अधीर मन झाले..(भाग २१)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
ओवीने सार्थकच्या मदतीने समरचे शूज तर मिळवले होते, पण संभव मात्र तिच्या या चाणाक्ष वृत्तीवर मनापासून फिदा झाला होता.

दुरुनच ओवी संभवला नजरेतून खिजवत होती, त्याला पुरेपूर खुन्नस देत होती. पण संभवला मात्र म्हणावा तितका त्रास काही होत नव्हता.
'उलट ओवीने जे ठरवले ते करून दाखवले,' ह्या गोष्टीचा माहीत नाही का पण संभवला मनातून खूपच आनंद होत होता. ओवीच्या चेहऱ्यावर पसरलेले आनंदाचे हास्य संभवला आणखीच तिच्यात गुंतायला भाग पाडत होते. तोही हसतमुखाने तिला प्रतिसाद देऊन जणू तिच्या कृत्याला प्रोत्साहनच देत होता.

संभवचे असे वागणे पाहून प्रणिती मात्र त्याच्यावर खूपच चिडली होती.

"ये ब्रो...तू हे अजिबात बरोबर केलं नाहीस आ. तू मुद्दाम केलंस ना असं? तरी मला राज बोलला होता, ह्याच्यावर विश्वास ठेऊ नकोस. तू मुद्दाम शूज घेऊ दिले ना त्यांना?" रागातच प्रणितीने प्रश्नांचा भडीमार सुरू केला.

"नाही गं बाई..मी का असं करेल प्रणी?" संभव म्हणाला.

"तू तसंच केलंस ब्रो...एव्हढा मोठा ऑफिसर तू आणि साधे शूज सांभाळू शकला नाहीस. यावर विश्वास तरी बसेल का कोणाचा? "

"आता यावर माझाच विश्वास बसेना तर इतरांचं काय घेऊन बसलीस प्रणी. मलाही कोणीतरी मूर्ख बनवू शकतं, हे आजच समजलं." चेहेऱ्यावर जबरदस्तीचे हासू आणत संभव म्हणाला.

"आणि तुम्ही सगळे काय करत होतात? त्याचं लक्ष नाही निदान तुमचं तरी हवं ना." प्रणिती तिथे उपस्थित सर्वांना उद्देशून बोलली.

"बरं जाऊ दे आता, शांत हो बरं." समजावणीच्या सुरात संभव बोलला.

"जाऊ दे कसं? जा आता आधी दादूचे शूज घेऊन ये. नाहीतर मी तुझ्याशी बोलणारच नाही." रडवेल्या सुरात प्रणिती बोलली.

"प्रणी...नको ना गं इतकं पॅनिक होवूस. घेतले तर घेऊ दे ना शूज. एवढं काय त्यात? लग्नात हे असं होतंच राहतं. टेक इट स्पोर्टिंगली यार. एकप्रकारचा गेम आहे तो गेमसारखंच घे ना आणि गेम में तो हार जीत होती ही रहती है!" प्रणितीच्या गळ्यात हात घालून तिला जवळ घेत मस्का मारण्याचा संभव प्रयत्न करत होता.

"आजतरी मला नकोय तुझा हा मस्का... ठेव तुझ्याकडेच." रागातच प्रणिती बोलली आणि संभवचा हात झटकून तिथून निघून गेली."

"संभव आता काही खरं नाही बाबा तुझं. एकीकडे ओवी आणि दुसरीकडे प्रणी... त्या दोघींमध्ये तुझी डाळ शिजेल असं अजिबात नाही वाटत मला." हसतच स्वराज बोलला.

"हो का? पण या सगळ्याला तुम्ही सगळे देखील तितकेच जबाबदार आहात आ! माझं...ठीक आहे, पण तुम्ही समजून घ्यायला हवं ना मला. होतं असं कधी कधी." भुवया उंचावत स्वतःबद्दल सफाई देत संभव बोलला.

"ओय होय..काय लाजतोस भावा...पण काहीही म्हण संभव तुझी विकेट काढली ओवीने. जे भल्या भल्या मुलींना जमलं नाही ते ओवीने एका दिवसात करून दाखवलं बघ." पुन्हा हसतच स्वराज बोलला.

