Login

अबोली भाग २

Story Of A Emotional Girl

अबोली भाग २



    सुरेश स्वतःशीच विचार करत होता, ' असे वाटले होते, कि अबोली सॉरी म्हणेल.. मग मी तिला हवे तसे नाचवीन. पण कसले काय? माझ्या तोंडावर माझा अपमान करून गेली परत.. अरे जा... तू एक गेलीस तर शंभर येतील आमच्या वृत्तपत्रात.. आणि तूही जाशील कुठे? बघू कोण छापतंय तुझे फडतूस लिखाण?'

    "साहेब , तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावले आहे.." शिपायाने येऊन सुरेशला निरोप दिला..

' हे भावजी पण ना जरा शांत बसू देत नाही.. सतत हे कर आणि ते कर..' सुरेश मनातल्या मनात बडबडला.. "आलोच म्हणून सांग".


"हे काय? तू थेट आत आलास? विचारण्याची पद्धत नाही का?"

"असे काय करता, भाऊजी.. नेहमी तर मी असाच आत येतो.."

" हे बघ,आपले नाते याच्यापुढे फक्त घरी.. इथे मी तुझा बॉस आणि तू माझा कर्मचारी.."

" आता हे काय नवीन?"

" नवीन नाही.. मी हे आधीच करायला हवे होते.. तू त्या अबोलीमॅडमचे लिखाण परत का पाठवलेस?"

"अच्छा.. ते काही चांगले नव्हते.." सुरेशचे ततपप झाले..

" हो का? नक्की काय चांगले नव्हते त्यात? नाही ना उत्तर देता येत, मग कशाला करायचे हे कारभार? तुझ्या बहिणीने सांगितले म्हणून तुला इथे हि पोस्ट दिली तेही काही पात्रता नसताना..आणि तू? तुझ्यामुळे मला एका चांगल्या व्यक्तीला दुखवावे लागले.. ते काही नाही.. तू त्यांची लेखी माफी माग.. आणि यापुढे त्यांच्या लिखाणाला हात लावणार नाही असे वचन दे.. नाहीतर इथून बाहेर जायची तयारी ठेव.."

   चरफडत सुरेशने तिचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेला. तिथे गेल्यावर त्याला कळले कि ती दवाखान्यात आहे..त्याला खूप आनंद झाला पण तो चेहर्‍यावर न दाखवता तो ऑफिस मध्ये परत आला..

" काय मागितली का माफी?"

" भाऊजी.. नाही सर.. तिला दवाखान्यात ठेवले आहे. त्यामुळे भेट नाही झाली."

" हे सगळे तुझ्यामुळेच झाले असावे.. याची शिक्षा म्हणून उद्यापासून तू फिल्डवर्क करायचे.. आणि नवीन लेखक, लेखिकांच्या आसपासही भटकायचे नाही.. कळले..."


काही महिन्यांनंतर....



  " श्वेता, गेले अनेक दिवस 'मूक स्पंदन' या नावाने वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये लिहून येत आहे.. तू पाहिलेस का?"

"हो सर, मी वाचते. खूप छान लिखाण असते ते.."

" ते कोण आहे, शोधून काढता येते का बघ ना जरा.. म्हणजे आपण पण त्यांना विनंती केली असती, आपल्याकडे लिहिण्यासाठी.. ती काव्यस्पर्धा झाली, पण अबोली मॅडम सोडून बाकी कोणामध्ये तेवढा स्पार्क नाही दिसला.. बरी आठवण झाली.. त्या अबोली मॅडम कशा आहेत आता? तुला माहित आहे का? मला लाज वाटते त्यांना फोन करायला.."

" हो सर, आता ती पुष्कळ बरी आहे."

" बरे झाले.. खरेतर त्यांना परत स्तंभ चालू कराल का असे विचारावेसे वाटते पण कोणत्या तोंडाने विचारणार?"

" सर तसा विचारही नका करू. मी आपल्या वृत्तपत्राचा विषयही काढणार नाही याच अटीवर तिचा नवरा मला भेटू देतो तिला.."

"जाऊ दे मग.. तू ते 'मूक स्पंदन' त्यांचा काही पत्ता लागतो का बघ.."


 दोन दिवसांनी...


" सर आत येऊ?"

" ये श्वेता.."

" सर तुम्ही ते 'मूक स्पंदन' बद्दल विचारले होते ना?"

" लागला का त्यांचा पत्ता?" संपादकांनी विचारले..

" नाही सर.. ते कोण आहे कोणालाच माहीत नाही.. सध्या त्यांचा स्तंभ जिथे चालू आहे, तिथे माझा एक मित्र काम करतो. मी त्याला खूप खोदून विचारल्यावर त्याने सांगितले कि आधी तिथे एक इमेल आला.. त्यात एक लेख होता आणि एक सूचना.. लेख आवडला तर खालील पत्त्यावर संपर्क साधा नाहीतर सोडून द्या.. त्यांना ते लिखाण आवडले म्हणून त्यांनी तो स्तंभ सुरू केला."

" विचित्रच आहे.. मग पेमेंट कसे करतात?"

