अबोली.. भाग ४

कथा एका अबोलीची
अबोली भाग ४


सुरेश स्वतःशीच विचार करत होता, ' असे वाटले होते, की अबोली सॉरी म्हणेल.. मग मी तिला हवे तसे नाचवीन. पण कसले काय? माझ्या तोंडावर माझा अपमान करून गेली परत. अरे जा... तू एक गेलीस तर शंभर येतील आमच्या वृत्तपत्रात. आणि तूही जाशील कुठे? बघू कोण छापतंय तुझे फडतूस लिखाण?'

"साहेब , तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावले आहे." शिपायाने येऊन सुरेशला निरोप दिला.
' हे भाऊजी पण ना जरा शांत बसू देत नाही. सतत हे कर आणि ते कर.' सुरेश मनातल्या मनात बडबडला.
"आलोच म्हणून सांग".

"हे काय? तू थेट आत आलास? विचारण्याची पद्धत नाही का?"

"असे काय करता, भाऊजी.. नेहमी तर मी असाच आत येतो."
" हे बघ,आपले नाते याच्यापुढे फक्त घरी. इथे मी तुझा बॉस आणि तू माझा कर्मचारी."

" आता हे काय नवीन?"

" नवीन नाही. मी हे आधीच करायला हवे होते. तू त्या अबोलीमॅडमचे लिखाण परत का पाठवलेस?"

"अच्छा. ते काही चांगले नव्हते." सुरेशचे ततपप झाले.

" हो का? नक्की काय चांगले नव्हते त्यात? नाही ना उत्तर देता येत, मग कशाला करायचे हे कारभार? तुझ्या बहिणीने सांगितले म्हणून तुला इथे ही पोस्ट दिली तेही काही पात्रता नसताना. आणि तू? तुझ्यामुळे मला एका चांगल्या व्यक्तीला दुखवावे लागले. ते काही नाही. तू त्यांची लेखी माफी माग. आणि यापुढे त्यांच्या लिखाणाला हात लावणार नाही असे वचन दे. नाहीतर इथून बाहेर जायची तयारी ठेव."
चरफडत सुरेशने तिचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेला. तिथे गेल्यावर त्याला कळले की ती दवाखान्यात आहे. त्याला खूप आनंद झाला पण तो चेहर्‍यावर न दाखवता तो ऑफिस मध्ये परत आला.

" काय मागितली का माफी?"

" भाऊजी. नाही सर. तिला दवाखान्यात ठेवले आहे. त्यामुळे भेट नाही झाली."

" हे सगळे तुझ्यामुळेच झाले असावे. याची शिक्षा म्हणून उद्यापासून तू फिल्डवर्क करायचे. आणि नवीन लेखक, लेखिकांच्या आसपासही भटकायचे नाही. कळले?"

काही महिन्यांनंतर....


" श्वेता, गेले अनेक दिवस 'मूक स्पंदन' या नावाने वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये लिहून येत आहे. तू पाहिलेस का?"

"हो सर, मी वाचते. खूप छान लिखाण असते ते."

" ते कोण आहे, शोधून काढता येते का बघ ना जरा. म्हणजे आपण पण त्यांना विनंती केली असती, आपल्याकडे लिहिण्यासाठी. ती काव्यस्पर्धा झाली, पण अबोली मॅडम सोडून बाकी कोणामध्ये तेवढा स्पार्क नाही दिसला. बरी आठवण झाली. त्या अबोली मॅडम कशा आहेत आता? तुला माहित आहे का? मला लाज वाटते त्यांना फोन करायला."

" हो सर, आता ती पुष्कळ बरी आहे."

" बरे झाले. खरेतर त्यांना परत स्तंभ चालू कराल का असे विचारावेसे वाटते पण कोणत्या तोंडाने विचारणार?"

" सर तसा विचारही नका करू. मी आपल्या वृत्तपत्राचा विषयही काढणार नाही याच अटीवर तिचा नवरा मला भेटू देतो तिला."

"जाऊ दे मग.. तू ते 'मूक स्पंदन' त्यांचा काही पत्ता लागतो का बघ."
हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all