अधीर मन.. मधुर घन.. भाग ६ अंतिम (टीम:- विंग्स ऑफ फायर)

ही एक अनोखी प्रेमकथा अधीर मनाची मधुर घनाची…

अधीर मन मधुर घन.. भाग ६ (अंतिम भाग)

   माही तडक ऑफिसमधून बाहेर पडली. अमायरा आणि तिच्या वडिलांसोबत फोनवरून सांगितलेल्या पत्त्यावर दुपारपर्यंत बेंगलोरला पोहोचली. अपघात इतका जबरदस्त होता कि, मृतदेहाची ओळख पटणंही अवघड होतं. जवळ सापडलेल्या बॅगमधून मोबाईल, वॉलेट, आयडी-कार्ड वरून मृतदेह अविष्कार सुभेदार यांचाच असल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला. मृतदेह घरी घेऊन जाणं शक्यच नव्हतं. माहीची तर शुद्धच हरपली. महिला-पोलिसांनी तिला सावरलं.नगरपालिकेच्या स्मशानभूमीतील अग्निदाहिणीमध्ये अंतिम संस्कार वगैरे उरकावं लागलं. अस्थीकलशासह रात्री उशिरा माही अमायरा आणि तिच्या वडिलांसोबत घरी आली. अमायराला माहीसोबत सोडून ते घरी निघून गेले.

        शर्वरी कधीच झोपी गेली होती. सुमनकाकूंना मिठी मारून माही ढसाढसा रडू लागली. जवळच्या नातलगांना लगोलग फोन फिरवले. रात्रभर माही त्याच्या आठवणीत रडत होती. त्याच्या बोलण्यातून नाही, पण वागण्यातून, छोट्या-छोट्या गोष्टींतून, काळजीतून त्याचं प्रेम जाणवू लागलं. आपलं कुटुंब तो स्वतःच्याही जीवापाड जपायचा. कधीही कोणतीही जबाबदारी झटकली नाही. बेडरूममध्ये जिथं-तिथं तिला त्याच्या अस्तित्वाचा भास होत होता. मधेच ती 'अवी-अवी' म्हणत उठायची. पण आता तो फक्त भास उरलाय! आणि मागे ठेऊन गेलाय त्याच्या आठवणी!

        सकाळचे दहा वाजले होते. कसंबसं तोंडावर पाणी मारून माही आरश्यात स्वतःच्या अवताराकडे पाहत होती. डोळे सुजून लालेलाल झाले होते.

"काय गं? काय झालं? खूप थकल्यासारखी वाटतेयस?"

आरशातून पाठीमागे तिला बेडवर अविष्कारचा भास झाला. 'रात्रभर सुद्धा भास होत होते. आता तो या जगात नाहीये. आपल्यालाच इथून पुढे सगळं सांभाळायचं आहे.'

तोच, "पप्पा... पप्पा..." म्हणत शर्वरी धावत आली.

आता शर्वरीला कसे समजावयाचे? मोठाच प्रश्न, तिच्या समोर आ-वासून उभा होता. तिने मागे वळून पाहिलं तर तिला धक्काच बसला. आविष्काराच्या मिठीत शर्वरी हसत होती.

"पप्पा... कुतं गेला होतास... कित्ती-कित्ती वात पाहिली तुजी..."

ते दृश्य पाहून वेडच लागायची पाळी आली होती. हा धक्का एवढा जबरदस्त होता कि, ती पुन्हा बेशुद्ध पडली.

"माही... माही..."

पुन्हा तोच ओळखीचा अस्पष्ट आवाज...

        संध्याकाळची वेळ. झोप झाल्यामुळे आणि सलाईनमुळे तिचा थकवा दूर झाला होता. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. हे समजलं होतं तिला.

"मम्मा-मम्मा...", म्हणत शर्वरी बेडजवळ आली. पाठीमागून अविष्कार येतच होता.

“तो अजूनही असल्यासारखा भास का होतोय मला?”

तोच बेडजवळ स्टूल ओढत अविष्कार तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला,

"माही... शांत हो... मला सगळं कळलंय. इकडे काय झालं ते! मी तुझ्यासमोर धडधाकट आणि ठणठणीत आहे. मला काहीही झालेलं नाहीये."

तिला हुंदका अनावर झाला आणि “अवि..” म्हणत अविष्कारला गच्च मिठी मारली.

