अधीर मन...

स्वप्नील आणि स्वप्नाली दोघांची प्रेमकथा

लघुकथा स्पर्धा....१)प्रेमकथा..

*****************************************

स्वप्नाली एक शिक्षिका,घरी दोन भांवंड सुनिधी आणि सुधीर.आई वडील लहानपणीच देवाघरी गेलेले. स्वप्नाली साधारण आठवीला होती तेव्हा तिला दुःखाला सामोरे जावं लागलं.मामाच्या शेजारी राहून,त्यांच्या मदतीने स्वप्नाली शिकली आणि नोकरीला लागली.

दोन्ही भांवडांची जबाबदारी तिने स्वतःवर घेतली.कारण मामाने केलेली मदत मामीला कदापि आवडत नसे.त्यांच्या दोघांमध्ये वाद नको म्हणून स्वप्नाली दुसऱ्या गावात नोकरीला गेली.
दोन्ही भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी तिने स्वतःच उचलली.त्यांना काय हवं काय नको ती सर्व पाहत असे.

तिच्या घराजवळ राहणारा एक स्वप्नील नावाच्या मुलाच येणं जाणं होत.त्यांच्यात कधी मैत्री झाली कळलं नाही.त्याला स्वप्नाली खूप आवडायची. एक दिवस त्याने हिंमत करून विचारलं,"स्वप्नाली अगं किती काम करशील,दुसरं काही आयुष्यात आहे की नाही तुझ्या.नोकरी,घर आणि तुझी भावंडं बस एवढच".

"का!अजून काही असायला हवं का? मी खुश आहे यामध्ये.त्यांच दोघांचं आयुष्य सेट करून देणं हेच माझा प्रथम कर्तव्य आहे".

"आणि तुझं आयुष्य?त्याच काय?तुला स्वप्न नाहीत का?"

स्वप्नाली स्वप्नील कडे बघते आणि म्हणते "खरं सांगू का स्वप्नील! आई बाबा गेले तेव्हाच माझे स्वप्न घेऊन गेले ते.या डोळ्यांना आता कुठली स्वप्न बघण्याचा अधिकार नाही".

"हो पण माझं काय?मी का म्हणून स्वप्न बघणं सोडू?तुला राग येईल पण खरच स्वप्नाली आय लाईक यु!"

"हे!!... हे!!.काय बोलतोस तू स्वप्नील!
तुला शोभत का हे, असं भलत सलत बोलणं?मी दोन शब्द प्रेमाने काय बोलले,तू गैरसमज करून घेतलास.हे बघ...हे बघ... माझ्या आयुष्यात ह्या सर्व गोष्टींसाठी वेळ नाही आणि मला नाही आवडत हे सगळं".

"वेळ नाही म्हणजे?मी कुठे म्हणतोय तुला माझ्या सोबत तास अन् तास गप्पा मार,फिरायला ये. ह्यातलं काहीच नकोय मला.हे बघ तू मला आवडतेस माझं प्रेम आहे तुझ्यावर.मी तुला जबरदस्ती करत नाही.तू वेळ घे थोडा विचार कर,काही घाई नाही".

"हे बघ स्वप्नील,मी विचार केलाय.तू दुसरं कुणी शोध".

"अगं दुसरं कुणी शोध म्हणजे?प्रेम ही काय एखादी वस्तू आहे का? की,या दुकानात नाही आवडली तर दुसऱ्या दुकानात गेलो आणि घेऊन आलो".

"हे बघ बराच उशीर झालाय ,जा तू आता.नंतर बोलुयात आपण".

"ठीक आहे,तुझी जशी इच्छा.पण एक लक्षात असू दे, तू हो म्हण किंवा नाही म्हण तू माझी एक चांगली मैत्रिण आहे आणि राहशील,दुःख मात्र वाटेल.हे अधीर मन फक्त तुझा आणि तुझाच विचार करेल. तुझी शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघेल.चल बाय गुड नाईट,झोप आता निवांत".

स्वप्नील त्याच्या घरी निघून जातो.स्वप्नाली झोपायला बेडरूम मध्ये जाते.
"ताई अगं स्वप्नीलचे खूप प्रेम आहे गं तुझ्यावर,हे आम्हाला आधीपासून माहीत आहे.कर तू त्याच्याशी लग्न.नको काळजी करू आमची".

"ऐ गपचूप झोप आता.किती वाजलेत बघितलं का?"

"ताई अगं त्याला खूप काळजी आहे तुझी आणि आमची सुद्धा,तू काही कामाला बाहेर गेलीस तर तो आम्हाला कधीच एकट वाटू देत नाही".

"तुला कळत नाही का?झोप बाई आता,हात जोडते तुझ्यापुढे मी"

"ताई!"...

दुसऱ्या दिवशी सकाळी स्वप्नाली शाळेत निघून जाते,जाताना स्वप्नील तिला दिसतो तो तिला दुरून हाक मारतो पण ही बघून न बघितल्यासारख करते.त्याला ते समजून जाते.तो परत काहीच बोलत नाही.

संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती तिच्या घरी जातो,मात्र स्वप्नाली नेहमीसारखं बोलत नाही.
तो म्हणतो "स्वप्नाली अगं बोल माझ्याशी अबोला धरून काही उपयोग आहे का?तुला नसेल मान्य तर तस सांग मात्र अबोला नको धरू?"

