#नाव कमवावं लागतं...!

आई-वडिलांनी ठेवलेलं नाव मुलांनी मात्र सार्थ ठरवावं लागतं
ए आई, मला माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप चिडवतात ग..! तुझी आई सगळ्यांच्या घरी धुणीभांडी करते आणि तुला मात्र "राणी"म्हणते मला फार वाईट वाटतं.. आपण गरीब आहोत मग तू माझं नाव राणी का ठेवलं..?


अगं गरीब-श्रीमंत यावरून माणसांची नावं ठेवली जात नसतात.. माणूस गरीब म्हणून जन्माला आला तरी हरकत नाही; पण मारताना तो गरिबीत मरू नये.. कारण कोणत्या घरात जन्माला यायचं हे जरी माणसाच्या हातात नसलं, तरी स्वकर्तृत्वावर काय मिळवायचं..? हे नक्कीच त्याच्या हातात असतं..


शिक्षण घेऊन त्यानं लय मोठं व्हावं.. आणि मग बनाव की श्रीमंत हवं तेवढं.. तुला माहितीय, तू जन्माला आलीस, अन् तुझ्या बापान दारू सोडली बघ.. माझ्यासाठी गरीब असल्याचे दुःख कवाच नव्हतं, पण कष्ट करून आल्यावर समाधानाची झोप काही तुझ्या बा मुळं मिळत नव्हती बघ.. नवरात्रीत तु जन्माला आलीस अन् साक्षात आई जगदंबेन माझी विनंती ऐकली.. म्हणून माझ्या मनावर राज्य करणारी माझी लेक या छोटयाशा घराची राणी झाली..




आईचा शब्द न् शब्द राणीच्या कानातच नाही; तर अगदी हृदयात जाऊन भिडला.. तिनं ठरवलं गरिबीची नाहीतर, अज्ञानाची लाज वाटली पाहिजे.. त्यामुळे अज्ञानी राहायचं नाही.. आता शिकून खूप मोठं व्हायचं.. आईन ठेवलेलं राणी हे नाव सार्थ करायचं.. योगायोगाने राणीचा नवोदय स्कूल ला नंबर लागला.. आईचा आर्थिक भार हलका करत राणी मोठ्या जिद्दीनं शिक्षण घेऊ लागली.. प्राध्यापिका म्हणून कॉलेजवर रूजू झाली.. आईनं ठेवलेल्या राणी या आपल्या नावासोबत खरोखरच भाग्य जोडलं गेलं असं तिला वाटलं.. "पण भाग्य जोडायला राणीच्या अथक प्रयत्नांची कास होती..", हे आईने तिला बजावून सांगितलं..




राणी नावाप्रमाणेच सर्व विद्यार्थ्यांच्या मनावर ही राज्य करू लागली.. मग कधी ती होतकरू गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन, ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करून, तर कधी माता पालक यांना सन्मान देऊन सर्वांची आवडती आणि लाडकी शिक्षिका बनली.. याच शाळेचे प्रिन्सिपल डॉ. शेखर शेळके यांना राणी सून म्हणून खूप आवडली.. आपला मुलगा रोहन याच्यासाठी सरांनी राणीचा हात तिच्या आईकडे मागितला..


स्वभावाने राजबिंडा असणारा रोहन पाहताच क्षणी सर्वांना आवडला.. आणि मोठ्या थाटात राणी आणि रोहनच लग्न झालं..सासुबाई नोकरी करणाऱ्या राणीला अगदी मुली प्रमाणे वागणूक देत होत्या.. सर्व कामात त्यांची राणीला खूप मदत व्हायची.. राणी खरोखर स्वतःला खूप नशीबवान समजु लागली.. आणि अशा या राजाराणीच्या संसारात छोट्याशा प्रिन्सची एंट्री झाली..राणी आपल्या महालात सुखासमाधाने राहु लागली.. खऱ्या अर्थानं राणी न तिचं नाव कमावलं आणि आईने ठेवलेल्या राणी या नावाचं चीज झालं..

सौ. प्राजक्ता पाटील
लेख आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि नावासकट शेअर करा...