स्वराजच्या बोलण्याने संभवचा चेहरा मात्र गोरमोरा झाला. कारण स्वराजचे बोलणे कुठेतरी त्यालाही पटले होते.

"गप रे..काहीही बोलू नकोस. असं काही नाहीये." असे बोलून संभवने मात्र उडवाउडवीचे उत्तर दिले.

"आयडिया देणं आता बंद कर हा संभव आणि मान्य कर की ओवी तुला आवडते." स्वराज म्हणाला.

"मी का मान्य करू? तुम्ही काहीही बोलाल आणि मी लगेच मान्य करायचं! नॉट फेअर आ. पण काय रे, तुम्ही सगळे तिथेच होतात ना, मग असं असताना त्यांनी शूज नेलेच कसे? तुमचं सगळ्यांचं लक्ष कुठे होतं?" संभवने विचारले.

"तुमचा आँखो ही आँखो में रोमान्स सुरू होता, मग आम्हीही खूप एन्जॉय करत होतो ते सगळं. त्या गडबडीत थोडं दुर्लक्ष झालं शुजकडे." गालातल्या गालात हसत आणि संभवची खेचत अगदी शांतपणे स्वराज बोलला.

"काहीही काय बोलतोस स्वराक...रोमान्स काय रोमान्स. पहिल्याच भेटीत कोण रोमान्स करतं? म्हणे आँखो ही आँखो रोमान्स सुरू होता आणि तुम्ही सगळे काय तर एन्जॉय करत होतात. मग आता झाला असेल एन्जॉय तर जा बघा भेटतात का शूज? आता थोड्याच वेळात लग्नाचे सगळे विधी पण पूर्ण होतील मग काहीच करता येणार नाही." त्रासिक सुरात संभव म्हणाला.

संभवची अशी द्विधा झालेली मनस्थिती पाहून स्वराजला मात्र हसूच आवरेना.

"तुला तर आज खूपच हसायला येतंय रे. घे घे.. आता घे तू मजा पण वेळ आल्यावर मग बघतो तुझ्याकडे." स्वराजला असं हसताना पाहून लटक्या रागातच संभव म्हणाला.

थोड्याच वेळात समर आणि कार्तिकीचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. कार्तिकीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून, साताजन्माची वचने देत समर आणि कार्तिकीने आयुष्याच्या एका नव्या अध्यायाला अखेर सुरुवात केली.

काही वेळातच कन्यादानाचे विधी देखील निर्विघ्नपणे पार पडले. फोटो सेशनसाठी मग सर्वांची गर्दी झाली. कात्रजची लेक आता पाषाणची सून झाली होती.

"अरे संभव..शूज आण ना माझे. तुझ्याकडेच होते ना!" सर्व विधी पूर्ण झाल्यावर समरने विचारले.

"दादू...अरे एक प्रॉब्लेम झालाय."

"आता काय झालं?"

"तुझे शूज तुझ्या मेहुणीकडे आहेत. वहिनीला सांग ना...ती सांगेल तिला द्यायला." संभव म्हणाला.

"बरं केलं. आता ती इतक्या सहजासहजी देणार आहे होय. विसर आता. ओवी म्हणतात तिला." समर बोलला.

तेवढ्यात समरने कार्तिकीला शूजबद्दल सांगितले. कार्तिकीने लगेचच ओवीला जवळ बोलावले.

"ओवी...काय सुरू आहे तुझं? देऊन टाक बरं त्यांचे शूज. बरं दिसतं का ते?" गोड शब्दांत कार्तिकीने ओवीला समज दिली. पण इतकी गोड भाषा ओवीला थोडीच ना समजणार होती.

"बरं न दिसायला असं काय झालंय दि? आणि असे कसे देणार शूज? प्रथा असते ती. त्यामुळे शूज हवे असतील तर त्याबदल्यात आम्हाला काहीतरी शगुन द्यावाच लागेल. सांग तुझ्या नवऱ्याला." ओवीने लगेचच मनातील भावना बोलून दाखवतात.

