जेवण आटोपून भूषण रूममध्ये आला आणि स्वतःला बेडवर झोकून दिले, त्याचे मन आज बरेच शांत झाले होते, त्याला कॉलेज मधील दिवस आठवत होते स्नेहाचा अल्लडपणा, स्नेहाचा भोळा स्वभाव आणि त्या परिस्थितीत स्नेहाची काळजी घ्यायला त्याला खूप आवडायचे, भूषणला प्रत्येक घटना कालच घडल्यासारखे वाटत होते.
भूषण आज सकाळीच तयार होऊन कंपनीमध्ये निघून गेला, आज तो मनामध्ये निश्चय करूनच बाहेर पडला होता. त्याने कंपनीमधील आपले काम आवरले आणि स्नेहाला कॉल केला, इकडे स्क्रीनवर भूषणचे नाव पाहून स्नेहाच्या हृदयाची धडधड वाढत होती. तिने फोन उचलला नाही. भूषणने प्रेमाची कबुली दिल्यापासून स्नेहाचे मन सुद्धा अस्वस्थ होते जेवढे ते आधी मनमोकळेपणाने बोलायचे ते आता संकोच वाटत होता कारण आता या परिस्थितीला तिला तिच्या आई वडिलांचा निर्णय महत्वाचा होता. म्हणून ती भूषणला टाळत होती.
स्नेहाने फोन कट केल्यामुळे भूषणला वाईट वाटले, त्याने परत फोन लावला यावेळी सुद्धा स्नेहाने फोन कट केला असे सलग दोन तीन वेळा झाले, त्याला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की त्यांचे नाते असे वळण घेईल, त्याला त्याची हसती खेळती, मनमोकळेपणाने बोलणारी स्नेहा परत हवी होती, पण आता प्रयत्न सोडायचे नाहीत असा विचार करून त्याने परत स्नेहाचा नंबर डायल केला आणि यावेळी स्नेहाने फोन उचलला.
"हॅलो" शक्य तितके नॉर्मल होत स्नेहा बोलली.
"हॅलो, कशी आहेस?" तसा भूषण परिस्थितीचा अंदाज घेत बोलू लागला.
मी बरी आहे, तू कसा आहेस? - स्नेहा.
मी मस्त, मला तुझ्याशी बोलायचे आहे, आज भेटूया का? - भूषण
सॉरी पण मला नाही जमणार माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून आराम करत आहे, स्नेहा एकदम गोंधळली, ती त्याला टाळायचा विचार करत होती पण इथे तर तो भेटण्यासाठी बोलत होता म्हणून काहीतरी कारण द्यायचे म्हणून ती बोलली.
स्नेहाची तब्येत बरी नाही ऐकून भूषण अस्वस्थ झाला, एकदम उठून उभा राहिला आणि लगेच बोलला, काय झालं तुला, तू स्वतःकडे लक्षच देत नाहीस, लहान आहेस का अजून... मी येतो तुला भेटायला तू आराम कर.
स्नेहा पुढे काही बोलणार तितक्यात तिला जाणवले की फोन कधीच कट झाला होता, स्नेहाने डोक्यावर हात मारला आणि स्वतःशी बोलू लागली, " हा मुलगा ना, कधीच बदलणार नाही मी कसे विसरले की हा किती पॉझेसिव्ह असतो आणि मी तर माझ्या तब्येतीचे कारण दिले, चला आता त्याला सामोरे जायची तयारी करा.
स्नेहाला त्यांच्या बेंगलोरच्या कॉलेज टूरची आठवण झाली, कॉलेजमध्ये MBA च्या शेवटच्या वर्षाला त्यांची 4 दिवसांची कॉलेज टूर गेली होती, एकूण 30 जण विद्यार्थी आणि 2 प्रोफेसर इतके जण होते, राहण्याची सोय हॉटेलवर केली होती, पहिले एका नामांकित कंपनीला भेट दिली, त्यांच्या कंपनीच्या कामाचे स्वरूप समजून घेत होते, पूर्ण दिवस यामध्ये निघून गेला आणि संध्याकाळी सर्वजण बेंगलोरची प्रसिद्ध ठिकाणे फिरत होते.
