अधीर मन.. मधुर घन.. भाग ५ (टीम:- विंग्स ऑफ फायर)

ही एक अनोखी प्रेमकथा अधीर मनाची..मधुर घनाची..

अधीर मन मधुर घन.. भाग ५

         माही घरी पोहचली. नेहमीप्रमाणे शर्वरीची बडबड सुरू झाली. पण आज माहीचं शर्वरीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. बाल्कनीत उभं राहून आकाशातल्या चांदण्या बघण्यात माही हरवून गेली. शार्दूलच्या हातावर ठेवलेला हात शंभर वेळा निरखून बघितला तरी तिचं समाधान होत नव्हतं. त्याचा तो स्पर्श.. बोलके डोळे.. पुन्हा-पुन्हा डोळ्यासमोर तरळत होतं. इतक्या वर्षांनी शार्दूलच्या स्पर्शाने ती अंगोपांगी मोहरली. अगदी त्याच ओढीने! झोपण्यासाठी बेडवर पहुडली खरी पण मनात पिंगा घालणाऱ्या शार्दूलच्या विचारांनी झोपच येत नव्हती. केंव्हातरी पहाटे तिचा डोळा लागला. 

        अविष्कार बेंगलोरहून माघारी आला. माहीचं ऑफिस, क्लायंट मिटींग्स, घर, व्हिजिट्स तिचं रोजचं रुटीन चालू होतं. शार्दुलला भेटून आठवडा उलटला होता. दोघांच्यात एखादा मेसेज वा कॉलही झाला नव्हता. माही त्याच्या आठवणीने त्याचं प्रोफाइल, ऑनलाईन आहे कि नाही पाहायची. मेसेज टाईप करायची. पण सेंड करायचं धाडस होत नव्हतं. तिकडे शार्दुलचीही अगदी अशीच अवस्था होती. शार्दूलने त्याच्या भावनांवर संयमाने आवर घातला होता. पण माही मात्र त्याच्या आठवणीत त्याच्या ओढीने झुरत होती. तोच एक दिवस मेसेंजरवर त्याचा मेसेज आला,

“हॅलो माही,कशी आहेस?”

आता मात्र माहीचा स्वतःवरील ताबा सुटला. संयमाने तर केव्हाच परिसीमा गाठली होती. विचार न करता तिने मेसेज सेंड केला.

“उद्या वेळ आहे का तुला?”

“हो, तुझ्यासाठी कधीही, कुठेही आणि कितीही वेळ आहे माझ्याकडे.” 

त्याचं असं बोलणं तिला नेहमीच भुरळ घालायचं.

“हो का?” ती म्हणाली.

“ऑफकोर्स, आपके लिये तो जान भी हाजीर है, मोहतरमा!”

“ओह्ह! अस्स.” 

“हम्म..”

“बरं मग भेटायचं का नेहमीच्या वेळी, त्याच ठिकाणी?”

“बंदा हाजीर होगा.”

“बाय..”

हसतच तिने मेसेज सेंड केला.

“इंतेजार रहेगा.!”

शार्दूलचा रिप्लाय आला. त्याच्या लाघवी बोलण्याने माही हरकून गेली. त्याच्या भेटीसाठी मन अधीर झालं होतं. शार्दूलच्या विचारातच तिला झोप लागली. 

        दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माही ठरल्याप्रमाणे त्याच कॉफीशॉपमध्ये अगदी वेळेवर पोहोचली. शार्दूल ती येण्याआधीच तिथे पोहोचला होता. मागच्या वेळी बसलेल्या त्याच टेबलला शार्दूलने पसंती दिली. कॉफी ऑर्डर करून फक्त दोघे एकमेकांकडे बघत होते. कॉफीचे एक-एक घोट घेत एकमेकांकडे पाहताना नजरेची भाषा मनातलं गुज सांगत होती. मौनातला संवाद सुरू होता.

“चला, निघुया?” 

कॉफी संपवून पाच दहा मिनिटांनी माही म्हणाली.

“हो चालेल..”