"ओवी..अगं त्याची काही गरज आहे का?" पुन्हा एकदा कार्तिकी बोलली.

"गरज नाही पण प्रथा आहे ना दी तशी. मग आता मी तरी काय करु?"

"ओवी...देऊन टाक बरं त्यांचे शूज. पुरे झाला आता बालिशपणा." कडक शब्दांत कैवल्यने देखील ओवीला दम भरला. त्यामुळे प्रणितीला मात्र मनातून खूपच आनंद झाला.

"दादा...अहो असू द्या ना. एकुलती एक मेहुणी आहे माझी. तिने नाही हट्ट करायचा मग कोणी करायचा?" ओवीची बाजू सावरत समर बोलला.

"बरं ओवी..बोल काय हवंय तुला?" समरने विचारले.

"स्वेच्छेने तुम्हाला जे द्यायचे ते देऊ शकता." ओवी म्हणाली.

समरने लगेचच कोणतेही आढेवेढे न घेता पाकिटातून दोन हजार रुपये काढून ओवीच्या हातात टेकवले.

"हे घे...दोन हजार. बस का?" समर म्हणाला.

ओवीने एक कटाक्ष कैवल्यवर टाकला. नजरेतूनच त्याने 'एवढे पैसे नको घेऊ' असा सिग्नल दिला. ओवीचीही त्यामुळे द्विधा मनस्थिती झाली.

"नाही नको..एवढे कशाला?" आढेवेढे घेत कैवल्यचे मन राखण्यासाठी ओवी म्हणाली.

"राहू दे गं. ठेव..तसंही तू ह्या पैशांचा नक्कीच काहीतरी सदुपयोगच करशील, याची खात्री आहे मला." समर म्हणाला.

समरचे बोलणे ऐकून ओवीच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. ओवीचे निरागस हास्य पाहून संभवच्या चेहऱ्यावर देखील आपसूकच मग हास्यकळी खुलली. प्रणिती मात्र हिरमुसली. अगदी छोट्याशा चुकीमुळे त्यांची हार जी झाली होती. पण असो जे झाले ते झाले म्हणत तिनेही मग लगेचच सत्य स्वीकारले.

वेळ जात होती तशी लेकीची पाठवणी देखील जवळ येत होती. त्यामुळे शशिकांतराव आणि माधवी ताईंच्या चेहऱ्यावर लेकीसाठीची चिंता आणि मनात कुठेतरी हुरहूर दाटली होती. लेक देशमाने कुटुंबाची सून झाली याचा आनंद व्यक्त करावा की ती आपल्याला सोडून दूर जाणार याचे दुःख मानावे हेच त्यांना समजेना. थोडक्यात काय एका डोळ्यात हासू तर दुसऱ्या डोळ्यात आसू अशीच काहीशी परीस्थिती निर्माण झाली होती.

हळूहळू आता पाहुण्यांची गर्दी कमी होत चालली होती. घरचे आणि जवळचे नातेवाईक तेवढे थांबून होते. बघता बघता कार्तिकीच्या पाठवणीची वेळ आली. बाहेर समरची गाडी तयारच होती.

सगळ्यांत आधी कार्तिकीची पावले शशिकांत रावांच्या दिशेने वळली. लाडक्या लेकीने मग तिच्या बाबाला घट्ट मिठी मारली. शशिकांत रावांच्या भावनांचा देखील आता बांध तुटला. अंगा खांद्यावर खेळलेली लेक पाहता पाहता किती मोठी झाली आणि आता सासरी देखील निघाली. बापाचा ऊर मात्र भरुन आला. सोप्पं नाही एका लेकीचा बाप होणं. आपल्या काळजाचा तुकडा असा दुसऱ्याच्या हवाली करताना त्या पित्याला काय वेदना होत असतील हे फक्त एका लेकीचा बापच जाणो.

कार्तिकीला असं रडताना पाहून समरच्या हृदयात देखील अगदी कालवाकालव झाली. नकळतपणे त्याचे डोळेही पाणावले.