मज्जा मस्ती करत 2 दिवस निघून गेले, पण तिसऱ्या दिवशी दुपारी सगळे आराम करून दुसऱ्या कंपनीत निघणार होते, सगळे बसची वाट पाहत होते तर स्नेहाला एकदम चक्कर आली, सगळे एकदम घाबरले, त्यांच्या मॅडमनी तिला सांभाळले. भूषण पळत तिच्याजवळ आला, तिला पाणी दिले आणि रूम मध्ये घेऊन गेले, ती बेशुद्ध होती म्हणून डॉक्टरांना बोलवून घेतले, डॉक्टरांनी तिला चेक केले आणि सांगितले, थोडा ताप आहे, आणि अशक्तपणा आला आहे तर काळजी करू नका, थोडा आराम करू द्या, आणि त्यांना शुद्धीवर आल्या कि स्ट्रिक्टली काहीतरी खायला द्या आणि ही औषधे द्या.
प्रोफेसर सर मॅडमना बोलले कि तुम्ही थांबा बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना मी घेऊन जातो, पण आज ज्या कंपनीत त्यांना भेट द्यायची होती ती मॅडमच्या रेफरन्सची होती त्यामुले त्यांना जाणे भाग होते म्हणून भूषण बोलला, मी आणि सायली (स्नेहाची रूममेट) स्नेहासोबत थांबतो तुम्ही सगळे जा.
तसे ही त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांची मैत्री म्हणजे एक आदर्शच होता त्यामुळे कुणालाही काही अडचण वाटली नाही. मॅडमनी भूषण आणि सायलीला सांगितले स्नेहा शुद्धीवर आली कि तिला काहीतरी खायला द्या आणि ही औषधे द्या आणि काही लागले तर कॉल करा आणि सर्वजण निघून गेले. भूषण आणि सायली स्नेहाच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. भूषण खूप अस्वस्थ झाला होता, आणि उठल्यावर तिला काहीतरी खायला देणे गरजेचे होते म्हणून त्याने सायलीला स्नेहाची काळजी घे असे सांगून बाहेर गेला आणि थोड्यावेळाने मोठी बग् घेवुन् आला, सायलीला आश्चर्य वाटले म्हणून तिने त्याबद्दल विचारले तर भूषण बोलला, स्नेहा शुद्धीवर आली कि तिला पहिला खायला द्यायला हवे ना, आणि तिची काय खावेसे वाटेल माहित नाही, मॅडम मुडी आहेत आणि ती शुद्धीवर आल्यावर काहीतरी खाणे भागच आहे म्हणून सगळेच आणले आहे. म्हणून त्याने एक एक पार्सल रूममधल्या टेबल वर मांडले, सायली तर बघून शॉकच झाली.
तेवढ्यात स्नेहाला शुद्ध आली तसा भूषण आणि सायलीला हायसे वाटले, ते लगेच तिच्या जवळ आले आणि तिच्या तब्येतीची चौकशी केली तरी अशक्तपणा जाणवत होता म्हणून त्याने तिला ज्यूस दिला, तिने थोडाच ज्यूस पिला आणि ग्लास बाजूला ठेवला, मग भूषणने जेवणाचा टेबल तिच्याजवळ आणला, ते सर्व पाहून स्नेहापण शॉक झाली, टेबलवर ज्यूस, सर्वप्रकारचा नाश्ता, स्नॅक्स, 4-5 प्रकारचे गोड पदार्थ, पिझ्झा, बर्गर, फ्रुट्स सगळे पाहून स्नेहाने डोक्याला हात लावला. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून भूषण लगेच म्हणाला, मला समजत नव्हते तुला काय खायची इच्छा होईल म्हणून सगळे आणले आहे.
गाडीचा हॉर्न वाजला तशी स्नेहा एकदम भानावर आली, तिची धडधड वाढली होती, तिला वाटले भूषणच आला असेल म्हणून ती रूममधून बाहेर आली आणि विवेकला पाहून ती थोडी शांत झाली, तिला भूषणला सामोरे जाणे कठीण जात होते म्हणून विवेकाला पाहून तिला थोडे बरे वाटले तेवढ्यात भूषणही घरी पोहचला आणि तिथे विवेकला पाहून त्याच्या हृदयात एकदम दुःख दाटून आले.
आता पुढे पाहू कि भूषण आणि स्नेहा यांची भेट कशी होते आणि त्यांचे आयुष्य कोणते वळण घेते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा