अधीर मन झाले..(भाग २०)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
"सार्थक अरे त्यांनी चेअरच्या खाली शूज ठेवलेत." इकडे तिकडे पाहत ओवी सार्थकला म्हणाली.

"हो पाहिले मी..पण सगळेजण तिथेच आहेत ओवी. कसं करायचं मग आता?" सार्थक म्हणाला.

"डोन्ट वरी... मैं हू ना...बघच तू मी काय करते."

"म्हणजे नेमकं काय करणार आहेस ओवी तू?" सार्थकने विचारले.

"त्यांचं लक्ष विचलित करायचं काम माझं. फक्त योग्य वेळ पाहून तू शूज तिथून उचलायचे. जमेल ना पण तुला? तुझ्या चेहऱ्याकडे पाहून तर वाटत नाही तुला जमेल असं."

"तसं नाही गं ओवी...पण हे असं याआधी कधी केलं नाही ना म्हणून थोडी भीती वाटतेय."

"हो का...आणि मी काय रोज लोकांचे शूज चोरत असते का? थोडक्यात मला खूप एक्सपिरियन्स आहे त्यात असं म्हणायचंय का तुला?" खोचकपणे ओवी बोलली.

"मी तसं म्हणालो का गं ओवी? तू ना प्रत्येक वेळी माझ्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ घेतेस आणि मग त्यामुळेच वाद होतात आपल्यात. मला नाही आवडत तू माझ्यावर रागवलेलं." अत्यंत त्रासिक स्वरात सार्थक बोलला.

"बरं बाबा..नाही रागवत. पण तू करशील ना माझं काम? मध्येच मला एकटीला अडकवून पळून तर नाही ना जाणार."

"न करून आता सांगू कोणाला?" तोंडातच सार्थक पुटपुटला.

"काही म्हणालास का?"

"नाही, नाही..कुठे काय? मी म्हणालो की, असा दिलेला शब्द हा सार्थक कधीही मोडत नाही..समजलं? तू जा बोल त्यांच्याशी मी घेतो बरोबर शूज." सार्थकला हे पटत नव्हते पण फक्त ओवीच्या आनंदासाठी तो तिला साथ देत होता.

"हो...ते माहितीये..पण आधीच शब्द देऊ की नाही ह्या विचारांत कितीतरी वेळ वाया घालवतोस." हसतच ओवी म्हणाली.

"बस झालं, नको आता पुन्हा त्याच त्याच विषयावर बोलूस. चल..."

"ओवी जरा जपून हा... चुकीचा माणूस निवडलाय तू ह्या कामासाठी. आमच्या सार्थकला केव्हा जमायचे हे असे शूज वगैरे चोरणं." हसतच सानवी बोलली.

"तू बघ ना तुझं..दरवेळी असे माझे पाय खेचत असतेस. पण ह्यावेळी बघ दाखवतोच मी तुला आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या लग्नात तुझ्या नाकावर टिच्चून तुझ्या नवऱ्याचे शूज चोरुन दाखवणार आणि जोपर्यंत म्हणेल ती रक्कम हातात येत नाही तोपर्यंत शूज देणार पण नाही. मग तेव्हा म्हणू नकोस, मी चुकीचा आहे म्हणून." रागातच सार्थक सानवीला म्हणाला.

"आधी आज घेतलेलं चॅलेंज पूर्ण करून दाखव आणि मग पुढचे प्लॅनिंग कर तू." सानवी सार्थकवर पुर्णपणे अविश्वास दाखवत म्हणाली. 

"तू गप्प बस ना गं सानू दी.. तुला नको मला मदत करायला आणि तो करतोय तर त्यालाही मागे खेचतेस. तो अभ्या आणि तू सारखीच आहेस. काहीच फरक नाही दोघांमध्ये आणि जमणार आहे सार्थकला, तू नको काळजी करू." रागातच ओवी बोलली. तिच्या बोलण्याने सार्थकचा आत्मविश्वास मात्र दुणावला.

थोड्याच वेळात मागचा पुढचा कोणताही विचार न करता ओवी डायरेक्ट संभवच्या समोर जाऊन उभी राहिली."

ओवीला असं अचानक समोर आलेलं पाहून संभवने नजर फिरवली. कारण त्याने असा विचार पण केला नव्हता ही डायरेक्ट अशी समोर येईल.

