Feb 29, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी

अधीर मन झाले! भाग -२

Read Later
अधीर मन झाले! भाग -२अधीर मन झाले!
भाग - दोन."आय मिस हिम व्हेरी बॅडली! मला त्याची खूप आठवण येते गं. हा असा बरसणारा पाऊस बघितला की आणखी खूप जास्त आठवण येते."  रडत रडत मेघाला तेजस्विनीने मिठी मारली.

ह्यावेळी तिला रडण्यापासून मेघा रोखू शकली नाही. तिच्या डोळ्यातील ढग रिते होणे गरजेचे आहे हे तिला ठाऊक होते.

मेघाच्या मांडीवर डोके ठेऊन तेजस्विनी पहुडली होती. तिचे मुसमुसणे चालूच होते. मेघाच्या थोपटण्याने ती केव्हा झोपी गेली समजलेच नाही. मेघा मात्र अजूनही तिच्या केसांतून हात फिरवत होती.

"हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालींचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती.

..छानी माझी सोनुकली ती
कुणाकडे गं पाहत होती

कोण बरे त्या संध्येतून
हळूच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा
आवडला अमुच्या राणींना?
लाजलाजली या वचनांनी
साधीभोळी ती फुलराणी!"


बालकवीची ही फुलराणी म्हणजे तेजूसाठी जादूची कांडी होती. लहान असताना कितीही रडत असली, चिडलेली असली तरी हे गीत ऐकले की ती शांत होई. अगदी चिमुकली असतानापासूनच ती या फुलराणीच्या प्रेमात होती.
आजही तिला शांत करण्यासाठी तिच्या रेशमी केसात आपली बोटे फिरवत मेघा 'ती फुलराणी' कविता म्हणत होती.

'तेजू, तुझा जन्मच मुळी अल्लड श्रावणातला. जन्माला आल्याआल्या त्या श्रावणसरीशी तुझी गाठ बांधली गेली आणि अलवारपणे तू पावसाच्या प्रेमात पडलीस. आता त्याच अवखळ पावसाशी जुळलेली गाठ सोडायची म्हणतेस? तेजा, नाही जमायचं गं ते तुला.'

इतका वेळ डोळ्याच्या तळाशी साठवून ठेवलेले टपोरे मोती मेघाच्या गालावर ओघळून तेजूच्या रेशमी केसांत जाऊन विसावले.

'तो रविकर का गोजिरवाणा
आवडला अमुच्या राणींना? '

तिने पुन्हा ती ओळ आळवली.

'रवी, तुझ्या फुलराणीसमोर तुटायचे नाही म्हणून किती प्रयत्न करते रे, पण प्रत्येक वेळी हा डाव माझ्यावरच का उलटतो?'

डोळ्यातील थेंब पुसत ती स्वतःशी म्हणाली. 'बघतोस ना? आपली तेजा तुझ्यासाठी किती हळवी आहे ते? आमच्यातून जाण्यापूर्वी तिचा विचार जराही तुला शिवला नाही का रे?'

तिने आपल्या ओंजळीत चेहरा झोकून दिला. डोळ्यातून आसवे वाहत होती आणि मन मात्र उडत भूतकाळात जात होते.


"आँ छीऽऽ , आँ ऽछी!"


"मेघू, हे दूध पी तुला बरं वाटेल."  शिंकणाऱ्या मेघाच्या मागेमागे आकाश दुधाचा ग्लास घेऊन फिरत होता.

"नकोय मला हे दूध. आँऽ छी. हे सगळं ना तुझ्यामुळेच झालंय. नाही,नाही. तुझ्या त्या बिनडोक मित्रामुळे झालेय. स्वतः तर ओला झालाच आणि वर माझी छत्रीदेखील ओढून घेतली. थांब, आई बाबांना येऊ देत, सांगतेच मी त्यांना."  आपले नाक पुसत ती म्हणाली.


"मेघू, सॉरी ना यार! पण प्लीज, आईला यातलं काही बोलू नकोस." आकाश.

"का रे? आणि मित्राचा तुला भारी पुळका आहे रे. मला सर्दी झाली त्याचे काहीच नाही."  ती पुन्हा शिंकायला लागली.


