अधांतरी

तृतीयपंथीचा होणारा भावनिक कोंडमारा मांडणारी कथा
रोहनला मुंबईत येऊन काही महिनेच झाले होते. पत्रकार म्हणून टॅबलॉइड पेपरला नवीनच जॉइन झाला होता. ट्रेनच्या गर्दीची त्याला अजून सवय नव्हती. एकदा चुकून तो लेडीज डब्यात चढला होता तेव्हा बायकांनी त्याचा जीव नकोसा केला होता. ह्या आधीही चढला होता पण तेव्हा तर कोणी काही बोललं नव्हतं. मग त्याचे लक्ष त्याने घातलेल्या जीन्स आणि टीशर्टकडे गेले. तो मनातच हसला आणि तेच हसू त्याच्या चेहऱ्यावर पण आले.

"काय पुरूष असतात हे. लेडीज डब्यात गर्दीत मुद्दाम चढतात आणि शिव्या खाऊनही बत्तीशी दाखवतात." रोहनची तंद्री भंग करत एक बाई म्हणाली.

तिचा टोमणा रोहनच्या कानावर पडला पण राग येण्याऐवजी " पुरूष " हा शब्द ऐकून तो सुखावला. तो दरवाज्याजवळ उभा होता. इतक्यात एक तृतीयपंथी लेडीज डब्यात चढला. रेखा आणि इतर हिरोइनच्या डायलॉग म्हणून तो बायकांना हसवत होता.

" एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानोगे रमेश बाबू. " तो आपल्या भसाड्या आवाजात दिपीकाची नक्कल करत म्हणाला.

हे म्हणतानाही त्याने मस्तपैकी डोळ्यात पाणी आणले आणि मग नंतर म्हणाला ,

" अरे रमेश बाबू को कैसे बता होगा ? वो थोडी सिंदुर लगता है |वो तो दुकानदार को पता होगा ना ..!समझती नही है |इसलिए तो रमेश बाबू ने उसको छोडा ना. नहीं तो शांतीप्रिया अभी भी जिंदा होती | "

हा डायलॉग त्याने अगदी नाक मुरडत आणि गांभीर्याने अश्याप्रकारे म्हणले की समोरच्या बायका अगदी हसतच सुटल्या.

नाही म्हटलं तरी रोहनलाही त्याच्या कलेचं आणि अश्या अफलातुन लॉजिकचे कौतुक वाटलं. रोजच्या धाकाधाकीत का होईना चार क्षणांची ही मजा या बायकांना सुखावत होती. एरवी ह्या बायका भिकाऱ्याला एक रूपयाही देणार नाही तरीही ह्याला मात्र खुशीने दहा रूपये देत होत्या कारण तो उगाच टाळ्या मारत , आवाज करत भीक मागत नव्हता तर तो त्यांना हसवत होता. रोहनने विचार केला की जर ह्या तृतीयपंथीची मुलाखत घेतली तर..तसही काही स्टोरी द्यायचीच आहे. मग ह्याची स्टोरी कव्हर केली तर.. इतक्यात स्टेशन आलं आणि रोहन ट्रेनमधून उतरला आणि तो तृतीयपंथीही. रोहन त्या तृतीयपंथीचा पाठलाग करत निघाला. शेवटी त्याच्या जवळ येत रोहनने त्याला विचारले.

" सुनो मेरे साथ चाय पिओगे..?" रोहनने विचारले.

त्या तृतीयपंथीने रोहनकडे बघितलं. बाईसारखा नाजुक बांधाचा आणि दाढीही नसलेला रोहन त्याला वेगळा वाटला.

"हा ..! पिएगी लेकिन मैं लंबा नहीं जाएगी. इधर बाजुके इरानी हॉटेलमे चलता है ,तो चलेगा|"

"हा. नहीं लंबा जाएंगे. मेरे को भी काम पे जाना है | " रोहन हसतच म्हणाला.

रोहनचे हसणे तर त्याला खुप आवडले. मग ते दोघेही चहा प्यायला हॉटेलात गेले. रोहनने मोबाईचा रिकॉडर ऑन केला आणि पहिला प्रश्न विचारला .

" नाम क्या है तेरा ? " रोहनने विचारले.

" वासंती.." त्याने चहाचा घोट घेत म्हटले.

" और रहनेवाली ? " रोहनने परत विचारले.