'खरंच कार्तिकी बायको म्हणून आज माझ्यासोबत येणार याचा आनंद साजरा करू की तिच्या जन्मदात्यांपासून तिला दूर करत असल्याचे दुःख मानू तेच समजेना झालंय.' समर मनाशीच बोलला.

दिवसभराच्या आनंदानंतर आलेला हा अत्यंत भावूक क्षण प्रत्येक मुलीला आणि तिच्या आई वडिलांना कधीही चुकला नाही.

माधवी ताईंनी लेकीचे अश्रू पुसत तिला कुशीत घेतले. स्वतःच्या भावनांना आवर घालण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र सपशेल फसला. कार्तिकीचे बालपण झरझर त्यांच्या डोळ्यासमोर तरळले. कसेबसे स्वतःला सावरत कार्तिकीच्या पाठवणीसाठी त्यांनी मनाची तयारी केली.

सर्वांनी मग कार्तिकीची समजूत घातली.

"रडू नकोस..आम्ही आहोत सगळे इथेच. केव्हाही आपण भेटू शकतो." असे म्हणत सर्वजण कार्तिकीची समजूत काढत होते.

"आमची लेक आजपासून तुमची झाली. तिचे काही चुकले तर  समजावून सांगा आणि तिला समजून घ्या."माधवी ताई नंदा ताईंना म्हणाल्या.

"काळजी करू नका. कार्तिकी आमची सून नाही तर लेक म्हणून आम्ही आज तिला आमच्या सोबत नेत आहोत." दिपकराव आणि नंदा ताईंनी शशिकांतराव आणि माधवी ताईंची समजूत काढत त्यांना खूप मोठा आधार दिला. त्यांचे हे शब्द कानी पडताच शशिकांतराव आणि माधवी ताईंना खूप मोठा आधार मिळाला होता.

शशिकांतराव आणि माधवी ताईंनी कशीबशी लेकीची समजूत काढली. अश्रूंनी भरलेली कार्तिकीची नजर मात्र एवढ्या गर्दीतही ओवीला शोधत होती.

"छोटी आई...ओवी कुठेय?" इकडेतिकडे पाहत रडवेल्या सुरात कार्तिकीने सीमा ताईंना विचारले.

"अगं ती इथेच होती ना आता." सीमा ताई उतरल्या.

"ओवी..." सीमा ताईंनी आवाज दिला. पण ओवी मात्र तिथे नव्हतीच. 

'कुठे गेली ही मुलगी?' रमाकांतराव मनातच बोलले.

संभवची नजर देखील आता इकडेतिकडे ओवीला शोधू लागली. पण आजूबाजूला ती कुठेही दिसत नव्हती.

"सार्थक...अरे तुलाही माहीत नाही का ओवी कुठे आहे ते?" सुलू आत्याने लेकाला प्रश्न केला.

"आई...अगं इथेच तर होती ती आता. पण लगेचच कुठे गायब झाली माहीत नाही." सार्थक म्हणाला.

"सार्थक तिला कॉल करून बघ." आजी म्हणाल्या.

" अगं आजी आज सकाळपासून तिचा मोबाईल माझ्याकडेच आहे. हे बघ." खिशातून मोबाईल काढत सार्थक बोलला.

"अरे देवा...ही ओवी पण ना...बरोबर आयत्या वेळी नेमका असा काहीतरी गोंधळ घालून ठेवते." सानवी म्हणाली.

"असेल ती इथेच कुठेतरी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी बघतो तिकडे." सार्थक म्हणाला.

"सार्थक थांब मी पण येतो." म्हणत संभवदेखील त्याच्यासोबत जायला निघाला.

"हो चला."

संभवच्या पाठोपाठ स्वराज देखील गेला.

"तू इकडे बघ आम्ही तिकडे आहे का ते पाहतो." संभव म्हणाला. आणि मग तिघेही ओवीला शोधायला गेले.

क्रमशः

कुठे गेली असेल ओवी? काय झालं असेल नेमकं? सापडेल का आता ती? जाणून घेऊयात पुढील भागात. त्याआधी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरुर सांगा.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all