"हे बघ स्वप्नील तुला नाही कळणार! मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे.सूनिधीला डॉक्टर व्हायला ५-६ वर्ष जातील आणि सुधीर फक्त दहावीत आहे.त्यांना असं कसं शोडून देऊ मी".

"अगं मी कुठे सोडून दे म्हणतोय.आपण दोघे मिळून करू सगळं. त्यांना त्यांच्या पायावर उभं करूं".

"नाही नाही ते केवळ माझी जबाबदारी आहेत".

स्वप्नील तिचा हात हातात घेतो "ठीक आहे,पण तू माझी जबाबदार आहेस,हे मी कधी विसरणार नाही.तू तुझं कर्तव्य पार पाड आणि मी माझं".

स्वप्नाली हात झटकते आणि म्हणते,"तुला कसं कळत नाही मला हेच कळत नाही".

"अगं स्वप्नाली मला कळत गं पण या मनाचं काय करू?ते नाही ऐकत माझं?"आणि स्वप्नील निघून जातो.

असेच दोन तीन वर्षे निघून जातात.आणि स्वप्नीलची बदली होते.जाताना तो एवढेच सांगतो."स्वप्नाली एक लक्षात असू दे,मी कितीही दूर गेलो तरीही मनाने तुझ्या जवळच आहे,तुला कधीही गरज भासली,कधी एकटी पडली तर एक आवाज दे,मी नक्की येईल.सुनिधी आणि सुधीर मला रोज फोन करायचा ओ. के.ताईच ऐकायच शिकून मोठ व्ह्यायच".आणि तो निघून जातो.

इकडे स्वप्नालीच्या मनाला हुरहूर लागते.रोज रात्री येणारा स्वप्नील येणं बंद होतं.तिचही मन अधीर होत.ती हातात फोन घेत आणि स्वप्नीलला डायल करते आणि कट करते.

"ताई अगं लाव फोन, त्यालाही बर वाटेल.मला माहीत आहे तुलाही तो आवडतो पण तू मान्य करत नाही.तो सांगून मोकळा झाला.खरच खूप चांगला आहे गं तो".स्वप्नाली फक्त सुनिधी कडे बघते.

असेच पाच सहा वर्षे निघून जातात.सुनिधी डॉक्टर होते आणि सुधिरलाही मस्त नोकरी लागते.स्वप्नाली आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करते.आणि एवढ्यावर ती थांबत नाही तर सुनिधी आणि सुधीर लग्न लावून देते.
दोघे आपल्या आपल्या संसारात मग्न होतात... मात्र स्वप्नाली एकटी पडते.

आता स्वप्नाली ३५ वर्षांची झालेली असते. तिची नोकरी आणि ती, एकमेकात खुश असतात.एक दिवस अचानक रात्री दाराची बेल वाजते.
स्वप्नाली विचार करते.एवढ्या रात्री कोण असेल? सुनिधी किंवा सुधीर तर फोन करून येतात मग आता कोण असेल बरे?.

ती दरवाजाजवळ येते आणि विचारते..

"कोण?"

बाहेरून आवाज येतो..

"मी आहे".

स्वप्नाली विचारते..

"मी म्हणजे कोण?".

"अरे वा! आता आवाज पण विसरली वाटते".

स्वप्नालीला अंदाज येतो की तो स्वप्नील असेल म्हणून ती हळूच दार उघडते.बघते तर खरच स्वप्नील असतो पण आता तो थोडा जाड दिसतो ,त्याच्या दाढीचे एक दोन केस पिकलेले दिसतात.राहणीमानात फरक झालेला दिसतो.
त्याला पाहतच स्वप्नाली बोलते...

"अय्या तू किती बदललास, वेगळा वाटायला लागलास".

"आत बोलावशिल का नाही?"

"अरे...विसरले! ये ना.एकटाच आलास?"

"का अजून कुणाला आणायला हवं होतं?"

"तसं नाही रे! म्हणजे बायको, पोरं"

तो तिच्याकडे एकटक बघतो
ती मान खाली घालते.

"अग तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहील".

"कुठल्या रे?"

"मी फार बदललो.. याचं".

"अच्छा ते होय".

"स्वप्नाली मी खरच बदलोय १० वर्षे निघून गेली,मी तसाच कसा राहणार. पण माझं मन अजूनही तसच आहे गं...तुझ्यात गुंतलेलं.
अजूनही तुला बघितल्यावर माझ्या हृदयाची धडधड वाढते.माझं अधीर मन अजूनही तुझ्या होकाराच्या प्रतीक्षेत आहे.आता तरी देशील होकार?"

"स्वप्नील तू ना!खरच तू लग्न नाही केलास?"

"कसं करणार तुला वचन दिलं होत, तुला जेव्हा गरज लागली तेव्हा मी येईल. आज तू एकटी पडली आहेस आणि खर सांगू का,तुला ही वाटत ना कुणीतरी हवं सोबतीला".

"हो... वाटते पण आता या वयात"...

"स्वप्नाली सर्व सोडून दे गं आता...चल मंदिरात जाऊन लग्न करू या. जेवढं आयुष्य राहिलय ते आनंदात घालूया".

स्वप्नाली शांत राहते.काही वेळाने स्वप्नील निघून जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुधीर त्याची बायको, सूनिधी तिचा नवरा स्वप्नालीला घ्यायला येतात आणि मंदिरात नेतात .तिथे स्वप्नील हजर असतो.आणि दोघांचे लग्न होते.दोघांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होतो.

माझी ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद!
©®कल्पना सावळे.