" मैं इधरीचकी अहमदनगर.." हे ऐकून रोहन थोडासा उडालाच. त्याला युपी ,बिहार असं कोणत्यातरी राज्याचं नाव घेणार असं वाटलं. पण तो तृतीयपंथी तर महाराष्ट्रीयन होता.

" तुला मराठी येत का ? " रोहनने उत्साहात विचारले.

" हो ! " तो चहात मस्का बुडवत शांतपणे म्हणाला.

" मला तुझी मुलाखत घेऊ देशील ?" रोहनने आता मुळ मुद्याला हात घातला. तसं त्याने डोळे रोखत पुन्हा रोहनला नजरेतून पडताळले. काही क्षण विचार केला आणि मग म्हणाला.

"नाही. "

रोहनला थोड आश्चर्यच वाटलं. एरवी मुलाखत म्हणले की कोणीही हसत तयार होतं. मग ही का नाही म्हणतेय. हो त्याच्या चेहरा जरी पुरूषी असला तरी पेहराव स्त्रीचा होता. भडक निळ्या कलरची टिकल्याची साडी , वेलवेटचा निळा ब्लाउज , हातभर निळ्या बांगड्या , गोऱ्या कमरेच्या खालती चापुनचोपुन नसलेली साडी आणि गुळगुळीत दाढी की एक केस चेहऱ्यावरती नव्हता. कपडे जरी भडक असले तरी मेकअप अगदी सौम्य होता. हलकी निळी आयशँडो , गुलाबी लिपस्टीक आणि निळी छोटी बिंदी. आवाज नाही आला तर तो बाईसारखाच तर दिसत होता. तो खरचं वासंती म्हणूनच जगत होता.

रोहन तिला बोलते करायला म्हणाला ,

" अगं , तुझ नाव होईल. तुझी कला लोकांमध्ये पोहचेल. कदाचित तुला अजुन जास्त.." हे म्हणताना रोहन कुठेतरी थांबला. त्याच्या तोंडातुन "भीक" शब्द बाहेर येणारच होता.

रोहनचे अबोल भाव वासंतीने ओळखले. तो हसला.

" मला एवढी भीक मिळते की माझ्या आईवडीलांचे पोट भरू शकते. पण, मला जर प्रसिद्धी मिळाली तर..होत्याच नव्हत होईल. चहासाठी आभारी आहे. दुसऱ्या ट्रेनचा टाईम झालाय..येते मी. " असे म्हणून तो उठून गेला.

रोहन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसला.

" आईवडील ? म्हणजे हिच्या आईवडीलांना माहीत आहे. किती लकी आहे ही. तरी मग ती असं का म्हणाली, \"होत्याच नव्हतं होईल.\" " रोहन बिल देत असताना विचार करायला लागला.

मग त्याने ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी वासंतीला गाठायचं ठरवलं. पण वासंती तर माहीम स्टेशनच्या कुठल्यातरी लेडीज डब्यातून गायब झाली होती.

रोहननेही पुढची ट्रेन पकडली आणि तो ऑफिसात निघून गेला. खुप दिवस त्याची नजर वासंतीला शोधत होती पण वासंती नजरेस पडली नाही. रोहन त्या डोळ्यासमोरून मात्र वासंतीचा हसरा चेहरा काही हटत नव्हता.

एकदा कामावरुन रात्री बारा वाजता परत येताना रोहनला एक तृतीयपंथी महालक्ष्मी स्टेशनवर दिसला. पोलिस त्याला जाम मारत होते. नीट निरखुन बघितल्यावर रोहनला जाणवलं की ती वासंतीच आहे. तिला वाचवण्यासाठी रोहन चालत्या ट्रेनमधुन उतरला. त्या पोलिसाकडे आला आणि विचारलं , "साहेब काय झाल? का मारताय ?"

" काय नाही साहेब. पाकीट मारत होता. हिजडा साला. " पोलीसाने वासंतीला अजून एक दंडुका मारत म्हटले.

"अहो मग पोलीस स्टेशनला घेऊन चला. असं गुरासारखे का मारताय ? हव तर मीही येतो. मलाही न्युज हवीच आहे . " रोहन म्हणाला.

न्युज रिपोर्टर म्हटल्यावर पोलीस जरासा चपापला. तो लगेच म्हणाला,"जाऊद्या हो. एवढ्यावरून कोण कोर्टात केस उभी करणार? "आणि मग त्याने काढता पाय घेतला.

वासंती अजुन कण्हतच होती. रोहनने तिला आधार  देऊन बेंचवर बसवले. पाणी दिलं. मग विचारलं , "का मारत होता तो ?"

" त्याला हफ्ता नाही ना दिला. ह्या आठवड्यात घरी  जास्त पैसे पाठवायचे होते. म्हणून नाही दिला. विचार केला तो जास्त तरी काय करणार होता ?मारणारच होता ना? तसंही आम्हाला मार खायची सवयच असते. "वासंतीने हसत म्हटले.

" मग घरी का नाही जात? तिकडे काम बघ. तुझे तर घरातले तुला सपोर्ट तर करतात. " रोहन म्हणाला.

" साहेब,मी इथे वासंती म्हणून भीक मागतो. घरी मात्र मला वसंत हीच ओळख घेऊन वावरावे लागते. कधी कधी आरश्यात आपलीच खरी ओळख दिसत नाही. मग ती ओळख मनातल्या लपलेल्या आरश्यात शोधावी लागते. जेव्हा खरी ओळख सापडते तेव्हा जीव घुसमटतो."

"गावात असताना,"मी वसंत नाही..मला हे कपडे नको.." असे म्हणत माझे मन आक्रांत करत होते. त्यात बापाची विखारी नजर आणि लोकांच बायल्या , नाच्या म्हणून चिडवणे सारे नकोसे वाटत होते. म्हणून मी हे दुहेरी जीवन स्वीकारले. तुम्हाला मुलाखत दिली असती आणि गावात कोणी माझा असा फोटो पाहीला असता तर गावकीने आईबाबांच जीवन हराम केले असते. म्हणून मी नकार दिला." वासंती म्हणाली.

वासंती ही वसंतरुपी पुरुषी देहात अडकलेली स्त्री होती. लहानपणापासून वसंतला स्त्रियांचे कपडे घालणे , मेकअप करणे याची सवय होती. त्याच्या बायकी स्वभावामुळे घरच्यांनी आणि समाजाने त्याला कायमच हिणवले होते. तो टिंगलटवाळीचा विषय बनला होता. या सर्वामुळे त्याचे शिक्षणही अर्धवटच राहिले. शेवटी शहरात येऊन तो लादलेल्या " पुरुषत्व " पासून मुक्त झाला आणि त्याने आपले खरे अस्तित्व स्वीकारले. मनातली घुसमट कमी झाली तरी समाजाची हेटाळणी सुरूच होती. पण यावेळी वासंतीला समजून घेणारेही अनेक तृतीयपंथी भेटले. त्यामुळे आपण जगात एकटे नाही याची त्याला जाणीव झाली. रोहनला भूतकाळ सांगताना सर्व आठवणी वासंतीच्या डोळ्यादेखत गेल्या.

हे सर्व ऐकून रोहनलाही आपला भुतकाळ आठवत होता. त्यालाही नकोसेपणाची असलेल्या जखमेवरची खपली कोणी काढलीय असं वाटत होतं. तरी त्याने वासंतीला अडवलं नाही. त्याने फक्त वासंतीचा हात अजुन घट्ट पकडला. वासंतीच्याही  मनाचा बांध फुटला होता. ती बोलतच सुटली.

" मलाही वाटले की भीक मागण्यापेक्षा कष्ट करून स्वाभिमानाने कमवावे. पण आता खरच पुरुष बनून वावरू वाटत नाही. माझा आत्मा स्त्रीचा आहे. पुरुष म्हणून जगताना खुप कोंडमारा होतो. म्हणून फक्त गावाकडे जाण्याची वेळ आली तरच अवतार बदलते." वासंती पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली.

" आता मला गावाला जावे लागणारच कारण माझ्या लाडक्या बहीणचं लग्न आहे पुढच्या महीन्यात..तिने पत्रात लिहलं आहे , "दादा मला ह्या साड्या आण. कॅटरीनाने घातला तसा गॉगल आण. नेलपॉलिश आण. सोन्याचे दागिने तर मीच घालणार म्हणून सांगितलं आहे. काल बाबा आला होता. सगळ त्याच्या हाती दिलं. त्याला वाटतं, त्याच्या मुलगा मुंबईत वेटरचं काम करतो मोठ्या हॉटेलमध्ये..पण त्याला कळलं की मी माझ्या खऱ्या रूपाचा तमाशा करून वावरतो तर तो मला जीता नाही सोडणार आणि त्यापेक्षा वाईट मला माझ्या आई-बहीणीपासून कायमचं तोडणार ते आगळचं. " वासंती म्हणाली.

