Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

अबोली: एक पाऊल परिवर्तनाकडे

Read Later
अबोली: एक पाऊल परिवर्तनाकडे

राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

कथेचे शीर्षक - अबोली: एक पाऊल परिवर्तनाकडे 

लघुकथा विषय - स्त्री आणि परावलंबित्व

................................................................................. 


                 अबोली साठे, वय वर्षे सव्वीस! गोरी गोमटी कांती असलेली अन् दिसायला नाकीडोळी सुंदर! पेशाने ग्राफिक्स डिझाइनर असून जन्मतःच पोरकी असल्याने तिने एकटीनेच कुणाच्याही आधाराविना स्वतः अवघ्या ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात नावलौकिक मिळवले.


                 अबोलीने सुरुवातीला छोटीशी ग्राफिक डिझायनिंग कंपनी उभी केली अन् नंतर हळूहळू त्या कंपनीचा विस्तार केला. कमी वयात अन् कित्येक उद्योजकांच्या तुलनेत कमी वेळात तिने त्या क्षेत्रात भरारी घेतली आणि याचा पुरावा म्हणजे आज झालेला पुरस्कार वितरण सोहळा अन् त्यात तिला मिळालेला पुरस्कार! 


                  खरंतर, हा पुरस्कार मिळाल्याने तिचा आनंद द्विगुणित असायला हवा होता पण ती नाखूष होती. म्हणजे तिला पुरस्कार मिळाल्याने ती नाराज नव्हतीच उलट तिलाही तिचा आनंद साजरा करायचा होता पण परत भल्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांनी तिच्या व्यक्तिगत आयुष्यावर केलेल्या विशेष टिप्पणीमुळे ती दुखावल्या गेली होती. 


                  भरीस भर म्हणजे काही तत्सम लोकांनी मुद्दाम तिच्या आजीवन अविवाहित राहण्याच्या निर्णयावर लक्ष्य साधले; शिवाय तिने एकटीने मेहनत घेऊन उभ्या केलेल्या साम्राज्याच्या यशाचे श्रेय उगाच तिचा नाममात्र बिझनेस पार्टनर असलेल्या अंगद खरे याला दिले. 


                  तिने एरवीप्रमाणे त्या सगळ्यांच्या वायफळ बडबडीकडे यावेळीही दूर्लक्ष केले पण अंगदचे त्या सगळ्यांकडून वाहवा मिळवून घेणे तिला खटकले. त्याची पात्रता किती आहे, या वास्तवाची जाण तिच्यापेक्षा त्याला होती पण तरीही तो काहीही एक न बोलता उलट सगळ्यांकडून प्रशंसा करवून घेत असल्याचे अबोलीच्या नजरेतून सुटले नाही. 


                  क्षणाचा विलंब न करता म्हणूनच अबोलीने पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या मुलाखतीत अंगद खरे सोबत ग्राफिक्स डिझायनिंग कंपनीत पाच टक्के त्याची असणारी पार्टनरशीप रद्द केली असल्याचे घोषित केले. त्याच्याकडे कुठलेही शेअर्स नसल्याने तो फक्त नाममात्र पार्टनर होता, हे लोकांना नंतर कळले पण तरीही सगळ्यांनी तिलाच टोमणे मारायला सुरुवात केली. तिच्याविषयी नानाविध अफवा पसरविल्या, अंगदमुळे कंपनीचे भले झाले होते, तो नसताना आता ती कंपनी पार भुईसपाट होईल अशी कित्येक तर्कहिन भाकिते केली. 


                  प्रत्येक न्यूज चॅनेलवर तिच्याविषयीच बातम्या सुरू होत्या. एवढेच नव्हे तर, तिचा स्टाफही तिच्यामागे तिचीच बदनामी करत होता. हे सगळं अनुभवून तिचं डोकं अगदी ठणकत होतं, दिवसभर घडलेल्या घटना आठवून ती अगदी सुन्न झाली होती, तिला काही सुचेनासे झाले होते म्हणून ती तिच्या हक्काच्या जागेवर म्हणजेच तिच्या खोलीतल्या खिडकीजवळील स्टडी टेबलवर बसून सगळं काही परत एकदा आठवून आकलन करत होती. 