“मला कधीच सोडून नाही ना जाणार?”

“अगं., वेडी आहेस का तु? तुमच्याशिवाय दुसरं जग आहे का माझं?”

त्याच्या मिठीत माही मनसोक्त रडत होती. अविष्कारने त्याच्यासोबत घडलेली हकीकत सांगितली.

“बेंगलोरला विमानतळावर टॅक्सी चालकाला पैसे देताना मोबाइल आणि पाकीट नकळत बॅगमध्ये ठेवलं गेलं. पण टॅक्सी स्टॅण्डवर बॅगच चोरीला गेली. चोराच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. तसंच पुन्हा हॉटेलवर माघारी जाऊन मित्राकडून काही पैसे घेतले. ट्रॅव्हल्सने इकडे यायला निघालो. एकाच्या फोनवरून तुला कॉल करायचा प्रयत्न केला .परंतु, एक दोन वेळा एंगेज लागल्यामुळे कामात किंवा मिटिंगमध्ये असशील म्हणून पुन्हा कॉल नाही केला. इकडे आलो, तर हे सगळं रामायण! नंतर कळलं कि, माझी बॅग चोरणाऱ्याचा अपघात झाला होता. त्याची ओळख न पटल्यामुळे माझ्या पाकीटामधील आयडी कार्डवरून तो मीच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि हा सगळा घोळ झाला.”

       आपलं माणूस गमावण्याचं दुःख माहीला चांगलंच उमजलं होतं. औषध घेऊन माही शांत झोपी गेली. अविष्कारने तिच्या अंगावर पांघरून टाकलं आणि तिच्या कपाळावर अलवार ओठ टेकवले.

        आज माहीची सकाळ अगदी प्रसन्न होती. सगळं कसं वेगळं वाटत होतं. हरवलेलं सुख सापडल्यानंतर होणाऱ्या आनंदापेक्षाही ती जास्त आनंदी दिसत होती. फोनवर शार्दुलचे कितीतरी मेसेजेस-कॉल्स येऊन गेले होते. तिने कॉल केला.

“हॅलो....”

"अगं काय माही... किती कॉल्स-मेसेजेस. रिप्लाय नाही. काय झालंय? सांगशील का?"

"हो-हो-हो... शांत हो... संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेटू."

"ओह्ह  वाँव, खरंच! पण पुन्हा टांग नाही ना देणार?"

"नाही रे... चल बाय..."

"बाय... लव्ह यु माही..."

"बाय...",

त्याचे ‘लव्ह यु’ हे शब्द तिला कसंतरीच वाटलं!

             कॉफी शॉपमधल्या नेहमीच्या कॉर्नरच्या टेबलवर शार्दूल माहीची वाट पाहत होता. तिच्या आवडीचा नेव्ही ब्लू हाफ शर्ट, त्यावर मस्त परफ्युमचा सुंगंध दरवळत होता. नेहमी जीन्स टॉप किंवा पंजाबी ड्रेस मध्ये येणारी माही, आज मात्र, चक्क निळ्या शिफॉन साडीमध्ये! गळ्यात मंगळसूत्र. कानातही साजेसे झुमके. एखाद्या नववधूलाही लाजवेल अशी सौन्दर्यखणी! तिचा पारंपरिक साडीमधला पेहराव पाहून तो जागीच थक्क होऊन तिच्याकडे एकटक भान हरपून पाहत राहिला. काही क्षणात भानावर येत तिच्यासाठी खुर्ची ओढत तिला हाय केलं. तिनेही हसतच प्रतिसाद दिला. हसताना तिच्या गालांवर पडणारी खळी खुलून दिसत होती. तिच्याकडे पाहत त्याने दोन स्ट्रॉंग कॉफीची ऑर्डर सांगितली.

"माही... अगं काय झालं? काल भेटायला येणार म्हणालीस आणि..."

ती जरा सावरूनच बसली होती. त्याच्या प्रश्नाने भानावर येत म्हणाली,

"अं... हो... सॉरी... अरे... "

"काय झालं?", तिचा हात हातात घेत तो म्हणाला.

त्याच्या हातातून हात सोडवत ती म्हणाली,

"शार्दूल... मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय."

"मग सांग ना...!"

"कुठून सुरुवात करू कळत नाहीये."