रोहन मनात विचार करू लागला ," मी का लकी म्हणालो वासंतीला ? असं दोन रूपांचे  अंधातर जिण आणि घुसमट सहन करवी लागणार का ? तर आपल्याच परिवारात राहण्यासाठी."

" का तृतीयपंथी आहोत म्हणुन मनासारखं जगायची मुभा नसते ह्या समाजात ? तृतीयपंथी जात ही अस्पर्श नि हिडीस का ? जर देवाने वेगळ बनवलं ह्यात माणसाची काय चुक ? कोणी ही विचारसरणी आणली ? कोणी  असा भेद केला आणि का ?" वासंतीने विचारले.

पण ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची ही वेळ नव्हती , ना ती उत्तरे लगेच मिळणार होती. रोहनने वासंतीला आधार देऊन उठवलं आणि औषधोपचार करण्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

तिकडे हॉस्पिटलमध्ये रोहनच्या पत्रकार आयडीमुळे फायदा झाला आणि वासंतीला लगेच उपचार मिळाले. डॉक्टरांनी एका आठवड्यांनी काही जखमांवरच्या टाके काढण्यासाठी व चेकअपसाठी बोलवलं. रोहनने वासंतीला घरी सोडलं आणि तो स्वत:ही घरी गेला. त्याने वासंतीचा मोबाईल नंबर घेतला होता. त्यावरून तो तिची चौकशी करे. तिला औषध घेण्याची आठवण करे. तिच्या आजुबाजूचे तृतियपंथी आता रोहनच्या नावाने चिडवायला लागले होते. वासंतीलाही रोहनमध्ये समजून घेणारा मित्र सापडला होता.आठवड्याभराने रोहन वासंतीची वाट पाहत बॉम्बे हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता. पण वासंती आलीच नाही. रोहनने तिला फोन लावले पण ती उचलतच नव्हती. शेवटी वैतागून तो जिकडुन वासंती भीक मागायची त्या महालक्ष्मी स्टेशनला गेला. रोहनला वासंती प्लॅटफॉर्मवर दिसली नाही. पण कुणीतरी रूळावर साडी नेसलेलेली बाई उतरतेय असं जाणवलं. रोहनने त्या बाईकडे धाव घेतली कारण ती आत्महत्या करणार होती. रोहनने पटकन तिला पकडलं नि रूळाच्या बाहेर खेचून खाली बसवलं. ट्रेन जाईपर्यत तिला रोहनने घट्ट धरून ठेवलं. ट्रेन गेल्यावर जेव्हा त्याने त्या बाईला सोडलं आणि तिच्याकडे पाहीलं तर ती वासंती होती.
रडून रडून डोळे लाल झाले होते. विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर थोबडवल्याच्या जखमा होत्या. रोहन एकदम चकित झाला. त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली.

" वासंतीला पुन्हा कुणी मारलं?आणि  का? असं अचानक काय झाल की कालपर्यंत गावाला जायचे आहे , बहिणीच्या लग्नात मजा करायची आहे , तिला मेहंदी लावयचीय असे अनेक मनसुबे आनंदाने रचणारी वासंती अचानक जीव द्यायला का निघाली ? इतकं सोसूनही अधांतर का होईना पण मनासारखं आयुष्य जगणारी वासंती मृत्युला का आपल्या समस्येचं समाधान बनवतेय ? " रोहन विचारात पडला.

रोहनला आता आजुबाजूला गर्दी जाणवायला लागली होती. वासंतीही रडत होती आणि जमल तर स्वत:ला सोडवायला बघत होती. कदाचित पुन्हा ट्रेनखाली येण्यासाठी..रोहनने वासंतीच्या दंडाला घट्ट पकडलं आणि प्लॅटफॉर्मवर वरती असलेल्या लोकांना तिला वरती खेचायला लावलं. मग स्वत:ही वरती चढला.

वासंतीशी शांतपणे बोलता यावं म्हणून रोहन वासंतीला आपल्या घरी घेउन जाण्याचं ठरवलं. वासंतीला टॅक्सीत बसल्यावर रोहन वासंतीला म्हणाला.