"अगं, त्यानेच तुला हळद दूध द्यायला सांगितलेय. चांगला आहे गं तो. तुझी छेड काढत नव्हता तो. शप्पथ! नाहीतर तिथे काय झाले हे त्याने मला का सांगितले असते ना?"  आकाश.

" तो बोलला म्हणून मला दूध देतो आहेस ना? आता आईला सांगेनच मी."  ती आपले लाल नाक फुगवून म्हणाली.

"मेघू, अगं."  तो.

"आणि मघापासून मेघू, मेघू काय लावले आहेस? मला इरिटेट होते ते. बोलायचं असेल तर फक्त मेघा म्हण. मी आता काही लहान नाही राहिलेय."  ती.

"बरं बाई, मेघाच म्हणतो. खूष? पण तू आईला नको सांगू ना गं. जिगरी यार आहे तो आपला. आणि तूच सांग, तुझ्याशी काही चुकीचा वागलाय का तो? फक्त पावसाचा आनंद घे, एवढंच बोलला ना? "

"हं! विचार करेन. तू मला त्याबद्दल्यात काय देशील? ते बोल." त्याच्यापुढे हात करत ती म्हणाली.

" भाई से रिश्वत? ठीक आहे. तू म्हणशील ते."  आकाशने तिच्या हातावर हात ठेवला.

"बघ हं, नंतर पलटी मारू नकोस."  मेघा.

"अरे, भाई हूं मै तेरा. नाही पलटणार. तू मागून तर बघ."   तो.


" वेळ आली की मागेन."   हसून मेघा.

"ठीक आहे. आता दूध पिऊन घे."  तो आपल्या खोलीत निघून गेला.

ती त्या दुधाच्या पेल्याकडे पाहत होती. नजरेसमोर मात्र रवीचा चेहरा येत होता.


'सावळाच, पण किती रेखीव होता. त्याचे काळेभोर डोळे हृदयात कसे घर करून गेले आणि कानाजवळ जे बोलला ते? तेव्हा तर काहीच वाटलं नव्हतं नि आता का शहारल्या सारखं होतेय?'  मनात येणाऱ्या विचाराने तिला हसू येत होते.

'मी का त्याचा एवढा विचार करतेय? पहिल्या नजरेतच मला आवडला का तो?'

'छे! काहीतरीच. त्याने माझी छत्री बाजूला करून मला भिजायला भाग पाडलं. मला नाही आवडलं ते.'

'पण त्याचा हेतू वाईट नव्हताच की. नाहीतर हे दादाला का सांगितले असते?'


तिचे दोन्ही मन एकमेकांशी वाद घालण्यात गुंतले होते. त्यातून वाट काढत एक गोड स्मित तिच्या गुलाबी ओठावर येऊन स्वार झाले.

'मेघा, रवीच्या काजळी डोळ्यात पुरती अडकलीस गं बाई! त्यातून बाहेर पडायचं की नाही हे आता तूच ठरव.'  तिचे पहिले मन तिच्यावर उलटले.

दुधाचा पेला तिने ओठांना लावला.

'पण त्याला माझी का काळजी? दादाची बहीण म्हणून? की त्यालाही माझ्याबद्दल काही वाटले असावे?' दुसरे मन कुठे मागे सरणार होते? त्याचा पुढचा प्रश्न तयार होता.

सध्यातरी या प्रश्नाची उत्तरं तिच्याजवळ नव्हती. घटाघटा दूध पिऊन तिने पलंगावर अंग टाकले. डोळे मिटले होते तरी मन:चक्षु मात्र त्याच्याच प्रतिमेत अडकले होते. पावसात भिजलेला तो तिच्या नजरेसमोरून हटत नव्हता. शेवटी रात्री उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला.

आकाश आणि मेघा दोघे जुळी भावंडं होती. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम. भांडणदेखील तसेच. तो

तिच्यापेक्षा पाच मिनिटांनी मोठा, म्हणून तिने  'दादा'  म्हणावे हा त्याचा अट्टहास. तिलाही दादा म्हणायला आवडे. पण जेव्हा तो तिला  'मेघू'  म्हणायचा तेव्हा मात्र तिला अजिबात आवडायचे नाही. दोघांचे नाते अगदी उंदरा-मांजरासारखे.  तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना!