"बोल डार्लिंग, तुझं ऐकण्यासाठी मी माझं सगळं आयुष्य राखून ठेवलंय..!"

"शार्दूल.. आपलं जगणं, असणं हे कधीही आपल्या एकट्यापुरतं मर्यादित नसतं. आपल्या आयुष्यावर बऱ्याच जीवलगांचा अधिकार असतो. आई, वडील, मुलं, नवरा, बायको, मित्रमैत्रिणीं अशा अनेक नात्यांनी आपलं आयुष्य समृद्ध होतं. त्या प्रत्येक नात्यांसाठी, प्रत्येक नात्यांच्या सुखासाठी, त्यांच्या आनंदासाठी आपली काही कर्तव्ये असतात. मग असं हे आयुष्य फक्त  एकाच नात्याला वाहिलं तर मला सांग, एका नात्याला न्याय देताना इतर नात्यांवर अन्याय नाही का रे होणार? आयुष्यामध्ये घेण्यापेक्षा भरभरून देण्याला प्राधान्य असावं, ते हि निस्वार्थ भावनेने!"

"माही... एवढं अवघड नको यार...!"

"शार्दूल.. थोडं स्पष्टच बोलते. आपल्या दोघांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठीही ते तितकंच महत्वाचं आहे."

"हम्म..."

काहीसा गंभीर होत त्याने हुंकार भरला,

“आपलं कॉलेजमध्ये असताना प्रेम होतं. नंतर दोघांचीही लग्नं झाली. मग मुलं, संसार आपापलं एक वेगळं जग निर्माण झालं. तू मला अर्ध्यावर का सोडून गेलास?  त्याचं कारणही  समजलं.. पटलं मला.. आणि ते मी स्वीकारलंही. एवढ्या वर्षांनी आपण भेटलो.  ‘अर्ध्यावर सुटलेला डाव पुन्हा नव्याने पूर्ण करावा.’ मनात आलं माझ्या.  प्रेमतृष्णा मनात दाटून आली. त्या नात्याच्या हव्यासापोठी मी त्या नात्यामागे धावत होते.  पण नाही शार्दूल.. ती माझी चूक होती.  आपले मार्ग, आपलं जग, आपली नाती  सारं काही वेगळं आहे. तुला तुझी कर्तव्ये, जबाबदाऱ्या आहेत अन मला माझ्या. जे झालं ते झालं.. पण आता थांबायला हवंय शार्दूल. जेणेकरून आपल्या कुटुंबाला पुढे जाऊन याचा त्रास नको व्हायला.”

"अगं... माही... असे काहीही होणार नाही. ट्रस्ट मी. घरच्यांना कळलंच नाही तर प्रॉब्लेम  व्हायचा प्रश्नच नाही."

"नाही शार्दूल.. आपलं हे नातं, आपण किती दिवस जगापासून लपणार! मी नाही फसवू शकत माझ्या कुटुंबाला. यु आर माय पास्ट अँड माय फॅमिली ईज माय प्रेझेंट..

आपला नवरा, बायको, मुलं कशीही असली तरी ती आपली आहेत. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, सांभाळणारी, आपली काळजी करणारी आहेत. तुझी बायको कितीही टिपिकल, गावंढळ असली तरीसुद्धा ती तुझा संसार सांभाळते. तुझ्यासाठी मुलांसाठी सर्वस्व पणाला लावते. तुझ्यावर मनापासून प्रेम करते."

"माही.. प्लिज बस्स यार..."

"शार्दूल, तुला वाटत असेल, मी का उगाच तत्वज्ञान झाडतेय? पण हेच खरं आहे. तुझ्यासाठी वेडी होते मी. खूप ओढ होत तुझी. माझा नवरा नाहीये तुझ्यासारखा हँडसम! नाही येत त्याला तुझ्यासारखं एक्सप्रेस होता! म्हणून त्याचा अर्थ असा नाही होत कि, त्याला सोडून मी तुझ्याकडे यावं. त्याची अशी प्रतारणा करावी. तो कसाही असला, तरी माझ्या कुटुंबाची काळजी घेणारा, जबाबदारीने वागणारा, निरपेक्ष प्रेम करणारा नवरा आहे यापेक्षा वेगळं आणखी काय हवं असतं  एका स्त्रीला?"

शार्दूल पुरता गोंधळून गेला होता.