                  विचारात हरवलेले असतानाच अचानक तिला काहीतरी सुचले, तिने ड्रॉवर उघडला अन् त्यातून तिने तिची डायरी बाहेर काढली. तिने ती डायरी हातात घेतली अन् सोबतीला पेनही घेतला. नंतर एकदा डोळे मिटून थोडा खोल श्वास घेऊन तिने डायरीतले एक पान उघडले आणि मग हातात घेतली लेखणी अन् मग साधू लागली संवाद तिची लेखणी डायरीतल्या कोऱ्या कागदाशी! थोडक्यात, डायरीत लिहायला सुरुवात करून ती तिचे मन रिते करू लागली. 


प्रिय सखी, 


                  कशी आहेस? ठीक आहेस ना? काळजी घेत आहेस की नाही गं स्वतःची? कसं आहे, इतरांकडून कसली अपेक्षा न ठेवता आता तुला स्वतःला जपणे शिकायचं आहे, बरं का! तसं आज बऱ्याच दिवसांनंतर आपण अशा गप्पा मारतोय ना? करायला हव्याच म्हणा गप्पा अधुनमधून म्हणजे थोडी उसंत देखील मिळते, मग काय तेवढाच समतोल साधता येतो ना म्हणून! 


                  अरेच्चा! बघितलंस? मी परत तुझ्यासारखीच वायफळ निरंतर बडबड करत बसले अन् महत्त्वाचे ते राहूनच गेले. बरं असो! तर आज हा संवाद साधायचा आणि मुळात हा पत्र लिहिण्याचा माझा मूळ उद्देश असा की, हल्ली खूप वर्दळ सुरू आहे ना आयुष्यात तुझ्या? माहिती आहे गं मला सारं... अन् हे ही माहिती आहेच गं की, सगळं कसं एकाचवेळी होतंय, जणू आधीच ठरवल्याप्रमाणे चहूदिशांनी अडथळ्यांच्या गर्दीत तू एकटीच फसल्यासारखं वाटत असेल ना तुला? अन् असे वाटायलाही हवे, माझे तर हे स्पष्टच मत आहे. 


                  आता विचारशील असं का? तर सांगते! कसं असतं ना, विश्वास आणि अविश्वास यावर संशयाची ठिणगी जर पेटली नाही तर प्रचिती येत नाही ना वास्तविकतेची! शिवाय संकटांना पाहून थोडीशी उठाठेव देखील व्हायलाच हवी ना मनाच्या गाभाऱ्यात असंख्य प्रश्नांची! 


                  पण एक सांगू, हे जे वैचारिक वादळ आहे ना ते क्षणिक असावं, नाही का! माझ्या मते तरी, सकारात्मक अन् नकारात्मक विचारांचा गदारोळ वाढायला नको कारण त्या वैचारिक विचारांची व्याप्ती वाढली की, त्रास पुढे आपल्यालाच होतो ना! आणि मग अशा असंख्य विचारांच्या दाटीवाटीने निर्णय आपलेच चुकत जातात.


                 थोडक्यात, 'विनाश काले विपरीत बुद्धी' म्हणतात ना तसंच काहीसं घडायला लागतं पण माझ्या मते, तुझ्या बाबतीत हे घडायला नको! अन् सखे त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेव. वरवर पाहता तुला नक्कीच वाटेल की, अख्खं जग हे वळणावळणावर तुझे पाय खेचत आहेत निव्वळ तुला खाली पाडण्यासाठी! अन् याला नियतीही अपवाद नाही, सध्या तुला असेच वाटत असावे; पण असा कोणताही निष्कर्ष अद्याप काढू नकोस. 


