Mar 01, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी

अधीर मन झाले! भाग -३

Read Later
अधीर मन झाले! भाग -३


अधीर मन झाले..!
भाग -तीन


नकळत तिने त्याच्याकडे पाहिले नी त्यांची नजरानजर झाली.

'काल किती आनंदी आणि प्रसन्न दिसत होता हा? आज तापामुळे चेहरा उतरलाय अगदी. देवा! लवकर बरे कर रे याला.'  मनोमन तिने देवाला आळवले.

"मेघाऽ."  ती जायला निघाली तसा रवीने आवाज दिला.

"काल माझ्यामुळे तू भिजलीस, पण त्यात माझा कसला वाईट हेतू नव्हता."

"हम्म!"  ती.

"आय एम सॉरी गं!"  त्याने आपले कान पकडले.

ती त्याच्याजवळ आली.  "दुसऱ्यांना हळद दूध प्यायला सांगू शकतोस, मग तू का नाही प्यायलास? आणि एवढे आजारी पडेपर्यंत भिजायची काय गरज होती?"
तिच्या डोळ्यात त्याला काळजी दिसत होती.


"अगं, पहिल्यांदाच असा आजारी पडलो. पण तू मला माफ केलेस ना?"  रवीची नजर तिच्यावरच होती.


"हो रे, मी तर ते विसरलेही."  हसून ती.


"झाले का तुमचे पॅच अप? आता कसले गैरसमज तर नाही आहेत ना?"  आकाश आत येत म्हणाला. त्यावर दोघेही हसले.


"फ्रेंड्स?"   रवीने तिच्यापुढे हात समोर केला तशी थोडीशी ती गोंधळली. बावरून तिने आकाशकडे पाहिलं.


"तुझ्या मित्राची बहीण म्हणून विचारतो आहेस का?"  ती.

तिच्या प्रश्नावर तो केवळ मंद हसला. त्याचे ते गोड हसू तिला हवेहवेसे वाटत होते.

"अगं, नाही म्हणू नकोस. असा मित्र तुला शोधून सापडणार नाही. तुझ्या त्या नकट्या नेहा पेक्षा कैक पटीने चांगला आहे हा."  आकाश तिच्याकडे बघत म्हणाला.

"एऽ, माझ्या मैत्रिणीला काही बोलायचं नाही हं. तुझ्या मित्रासारखी तासंतास पावसात भिजत राहायला ती वेडी नाहीये."  आकाशला मारायला ती त्याच्या मागे धावली.


"माझा मित्र वेडा असेल पण तुझी मैत्रीण तर नकटी आहे ना." तिला वाकुल्या दाखवत आकाश तिच्या हातून निसटला.

रवी दोघांच्या मर्कटलीला पाहत होता. असे क्षण त्याच्या आयुष्यात कधी आलेच नव्हते. भावंड, आईबाबा यांच्या प्रेमाची चव त्याने कुठे चाखली होती? अनाथाश्रमात इतरांशी त्याचे नाते जुळले होते पण असे इतके निर्व्याज प्रेमाचे नाते तो पहिल्यांदाच बघत होता.

"आईऽ " मेघाने जोरात हाक दिली. "काल मला घ्यायला आला नाहीस ना? थांब, आता आईला तुझी कागाळीच करते."  ती आकाशला धमाकावत होती.


"आँ? अगं, आता मध्येच कालचे कसे आले?"  तो म्हणाला.


" माझ्या मैत्रिणीला काही बोलशील तर मागच्या जन्मातील गोष्टी देखील मी उकरून काढीन. आता आईला काय सांगते ते बघच तू."  ती विजयी मुद्रेने म्हणाली.


" ये नको गं बाई. तुझ्या नकट्या नेहाला यापुढे मी कधीच नकटी म्हणणार नाही."  त्याने आपले हात जोडले.


"ओरडायला काय झाले गं?"  तोवर आई आत आली होती.

आकाशचे जोडलेले हात बघून मेघा गोंधळली. काय बोलावे तिला सुचेना.

"अं? अगं हा रवी बघ ना, दादा एवढा हात जोडतोय तरी दूध प्यायला नाही म्हणतोय."  तिने आपला मोर्चा रवीकडे वळवला.


"असे काय रे बाळा? तू पी बघू. तब्येतीला बरे असते."  रवीच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली.

त्याने गुपचूपपणे आढेवेढे न घेता दूध संपवून आईच्या हातात ग्लास दिला.

"हे काय होतं? तुम्हा दोघांच्या भांडणात तू माझ्यावर का उलटलीस?"  आई गेल्यानंतर रवीने मेघाला विचारले.


"डेमो!" ती हसून म्हणाली.  "माझ्याशी मैत्री करायची असेल तर अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे ध्यानात ठेव. मला हरण्याची सवय नाहीये आणि दादाला मी हरवू शकत नाही. कारण शेवटी आम्हा दोघांची नाळ एकत्रच जुळली होती ना? त्यामुळे आमच्या भांडणात तू कधी, कसा अडकशील तुलाही कळणार नाही बरं, चालेल ना? विचार कर नी मगच मैत्रीचा हात पुढे कर."  आपली एक भुवई उंचावत ती म्हणाली.


"अशा अडकण्याने आईचे प्रेम मिळत असेल तर तुझ्याशी मैत्री करायला आवडेल मला."  त्याने परत आपला हात समोर केला.


तिनेही मग त्याच्या हातात हात दिला आणि मग सुरु झाला त्यांच्यातील नव्या नात्याचा प्रवास!


********"गुडमॉर्निंग! तुझा आवडता स्पेशल आलं घातलेला चहा." मेघाने डोळे उघडले तर समोर तेजस्विनी हातात चहाचा कप घेऊन उभी होती.

"गुडमॉर्निंग तेजू. अगं आज रविवार ना? मग इतक्या लवकर उठून चहा का केलास? मी केला असता की."  मेघा.

"हम्म! नव्हते करणार पण तुझ्या गालावर डोळ्यातून बरसलेल्या पावसाचे सुकलेले थेंब दिसले आणि रात्री काय झाले असेल याची कल्पना आली. तो पाऊस बाधू नये म्हणून हा चहा."  तिच्या हातात कप देऊन ती जायला निघाली.

"तेजा, माझ्याजवळ बस ना जरा." मेघाने तिचा हात पकडला.

सॉरी आई! रात्री माझ्यामुळे रडलीस ना? खूप त्रास देते ना गं मी तुला?"  तिने मेघाला घट्ट मिठी मारली.

"वेडूलीच आहेस तू. तुझा मला त्रास का होईल? चल आज मस्तपैकी तुझ्या आवडीचा मेनू बनवूया. तू सुद्धा मला मदत करायचीस."  तिला कवेत घेत मेघा म्हणाली.
"आज खायला काय आवडेल तुला?" मेघा.

"पालक पनीर! मी लगेच जाऊन पनीर घेऊन येते."  तेजस्विनी सहजपणे बोलून तिथून निघून तर गेली, मेघाच्या मनात मात्र त्या दिवसाची आठवण पुन्हा जागी झाली.


"रवी बाळा, जेवणात काय करू रे? तुला काय आवडतं? "
नाश्ता करताना आई रवीला विचारत होती.

"हम्म्म्म, मज्जा आहे बाबा एकाची. आज सगळं त्याच्या आवडीचे बनणार आहे." त्याला चिडवत मेघा म्हणाली.


"पालक पनीर! काकू पालक पनीर बनवाल का तुम्ही? मी आजवर कधीच खाल्लेलं नाहीये."

त्याच्या उत्तराने आईच्या डोळ्यात टचकन पाणीच आले होते. 'आपली मुलं किती नशीबवान! त्यांना हवे ते खाता येतं आणि हा?'
जेवताना मेघाच्या आईने मुद्दाम त्याला जास्त भाजी वाढली. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघून त्या माऊलीला तृप्त झाल्यासारखे वाटले.

******


"आई, तू बाबाला एवढ्या सहजतेने तुझ्या अंतरात कसे दडवून ठेवलेस गं? त्याच्या आठवणीने तुला त्रास होत नाही का?" जेवताना तेजस्विनी मेघाला विचारत होती.

ती हसली, अगदी मंदशी!

"तेजा, अगं आपल्याच माणसाच्या आठवणीने आपल्याला त्रास का व्हावा? आणि मुळात आठवण यायला तो माणूस मनातून जायला तर हवा की नाही? तुझा बाबा इथे नसला तरी त्याने स्वतःला तुझ्यात सामावून ठेवलेय. तुझे दिसणे, बोलणे, सतत माझी काळजी करणे, तुझ्या आवडीनिवडी.. हे सारं जे तुझं आहे ते त्याचेच तर आहे. तुझ्या रूपात तो रोज माझ्यासमोर असतो, मग त्याच्या आठवणीत का झुरत राहायचं, हो ना?"
त्याच्या आवडीची भाजी त्याच्यासारखीच खात असलेल्या लेकीकडे पाहून ती म्हणाली.


"मग त्याच्या आठवणीने मला इतका त्रास का होतो? तुझ्यासारखे संयत राहणे मला का जमत नाही? बाबा मला कळलाच नाही का गं?"  तेजस्विनीच्या डोळ्यात पुन्हा आसवांची गर्दी होऊ लागली.