 "तिथे एका अकाउंटची माहिती दिली आहे. तिथे पैसे भरायचे. जास्त चौकशी करू नये अशी अट आहे.. नवनवीन , छान लिखाण आहे म्हणून ते ही जास्त खोलात जात नाहीत.."

" आश्चर्य आहे नाही.. कारण लोकांना प्रसिद्धी हवी असते.. हे उलटच आहे."

" ते ही आहेच.. पण मला एक आतली बातमी कळली आहे. त्यांच्या एका कवितासंग्रहाचे अगदी खाजगी रित्या प्रकाशन समारंभ आहे. हवे असेल तर मी प्रयत्न करते आमंत्रण पत्रिका मिळवण्याचा.."

" नक्की कर. मला आवडेल त्या व्यक्तीला भेटायला.."

   एका छोट्याच हॉलमध्ये पुस्तक प्रकाशन समारंभ होता.. मोजकीच जाणकार माणसे होती.. यातून श्वेताने कसे आमंत्रण मिळवले याचे संपादकांना आश्चर्य वाटले.. ते तिला काही विचारणार एवढ्यात समारंभाला सुरुवात झाली. व्यासपीठावर असलेल्या तरूणाने बोलायला सुरुवात केली..

" 'मूक स्पंदन' म्हणजे कोण हा प्रश्न तुम्हा सगळ्यांनाच पडला आहे, हे मला माहित आहे.. त्यांची आज ओळख होईलच पण एक विनंती आहे, हे जेवढ्या कमी लोकांना कळेल तेवढे चांगले.. मी मूक स्पंदन यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो.."

टाळ्यांचा कडकडाट झाला.. समोरून श्वेता अबोलीला धरून येत होती.. श्वेता कधी उठून गेली हे त्यांना कळलेच नव्हते.. अबोलीने मानेनेच सर्व ठिक असल्याचा श्वेताला इशारा केला.. श्वेता परत जागेवर येऊन बसली.. त्या तरुणाने अबोलीला दोन शब्द बोलण्याची विनंती केली..


   अबोलीने माईक हातात घेतला. "सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचेच आभार मानते. माझ्यासारख्या एका नवोदित कवयित्रेच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास तुम्ही सर्वजण आलात हा माझा बहुमान आहे. मी नाव का लपवले हे सर्वांना गूढ वाटते. पण असे काही नाही.. काही महिन्यांपूर्वी हि अशी परिस्थिती नव्हती.. इतरांसारखेच मलाही माझे नाव प्रसिद्ध व्हावे, माझे कौतुक व्हावे असे वाटत होते.. ते तसे होतही होते.. पण लवकरच माझा भ्रमाचा भोपळा फुटला.. एका व्यक्तीने खूप जुना राग धरून माझे लिखाण प्रकाशित करायला नकार दिला.. मी त्याचा खोटेपणा त्याच्या पदरात घातला खरा.. पण मनातून हा विचार गेला नाही कि जोपर्यंत मी कोण हे त्या व्यक्तीला माहित नव्हते तोपर्यंत एका अनोळखी व्यक्तीच्या लिखाणावर त्याला आक्षेप नव्हता. पण तीच व्यक्ती ओळखीची निघाली , तिने आपल्याला नकार दिला होता या भावनेने तिचे करिअरच होऊ द्यायचे नाही या वृत्तीचा मला खरंच खूप मोठा धक्का बसला.. मला हे सहनच झाले नाही..काही दिवस दवाखान्यात रहायला लागले मला..आणि आज या सगळ्या ज्या नावाजल्या गेलेल्या कविता मी त्या काळात लिहून काढल्या.. या काळात मला माझ्या घरातल्यांनी खास करुन नवर्‍याने खूपच सांभाळून घेतले.. माझी अक्षरशः लहान बाळासारखी काळजी घेतली.. या व्यतिरिक्त अजून एका व्यक्तीचे आभार मला मानायचे आहेत.. मला माहीत आहे तिला ते नाही आवडणार.. पण जर ते नाही मानले तर मी कृतघ्न ठरेन.. ती आहे श्वेता.. तिची आणि माझी काही महिन्यांचीच ओळख.. पण जन्मोजन्मीचे नाते असल्यासारखी वाटते.. तिला माझी परिस्थिती कळल्यानंतर यातून मला बाहेर काढण्याचा तिने प्रयत्न केला.. स्वतःचा कोणताच स्वार्थ नसताना.. तिने आणि माझ्या नवर्‍याने सुबोधने मिळून माझ्या कविता सगळ्यांपर्यंत पोहचवल्या.. त्यामुळेच हा दिवस मला दिसतो आहे.. असो.. माझे दोन शब्द खूपच लांबले... पण तरिही एक सल्ला द्यावासा वाटतो माझ्या वाचकांना.. आपल्या आयुष्यात आपले पाय खेचणारे, आपले कौतुक न करणारे, चांगले न बघवणारे अनेकजण असतात.. पण म्हणून माझ्यासारखे निराश न होता खंबीरपणे उभे राहा.. जरी निराश झालात तरी आपल्या कुटुंबियांशी, मित्रमैत्रिणींशी बोलणे बंद करू नका.. हे हि दिवस जातील.. यावर विश्वास ठेवा..."



यावेळेस सगळ्यात जास्त टाळ्या संपादकांच्या होत्या....



कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

0