अधीर मन झाले! भाग -८

मुसळधार पावसातील एक ओलीचिंब प्रेमकथा!

अधीर मन झाले!

भाग -आठ.



बारावीच्या परीक्षेनंतर एन.डी.ए. ची एंट्रन्स तो पास झाला होता पण खरा कस लागला होता तो दुसऱ्या टप्प्यात. संरक्षण सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना हा टप्पा पार करणे अनिवार्य असते, तो म्हणजे मुलाखतीचा. विविध निकषावर आधारित असलेली ही पाच दिवस चालणारी मुलाखत उत्तीर्ण होणे म्हणजे एक कसबच! रवी त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडला आणि खडकवासल्याच्या ह्या संस्थेत दाखल झाला. एवढा मोठा परिसर पाहून त्याचे डोळे दिपले. त्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेची कसोटी आता सुरू होणार होती.


एन.डी.ए. मध्ये त्याने बी. एस्सी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. आपल्या पदवी अभ्यासक्रमसोबतच आता तो खडतर शारीरिक आणि मिलिटरीचे प्रशिक्षणही घेणार होता. तिथे प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मध्ये विभागणी केली गेली. आता तीन वर्षासाठी हे स्क्वाड्रन्स म्हणजेच त्यांचे घर असणार होते. पूर्वी वसतिगृहात राहण्याची सवय असल्यामुळे रवीच्या अंगात एक वक्तशीरपणा भिनला होता. भल्या पहाटेपासून सुरू होणारा त्याचा दिवस रात्रीच संपत असे. अभ्यासाबरोबरच परेड, पोहणे, हॉकी, फुटबॉल, रायफल शूटिंग, रोप क्लायबिंग, स्कुबा ड्राइव्हिंग या सारखे साहसी खेळ खेळायला मिळू लागले. अभ्यासात मुळातच हुशार असलेला रवी आता विविध खेळातही तरबेज होऊ लागला होता. दिवसभर शरीर थकवणारे खेळ, कवायती करून देखील मात्र रात्री गाढ झोप लागत नव्हती. मग हळूच पाकिटातील एक फोटो काढून तो बघण्यात गढून जायचा. तो फोटो मेघाचा होता! बारावीच्या पेपरच्या शेवटच्या दिवशी तिच्या नकळत तिच्या प्रवेशपत्रवरचा फोटो काढून त्याने स्वतःच्या खिशात टाकला होता.

तोच फोटो हातात घेऊन तो बसून राहायचा.


'मेघा, तुझ्याशी प्रतारणा नव्हती करायची गं. पण माझे ध्येय मला तुझ्यापासून दूर घेऊन आले. अशा अनाथ मुलासोबत खरंच तू खूष राहू शकली असतीस काय?'

'मेघा, तू माझ्यासाठी केवळ एक गोड स्वप्न आहेस. त्या स्वप्नाच्या हिंदोळ्यावर मी कायम झुलत असेन. तू मात्र माझ्यासाठी थांबू नकोस. खूप पुढे जा. तुझ्या स्टेट्सच्या एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न कर नी खूप खूप आनंदी रहा. तुझ्या गोड आठवणीच कायम मला जगण्याची नवी उमेद देत राहतील.'


त्याचे तिच्या फोटोशी रोजचे हेच हितगुज चाले. किमान तासभर तरी तिला डोळ्यात साठवल्याशिवाय निद्रादेवी त्याच्यावर प्रसन्न होत नव्हती.


तीन वर्षांत त्याच्या या नित्यक्रमात एकदाही खंड पडला नव्हता. एन.डी.ए. ची तीन वर्ष सरली होती. रवीच्या हातात जे एन यू (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) ची बी. एस्सी. ची पदवी हातात आली होती. इथे येण्यापूर्वी नुकताच मिसरूड फुटलेला रवी आता शरीर कमावून एक उमदा तरुण बनला होता.


पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पुढील विशेष प्रशिक्षणासाठी आर्मी कॅडेट इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे तो रुजू झाला. हे वर्षही सरले आणि आर्मी ऑफिसर म्हणून तो सगळ्या परीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडला होता. पदवीदान समारंभात टोप्या उडवून सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.

आता वाट होती पोस्टिंगची. त्याआधी दोन महिन्यांची दीर्घ सुट्टी होती. चार वर्ष एकत्र काढलेल्या विद्यार्थ्यांचे एकमेकांशी ऋणानुबंध जुडले होते. एकमेकांपासून दूर जातांना प्रत्येकजण हळवा झाला असला तरी इतक्या वर्षांनी घरी परतण्याचा आनंदही होता. घरी डोळ्यात तेल टाकून वाट बघणाऱ्या मायेच्या माणसांना केव्हा भेटतो असे सगळ्यांना झाले होते.