दोघे बारावीला, पण कॉलेज मात्र वेगवेगळे. का? तर दहा वर्ष एकत्र शिकल्यावर त्यांना आता वेगळ्या वाटेने जायचे होते. आकाशला विज्ञानात रस, तर मेघाचा कल कलेकडे.

दुसऱ्या दिवशी मेघा कॉलेजला पोहचली तर तिथे तिची जिवाभावाची मैत्रीण नेहा हजर होती. तिला बघून ही रागाने दुसऱ्या जागेवर जाऊन बसली. काल जर ती सोबत असती तर असे पावसात भिजावे लागले नसते. नेहमीप्रमाणे तिनेच घरापर्यंत सोडून दिले असते.

"हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा, सोड ना अबोला."
तिचा राग कळून नेहा माफी मागायला जवळ आली. ती काही भाव देईना.

"नाकावरच्या रागाला औषध काय?"  नेहाने पुन्हा आलाप घेतला. मेघाने नाक वाकडे केले.

"तू सांगितले नाहीस तरी मला तुझ्या रागावरचे औषध मला
ठाऊक आहे. चल, कॅन्टीन मध्ये जाऊया."  नेहा.

"कशाला?"  गाल फुगवून मेघा.

"मेघाराणी, एकदाचे आपण बोललात, माझे कान तृप्त झाले. चला, कॅन्टीनमध्ये जाऊन गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेऊया."  नाटकी सुरात नेहा म्हणाली.

"तुला मी काय भुक्कड वाटले?"   मेघा.

"हो मेघू हो, तू आहेसच भुक्कड."  मस्करी करत नेहा.

"नेहटले, मार खाशील हं!"

"चालेल हं मेघू. तू भजी खा."   हसत नेहा.

"मेघू म्हणायचं नाही हं. दादाची चमची कुठली."  तिच्या पाठीवर धपाटा देत मेघा.

" चमची नाही, होणारी वहिनी आहे तुझी."   नेहा.

"दादा तर तुझ्याकडे बघतसुद्धा नाही आणि आली मोठी माझी वहिनी बनायला." बोलता बोलता दोघी कॅन्टीनमध्ये पोहचल्या.


"बघेल, बघेल. माझ्याकडून लाईन क्लिअर आहे, त्याचा होकारही लवकरच येईल."   चहाचा घोट घेत ती.

"हे कधी ठरलं?"  आश्चर्याने मेघा.

" आत्ताच, मीच ठरवलंय."  नेहा.

"धन्य आहेस!"  मेघाने हात जोडले.

"प्रेमात काय जादू असते तुला काय माहीत? बच्ची आहेस तू अजून."   नेहा.

"हं?"   डोळे मोठे करून मेघा.

"अगं, पाच मिनिटांनी मोठया असलेल्या भावाला दादा म्हणतेस, मग बच्चीच आहेस ना? एकदा प्रेमात पडून बघ, मग तुला कळेल,  'प्यार क्या चीज है'  ते."

"पुरे! लेक्चर्स सुरु व्हायची वेळ झालीय. वर्गात जाऊया."  तिला मध्येच थांबवत मेघा म्हणाली.

कॉलेज सुटल्यावर दोघी नेहाच्या स्कुटीने निघाल्या. वाटेत
रिमझिम पावसाने फेर धरला. अंगावर रेनकोट होताच. नेहमी पावसापासून दूर राहणाऱ्या मेघाने आज आपले हात पसरवून पाऊस झेलला आणि नेहाच्या अंगावर थेंब उडवले.


"एऽ, पाऊस खेळायचा असेल तर माझ्या स्कुटीवर बसायचे नाही हं. तू आपली बसने घरी जा."  तिच्यावर ओरडत नेहा म्हणाली. पावसाशी तिचाही छत्तीसचा आकडा होता.


"पावसात भिजून बघ, आणि त्यातील आनंद अनुभव. मग तुला त्यातील खरी मजा कळेल. जाऊ दे, तुला काय कळणार म्हणा, बच्ची आहेस तू अजून."
तिच्या अंगावर पाणी उडवत मेघा म्हणाली.