“शार्दूल.. आपल्या जवळची माणसं जेव्हा आपल्यापासून दुर जातात ना! तेव्हा त्यांचा अस्तित्व, त्यांच महत्व आपल्याला जाणवायला लागतं. आणि याचा अनुभव तुला मला चांगलाच आहे म्हणूनच सांगते, आपण आता थांबायला हवंय.”

"पण मला तू हवी आहेस माही..."

"शार्दूल... आपण आता कॉलेजमध्ये नाही आहोत. तुझं माझं असं वेगळं जग आहे."

त्याचा हात हाती घेत ती म्हणाली,

"आणि मी थोडीच तुझ्यापासून कायमचं नातं तोडते आहे. आपण मित्र आहोत. भेटू. बोलू. पण एका ठराविक मर्यादेपर्यंत! कळतंय ना तुला?"

"हं..."

शार्दुलच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. सुरुवातीला तिचं बोलणं त्याला खटकत होतं. आपण आपल्या वेडापायी उगाचच चुकीचं वागतो आहोत याची जाणीव होऊ लागली. त्याला बाय करून माहीने निरोप घेतला.

        भरलेल्या आसवांनी तो तिची पाठमोरी आकृती नाहीशी होईपर्यंत पाहत होता. त्याच्या प्रेमासाठी वेडी असणारी, त्याला आज वेगळीच वाटली! एखादी पोक्त विचारांची बाई! आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचं महत्व माहीने अगदी सहज पटवून दिलं होतं. न रागवता! न भांडता! अगदी शांत! आपल्या हातून चुका होतायत. हे कळत असूनही आपल्या वेडापायी आपण त्यांना नाकारत होतो  हे स्वतःला समजणं सुद्धा किती मोठी गोष्ट असते ना! पुढे जाऊन आपल्या कुटुंबाला घातक ठरणाऱ्या गोष्टी वेळीच थांबवल्या तर भविष्यात आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळच येत नाही.

        मनावरचं ओझं हलकं होऊन अगदी मोकळं-मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. घरी जाऊन अविष्काराला भेटण्यासाठी माही अधीर झाली होती. जेवण वगैरे आटपून  माही बेडरूममध्ये आली. खिडकीतून मंद गार वारा येत होता. चंद्राचा शीतल प्रकाश. लुकलुकणाऱ्या चांदण्या. खिडकीतल्या मोगऱ्याचा सुगंध खोलीत दरवळत होता. अविष्कार कादंबरी वाचत बसला होता. कादंबरीमधल्या  कवितेच्या काही ओळी नकळत गुणगुणत होता.

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे...

जिथे मी रुसावे, तिथे तू असावे...

त्याचं असं गुणगुणणं माहीला नेहमीच आवडायचं! पण कधी बोलली नव्हती! बेडवरूनच ती म्हणाली,

"अवी..!"

"अं...हो... काय गं? झोप नाही का येत?"

"हुं...", म्हणत तिने अवीला मिठीत घेण्यासाठी हात पसरले.

अविष्कार तिच्या जवळ आला. नेहमी भेटणारा अविष्कार आज नव्याने भेटतोय असा भास माहीला होत होता.  तीही त्याच्या बाहुपाशात विसावली. तिच्या नाजूक ओठांच्या पाकळ्यावर आपले ओठ टेकवून अविष्कारने साखर पेरणी केली. माही त्याच्यात विरघळून जात होती.  तिच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेत अविष्कारने तिला कवेत घेतलं. श्वासात श्वास मिसळून गेला. तिची काया थरथरली. गात्रे सैल झाली. तिने स्वतःला अविष्कारच्या स्वाधीन केलं.  धुंद मंतरलेली रात्र,  मिलनास अधीरलेलं मन आणि ते गंधाळलेले क्षण.. एक तृप्ततेची भावना तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. अन अलगद तिची रेशमाची मिठी सैल झाली.


 

       आज खूप दिवसांनी तो तिला प्रेमानं कुशीत घेऊन निजला होता. तीही त्याच्या कुशीत सुखाधीन झाली होती. दूर कुठेतरी गाणं वाजत होतं.

अधीर मन झाले, मधूर घन आले...

धूक्यातूनी नभातले, सख्या, प्रिया..

सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले...

अधीर मन झाले...

~ समाप्त ~

@ गीता उघडे

🎭 Series Post

View all