्या या अशा बोलण्याने थोड्या वेळापूर्वी रडणाऱ्या ओवीच्या ओठांवर नकळतपणे हास्य फुलत होते.

तेवढ्यात सार्थक तिथे आला.

"काय हे ओवी... किती शोधलं मी तुला आणि तू इथे आहेस होय. अगं निदान सांगून तर येतेस. आम्ही सगळे किती टेन्शन मध्ये आलो होतो माहितीये. तुला ना असे धक्के द्यायची सवयच लागलीये आ ओवी. असं का गं वागत असतेस तू? नाही कोणाला निदान मला तर सांगून येतेस. बरं तुझा मोबाइल पण नाही तुझ्याकडे. कसं शोधायचं तुला? इतकी कशी गं बेजबाबदारपणे वागू शकतेस तू?" सार्थक एकसारखा बोलत होता.

"हो हो....अरे श्वास तर घे आधी आणि तुझी ही प्रश्नांची ट्रेन थांबव आधी सार्थक. किती बोलतोस अरे. आता सापडली ना ओेवी. मग नको ना इतका पॅनिक होवूस." गालातल्या गालात हसत संभव म्हणाला.

संभवचे हे असे बोलणे सार्थकला अजिबात आवडले नाही.

"तुम्हाला नाही समजणार.. जाऊ द्या." रोखातच सार्थक बोलला तसा संभवचा चेहराच पडला.

"काय हे सार्थक? असं बोलतं का कोणी?" संभवची बाजू घेत ओवी सार्थकला म्हणाली.

"हो का...पण वेगळं असं काय बोललो गं मी? आणि माझ्या बोलण्यामागची तुझ्याबद्दलची माझी काळजी तुलाही दिसत नाही का गं?" दुःखी अंत:करणाने आणि भरल्या डोळ्यांनी सार्थक बोलला.

"अरे हो...ठीक आहे ना. इतका का चिडतोस? आणि तू पॅनिक होवू नकोस एवढंच तर ते म्हणाले. इतकं का वाईट वाटतंय तुला? तेच मला समजेना!" समजावणीच्या सुरात ओवी बोलली.

सार्थकचे वागणे खरंतर संभवच्याही लक्षात येईना.

'हा इतका ओव्हर रिॲक्ट का करत आहे?' मनातच संभव विचार करू लागला.

"बरं ओवी...या लवकर तुम्ही, मी होतो पुढे." असे बोलून संभव तिथून निघून गेला.

"बघ वाटलं ना त्यांना वाईट? म्हणून मी म्हटलं. पण तुला ते अजून थोडीच ना पटणार आहे." ओवी बोलली.

"तुला त्यांना वाईट वाटलेलं बरोबर दिसलं पण मला किती वाईट वाटत असेल याचा साधा विचारही तुझ्या मनात येत नाही का गं." सार्थक ओवीला जणू जाब विचारत होता.

"सार्थक...अरे आपले पाहुणे आहेत ते. काही वेळापूर्वीच त्यांचं आपल्या कुटुंबासोबत कायमस्वरूपी नातं जोडलं गेलंय. आपल्या कार्तिकी दिचे लहान दिर आहेत ते. मग त्यांच्यासोबत बोलताना आपल्याला विचार तर करायलाच हवा ना."

"हो, समजलं...बरं चला, तिकडे सगळे वाट पाहत आहेत." पुढे विषय न वाढवता थोडे आढेवेढे घेतच सार्थक बोलला. ओवीचे बोलणे म्हणावे तितके त्याला रुचले आहे असे वाटत नव्हते.

खरंतर ओवीला आणि संभवला एकत्र हसताना... बोलताना पाहिल्यापासून सार्थक खूपच चिडला होता. त्यातच संभवचे त्याला हसून बोलणे म्हणजे त्याची खिल्ली उडवल्यासारखे सार्थकला वाटले. त्यामुळे तो जरा जास्तच रिॲक्ट झाला.

