Login

अडम तडम तडतड बाजा

निरागस बालपणातील रम्य खेळ

अडम तडम तडतड बाजा

"आजी अडम तडम कर ना" माझ्या तीन वर्षांच्या जुळ्या नातींनी एका सुरात लाडिक गलका केला. काही दिवसांपूर्वीच मी लेकीकडे वास्तव्यास आले आहे. दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो काही कळतच नाही. त्यांच्या बाललीलांमध्ये इतकी समरसून जाते काही विचारू नका. त्यांचं कोणतीही गोष्ट करताना ' मी फर्स्ट, मी फर्स्ट ' असं नेहमीच चालायचं. तेव्हा त्यांच्या आई बाबांनी त्यांना दहा वीस करून सुटायचे कसं ते दाखवलं. अंघोळ करून पहिल्यांदा पाण्यातून बाहेर कोणी यायचं ह्यावरून त्यांच्यात त्यांच्या पद्धतीने गोड भांडण सुरू व्हायचं. तेव्हा हा सुटण्याचा नामी उपाय लागू पडला.

मी इथे आल्यावर त्यांना सुटण्याच्या आणखीन काही पद्धती दाखवल्या. त्यांच्याबरोबर खेळताना मी नकळत माझ्या बालपणात कधी रमले काही कळलंच नाही. अगदी लहानपणी खेळलेले सारे खेळ डोळ्यापुढून तरळून गेले. माझं बालपण एका दहा खोल्यांच्या चाळीत, मुंबईच्या तेव्हाच्या शेवटच्या उपनगरात म्हणजेच दहिसरला गेलं. तेव्हा दहिसर हे एक गावच होतं. लांबलचक चाळीत पुढे मागे खेळायला खूप मोकळी जागा होती. सर्वांचीच दारं सताड उघडी असायची. 'आव जाव घर तुम्हारा' . शेजारी म्हणजे अगदी ' सख्खे शेजारी ' नातेवाईकांपेक्षा जवळचे वाटायचे. तेव्हा सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बेताचीच असायची. त्यामुळे एकही पै खर्च न करता अनेक खेळ खेळले जायचे. पण त्यातून जो अपरिमित आनंद मिळायचा तो आजच्या मुलांना महागड्या खेळण्यातूनही मिळत नसेल.

अगदी भातुकली पासून खेळ सुरू व्हायचा. खेळणी तरी काय तर घरातलीच लहानसहान भांडी घेऊन खेळायचो आम्ही. खाऊ म्हणून गूळ चणे इत्यादी. प्लॅस्टिकचा बाहुला आणि बाहुली. शाळा सुरू असली की शाळेचा अभ्यास भरभर करून सगळे खेळायला मोकळे व्हायचे. दुपारच्या वेळी बैठे खेळ व्हायचे. त्यात सागरगोटे, काचापाणी, कांदाफोडी इत्यादीचा समावेश असायचा. सर्व खेळांमध्ये एकाग्रता लागायची. कोण जिंकतय ह्यामध्ये एक चुरस असायची पण कोणीही कुणाचा दुस्वास करायचं नाही. मे महिन्याच्या सुट्टीत सकाळ झाली की विविध खेळांना सुरुवात व्हायची. पत्त्यांचा डाव रंगायचा. अगदी ' राजा भिकारी ' पासून ' मेंढिकोट ' पर्यंत सगळे खेळ खेळले जायचे.

संध्याकाळचे मैदानी खेळ म्हणजे लंगडी, सोनसाखळी,आबादुबी, लगोरी, लपंडाव, डबा ऐसपैस,दगड का माती. ' कोरा कागद निळी शाई, दगड का माती ' असं अगदी एकसुरात म्हटलं जायचं. दोन गट करून खेळामध्ये कोणतरी दोघं कॅप्टन असायचे. मग आपल्या टीम मध्ये आपापल्या आवडीचे खेळाडू मागितले जायचे. सगळ्यांनी मिळून खेळांमध्ये सुटायचे म्हणजेच चकायचं असायचं. त्यात गोल करून सर्वांनी उभं राहून हात उलटा किंवा सुलटा ठेवायचा. एकमेकांचे हात धरून ' राम राई साई सुट्यो ' म्हटलं जायचं. त्यावेळी सर्वजण निरागसपणे ' जास्तीची मेजोरिटी ' म्हणायचे. मेजोरिटी म्हणजेच जास्त तेव्हा काही कळायचं नाही. ' टाइम प्लीज ' न म्हणता सर्रास सर्वजण
' टॅम्पलीज ' म्हणायचे. खेळातली भांडणं म्हणजे नित्याचा एक भाग असायचा. निरागस हमरीतुमरी असायची ती.

दुपारी सावलीत खेळायचे आणखीन खेळ म्हणजे भोवरा, गोटया, आट्यापाट्या इत्यादी. भोवरा खेळताना हातजाली घेणं म्हणजे एकदम निष्णात. दुसऱ्याच्या भोवऱ्याला आपल्या भोवऱ्याच्या आरिने ठोके मरायला खूप मजा यायची. गोटया खेळताना नेमबाजी एकदम चांगली पाहिजे. रुमाल डाव, विटीदांडू खेळताना भान हरपायचे. पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी असताना कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणे म्हणजे निखळ आनंद होता. होड्यांचे प्रकार तरी किती. साधी होडी, राजा राणी होडी, नांगर होडी , इत्यादी. होडी पाण्यात सोडल्यावर ती दिसेनाशी होईपर्यंत तिचा पाठलाग करायचा. पाऊस थांबल्यावर एखाद्या तुटलेल्या छत्रीची तार घेऊन चिखलात रूतारुती खेळण्यात खूप मजा यायची.

एकंदरीतच खूप सारे मैदानी आणि बैठे खेळ खेळून आम्ही सर्व लहान मुले घरगुती खाद्य पदार्थ, चणे शेंगदाणे खाऊन एकमेकांच्या साथीने, आजी आजोबा, काका काकूंच्या सान्निध्यात मोठे झालो. वेळप्रसंगी मोठ्या माणसाना मदत केली. कधी लहान भावंडांना सांभाळून, शिस्तीत आणि अभ्यासाचा अनावश्यक बोजा न घेता छान मोठे झालो.

खरं तर बालपणातल्या सर्व रम्य आठवणी, गमतीजमती लिहायच्या म्हटलं तर नक्कीच एक पुस्तक लिहावं लागेल. आज गोडगोजिऱ्या
नातींच्या हव्याहव्याशा सहवासात इतकंच. पुन्हा कधीतरी अजून बरंच काही मनातलं उतरेल कागदावर. मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेकांच्या मनात तुमच्या अवखळ, निरागस बालपणाने रुंजी घातली असेलच, नाही का!


©️®️सीमा गंगाधरे