अधीर मन झाले!
भाग-एक.
भर दुपारची वेळ, तरी बाहेर उन्हाचा पत्ता नव्हता.
सगळीकडे अंधारून आले होते. आकाशात काळ्या नभांची गर्दी झाली होती. नभीचे घन केव्हाही धो धो बरसतील असे चित्र निर्माण झाले होते. अंगणात वाळत घातलेले कपडे ओले होतील, या भीतीने ती शीघ्रतेने घरात घेऊन आली. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून घराची दारे-खिडक्या घट्ट बंद केल्या. स्वयंपाकघरात जाऊन दाटसर दुधात आलं घालून चहा उकळायला ठेवला. कपामध्ये तो वाफाळलेला चहा ओतताना झालेल्या घाईने काही थेंब ओट्यावर सांडलेच. त्यावर जलदगतीने कपडा फिरवून ती स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि आपल्या आवडत्या खिडकीपाशी उभी राहिली.
'हुश्श! वेळेत पोहचले. पाऊस सुरु व्हायचाय अजून.' तिने सुटकेचा निःश्वास टाकला.
एवढया वेळापासून चाललेल्या लगबगीने तिचा श्वास फुलला होता. बंद खिडकीच्या काचा तिने सरकवल्या आणि बाहेरचा थंड वारा अंगावर घेतला. खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या वाऱ्याने केस भुरुभुरु उडत चेहऱ्यावर येऊ लागले होते.
तिने एकवार परत आकाशाकडे नजर टाकली. काळे ढग अगदी दाटीवाटीने एकमेकांना स्पर्शून त्या गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या पोटात असणारे पाणी आणि त्यामुळे पुढे जाण्यास मंदावलेली गती. जरासा धक्का लागला तरी केव्हाही बरसायला सुरुवात होईल असे दृश्य!
त्या नभाकडे ती आसुसल्या नजरेने पाहत होती तोच अचानक पावसाला सुरुवात झाली. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तसाही पाऊस तिला फक्त बघायलाच तर आवडे. आत्ता सुद्धा ती ही बरसात बघण्यात गुंग झाली.रिते होण्यासाठी जणू प्रत्येक ढगामध्ये चढाओढ सुरु झाली होती. पावसाचा वेग वाढतच होता.
बाहेर धो धो कोसळणारा आषाढातील तो पाऊस आणि तिच्या मनात रुंजी घालणारा श्रेया घोषालचा मंजुळ स्वर.
धुक्यातुनी नभातले, सख्या, प्रिया,
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले…'
डोळे मिटून हात पसरून ती पावसात उभी, बरसणाऱ्या जलधारांना अंगावर झेलू लागली. प्रत्येक सरीत त्याचा स्पर्श जाणवत होता. त्या स्पर्शाने तिच्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी ओघळू लागल्या. ती तशीच उभी, निश्चल, निशब्द!
बाहेरचा मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. तेजस्विनी, तिची लेक शिकवणी आटोपून घरी आली.
"आई ss, अगं काय करतेस? पूर्ण भिजलीस ना? सर्दी पडसे होईल ते वेगळेच!" तिने तिच्या डोक्यावर छत्री धरली.
अंगावर होणारा पावसाचा वर्षाव अचानक थांबला तशी तिची तंद्री भंगली. समोर तेजस्विनी उभी होती.
हातात छत्री घेऊन उभी असलेल्या तेजस्विनीकडे बघून ती आल्यापावली परत भूतकाळात गेली.
तो असाच देहभान विसरून पावसात भिजत होता. काळजीने तिने त्याच्या डोक्यावर छत्री पकडली तेव्हा त्याने तिच्याकडे टाकलेला कटाक्ष आणि ओठांवरचे मधुर हास्य! त्याच्या सावळ्या चेहऱ्यावर असलेले तेज पाऊस देखील मिटवू शकला नव्हता. पाहिल्याच नजरेत ती गारद झाली. भिजणाऱ्या त्याला पाऊस लागू नये म्हणून छत्री घेऊन आलेली ती, त्याच्या काजळी काळ्या डोळ्यात अलगद अडकली.