आज मात्र माहीच्या मनात शार्दूलविषयी बिलकुल राग नव्हता. दोघेही बाहेर पडले. माहीच्या मागोमाग शार्दूलही चालू लागला. आणि अचानक जिन्यावरून खाली उतरताना  पायरीवर अंथरलेल्या कार्पेटमध्ये पाय अडकून माहीचा तोल गेला. आणि ती खाली कोसळणार तोच पटकन मागून शार्दुलने तिचा हात घट्ट पकडला. तिला सावरत त्याने स्वतःकडे खेचलं. नकळत माही त्याला बिलगली. श्वासांची गाणी सुरू झाली. दोघांचीही हृदये धडधडत होती. त्याच्या नजरेत माहीला निर्व्याज प्रेम दिसत होतं. थोड्याच वेळात भानावर येत स्वतःला सावरत माही कारच्या दिशेने चालू लागली. तिने त्याचा निरोप घेतला. दोघांच्याही गाड्या एकमेकांच्या विचारांत आपल्या घराकडे धावत होत्या.

        आता त्यांची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. माहीच्या मनातल्या रागाची जागा आता पुन्हा प्रेमाने घेतली होती. 

'गुड मॉर्निंग, गुड नाईट., जेवलास, जेवलीस का?  इथपासून ते टेक केयर आणि नंतर तर मिस यु' पर्यंतचा प्रवास सुरू झाला. एकमेकांच्या फेसबुकच्या स्टेट्सवर लव्ह, किस, हार्ट असे रिप्लाय येऊ लागले. शिवाय न विसरता ते मेसेजेस डिलीट करणं चालू होतं. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. संसार, नोकरी सांभाळून एका नवीन नातं फुलत होतं. 

      संध्याकाळी माही टीव्हीवर बातम्या पाहत होती. बराच वेळ फोन वाजत होता.

“अगं, बघ ना कोण आहे?” अविष्कार म्हणाला.

“जाऊदे रे.!”

पुन्हा रिंग वाजू लागली. यावेळी अविष्कारने स्वतः फोन घेऊन तिच्याकडे दिला.

“हॅलो,माही”

 पलीकडून बॉस बोलत होता.

“येस सर”  तिने नम्रपणे प्रत्युत्तर केले.

“येत्या रविवारी, मुंबई मध्ये एक कॉन्फरन्स आहे. तिथे आपल्याला प्रेझेन्टेशन द्यायचे आहे. मी दोन दिवसांसाठी दिल्लीला क्लायंट मिटींग्ससाठी जातोय. मला खात्री आहे. फक्त तूच उत्तमरीत्या प्रेझेन्टेशन देऊ शकतेस. सो, तू जावं असं मला वाटतंय”

“सर, मी?”   तिला धक्काच बसला.

“हो, माही.. अमायरा येईल तुझ्यासोबत.”

“सर,प्लिज  माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाला..”

“लिसन माही, हि खूप मोठी आणि चांगली संधी आहे. तिथं मोठं-मोठे उद्योगपती आणि बिजनेसमन येणार आहेत. सो आय थिंक, तुला ही संधी घ्यायला हवी. सकाळपर्यंत सांग म्हणजे मला पुढे ठरवायला.”

“येस सर..”  म्हणत नाखुशीनेच तिने फोन बंद केला.

माहीने अविष्कारशी या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यानेही  तिला जाण्यासाठीच आग्रह केला. अखेरीस माही अमायरासोबत मुंबईला येऊन पोहोचली. जाण्याची घाई, प्रेझेंटेशनची तयारी या सगळ्या गडबडीत माही शार्दूलला सांगायचं विसरून गेली.

मुंबईतील सी लिंकला लागुनच असलेल्या पंचतारांकित ‘ब्लू डायमंड’ हॉटेलमध्ये सर्व आमंत्रित पाहुण्यांची राहण्याची उत्तम  केलेली होती. माही तिच्या रूममध्ये पोहोचली. छान शॉवर घेऊन फ्रेश झाल्यावर तिने फोन करून सुखरूप पोहचल्याचं अविष्कारला कळवलं. मोबाईलवर महत्वाचे मेसेजेस, मेल पहिले. शार्दुलला एकदा फोन करून कळवावं म्हणून तिने त्याला कॉल केला. फोन एंगेज आला. स्वतःचं आवरून माही कार्यक्रमाच्या ठिकाणी निघाली. 