सार्थक आणि ओवी मग सोबतच गेटच्या जवळ आले.

ओवीला समोर पाहताच कार्तिकीने तिला घट्ट मिठी मारली आणि हमसून हमसून ती रडू लागली.

कसाबसा ओवीने तिच्या भावनांना आवर घातला.

"दी...आता अजिबात रडायचं नाही आ. बघ बरं किती छान सगळं तुझ्या मनासारखं होतंय की नाही. मग आता अजिबात रडायचं नाही. हसत हसत सर्वांना निरोप दे." कार्तिकीचे डोळे पुसत अत्यंत समजूतदारपणे ओवी तिला समजावून सांगत होती.

संभव मात्र कुतूहलाने तिच्याकडे पाहत होता.

"तू कुठे गेली होतीस मला न सांगता? बाजूला जाऊन रडत बसली होतीस ना?" कार्तिकीने विचारले.

"नाही गं...मी.. ते...आपलं... वॉशरुमला गेले होते अगं." नजर चोरत ओवी बोलली.

"खोटं..तुझा चेहराच सांगतोय सगळं."

न राहवून ओवीचे डोळेही आता पाणावले. पण कार्तिकीसाठी तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला. ओवीच्या गप्प राहण्यातच तिचे उत्तर दडले होते. जे की कार्तिकीलाही समजले होते.

"बरं चला आता...उशीर होतोय. सर्वांनी हसत हसत निरोप दया बरं तिला आणि नव वधू-वराला भरभरून आशीर्वाद देखील द्या. अजिबात आता कोणी रडायचं नाही. हवं तेव्हा तुम्ही तिला भेटू शकता, मग रडायचं काय त्यात आणि आम्ही आहोतच की सगळे. आता ती आमचीही लेकच आहे. जशी आम्हाला आमची प्रणिती अगदी तशीच आता कार्तिकी." हसतच प्रदिपराव म्हणाले आणि ड्रायव्हरला त्यांनी गाडी काढायला सांगितले.

लेकीच्या सासरच्यांचे असे धीराचे शब्द कानी पडताच शशिकांतराव आणि माधवी ताई अगदी भरून पावल्या.
कोणत्याही मुलीच्या आई वडिलांना अगदी असेच वाटत असते.

'नव्या घरात, नव्या ठिकाणी, नवीन माणसांमध्ये आपली लेक लवकर रुळेल का तसेच तिथे तिला समजून घेतील का? नव्याने संसाराचा श्री गणेशा करताना सगळ्यांचे मन राखत सगळ्या जबाबदाऱ्या तिला पेलता येतील का?'
असे एक ना अनेक प्रश्न त्या आई बाबाच्या मनात पिंगा घालत असतात. पण मनातून कुठेतरी लेकीबद्दल, आपल्या संस्कारांबद्दल त्यांना विश्वास देखील वाटत असतो आणि कितीही काही झाले तरी आई बापाचे मन लेकीसाठी हळवेच असते. अगदी तसेच काहीसे झाले होते कार्तिकीच्या आई बाबांचे.

थोड्याच वेळात कार्तिकीची पाठवणी झाली आणि खऱ्या अर्थाने आजच्या या विवाह सोहळ्याची सांगता झाली. कार्तिकी सोबत तिची पाठराखीण म्हणून अर्थातच ओवी गेली. सोबत मोठे कोणीतरी असायला हवे म्हणून कार्तिकीच्या मेधा मावशीला देखील पाठवले.

ओवी कार्तिकीसोबत आली, याचा संभवला मनातून खूपच आनंद झाला होता. त्याच्या मनाने त्याला आज फायनल सिग्नल अखेर दिला होता. ओवीबद्दल त्याच्या मनात आपसूकच ओढ निर्माण झाली होती.

क्रमशः

आता पुढे काय होणार? जाणून घेण्यासाठी वाचत राहा अधीर मन झाले..एक प्रेमकथा. तोपर्यंत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all