संभवचे ओवीकडे लक्ष होते पण ती जवळ आल्यावर त्याच्या हृदयात जणू पुन्हा फुलपाखरं उडायला लागली. त्याच्या पोटात मोठा गोळा आला. ओवीचा तो पहिला स्पर्श आठवून संभवच्या हृदयाची स्पंदने आपसूकच वाढली. काही क्षण का होईना पण पहिल्यांदा एखादी मुलगी आपल्या मिठीत होती. आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या मुलीचा स्पर्श त्याने इतक्या जवळून अनुभवला होता आणि आता त्याच मुलीचं आपल्या अवतीभोवती असणं त्याला हवंहवंसं वाटत होतं. ती भाग्यवान मुलगी म्हणजे ओवी. ओवीसोबतचा प्रत्येक अनुभव त्याच्यासाठी अविस्मरणीय होता.

आधी शाळा, कॉलेज, करिअर ह्या सगळ्यांत संभवचं आयुष्य जणू जगायचं राहूनच गेलं होतं. आता सगळं काही त्याच्या मनासारखं झालं होतं पण त्या आयुष्याला अर्थ प्राप्त करुन देण्यासाठी त्याला आता गरज होती ती म्हणजे त्याच्या हक्काच्या जवळच्या माणसाची. त्याच्या मनाला ओढ लागली होती ती म्हणजे प्रेमाची. त्याच्या प्रेमभावना जपणाऱ्या त्या नाजुक मनाची.

ओवी अगदी योग्य वेळी त्याच्या आयुष्यात आली होती. असे म्हणायला हरकत नाही. हा योगायोग म्हणावा की आणखी काही हे त्यालाही समजेना. पण ओवीचा सहवास अगदी काही वेळातच त्याला हवाहवासा वाटू लागला होता खरा. आपण कोण आहोत! काय आहोत! या सगळ्याचा त्याला जणू विसर पडला होता.

ओवीविषयी त्याला जास्त काही माहिती नव्हते. समरकडून जेवढं काही तिच्याबद्दल ऐकलं होतं, बस तेवढंच आणि ओवी सोबतची पहिली भेट तर तो कधी विसरुच शकत नव्हता. पहिल्याच भेटीत अत्यंत उद्धट आणि बालिश वाटली होती ती त्याला. पण तिच्या निरागस चेहऱ्याच्या पाठीमागे एक अत्यंत समंजस मुलगी दडलेली आहे हे आता त्याने अगदी जवळून अनुभवले होते. उगीच नाही त्याच्या मनात ओवीविषयी ओढ निर्माण झाली.

कॉलेज लाईफमध्ये खूप मुली त्याच्यावर फिदा असायच्या.  पण ह्या पठ्ठ्याने काही कोणाला भिक घातली नाही. त्याची हुशारी कधी लपलीच नाही.

एअर फोर्समध्ये भरती होण्याचे स्वप्न अगदी कळत्या वयापासून त्याने डोळ्यांत साठवले होते. मुळातच तो हुशार होता. देशमाने फॅमिलीची तो शान होता. जोपर्यंत त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही तोपर्यंत इतर सर्व गोष्टी त्याच्यासाठी शुल्लक होत्या. फायनली मनातील स्वप्न जेव्हा सत्यात उतरले तेव्हाच इतर गोष्टींसाठी त्याने मनात आणि डोक्यात जागा रिक्त केली आणि ओवी म्हणजे त्या रिक्त जागेत स्वतःचे स्थान निर्माण करणारी  पहिलीच व्यक्ती होती.

ओवी निरागसपणे संभवकडे पाहत त्याच्यासमोर उभी होती.

ओवीचे साडीतील रूप आज अधिकच खुलले होते. तिच्या त्या रूपाने संभवच्या मनाला अधिकच भुरळ घातली. जवळून ओवीला न्याहाळताना त्याच्या मनात वेगळीच स्पंदने निर्माण होत होती. परंतु तसे न दाखवता संभव मात्र नजर चोरत थोडा ॲटिट्युडवाला भाव चेहऱ्यावर आणत तसाच खुर्चीत बसून राहिला.