" वासंती,हे करण्याआधी स्वत:चा नाही पण आईवडीलांचा ,तुझ्या बहीणीचा विचार का नाही केला ? अरे..! तू मेलीस तर तिचं लग्न मोडेल. ती बोहल्यावरती चढेल तरी का ?" रोहन म्हणाला.

वासंती हे ऐकल्यावरचं एखादा बांध फुटल्यासारखी ढसाढसा रडु लागली.

" रोहन, ती बहीणच आज माझ्यावर छक्का म्हणून थुंकली. बाबा आला होता मला भेटायला अगदी न सांगता कारण काही पैसे हवे होते तातडीने. एरवी मी वसंत म्हणुनच त्याच्यासमोर जायचो पण आज धंदा आटपून खोलीवर आलो तर तो बसला होता. बरोबर लहानीपण होती. लग्नाच्या आधी मुंबई बघायचीय म्हणून दोघ एकत्र आली होती. दोघांनी मला असं वासंतीच्या रूपात पाहीलं आणि त्याला खर ते समजलं. लहानीला तर माझं खर रूप माहीतचं नव्हतं..कारण आईने नेहमीच घरातल्यापासुन ते लपवून ठेवलेलं होतं. बाबा लय चिडला आणि मला थोबडवलं. तसं पण त्याला माझं बायकी वागणं आवडायचं नाही. त्याचं मला काही वाटलं नाही. पण माझी लहानीनेही मला नाकारलं. बोलली," माझ्या लग्नात येऊ नको. असा छक्का माझा भाऊ आहे कळलं तर सासरी नांदण मुष्कील होईल मला." ज्यांच्यासाठी मी भीक मागयचो तेच लोक आज मला हिणवून गेले. माझं घर गेलं. माझी माणसं गेली. आता मी कुणासाठी जगू ? " हे म्हणत असताना वासंती अजुनच रडयला लागली.

रोहनने वासंतीला शांत करत घरी आणलं आणि तिला म्हणाला,"वासंती स्वत:साठी जग जसा मी जगतोय. "

" रोहन, तु पुरूष आहेस. तुला समाजमान्यता आहे. माझी गोष्ट वेगळी आहे. "

रोहन ह्यावर हसत आणि बायकी आवाज काढत म्हणाला , "अग ! मी शरीराने मुलगी आहे पण मनाने मुलगा आहे. अगदी तुझ्यासारखा..मीही एक तृतीयपंथीच आहे वासंती. आणि हा आवाज मी प्रँटीक्स करून कमवलाय. माझी कथाही काही वेगळी नाही. नागपुरवरून मीही पळून पुण्यात आलो. घरी एक पत्र खरडलं होतं आणि घरचे सगळे पाश तोडले. ते हे पत्र. हे वाच. हे पत्रच मला संघर्ष करायला साहस देतं. कदाचित तुलाही देईल. "

वासंतीने ते पत्र हातात घेतलं. तिच्या मनात गोंधळ होता आणि रोहनबद्दल अनेक प्रश्नही होते. कारण रोहन तसा मुलीसारखाच सडपातळ , अरूंद खांदे असणारा होता पण असतात असे बारकेले पुरूष म्हणून वासंतीच्या कधी लक्षातच आले नाही.
वासंतीने पत्र  रोहनचं वाचयला घेतलं.