        माहीने निळ्या रंगाची साडी आणि त्यावर स्लिव्हलेस मॅचिंग नक्षीदार ब्लाउज परिधान केला होता. त्यावर चंदेरी रंगाची ज्वेलरी एकदम उठून दिसत होती. कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांनी एक-से-बढकर एक प्रेझेंटेशन दिली होती. माहीच्या कंपनीचे नाव घोषित झालं. माही मनातून खुप घाबरली होती. दोघी व्यासपीठावर पोहचल्या. अमायराने प्रेझेन्टेशन सुरू केलं. माहीने घाबरतच बोलायला सुरुवात केली. इतक्यात तिचं लक्ष समोरच्या रांगेत बसलेल्या शार्दूलकडे गेलं. त्याला पाहताच ती चकित झाली. त्याने डोळ्यांनीच तिला आश्वस्त केलं. एवढ्याश्या गोष्टीचाही तिला खूप आधार वाटला. तिचे हावभाव, स्पष्ट आणि काळजाचा ठाव घेणारे शब्द, बोलण्यातील लकब सगळेच भान हरपून ऐकत होते. प्रेझेंटेशन संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. संचालकांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी माहीचे भरभरून कौतुक केलं. दुरूनच शार्दुल तिच्याकडे भारावल्यासारखा पाहत होता. कॉन्फरन्स संपल्यानंतर संयोजकानी सर्वांसाठी रात्रीच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. शार्दुल त्याच्या मित्रांशी गप्पा-गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेत होता. माहीनेही अमायरासोबत जेवण उरकलं. थोड्यावेळाने अमायरा झोपायला तिच्या रूममधे निघुन गेली. 

        माही शार्दुलची वाट पाहत लॉनसमोर असलेल्या गच्चीमध्ये उभी होती. अथांग पसरलेला निळ्याशार समुद्र. आकाशात काळ्या ढंगांची गर्दी दाटू लागली होती. ढगांआडून विजेचा लपंडाव चालू होता. तिचे मोकळे केस हलकेच वाऱ्यावर उडत होते. इतक्यात तिला ओळखीच्या पर्फ्युमचा गंध जाणवला. डावीकडून वळून पाहिलं, पण कुणीच नव्हतं. उजव्या बाजूला अगदी जवळ शार्दूल उभा होता. ती जरा दचकलीच!! स्वतःला सावरत म्हणाली.

“काय रे, किती वेळ?”

“सॉरी यार, ते लोक सोडतच नव्हते. एक सांगु माही, आज तू खूप सुंदर दिसतेयस.”

“अच्छा, हे आत्ता कळलं तर!”

“जेव्हा तू व्यासपीठावर आलीस ना! तेव्हापासून मी फक्त तुला अन तुलाच पाहत होतो.”

“ओह्ह रियली..!”

त्याच्याकडे वळून उजव्या डोळ्याची भुवई वर घेत ती हसून म्हणाली.

तिच्या गालावर आलेली केसांची एक बट त्याने अलगद मागे सारली. तिच्या गालावर हलकेच लाजेची खळी उमटली. तिचं असं गोड हसणं, कुणालाही भुरळ घालणारं होतं. आणि याच तिच्या हसण्याचा शार्दूल दिवाना होता.

“तू इथे कसा?”

“तुला आवडलं नाही का? मी इथे असं आलेलं.”

“तसं नाही रे, पण या कॉन्फरन्सला.! आय वाँज सरप्राईज्ड”

“म्हटलं, तुला सरप्राईज द्यावं.” तो हसून म्हणाला

“हम्म...”

दोघांच्या गप्पा छान रंगत चालल्या होत्या. शार्दूल त्याच्या बायकोबद्दल सांगत होता तर माही तिच्या नवऱ्याबद्दल! बोलता बोलता नकळत हातांचा स्पर्श होतं होता. ओढीने अधीर झालेल्या मनाला आवरायला कठीण जातं होतं. बारा वाजून गेले होते. माहीच्या डोळ्यांवर झोप दाटू लागली होती. माही जांभई आवरत म्हणाली,

“चल, निघूया.” 

इच्छा नसतानाही शार्दूल "हं" म्हणाला.

"चल, तुला सोडतो रुमपर्यंत.”

माहीला रुमजवळ सोडून शार्दूलने तिला गुड नाईट केलं. माहीने तिच्याजवळ असलेल्या चावीने रूमचा दरवाजा उघडून आत जाताना मंद स्मित हास्य करत बाय केलं. 