मेघाचे घर आले तसे नेहाने करकचून ब्रेक दाबला.


"तू कधीपासून भिजायला लागलीस? लक्षात ठेव,पावसाच्या प्रेमात पडशील तर मैत्री तुटेल आपली, आधीच सांगते." नेहाने तिला दरडावले.


"बहुतेक प्रेमात पडलेय मी."  रवीचा चेहरा तिच्या नजरेसमोर आला. "आणि पावसावरून मैत्री तोडायची धमकी देशील तर तुला वहिनी बनवणार नाही माझी, कळलं?" तिच्याकडे हसून बघत मेघा म्हणाली आणि आत गेली.

घरात पाय टाकला, तर भाऊराया तिच्याआधीच हजर असलेले दिसले. तिने नजरेनेच  'इतक्या लवकर कसा?'  म्हणून प्रश्न केला. नेमक्या त्याच वेळी आतून शिंकल्याचा आवाज आला.


"कोण आलंय?"  तिने कुतूहलाने विचारले.


"रवी."   त्याच्या आवाजात काळजी होती.

त्याचे नाव ऐकून तिने आकाशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

"कालच्या भिजण्याने तो आजारी पडलाय गं. म्हणून दवाखान्यात तपासणी करून डायरेक्ट आपल्या घरी घेऊन आलोय."   त्याने स्पष्टीकरण दिले."हो पण आपल्या घरी का? त्याच्या घरी सोडून द्यायचेस ना?" तिने गोंधळून विचारले.


"कारण त्याला घर नाहीये."   तो शांतपणे उत्तरला.


"त्याचे आईबाबा घरी नाहीयेत, असे तुला म्हणायचे आहे का?" मेघाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ कायम होता.


"नाही. तू जे ऐकलेस तेच म्हणायचं आहे."   क्षणभर थांबून तो पुढे बोलला, "रवी अनाथ आहे गं. एवढी वर्ष अनाथाश्रमात वाढलाय. इथे वसतिगृहात राहून शिक्षण घेतोय. त्याला बरं नसताना तिथे कसे सोडू ना? म्हणून आपल्याकडे घेऊन आलो. आईबाबांना मी कल्पना दिलीय."   तो तिच्याकडे पाहून म्हणाला.

तिला आज आकाशचा अभिमान वाटत होता. रवी त्याच्यासाठी किती स्पेशल आहे याची जाणीव झाली. "खरंच मैत्री असावी तर अशी!"  त्याच्याकडे बघून स्मित करून ती म्हणाली.

"मी औषधं घ्यायला जातोय, थोडा वेळ लागेल."   पायात चपला घालून तो निघाला.


मेघा फ्रेश होऊन स्वयंपाकघरात गेली तर तिथे आई दूध गरम करत होती.

"मेघा, हे दूध आकाशच्या खोलीत घेऊन जा आणि त्याच्या मित्राला दे बरं."  तिच्या हातात पेला देत आई म्हणाली.

"मी?"

"हो तूच. आकाश बाहेर गेला आहे ना, आणि तू इथे आहेस तेव्हा तूच नेऊन दे."

आईच्या सांगण्यावरून ती दूध घेऊन गेली.


"तुझ्यासाठी आईने हे हळदीचे दूध पाठवले."  टेबलवर पेला ठेवत ती म्हणाली.

"धन्यवाद! " रवी क्षीण आवाजात म्हणाला.
नकळत तिने त्याच्याकडे पाहिले नि त्यांची नजरानजर झाली.


'काल किती आनंदी आणि प्रसन्न दिसत होता हा? आज तापामुळे चेहरा उतरलाय अगदी. देवा! लवकर बरे कर रे याला.'  मनोमन तिने देवाला आळवले.

"मेघाऽ."   ती जायला निघाली तसा रवीने आवाज दिला.

क्रमश :
**********

काय असेल रवीच्या मनात? कळण्यासाठी वाचत राहा कथामालिका,
अधीर मन झाले!
पुढील भाग लवकरच.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे *
************


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//