अबोली.. भाग २

कथा एका अबोलीची
अबोली.. भाग २


अबोलीने या कामात स्वतःला खरेच झोकून दिले. नवीन नवीन विषय शोधायचे त्यावर अनुरूप लेख किंवा कविता लिहायच्या. तिचे बरेचसे लेख, कविता छापून यायच्या. आणि त्यावर वाचकांचा प्रतिसादही उत्तम होता. तिच्या इमेल्स सध्या प्रशंसेने भरलेल्या असायच्या. त्यामुळे तिचा हुरूपही वाढला होता. तिचे लिखाण बहरत होते. आणि अचानक पहिल्यांदा ती देऊन आलेले पाकिट दुसर्‍याच दिवशी 'साभार परत' म्हणून आले होते. तिला आश्चर्याचा धक्का बसला. काय झाले असावे म्हणून तिने कचेरीत फोन केला.

" हॅलो मी अबोली बोलते आहे. श्वेता आहे का?"

" बोल अबोली, मीच बोलते आहे."

" अग बरं झाले तूच फोन उचललास ते. अग माझे लिखाण पहिल्यांदाच साभार परत म्हणून आले आहे. याच्या आधी कधी आले नव्हते. म्हणून आश्चर्य वाटते आहे."
पलीकडून काहीच उत्तर आले नाही. अबोलीला पण थोडे विचित्र वाटले. ती जेव्हा कधी ऑफिसमध्ये जायची तेव्हा श्वेता तिच्याशी छान बोलायची. आज ती का अशी बोलते आहे , तिला कळेचना. पण विषय वाढवायला नको म्हणून तिने विचारले ,
"सर आहेत का तिथे? म्हणजे काय चुकले आहे ते विचारेन."
" अग तुला त्यादिवशी नाही का बोलले सर काही दिवस ऑफिसमध्ये येणार नाहीत म्हणून."
" हो विसरलेच. ठिक आहे. ठेवते मग."
अबोलीने काहिशा नाराजीनेच फोन ठेवला. तिचा मोबाईल वाजला म्हणून तिने पाहिला तर श्वेताचा मॅसेज होता.

'आपल्या उपसंपादकांनी ते परत पाठवायला सांगितले. आम्ही त्यांना खूप समजावले. पण सर नाही आहेत याचा ते फायदा घेत आहेत. ते आता समोर बसले आहेत. म्हणून बोलता आले नाही. ते तुला ओळखतात का? कारण तुझा बायोडेटा सकाळी वाचल्यापासून चिडले आहेत. तुला कल्पना दिली. सविस्तर नंतर बोलू.'
अबोली विचारात पडली अशी कोणती व्यक्ती आहे कि जी तिचा एवढा रागराग करते आहे. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर श्वेताने तिला फोन केला.
" हाय.."
" हाय, हॅलो नंतर बोलू. आधी सांग ऑफिसमध्ये नक्की काय झाले?"
" अग आपले उपसंपादक आहेत, सुरेश म्हणून. तू जेव्हा आलीस तेव्हा ते सुट्टीवर होते. आणि नंतर जेव्हा जेव्हा तू यायचीस तो नेमका त्यांचा सुट्टीचा दिवस असायचा. त्यामुळे तुझी आणि त्यांची भेट झाली नाही."
" त्याचा इथे काय संबंध?" उतावळेपणाने अबोलीने विचारले.
" मॅडम ऐकून तर घ्या. गेले काही दिवस तुमचे नाव गाजते आहे. म्हणून त्यांनी तुझी फाईल मागवली. त्यातला तुझा फोटो आणि नाव बघून ते जे चिडले. बाप रे बाप. त्यात आपले सर पण इथे नव्हते. मला तर वाटते आहे. एकतर तो तुझा जुना आशिक असावा किंवा शत्रू." श्वेता थोडे मस्करीत थोडे गंभीरपणे म्हणाली.
" काहीच कल्पना नाही ग.. सर कधी येणार आहेत, सांगशील? मी त्यांनाच येऊन भेटेन. " अबोली विचार करत म्हणाली.
" नक्की.. पण थोडे जपून बरे का. कारण सुरेशसर आपल्या सरांचे मेव्हणे आहेत."
" अच्छा. म्हणजे सगळेच अवघड आहे. मग मी उद्या येऊन त्या सुरेश सरांनाच भेटते. वाघ म्हटल तरी खातो , वाघ्या म्हटले तरी खातो."
" शोभतेस बाई साहित्यिक. चल ठेवते फोन. उद्या बोलू."
सुबोध ऑफिस मधून आल्यानंतर तिने त्याच्या कानावर हे घातले. तो ही चिडला. "काय फालतुगिरी आहे? हे असे पेपर चालतात का? चांगले लेख आणि कविता नाकारून काय मिळते आहे या माणसाला? मी येऊ का उद्या तुझ्यासोबत?"
" नको मी जाईन एकटी. गरज पडली तर तुला नक्कीच सांगेन. तसेही श्वेता असेलच तिथे. बघते तर काय आहे गोंधळ."
दुसर्‍या दिवशी अबोली ऑफिसच्या वेळेत तिथे पोचली. उपसंपादक अजून आले नव्हते म्हणून त्यांची वाट पहात बसली. थोड्या वेळाने ते आल्यावर श्वेताने तिला डोळ्यांनी खूण केली.

" Excuse me sir , मी आत येऊ का?" तिने विचारले.
" हो या ना.." त्यांच्या चेहर्‍यावर थोडे छद्मी हास्य होते. हा चेहरा कुठे पाहिल्यासारखा वाटतो आहे का? अबोली स्वतःशीच विचार करू लागली.

" बोला काय काम आहे माझ्याकडे?"

" सर,मी गेले महिनाभर या वृत्तपत्रात लिहित आहे. आजपर्यंत मी लिहिलेले कधीच 'साभार परत' आले नव्हते. माझे यावेळेस एवढे काय चुकले आहे हे कळावे म्हणून आले आहे."

" आता चुकले काहीच नाही.. पण तुम्हाला नकाराचे दुःख कळावे म्हणून मी हे केले."

" नकार?? तो ही विनाकारण? मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही.."
" कशी ओळखशील? कॉलेजमधली मोठी कवयित्री होतीस ना तू. आमच्या सारखे कसे लक्षात राहणार तुझ्या?"

" तुम्ही वाटेल तसे बोलताय?"

" हो का? आणि रोज डे ला तू केलेला माझा अपमान? तेव्हा तू नव्हतीस वाटेल तसे बोललेलीस? सगळे कॉलेज हसले होते मला."
आता अबोलीला आठवले कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना कोणीतरी तिला गुलाब दिले होते. तिने घ्यायला नकार दिला तर ते गुलाब त्या व्यक्तीने अख्खया वर्गात लावून ठेवले होते आणि फळ्यावर तिचे नाव लिहून ठेवले होते. त्यानंतर मात्र त्याला तिने सोडले नव्हते. वर्गात आलेले प्रोफेसर सुद्धा त्याला ओरडले होते. पण नंतर तो मुलगा परत कधीच दिसला नाही आणि ती ही विसरून गेली होती.


कशी सामोरी जाईल अबोली या परिस्थितीला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई


🎭 Series Post

View all