अधिक , पाखी आणि उन्हाळा !

.
रात्रीचा प्रहर होता. अधिक आणि पाखी डिनर करत होते.

" पाखी , उद्यापासून मी घरीच आहे. "

" हो का ? मग मी सकाळीच माहेरी जाते. "

" का ?"

" मला जॉबलेस मुलासोबत संसार करायचा नाही. चांगलं आयआयटीच्या मुलाचे स्थळ आले होते माझ्यासाठी. पण घरच्यांनी तुझ्यासोबत लग्न लावून दिले. "

" आजकाल तर आयआयटीमध्येही प्लेसमेंट होत नाहीत. बाय द वे तुझ्यासाठी आयआयटीवाल्याचे स्थळ आले होते ?"

" हा. आयटीआय केला होता त्याने. "

अधिकने कसेबसे स्वतःचे हसू आवरले.

" दोघांमध्ये खूप फरक आहे पाखी. "

" हसू नको. तुला जॉबवरून का काढून टाकले ?"

" अग ऑफिसमध्ये रिनोव्हेशनचे काम आहे म्हणून आठवडाभर वर्क फ्रॉम होमच आहे. "

" अच्छा. तस सांग मग. "

रात्री दोघेही झोपायला बेडरूममध्ये गेले. त्यांच्या बेडरूममधला फॅन खूप हळू चालत होता.

" पाखी , जुन्या हॉरर पिक्चरमधल्या पंख्यासारखा आपला फॅन का वागतोय आज ?"

" एक काम कर. झाडू आण. "

" आता एका फॅनसाठी तू मला झाडूने मारणारे ?"

" अरे फॅनने झाडूला मार. सॉरी झाडूने फॅनला मार म्हणजे त्याची स्पीड वाढेल. "

" ओह. "

अधिकने झाडूने फॅनला धक्का मारला आणि फॅन पूर्ववत स्पीडने चालू लागला. दोघेही झोपी गेले आणि दहा मिनिटातच फॅन पुन्हा हळू चालू लागला.

" फॅन खराब झाला वाटत. यार आधीच उन्हाळा त्यात फॅन खराब झाला. "

" हो ना. अधिक , अजून एकदा झाडूने फिरव ना. "

" अग रात्रभर हेच करत बसायचे का ? चल हॉलमध्ये जाऊन झोपू. "

दोघेही हॉलमध्ये गेले. तिथे अंथरूण वगैरे टाकले. पण लगेचच लाईट गेली.

" अधिक , आता काय करायचे ?"

" काय करू शकतो ? लाईट येण्याची वाट बघायची. एक काम कर. खिडक्या वगैरे उघड. म्हणजे थोडी हवा आत येईल. "

पाखीने खिडक्या उघडल्या आणि गार वाऱ्याची झुळूक घरात घुसल्यामुळे दोघांनाही थोडे चांगले वाटले.

" या वेळचा उन्हाळा थोडा जास्तच तीव्र आहे. सकाळी सकाळी सूर्य आग ओकायला सुरुवात करतो , दुपारी रौद्ररूप धारण करतो आणि संध्याकाळी नापसंत पाहुण्यांप्रमाणे घरातून जाण्याचे नावच घेत नाही. बाहेर थोडे फिरले की आंघोळ केल्यासारखे वाटते. घामाने सारे अंग भिजून जाते. माणसांचेच हे हाल तर बिचारे पशु , पक्षी तर कसे जगत असतील. म्हणून कालच्या सोसायटी मीटिंगमध्ये मी प्राणी-पक्ष्यांसाठी , येणाऱ्या जाणाऱ्या साठी पाण्याची सोय व्हावी अशी योजना मांडली. तहानलेल्याला पाणी पाजवणे म्हणजे खूप पुण्याचे कर्म. "

" उन्हाळा खूप तीव्र आहे. मला तर आठवड्याला एक सनस्क्रीन क्रीम लागत आहे. "

" एवढं का लावत आहेस ? तू तर बाहेर पडतच नाहीस. "

" अरे संकटे सांगून येतात का ? म्हणजे एखाद्या फ्रेंडने भेटायला बोलावलं तर आपली तयारी हवी म्हणून. "

" धन्य आहेस. " अधिक हात जोडून म्हणाला.