"काय गं?" त्याने हसून तिला विचारले.
"अरे, केव्हाचा भिजतो आहेस? अर्धा तास झालाय. तब्येत बिघडेल ना अशाने." ती उत्तरली.
" तब्येतीचं काय गं? ती कशानेही बिघडू शकते आणि मी अर्ध्या तासापासून भिजतोय हे तुला कसे ठाऊक? माझ्यावर नजर ठेऊन आहेस काय?" अनिमिष नजरेने तिच्याकडे बघत त्याने हसत विचारले.
पुन्हा त्याच्या ओठांवर तेच गोड हसू! लोभसवाणे!
"मी कशाला नजर ठेवू? बसचा थांबा आहे हा! केव्हाची बसची वाट बघत उभी आहे. तू वेड्यासारखा भिजतो आहेस म्हणून तुझ्याकडे आले. छत्री हवी नसेल तर जा उडत. भलाई का तो जमानाही नही रहा आज -कल!"
ती बोलत होती. तो बघत होता. बोलतांना तिच्या गुलाबी ओठांची होणारी हालचाल त्याचे लक्ष वेधून घेत होते.
"तुला पाऊस आवडत नाही का?"
"आवडतो, पण फक्त बघायला. असे वेड्यासारखे भिजायला मला नाही आवडत." ती.
"पाऊस असा नुसता डोळ्यांनी बघून अनुभवायचा नसतो गं. एकदा स्वतःला मोकळे करून मुक्तपणे भिजून बघ आणि तो आनंद अनुभवून बघ." तिच्या कानाजवळ येऊन अगदी हळुवारपणे तो म्हणाला.
"ए s, मी भिजतेय." तिने छत्री सरळ केली.
ती पुढे आणखी काही बोलणार तितक्यात तिच्या शेजारी एक बाईक येऊन थांबली.
"आकाश?"
"आकाश दादा?"
"मेघा, तू इथे आहेस?" आकाशने आश्चर्य वाटल्यासारखे करत विचारले.
"हो, माझा बस थांबा हाच आहे हे तुला माहीत नाही का? आणि काय रे, मी तुला फोन केला तेव्हा काय म्हणालास? की तुला महत्त्वाचे काम आहे म्हणून मला घ्यायला येऊ शकत नाहीस. मग आता इथे कसा? आणि ह्याला तुझे नाव कसे माहीत? तुम्ही ओळखता का एकमेकांना?"
तिच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
"अगं हो, हो. एकावेळी किती प्रश्न विचारशील? हा माझा मित्र आहे, रवी. बघते आहेस ना कसा भिजतो आहे, त्याला घ्यायला आलो होतो. तू इथेच आहेस हे खरंच माझ्या लक्षात नाही आलं गं." आकाश.
"मित्रासाठी तुझ्याजवळ वेळ आहे पण बहिणीसाठी नाही. हो ना?" गाल फुगवून मेघा म्हणाली.
"मेघू, अगं तसं नाही. चल मी तुला आधी सोडून देतो." आकाश.
"काही गरज नाहीये. माझी बस आली. मी जाते. तू तुझ्या मित्राला सोडून दे." ती फणकाऱ्याने बोलून बसमध्ये चढली.
"मेघाs, मेघू ss" तो मागून ओरडत होता.
"गेली ती. तूही जा. उगाच माझ्यामुळे भांडण नको." रवी.
"तू गप रे. मी घरी गेल्यावर तिला समजावेन. आता आधी तू चल. नाहीतर खरंच आजारी पडशील." आकाश.
ते दोघे बाईकवर निघून गेले. मेघा बसमधून त्यांच्याकडे दातओठ खात बघत राहिली.
"आई ss, आत चल. तब्येत बिघडेल ना तुझी." तेजस्विनीच्या आवाजाने मेघा वर्तमानात परतली.
मेघाही तिच्या पाठोपाठ आत गेली.
"पावसात भिजलीस की त्रास होतो, माहिती आहे ना तुला? तरी पुन्हा तेच? ही वाफ घे आणि हळदीचे दूध आणलेय ते पी." तेजस्विनी काहीशा रागाने म्हणाली.