         

दरवाजा बंद करणार तोच जोराची वीज कडाडली. दिवेही गेले. सर्वत्र काळाकुट्ट अंधार. माही मोठयाने किंचाळली. तिच्या आवाजाने पटकन शार्दूल दरवाजा ढकलून आत आला. तोच माही घाबरून शार्दूलला  बिलगली. तिचा तो गंधाळलेला स्पर्श त्याच्या रोमारोमात चेतना जागवत होता. तोच पुन्हा एकदा वीज कडाकडली. ती आणखीनच त्याला घट्ट बिलगली. बाहेर पावसाला सुरुवात झाली. विजांचा लपंडाव चालूच होता. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. श्वासात श्वास गुंतू लागला. त्याची उबदार मिठी अजूनच घट्ट झाली. कितीतरी वर्षांची भेट! दोन्ही शरीरं रोमांचित झाली होती. त्याने तिच्या कमरेला आपल्या मजबूत हातांचा विळखा घातला. हातांची पकड घट्ट झाली. त्याने हलकेच तिचा चेहरा वर उचलला. तिने लाजून पापणी खाली केली. त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच नशा, मादकता संचारू लागली होती. शरीराचा कण न कण तिच्या स्पर्शासाठी अधीर झाला होता. त्याचे गरम श्वास तिला जाणवत होते. त्याचे लालसर ओठ थरथरू लागले. थोडं खाली झुकून त्याने तिच्या गुलाबी ओठांच चुंबन घेतलं. कधीपासून आतुर झालेले त्याचे ओठ तिच्या रसरशीत ओठांच्या स्पर्शाने सुखावत होते.

        कित्येक वर्षांपासून रंगवलेलं स्वप्नं आज सत्यात उतरत होतं. तिची काया मोहरली. श्वासांची गती वाढू लागली. तिने आवेगाने डोळे मिटून घेतले. तिचे नाजूक हात त्याच्या पाठीवरून फिरू लागले. तिचा गंध त्याच्या रोमारोमात भिनत होता. त्याचे मजबूत राकट हात तिच्या सर्वांगावरुन फिरत होते. आता कुणीही थांबायला तयार नव्हते. कपड्यांचा अडसर दूर झाला सारे बंध गळून पडले. आसुसलेली शरीरे प्रेमाग्नीमध्ये धगधगत होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. अन आतमध्ये दोघेही एकमेकांच्या सान्निध्यात चिंब चिंब भिजत होती.

        तोच माहीच्या मोबाईलवर सहाचा अलार्म खणखणू लागला. ती झटकन उठून बसली. रूममध्ये एसी असूनही तिचं सारं अंग घामानं भिजून गेलं होतं. डोकं जड झालं होतं. 

“ओह्ह, स्वप्न होतं तर..!” 

पुटपुटत ती बेडवरून उठली आणि वॉशरुमकडे निघाली.

-----

        दुपारपर्यंत माही आणि अमायरा घरी पोहोचल्या.  अविष्कारलाही अचानक बेंगलोरचे काम निघाल्यामुळे जावं लागलं. माहीचा रोजचा दिनक्रम सुरू झाला.

'एक मन शार्दूलसाठी अधीर झालं होत तर दुसरं मन आपण काही चुकीचं तर करत नाही आहोत ना! असा विचार करत होतं. पण शार्दुलच्या बाबतीत माही दुसरा विचार करूच शकत नव्हती. आपलं अधुरं राहिलेलं प्रेम या ना त्या कारणाने आता अनायासे जवळ आलेलंच आहे म्हटल्यावर कुणीही ते आपलंस करण्याचा, मिळवण्याचा प्रयत्न करणारच! माही तरी त्याला अपवाद कशी असेल!'

       शार्दूल तिला आज संध्याकाळी भेटीसाठी विनवणी करत होता. ती सुद्धा त्याला भेटण्यासाठी आतुर होती. त्याच्या कळकळीने केलेल्या विनंतीला तिने होकार दिला. आणि ती महत्वाच्या कामात व्यस्त झाली. अचानक तिच्या डिस्प्लेवर अनोळखी नम्बर झळकला.

 'आत्ता कुणी कडमडायला फोन केला!'

"हॅलो.." तिने जरा त्रासुनच कॉल रिसिव्ह केला.

"हॅलो,मिसेस माही सुभेदार?" पलीकडून एक खणखणीत आवाज आला.

"येस..."

      पुढच्या काही वाक्यांनंतर तिला काहीच ऐकू आलं नाही. ती मटकन खुर्चीवर बसली. कानाला लावलेला फोन कधीच खाली पडला होता. डोळे पाण्याने भरून समोरचं सगळं धूसर दिसू लागलं होतं.

कुणाचा फोन असेल? काय झालं असेल नेमकं?

क्रमशः

@ईश्वर त्रिंबक आगम

🎭 Series Post

View all