" अधिक , वारा येत नाहीये खिडकीतून. "

" आता मी काय करू शकतो ? झाडूने मारू पण शकत नाही ना खिडकीला. "

" चल ना. लाईट येईपर्यंत गच्चीवर जाऊ. "

" नाईस आयडिया. "

दोघेही गच्चीवर गेले. पाण्याच्या टंकीजवळ जाऊन दोघेही बसले. गार वारा सुटला होता. नभात पौर्णिमेचा चंद्र शोभून दिसत होता. असंख्य चांदण्या जणू त्या सौंदर्यात भर घालत होत्या. खाली उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या पाखीला आता थंडी वाजू लागली. तिची अवस्था जाणून अधिकने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला जवळ खेचले. अधिकच्या घट्ट मिठीत पाखीला प्रेमाची ऊब जाणवली. पाखीने अधिकच्या खांद्यावर डोके टेकवले.

" अधिक , तुझ्यासाठी उन्हाळा म्हणजे काय ?"

" माझ्यासाठी उन्हाळा म्हणजे बालपणीच्या सुंदर आठवणी. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मी मामाच्या गावी जायचो. मग तिथे आम्ही सगळे कझीन्स खूप मज्जा करायचो. मामा शेताहून आंबे आणायचा. मामी थंड " रसना " बनवायची. उन्हाळा म्हणजे तो रसना , उन्हाळा म्हणजे ते आंबे , ते टरबूज , उन्हाळा म्हणजे कझीन्ससोबत खेळलेले गेम जसे कॅरम , लुडो , लगोरी , क्रिकेट , फुटबॉल , सापशिडी , कवड्या , चिप्पा , कानगोष्टी. उन्हाळा म्हणजे रात्री एकत्र बघितलेल्या हॉरर मुव्हीज , मामाच्या शेतात मनसोक्तपणे फिरणे. तू सांग. तुझ्यासाठी उन्हाळा म्हणजे काय ?"

" उन्हाळ्यात मी वेगवेगळे क्लासेस लावायचे. चित्रकलेचे क्लासेस , डान्स क्लासेस. खूप धमाल यायची. "

" म्हणूनच मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहायचो. पण आता बालपण संपले आणि उन्हाळा रुक्ष झालाय. "

तेव्हाच लाईट आली.

" अधिक , लाईट आली वाटते. चल खाली जाऊ. "

दोघेही खाली गेले आणि झोपी गेले. दिवसा त्यांना कळले की हॉलमधला फॅनही बिघडला आहे.

" अधिक , हे दोन्ही फॅन बिघडले आहेत. कुणालातरी बोलवून ठीक करून घे. "

" हो. मी कॉल केला होता एकाला. येतील थोड्या वेळाने. "

" अधिक , आपण एसी घ्यायचा का ?"

" मॅडम , एसीची किंमत माहिती आहे का ?आपल्याला परवडणार नाही. "

" इएमआयवर घेऊ. "

" अग नाही. बजेट सगळं बिघडून जाईल. "

" नाही बिघडणार. हे बघ. इएमआयवर एसी घेऊ. तीन महिने इएमआय भरायचा आणि नंतर भरायचा नाही. मग ते लोक एसी घेऊन जातील. पण तोपर्यंत पावसाळा सुरू होईल. "

" हे मीम मलाही स्क्रोल करताना आले होते. "

" ऍमेझॉनवरून मागवू. नंतर आपणच एसी खराब करून त्यांना सांगायचं डिफौल्टेट प्रोडक्ट आला आहे. मग ते रिफंड देतील आणि एसी आपल्याकडेच राहील. अरे मी आणि बाबांनी असे खूपदा केले आहे. इंग्रजांनी भारताला जितकं लुटलं नसेल तितके एमेझॉनला लुटले आहे. "

" पाखी , तू सासरेबुवाकडून काही चांगल्या गोष्टी शिकल्या आहेस की सर्व वाईट , चुकीच्या गोष्टीच शिकली आहेस. "

" शट अप. "

एक इसम फॅन चेक करून गेला. त्याने नवीन फॅन घ्यायला सांगितले. पाखीने सोसायटीच्या वॉचमनकडून तात्पुरता एक टेबल फॅन आणला. अधिकची ऑनलाइन मीटिंग होती. त्याचा बॉस व्हिडीओ कॉलवर बोलत होता. पाखी टेबल फॅन स्वतःकडे वळवला. अधिक चिडला.

" तोंड इकडे कर. "

" तुम्ही काही बोलले मिस्टर अधिक ?" बॉस म्हणाला.

" नाही सर. प्लिज , कंटीन्यू. " अधिक म्हणाला.

" नाही करणार. " पाखी चिडवत म्हणाली.

" प्लिज , तोंड सरळ कर. " अधिक म्हणाला.

बॉसने स्वतःचे तोंड सरळ केले. कॅमेरा हलवला.

" मिस्टर अधिक , माझे तोंड सरळच आहे. तुमची नजर वाकडी आहे. " बॉस म्हणाला.

" काय ?" अधिक म्हणाला.

" म्हणजे तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा. आपण ही मीटिंग उद्या घेऊ. " बॉस म्हणाला.

मिटिंग संपली. अधिक लेफ्ट करायचे विसरला.

" काय माणूस आहे ! एवढ्या उन्हाळ्यात फॉर्मल ड्रेस घालून मीटिंग करायला लावली. नॉर्मल कपडे घातले असते तर काय बिघडले असते. सगळे जेन्ट्स होतो. शर्टलेस बसलो असतो तरी काय झाले असते. "

" अधिक , मला वाटत तुझ्या बॉसने मीटिंगमधून लेफ्ट केले नाही अजून. ते सर्व ऐकत आहेत. " पाखी दबक्या आवाजात म्हणाली.

अधिक घाबरला.

" सॉरी सर. "

" ऑफिस सुरू झाल्यावर केबिनमध्ये येऊन भेट. " बॉस रागात म्हणाले.

***

" अधिक , उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आपण 8 बॉटल्स आणल्या आहेत. त्यापैकी चार माझ्या , चार तुझ्या. "

" ठीक आहे. "

" पाणी भरण्याची जबाबदारी तुझी. "

" नाही. ज्याची बॉटल तो त्यात पाणी भरेल. "

" अधिक , ही चिटिंग आहे. मी बॉटल्स आणल्या आहेत ना. "

" आणल्या नाही. घरी बसून ऑर्डर केल्यात. सरळ सरळ बोल ना तू आळशी आहेस. स्वतःच्या बॉटल्स स्वतः भरू शकत नाहीस. "

" हो. मी आळशी आहे. आता माझ्याही बॉटल्स भरत जा प्लिज. "

" निर्लज्जम सदा सुखी. मी नाही भरणार. "

" ठीक आहे. " पाखी नाक मुरडत म्हणाली.

अधिक आणि पाखी स्वतःच्या बॉटल्स भरू लागले.

***

अधिकने फ्रिज उघडले.

" यार , एक तासापूर्वीच पाणी होते या बॉटलमध्ये आणि आता चक्क रिकामी. "

तेवढ्यात पाखी आली आणि तिने स्वतःची बॉटल उचलली.

" आळशी कुठला. सर्व बॉटल्स रिकाम्या. " पाखी नाक मुरडत म्हणाली.

" कुछ तो गडबड है अधिक. "

एकेदिवशी अधिकने पाखीला रंगेहाथ पकडले.

" पाखी , मी म्हणजे इतक्या कष्टाने माझ्या बॉटल्स भरतो आणि तू माझ्या बॉटल्समधले थंड पाणी स्वतःच्या बॉटल्समध्ये ओततेस ? पापिणी , कलंकिनी , पिशाच्चिनी , पाषाणहृदयधारिणी. "

" हे बघ , नवऱ्याचे उष्टे पाणी पिल्याने नवरा-बायकोमधले प्रेम वाढते म्हणून मी तसे करत होते. "

" धन्य आहेस. " अधिक हात जोडून म्हणाला.