इतकी वर्ष एकत्र घालवल्यावर त्यांच्यापासून दूर जातांना रवी देखील भावुक झाला होता. सगळ्यांना आपल्या माणसांना भेटण्याची ओढ लागली होती. रवी.. तो कुठे जाणार होता? आपल्या वाटणाऱ्या माणसांना तो तर चार वर्षांपूर्वीच सोडून आला होता.

आता परत एकदा आपल्या अनाथाश्रमात परत जाण्याचा त्याने निर्णय घेतला. ही दोन महिने आश्रमतल्या छोट्या मुलांसोबत घालवायची आणि त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी प्लॅन्स करायचे ह्या विचारात तो डेहाराडूनच्या विमानतळावर पोहचला.

डेहराडून ते दिल्ली, त्यानंतर मुंबई आणि मग आपल्या शहरात! 


विमान आकाशात झेपावले आणि तो कापसाच्या पुंजक्यासारख्या ढगातून जातांना त्याच्या डोळ्यापुढे मेघाचा हसरा चेहरा उभा ठाकला. तीही अशीच तर होती. इतकी एकदम पांढरीशुभ्र नाही पण गव्हाळ कांतीची होतीच ना.


'मेघा, अजूनही तशीच असशील का गं तू? काळजी घेणारी. जराशी चिडकी, काहीशी भांडकुदळ अन ह्या सर्वाहून गोड! अजूनही थांबली असशील का गं माझ्यासाठी? की कोणीतरी भेटला असेल एखादा जीवभावाचा सखा, ज्याला तू नकार देऊ शकली नसशील?'

त्याने आपल्या खिशातून मेघाचा फोटो काढला.

'किती निरागस होतीस तू मेघा. मला विसरली असशील का गं?'

त्याच्या डोळ्यातील थेंब गालावर ओघळले.

*******

त्याचा विमानाचा प्रवास संपला होता. ह्या बसने पुढल्या तासात त्याचे ते शहर आणि मग दुसऱ्या एस. टी ने पुढच्या दोन तासांनी त्याच्या इच्छित स्थळी, एवढेच बाकी होते.

तासाभराने तो बसमधून खाली उतरला. ते शहर, ती भूमी त्याला पूर्वीइतकीच आपलीशी वाटत होती. आयुष्याला कलाटणी देणारी महत्वाची दोन वर्षे याच शहरात तर काढली होती. त्याचे ते कॉलेज, पहिल्यांदा मेघा भेटली तो बसचा थांबा.. सारे काही जसेच्या तसे नजरेसमोर आले. आकाशसारखा सच्चा दोस्त आठवला.


'तो विसरला असेल का मला? नव्या मित्रांच्या गराड्यात त्याला कधी माझी आठवण येत असेल का?'

आपल्या विचाराच्या तंद्रित असताना एक बाईक थोडी समोर जाऊन परत त्याच्याशेजारी येऊन थांबली. हा आपल्याच विचारात हरवला होता. त्या बेसावध क्षणी कोणीतरी कडकडून त्याला मिठी मारली.


"आकाश?"   त्या मिठीतला ओळखीचा स्पर्श अधिकच घट्ट झाला.


"रवी केव्हा आलास? नी कसला हँडसम दिसतो आहेस तू?"

मिठी सोडवत आकाश म्हणाला. समोर जाताना बाईकच्या आरशातून त्याला रवी दिसला म्हणून तो माघारी आला होता.


"तू सुद्धा एकदम भारी दिसतो आहेस हं. वजनाने आणि चेहऱ्याने सुद्धा." रवी म्हणाला. त्याला असे अनपेक्षितपणे बघून तो सुखावला होता.

दोघांनी पुन्हा एकमेकांना आलिंगन दिले.


"चल, घरी जाऊया."  त्याचा हात पकडत आकाश.


"नको रे मित्रा, अजून आश्रमतल्या सरांना मी येतोय हे कळवले नाहीये. मला पोहचायला उशीर होईल."  तो नजर चोरत म्हणाला.


"अरे, त्यांना तू काही कळवलेच नाही तर कसला उशीर होईल? चल पटकन बस."


"अरे, खरंच नको."  रवी.


"डोन्ट वरी, मेघा नाहीये इथे."   आकाश त्याच्या मनातील ओळखून म्हणाला.


"म्हणजे?"  तो.


"अरे, मागच्याच वर्षी लग्न करून ती गेलीय."  त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत आकाश बोलत होता.


"कुठे?"  तो.


"तिच्या सासरी. जवळच एक खेडे आहे, तिथे असते ती." आकाश मिश्किल हसत म्हणाला. "पण तुझा चेहरा का उतरला असा?"  आकाश.


"कालपासून प्रवास करून थकवा आलाय रे."   उसणे हसून रवी म्हणाला. मेघाचे लग्न झालेय हे ऐकूनच मनाला एक अस्वस्थता आली होती.