" प्रिय आई नि बाबा ,

मला क्षमा करा. मी कोणत्याच मुलाशी लग्न नाही करू शकत. मला लहानपणापासून जाणवत होतं की मी चुकीच्या शरीरात आहे. मी माझी घुसमट तुमच्यासमोर व्यक्त पण केली. मी तुम्हाला सांगितलही मला मुलासारख राहावस वाटतं. मला नटावस , मुरडावस वाटायचं नाही. पण तुम्हाला माझ वागणं अस्वाभाविक वाटायचं. मला मुलींचे खेळ आवडत नव्हते तर मुलांबरोबर क्रिकेट ,फुटबॉल ह्या खेळात मन रमायचे. मुलासारखे कपडे करायला खुपच आवडायचं , त्यासाठी मी एकदा तुमचे कपडेही कपाटातून काढून स्वत: घातले होते आणि मुलासारखी तयार झाले होते. त्यावेळी मला कळले मी रोहीणी नाही तर आतमधून रोहन आहे.
मग मी ह्यावर असणारी पुस्तके वाचली. गुगलही केले. पण तुम्ही कधी माझं वेगळेपण मान्यच नाही केल. मी तुमच्यासाठी स्वतःला बदलावयाला डॉक्टरांच काँन्सेलिंगही घेतल. त्यांचही हेच मत आहे की ही विकृती नसून ही एक निसर्गावस्था आहे.
मी मनातून एक पुरूष आहे बाबा म्हणजेच मी एक ट्रान्सबॉय आहे. पण तुम्हाला माझी लाज वाटते. माझ वेगळेपण तुम्ही मान्य नाही करू शकत आणि मी मुलगी बनून नाही राहू शकत. माझाही नाईलाज आहे. आईबाबा मला आता माझे खरे प्रतिबिंब पहायचे आहे. म्हणून मी कायमचा घर सोडून जातोय. जमल तर मला माफ करा.

तुमचा मुलगा
रोहन. "

हे पत्र वाचून वासंतीचे डोळे अजून डबडबले. रोहननेही तेच सहन केलं होतं जे तिने सहन केल होतं. रोहन पुढे बोलायला लागला.

" घरातुन पळून गेल्यावर पुण्यात एका मित्राने आधार दिला. मग त्याच्याकडेच राहून पत्रकारीतेचा कोर्स केला आणि मुंबईत आलो. आईवडिलांनी शोधलं खरं..माझ्याशी संपर्कही केला पण मी तेव्हा परत नाही गेलो. कारण मला रोहीणी व्हायचं नव्हतं. मुंबईत माणसाला मनासारखं जगता येतं. इकडे तुम्ही कोण आहात ह्यावरून तुमचं काम ठरत नाही हे ऐकुन होतो. झाल ही तसंच..वासंती, हे काम सोड. माझ्याबरोबर चलं. मी तुला लागेल ती मदत करेल. तुला शिक्षण हव असेल तर शिक्षण घे किंवा मनासारखं कामधंदा कर. जसं मेहंदी काढण किंवा ब्युटीशयन बन पण स्वत:च्या अस्तित्वाला विकून पैसे नको कमावू. "

वासंती रोहनला मिठी मारून म्हणाली , "खरंच असं होईल का ? समाज मला स्विकारेल का ? "

" का नाही वासंती ? आपणही तर समाजाचा हिस्साच आहोत ना..तृतीयपंथी असलो तरीही. मग जर आपण आपल्याला स्वीकारलं तर समाजही केव्हा ना केव्हा आपल्याला स्वीकारेलच ना. समलैगिक किंवा तृतीयपंथी असणे हा गुन्हा नाही. ते नैसर्गिक आहे. आपल्या लिंगावरून किंवा आपल्या लैगिक आकर्षणावरून तर आपलं माणुसपण ,आपली बुद्धी , क्षमता  हे तर कमी होत नाही मग आपण तरी घृणेची अपमानाची बेडी आपल्यावर का लादून घ्यायची ? वासंती समांतर आणि दुहेरी आयुष्य नको जगूस तर आरश्यात आपल खरं प्रतिबिंब पहा. जसं मी पाहतो. " एवढे बोलून रोहनने वासंतीला हात दिला. तिलाही ते पटलं. मग वासंतीही आपल्या सोबतीबरोबर एका नव्या संघर्षासाठी  सज्ज झाली.


पुरुषी देहात अडके स्त्रीभावना
जीवनी ह्या केवळ मरणयातना
स्वतःच्याच देहात होई घुसमट
कशी चालावी वाट ही अनवट

लोकांनी केली सतत हेटाळणी
न कुणी मित्र न प्रेम या जीवनी
टाळ्यांच्या स्वरात हरवले दुःख
आयुष्य सरले मिळेना तरी सुख

थोड्या पैश्यात वाटला आशीर्वाद
एकांती पुन्हा घालतो स्वतःशी वाद
का असामाजिक जन्मूनी समाजात
का नकोसा मी माझ्याच मूळ रुपात ?

संपला स्वाभिमान द्वेषनजरा झेलूनी
हृदय बने पाषाण अश्रू किती गाळुनी
नाही मी पूर्ण नर नाही मी पूर्ण नारी
ओळख माझ्या देहाची राही अधांतरी !


समाप्त