अधिकने एकेदिवशी घरी नवीन डेरा ( माठ ) आणला.

" पाखी , डेऱ्यातल्या थंड पाण्याची सर फ्रिजमधल्या थंड पाण्याला नाही. "

पाखीच्या मुखावर चिंतेचे सूर उमटले.

" काय झाले ?"

" अरे आता डेरा पण धुवावा लागेल ना. मी तर विचारानेच थकले. "

" धन्य आहेस. "

***

" अधिक , माझ्या नाकातून रक्त येत आहे. मला ब्लड कॅन्सर तर नसेल ना " चिमणपाखरे " मधल्या पद्मिनी कोल्हापूरेसारखा. "

" अग तुला घोळणा फुटला आहे. "

" म्हणजे ?"

" उन्हाळ्यात होते असे कधी कधी. तू हालचाल नको करू. "

अधिकने पाखीचे डोके पुढे झुकवले. तिच्या नाकाचा पुढचा भाग काही मिनिटे दाबून धरला. नंतर अधिकने पाखीच्या गालाला आणि नाकाला थंडगार पाणी आणि बर्फ लावले.

" आता उशीला उताणे पडून झोपी जा. "

" तुला कसे माहिती हे सर्व ?"

" लहानपणी मलाही हा त्रास व्हायचा. तेव्हा आई काळजी घ्यायची. "

रात्री पुन्हा लाईट गेली. पाखी गाढ झोपी गेली होती. उष्णतेमुळे तिला परत घोळण्या फुटण्याचा त्रास होईल असे अधिकला वाटले. म्हणून त्याने लगेचच खिडक्या वगैरे उघडल्या. पाखीचे डोके स्वतःच्या मांडीवर टेकवून तिला न्युजपेपरने हवा देऊ लागला. पाखीला जाग आली.

" अधिक , राहू दे. तुझे हात दुखतील. "

" तू झोप. माझी काळजी करू नकोस. लाईट येईल अर्ध्या तासाने. थांब. तुझ्यासाठी सरबत बनवून आणतो. "

अधिकने पाखीसाठी सरबत बनवले. दोघेही खिडकीजवळ आले. संपूर्ण शहर निद्रेच्या आधीन गेले होते.

" पाखी , आपण झाडे लावायला हवीत. वृक्षतोड थांबवायला हवी. बघ ना. या उन्हाळ्यात तापमान किती वाढले. कदाचित पुढच्या उन्हाळ्यात याहून भयंकर परिस्थिती असेल. "

" हो ना. माणसांच्या चुकीमुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. त्याचे परिणाम फक्त मानवच नाही तर इतर पशु पक्षीही भोगत आहेत. दुर्दैवाने जनता असो वा नेते , पर्यावरणचा कुणी विचारच करत नाही. "

" उद्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाची कल्पना मांडू. आपण वृक्ष लावले तेव्हाच त्याची सावली भावी पिढीला मिळेल. "

" छान कल्पना. "

तेवढ्यात नभात काळे मेघ दाटले. वीजा चमकल्या. पावसाची सरी कोसळली. पाखी तर आनंदाने नाचू लागली.

" काले मेघा काले मेघा पाणी तो बरसा. " पाखी गाऊ लागली.

नेमका त्याच वेळी अधिकने काळा रंगाचा टीशर्ट घातला होता. दोघेही खळखळून हसले. अधिकने पाखीला घट्ट मिठीत घेतले.

" पाखू , मला तुझ्यासोबत आयुष्याचे सर्व उन्हाळे-पावसाळे असेच एन्जॉय करायचे आहेत. "

इतके बोलून अधिकने पाखीच्या ओठांवर ओठ टेकवले.

©® पार्थ धवन


🎭 Series Post

View all