'आता ही काय बोलणार?' याकडेच त्याचे लक्ष लागले होते.

स्वराज तर आज दोघांच्याही हालचालींवर जणू लक्षच ठेऊन होता. ओवीसमोर आल्यावर संभवची उडालेली तारांबळ पाहून आता स्वराजला देखील हसू येत होते.

"प्लीज मला हे शूज हवे आहेत, मिळतील का?" निरागसपणे ओवीने प्रश्न केला.

ओवीचे हे बोलणे ऐकून संभवबरोबरच सगळ्यांना हसू आले. कारण 'असं कोणी शूज मागतं का? आणि मागितलेच तर कोणी देईल का?' हा प्रश्न अगदी सहजच कोणाच्याही मनात येईल.

"ही तीच मुलगी आहे का.. जिने आता काही वेळापूर्वी माईकमधे अप्रतिम स्पीच दिले?" खोचकपणे संभवने ओवीला प्रतिप्रश्न केला पण त्यातही ओवीचेच कौतुक होते.

"येस..एकदम बरोबर ओळखलंत. मी तीच मुलगी आहे. आता समजलं ना तुम्हाला, मग आतातरी देताय ना शूज?" हसतच पुन्हा एकदा ओवीने तोच प्रश्न केला.

तिच्या त्या बोलण्याने आणि गोड हसण्याने संभव पुरता घायाळ झाला. ओवीत कुठेतरी एक लहान आणि निरागस मुल दडलेलं होतं. आधी नाही पण आता संभवला हळूहळू तिच्यातील ते लहान मूल देखील खूपच आवडू लागलं होतं.

'कशी आहे ना ही मुलगी? का असं वागत असेल? जी अवस्था माझ्या मनाची झालीये तीच अवस्था हिच्याही मनाची झाली असेल का?' संभव स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारत होता. विचार करता करता त्याची तंद्री लागली. तो एकटक ओवीकडे पाहत होता. ओवीदेखील क्षणात त्याच्या त्या पाणीदार डोळ्यांत हरवून गेली. पण सर्वजण त्या दोघांकडेच बघत होते.

कायमस्वरूपी पुस्तकं आणि अभ्यासात रमलेल्या संभवला सगळेच जण अगदी लहानपणापासून पाहत आले होते, पण आता त्याच्यातील हा बदल देखील सर्वांना मनापासून आवडला होता. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी गोड स्मित पसरले होते.

परिस्थितीचे भान राखत ओवी लगेचच भानावर आली. संभवच्या अशा एकटक बघण्याने खरंतर ओवीदेखील घायाळ झाली होती. नजर चोरत क्षणभर तिने इकडेतिकडे पाहिले, पण आता हाच खरा चान्स आहे. असे म्हणून तिने थोडेसे पेशंस ठेवत जागेवरच उभे राहणे पसंत केले.

"संभव अरे काय सुरू आहे तुझं? त्या काहीतरी म्हणत आहेत. उत्तर दे ना त्यांना." ओवीची अवस्था पाहून स्वराज संभवच्या कानात बोलला. पण तरीही संभवच्या डोक्यात सुरू असलेले ओवीबद्दलचे विचार थांबायचे काही नावच घेईनात.

"अहो...कुठे हरवलात?" अखेर न राहवून संभवसमोर जोरात चुटकी वाजवत ओवीने त्याची तंद्री भंग केली.

"सॉरी पण तुम्हाला हे शूज नाही देऊ शकत मी." चेअरखालून शूज काढत संभव म्हणाला.

' काय केलं हे.. कशाला उचलले शूज. आता कसे चोरता येणार ते आम्हाला?' मनातच ओवी विचार करु लागली.

मागचा पुढचा कोणताही विचार न करता ओवीने मग संभवच्या हातातील शूज ओढून घेण्याचा प्रयत्न केला. काहीही झाले तरी संभवने ते शूज पुन्हा खाली ठेवावेत हा त्यापाठचा उद्देश होता.

संभवच्या हातातील शूज ओढून घेताना नकळतपणे होणारा तो चोरटा स्पर्श दोघांनाही जणू हवाहवासा वाटत होता. त्यामुळे दोघांच्याही चेहेऱ्यावर आपसूकच हास्य फुलले होते.