"शुऽऽ! पुन्हा असं म्हणू नकोस हं. तुझ्याइतका तुझा बाबा कदाचित कोणालाच कळला नसेल. मलाही नाही. उगाच का त्याची प्रत्येक गोष्ट तुझ्यात सामावली आहे? बाबा तुझ्या आतच आहे, अंतर्मनाने एक साद घालून तर बघ, मला जाणवणारे त्याचे अस्तित्व तुलाही जाणवायला लागेल."  तिच्या केसातून हात फिरवत ती म्हणाली.

बाहेरचे वातावरण पुन्हा बदलू लागले. गार वारा सुरु झाला होता. आणि क्षणातच सुरु झाला मुसळधार पाऊस!


"आई, ती खिडकी बंद कर ना. पावसाचा आवाजही आता नकोसा वाटतो गं." तिच्या डोळ्यात पुन्हा मेघ दाटले.

मेघा उठली आणि तेजस्विनीचा हात पकडून तिला खिडकीपाशी घेऊन आली.


"आई, तू काय करते आहेस?"


"काही नाही. तू केवळ एकवार बघ तर ह्या पावसाकडे." खिडकीच्या काचा सरकावत ती म्हणाली.

"बघ या मुसळधार बरसणाऱ्या जलधारा! साठव त्यांना तुझ्या हृदयात आणि मग आठवून पहा तुझ्या हृदयाच्या कप्प्यात दडलेल्या एकेक स्मृतीना!"

तिने तेजूचा हात खिडकीतून बाहेर काढला. मुसळधार पावसाची एक सर तिच्या हातावर येऊन स्वार झाली तसे तेजस्विनीने पटकन आपला हात मागे ओढला. डोळे गच्च मिटून घेतले.
त्या भर पावसात तिरंग्यात गुंडाळलेला बाबाचा देह तिच्या नजरेसमोर आला.
तिच्या मनात कालवाकालव होऊ लागली.

'बाबा मला कळलेच नाही
तुझ्या मनी वेदना.
कशी मी राहू, बोल कुठे जाऊ?
मला काही समजेना.
साद ही घालते लाडकी तुला.
जगण्या तू दिला, माझ्या जीवा अर्थ खरा.
बाबा..
थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा..'

"बाबाऽ " म्हणून तिने टाहो फोडला.

"तेजा, बाळा अशी रडू नकोस ना." खिडकी बंद करत मेघा म्हणाली.


"आई, हा पाऊस पहिला की मला केवळ शेवटचाच बाबा आठवतो गं. बाकीच्या इतर सर्व स्मृती पुसल्या गेल्याहेत असे वाटते."
ती मेघाला मिठी मारून रडत म्हणाली.


" माझा एवढा शूर पिल्लू असा रडका कधीपासून झालाय हं?" मेघा बळेच हसत म्हणाली.  "आणि आठवणी अशा पुसल्या जात नाहीत गं.  हां, त्यांच्यावर जराशी धूळ तेवढी साचली असेल. पावसाचे दोन थेंब त्याच्यावर उडाले की त्याही आठवणी स्पष्ट होतील."   तिला शांत करत मेघा म्हणाली.

तिच्या हाताला पकडून ती गॅलरीत आली. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. मेघाने हळूच तिचा हात समोर केला. बाहेरच्या पावसाचे काही थेंब तिच्या ओंजळीत आले.

तिला आठवले, बालपणी अशीच ती गॅलरीत उभी राहून हातावर पाऊस झेलायची. अगदी इटुकली पिटुकली असताना देखील ह्या पावसाची भारी ओढ होती. कारणही तसेच खास असायचे. तिचा वाढदिवस ऐन पावसाळ्यातला. म्हणून ती पावसाची चातकासारखी वाट पाहत असायची. पाऊस आला की आपला खास दिवस येणार हे तिच्या मनात बिंबले होते.

तिला आठवला तिच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेला तो खास पाऊस. मेघा आत तिच्या पाचव्या वाढदिवसाची तयारी करण्यात गुंतली होती. अचानक बाहेर पाऊस धो धो बरसायला लागला. पाच वर्षांची ती परी धावतच अंगणात आली. पावसात फेर धरून नाचायला लागली आणि काही क्षणातच कुणीतरी तिला घट्ट मिठीत घेतले. त्या पावसातही तिने ती ऊबदार मिठी लगेच ओळखली.


"बाबाऽऽ!" त्याच्या येण्याने तिला कोण आनंद झाला होता!

क्रमश:

 **********

बाबाविना कसा असेल तेजस्विनीचा प्रवास? कळण्यासाठी वाचत राहा, कथामालिका अधीर मन झाले!
पुढील भाग लवकरच.
**********

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे *
************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//