"तेजा, सॉरी ना. आं आं छी ss." ती.
"आई, तू ना माझ्याशी बोलूच नकोस. मी मामालाच सांगते." म्हणत तिने मोबाईल वर नंबर डायल केला.
"काय गं मेघू? कशाला इतकं भिजायचं?" तिचा ताप चेक करत आकाश म्हणाला. तेजूच्या फोनने तो तिथे आला होता.
"दादा, मला मेघू, मेघू नको करुस हं. कसं वाटतं ते? अगदी लहान मुलीसारखं? आंssछी." आपले नाक पुसत मेघा.
"आई, तू ना अगदी लहान बाळच आहेस, म्हणून अशी वागतेस. तुझ्या शाळेतील लहान मुलांना कशी सांभाळतेस कोणास ठाऊक? नाहीतर उद्या त्यांनाही पावसात घेऊन जाशील आणि मग त्यांचे पालक आपल्या घरावर धावून येतील." तेजस्विनीचा राग अजूनही शांत झाला नव्हता.
"काय गं तेजा? तुझी आई एक उत्तम शिक्षिका आहे हे विसरू नकोस बरं. तू देखील तिच्याच हातून घडली आहेस हं." आकाश.
"हो रे मामा, ते शंभर टक्के खरे आहे. पण तुम्ही लोकांनी ना लहानपणी अती लाडाने डोक्यावर चढवून ठेवली आहे. म्हणून ती आता माझं अजिबात ऐकत नाही." आपल्या नाकपुड्या फुगवून तेजस्विनी.
"अगं माझे आई, चूक झाली माझी. मला माफ कर. ह्यापुढे नाही भिजणार मी, किती गं बोलशील मला?" मेघाने आपले दोन्ही कान पकडले.
"मेघा ऐक ना, तुम्ही दोघी माझ्यासोबत घरी चला ना. तुलाही बरे वाटेल." आकाश.
"नको रे दादा. तू जा आता. मी बरी आहे रे. काही झाले तर इथे ही माझी आई आहे ना, ती घेईल माझी काळजी."
तेजस्विनीचे गाल खेचत ती म्हणाली.
" हो, मामा जा तू. तुझ्या नुसत्या दर्शनानेच ही बरी होते हे तुला माहिती आहे ना? म्हणून तर एवढया रात्री तुला बोलावून घेतले. काही वाटलं तर मी फोन करेन." तेजस्विनी त्याला दारापर्यंत सोडत म्हणाली.
" काळजी घे." असे म्हणून आकाश निघून गेला.
"तेजू, इतकी चिडचिड नको करत जाऊ ना बाळा." झोपताना तिच्या डोक्यावर हात फिरवत हळुवारपणे मेघा म्हणाली.
"कशाला भिजलीस एवढी तू? मला पाऊस आवडत नाही हे तुला माहीत आहे ना." मुसमुसत तेजस्विनी बोलली.
" एवढी पाऊसवेडी तू. कशाला गं त्या पावसावर राग काढतेस?" मेघाचे थोपटणे चालूच होते.
"कारण या घाणेरड्या पावसात मी माझा सुपरहिरो गमावलाय." आपल्या एकेक शब्दांवर जोर देत ती बोलत होती.
बाहेरचा पाऊस थांबला होता पण तिच्या काळ्याभोर डोळ्यात ढग दाटून येत होते.
"आणि तुला गं का एवढा पुळका या पावसाचा?" विचारताना तिचा हुंदका बाहेर पडला.
"कारण या सुंदर पावसातच तर मला माझा सुपरहिरो सापडला होता!" आपली शांत पण स्थिर नजर तेजस्विनीच्या डोळ्यात रोखत मेघा उत्तरली.
"आय मिस हिम व्हेरी बॅडली! मला त्याची खूप आठवण येते गं. हा असा बरसणारा पाऊस बघितला की आणखी खूप जास्त आठवण येते." रडत रडत मेघाला तेजस्विनीने मिठी मारली.
क्रमश :
******
अधीर मन हे झाले!