"मग लगेच घरी चल. आईच्या हातचा गरमागरम चहा पिशील तर एकदम तरोताजा होऊन जाशील." त्याची बॅग बाईकवर ऍडजस्ट करत आकाश.

तो आकाशसोबत निघाला खरा, पण मन पहिल्यांदा भेटलेल्या मेघाभोवती पिंगा घालत होते. तिचे बोलके डोळे आठवून मनाला यातना होत होत्या.

'इतका स्वार्थी कसा आहे मी. ती आनंदी असेल तर मलाही आनंदच व्हायला हवा ना?'

आकाशने ब्रेक लावला तसा तो विचारातून वर्तमानात परतला.


" उतरा, घर आलेय."  आकाशच्या आवाजाने तो उतरला.


"मेघाच्या लग्नाचे वाईट वाटतेय का तुला?' त्याला तसे उदास बघून आकाशने हळुवारपणे विचारले.


"छे! रे. ती खूष आहे ना, मग वाईट काय वाटायचे? उलट ती मूव्ह ऑन झाली याचा आनंदच आहे मला."  एक स्मित करून तो म्हणाला.


" अरे, थांब थांब!"  आत पाऊल टाकेल तोच आकाशच्या आईने त्याला दारात अडवले.


"काय झाले काकू?"  तो विचारणार तोच त्या औक्षणाचे ताट घेऊन आल्या.


"सैन्यात मोठा अधिकारी झाला आहेस असं आकाशने फोन करून मला सांगितले. आता आपल्या भारत मातेच्या सेवेत तू रुजू होशील. मग एक आई म्हणून तुझे औक्षण करूनच तुला मी आत घेईल ना?"

त्याच्या ललाटावर कुंकवाचे बोट उमटवून त्यांनी त्याला ओवाळले.

"हं, आता ये आत."  असे म्हटल्यावर तो आत आला आणि काकूला घट्ट मिठी मारून हुंदके देऊ लागला.


"काय रे हे लहान मुलासारखे?"  त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या. त्यांच्याही कडा ओलावल्या होत्या.


" अगं आई पुरे! तुमचा मिलाफ सोहळा जरा आटोपता घ्या. त्याला फ्रेश तर होऊ दे." आईपासून वेगळे करत तो रवीला आपल्या खोलीत घेऊन गेला.


ही तीच खोली होती, जिथे मेघाने त्याच्या हातात आपला मैत्रीचा हात दिला होता. त्याला हे सर्व पुन्हा पुन्हा आठवत होते आणि तो अधिकच भावुक होत होता.

थंड शॉवरखाली उभा राहून तो डोळ्यातील वाहणाऱ्या उष्म धारांना स्वतःमध्ये समावून घेत होता.

रवीला नाश्ता करायला बोलवण्यासाठी आकाश आत आला. तो अजूनही बाथरूम मध्येच होता.

कॉटवरची रवीची पॅन्ट उचलून ठेवताना खिशातून वॅलेट खाली पडले. त्यातून बाहेर डोकावणारा मेघाचा पासपोर्ट फोटो आकाशच्या हाती लागला.


'रवी, इतकी वर्ष मेघूचा हा फोटो तू जपून ठेवला आहेस. मित्रा, अजूनही नाही विसरू शकलास ना तिला?'

स्वतःशीच हसत तो खोलीबाहेर गेला.


"आई ऽ!"

दारात भेटलेल्या आईला मेघाने मिठी मारली.


"हे काय ग? आठवडयाभरापूर्वीच तर गेलीस ना तू? इतक्यात कशी परतलीस?" मेघाच्या हातातील बॅग घेत त्यांनी हसून विचारले.


"अगं तुझी खूप आठवण आली म्हणून पळतच आले. तसेही उदया रविवार! मग मनात आलं, आईच्या हातचे मस्त चमचमीत जेवण करून जावे." आईला परत मिठी मारत ती.


"बरं, बरं. मी जरा सुलू मावशीकडे जाऊन तासाभरात येते, तिने सकाळीच मला बोलावले होते. किचन मध्ये गरमागरम पोहे केलेत तोवर त्याचा आनंद घ्या."

आई तिच्या मैत्रिणीकडे निघून गेली.

आकाश मेघाकडे बघून गालातल्या गालात हसत होता.


"तू का हसतो आहेस?"  ती.


"तू मध्येच कशी आलीस?"  तो.


"सहजच! पण तू का हसतोस ते सांग ना."   ती.


"तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे."   तो.


"कसले?"  ती.


" सरप्राईज माझ्या खोलीत आहे, तू आत जाऊन बघ तरी."  तो.

.

.

क्रमश:

********


काय होईल, जेव्हा मेघा आणि रवी समोरासमोर येतील? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका, अधीर मन झाले!

पुढील भाग लवकरच.

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******


             *साहित्यचोरी गुन्हा आहे.*





🎭 Series Post

View all