आदरणीय स्री जन्मास ,

ईरा : शब्दांचे आदराचे स्थान जृ



आदरणीय स्री जन्मास ,

रात्रीच्या गर्भातच एक महान बीज पोसलं जात होतं.मंद वारा, पारीजातकाचे हळूवार ओघळणे , सोनचाफ्याची दरवळ , गुलाब , जाई , जुई , अबोली , मोगरा या फुलांची मुक्त उधळण , दवबिंदूची पखरण अशा पहाटेच्या विलोभनिय व अल्हादायक प्रसन्न वातावरणात स्रीचा जन्म झाला.नखशिखांत सुखावणारा हा कोवळा जीव धरतीवर अवतरला आणि सा-या जगाची निर्मितीकडे वाटचाल सुरु झाली.

कोवळा जीव रांगू लागला काळाच्या दिशेने तिची आगेकूच सुरु झाली .हळूहळू बालपण सरु लागलं. बालपणातच गरिबीच्या झळा बसू लागल्या.अडाणी संस्कार मनावर कोरु लागले .त्रास , हालअपेष्ठा सोसणारे स्रीचे रुप समोर आले .कपाळभर मळवट आणि कामाचा पसारा घेवून केवळ " चूल आणि मूल " सांभाळणारी अशी तिची अख्यायिका झाली . बुरसट विचारात ती रुतून बसली ती कायमची समाजाची खेळणेच बनून राहिली.

समाजाचे अनिष्ट चालीरीतींचे जोखड तिच्या मानेवर पकड घेत होते.अत्याचार , अन्यायाची चिड मनात धगधगत होती पण धीर होत नव्हता.आशेचे पंख छाटणारा समाज तिला पाऊल टाकू देत नव्हता पण रक्तबंबाळ मन कणखर झालं होतं.संकट झेलण्याची ताकद तिच्यात प्रचंड होती.सावकाश का होईना पण तिच्या मनगटात जोर धरु लागला होता.तिच्या मनाने आता उभारी घेतली होती.शिक्षणाचा परिमळ तिला खुणावत होता.शिक्षणाचा श्रीगणेशाने तिला नवे रुप मिळाले आणि पंख छाटणा-या समाजावर तिने मात केली.

स्री शिक्षित होवू लागली.समाजातील बदल तिला स्पष्ट दिसू लागले .समाजातील अनिष्ट रुढीवर तिने घणाघाती हल्ला सुरु केला.वंशाला दिवा पाहिजे यासाठी मुलींचे कोवळे जीव नष्ट करण्यास समाज अग्रेसर बनू लागला.याला कडाडून विरोध करताना स्री दोषी नाही हे ठणाकावून सांगावे लागले.स्रीच समाजाला तारणारी असूनसुद्धा तिला अनंत वेदना सहन कराव्या लागत होत्या.इतक्या सा-या वेदनांचा ससेमिरा असताना स्री सदा हसतमुख राहीली हे तिच्या सोशिकतेचे फळआहे.

शिक्षणाने स्री आता समृद्ध झाली होती.विचारांच्या कक्षा आता रुंदावल्या होत्या.काळही फार बदलला होता.दाही दिशा तिला प्रगतिचे आव्हान देत होत्या.शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक , वैज्ञानिक अशा सर्व क्षेत्रात स्रीयांनी दैदीप्यमान प्रगती चालूच राहिली..जिद्द , बुद्धिमत्ता , सोशिकता , सहनशिलता , प्रामाणिकपणा या सर्व गुणामुळे स्री आज समाजाचा तारणहार ठरली आहे.माध्यमांचा बोलबाला असताना तिने प्रत्येक क्षेत्र काबीज केले आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना कणखरता दाखविली आहे.आज तिचे विचार लेखणीच्या माध्यमांतून समाजाला उपयोगी पडत आहेत.तिची ज्वलंत विचारसरणी एकविसाव्या शतकातील क्रांती असेल.

स्रीची विविध रुपे मानव जन्माला मिळालेली देणगी आहे.तिच्या प्रत्येक रुपांत साक्षात परमेश्वराचे दर्शन होते.पदोपदी , क्षणोक्षणी तिची नितांत गरज लागते त्यावेळी खरोखरच देवाचे आभार मानावे वाटतात.स्री जन्म महान आहे.त्याचा आदर करा , तिला जोपासा , मनात पूजा , ध्यानात पूजा.ती सदैव तुमचे रक्षण करील.

स्री जन्माचे यथार्थ वर्णन करताना मला खूप आनंद झाला.जीवन जगत असताना स्रीला मातेसमान मानून मनात नेहमी आदराचे स्थान दिले आहे.सर्वांनीच स्रीला जर आदराची वागणूक दिली तर स्री नक्कीच गरुड भरारी घेईल.

प्रेमळ स्रीचा जन्म आहे छान
स्री - भ्रुण हत्येचे ठेवावे भान
स्रीच आहे संस्कृतीची शान
स्रीला देवूया मनापासून सन्मान


© नामदेवपाटील
-------------------------------------------------