"सिधी उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढी करनी ही पडती हैं!" हसतच ओवी बोलली.

"नो चिटिंग हा ओवी." संभव म्हणाला.

पहिल्यांदा संभवच्या तोंडून "ओवी" हे नाव ऐकताना ओवीला प्रचंड भारी फील झाले.

"मी कुठे चिटिंग करत आहे?" पुन्हा एकदा हसतच ओवी म्हणाली.

"मग असं डायरेक्ट नाही तुम्ही ओढू शकत हे शूज."

"बरं..नाही ओढत पण प्लीज द्या ना हो ते शूज मला. मी पुन्हा देईल की." विनवणीच्या सुरात ओवी म्हणाली.

"अरे बापरे! पुन्हा देणार आहात? मग घ्यायचेच कशाला?" पुन्हा चेअरखाली शूज सरकवत संभव बोलला.

"तसं नाही ओ, एक प्रॉब्लेम झालाय..माझ्या मैत्रिणींनी माझ्याशी पैज लावलीये..मी जर शूज मिळवून दाखवले तर त्या मला मी म्हणेल ते देणार आहेत." ओवी म्हणाली.

"हो का...पण मग त्यात माझा काय फायदा बरं?" संभवने विचारले.

"असं कसं फायदा नाही. ह्यावेळी तुम्ही मला मदत करा मग जेव्हा तुमची वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला मदत करेल." ओवी बोलली.

ओवीने संभवला बोलण्यात इतके काही गुंतवून ठेवले होते की आपल्याला शुजवर लक्ष ठेवायचे आहे हेही क्षणभर तो विसरुन गेला. जमेल तितकं तो ओवीला आपल्या नजरेत साठवून घेत होता. माहीत नाही पुन्हा इतक्या जवळून तिला न्याहाळता येईल की नाही, म्हणूनच त्याची नजर जणू तिच्यावरच खिळली होती.

"बरं... मला एक सांगा ना.. देताय ना शूज?" ओवीने ह्या एकाच वाक्याचा जणू पाठपुरावाच केला होता. तिने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला.

"नाही...नाही...नाही." अत्यंत त्रासिक सुरात संभव उत्तरला.

"काही नका देऊ, राहू द्या मग तुम्हालाच." रागातच ओवी बोलली आणि ती पाठमोरी फिरली.

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे संभव पाहतच राहिला.

दोन पावलं चालून गेल्यावर पुन्हा एकदा ओवीने मागे वळून पाहिले. तोपर्यंत शूज चोरण्यात सार्थक यशस्वी झाला होता.

ओवीला मात्र आता हसूच आवरेना. एवढे सगळेजण तिथे असताना देखील सार्थकने चलाखी दाखवत तिथून ते शूज गायब केले होते.

"जपून ठेवा हा शूज. नाहीतर काहीही होवू शकतं बरं का!" अत्यंत खोचकपणे आणि हसतच ओवी म्हणाली.

तिच्या या अशा हसण्याचा अर्थ संभवला देखील लगेचच समजला. वेळ न घालवता त्याने लगेचच खुर्चीखाली डोकावले. पण शूज काही तिथे नव्हते.

"ओ शिट...हे काय झालं? अरे काय करताय तुम्ही लोक. शूज वर लक्ष ठेवायला सांगितलं तर तुम्ही सगळे माझ्यावरच लक्ष ठेवून आहात की काय ? शूज नेले बघा त्यांनी. आता माझं काही खरं नाही. प्रणी काही आता मला नीट ठेवत नाही." घाबरतच ओवी बोलली.

'आपल्याला उल्लू बनवणारं कोणीतरी आहे म्हणायचं, हे आता मलाही मान्य करायलाच हवं.' मनातच संभव बोलला.

ओवीच्या चलाखीपुढे आज संभवची हुशारी सुद्घा फिकी पडली होती आणि हे त्याने देखील स्वतः मान्य केले होते.

तेवढ्यात प्रणिती तेथे आली. शूज चोरीला गेल्याचे एव्हाना तिला समजले होते.

क्रमशः

काय असेल आता प्रणितीची रीॲक्शन? जाणून घेण्यासाठी वाचत रहा.. अधीर मन झाले...एक प्रेमकथा.
परंतु, त्याआधी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all