                 तत्पूर्वी एकदा डोळे मिट अन् दीर्घ श्वास घेऊन घडलेल्या घटना वा आलेल्या अनुभवांचे आकलन करून पाहा. त्यावर मनोमन विचार करशील तेव्हा तुला आयुष्याचे गणित सहज लक्षात येईल. 


                  खरं सांगायचं तर सखे, प्रारब्ध नक्कीच तुला गंभीर जखमा देत आहे पण याचा अर्थ हा नाही की, प्रारब्ध तुझे अहित चिंतित आहे. हो, प्रारब्ध तुला वेदना देत आहे क्षणोक्षणी पण फक्त तुला तुझी जाणीव करून देण्यासाठीच, ह्याची तू गाठ बांधून घे! 


                 तुला माहिती आहे, तू का नवी सुरुवात करण्यास सध्या असमर्थ आहेस? कारण तू अजूनही भूतकाळात गुंतून आहे, आपल्याच माणसांकडून आलेल्या दुखद अनुभवांत गुरफटून आहेस पण यातून बाहेर पडायला हवे ना, नव्याने उभारण्यासाठी! 


                 मला सांग, काय झालं जर अडचणी तुझा पिच्छा सोडत नसतील तर? सांग ना! काय झालं, जर आपलीच माणसे तुझ्याशी वैऱ्यासारखी वागली असतील किंवा वागत असतील तर? काय झालं, विश्वासू व्यक्तींनीच तुझा विश्वासघात केला तर? सांग ना, बिघडलं कुठे? 


                  हो, आहे ना मान्य मला की, तू केलंस निस्वार्थ प्रेम, तू केलीस खरी मैत्रीही पण जर एखाद्याला त्याची कदर नसेल आणि त्याने तुझ्या प्रेमावर वा मैत्रीवर प्रश्नचिन्ह उचलले असतील तर? तर त्यामुळे तुझं प्रेम वा मैत्री सारेच खोटं आहे असं नाहीच ना? एखाद्याला तुझ्या प्रेमाचे मोल नाही यात तुझा दोष नाहीच गं वेडाबाई! 


                  ऐक, जाणारा जातोच गं, कधी एखाद्या वाऱ्याच्या झुळुकेप्रमाणे वाहून जातो एक क्षणही न थांबता वा कधीतरी जातो बरसून अगदी अलगद पावसाच्या सरींप्रमाणे! म्हणून तर ज्याला जायचे असेल त्याला आपण अडवू शकत नाहीच गं!मग त्यासाठी आपण का म्हणून झुरत बसावे? उलट जे सध्या आपल्याकडे आहे ते आपल्या परीने जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला तर, काही हरकत आहे का? नाही ना! 


                  खरंच गं, जे तुझे नव्हते त्यांनी सहज पळवाट काढून घेतली अन् जे तुझे आहेत, ज्यांच्यासाठी तू महत्त्वाची आहेस ती माणसे येतील, राहतील, भांडतीलही पण थांबतील अगदी आयुष्यभर मात्र पळवाट कधीच काढणार नाहीत. 


                   तुला म्हणूनच मी सांगतेय की, एखादा आपल्याशी कसा वागला यावरून त्या व्यक्तीची पात्रता कळते पण तू त्यांना दिलेल्या प्रतिसादावरून अन् तुझ्यात असलेल्या सहनशक्तीद्वारे जगाला चाहूल लागते वेळोवेळी तुझ्या अस्तित्वाची! म्हणूनच तू कर ना भरभरून प्रेम परत एकदा! वाग ना सगळ्यांशी हसतमुखानेच अगदी ज्यांनी ऐनवेळी पाठ फिरवून घेतली त्यांच्याशी अन् ज्यांनी तुझ्याशी विश्वासघात केला त्यांच्याशीही! जोड नवी नाती आणि जप तुझ्या परीने! 


                  ओळख वाढवून बघ अनोळखी व्यक्तींशी अन् करून बघ अनोळखी माणसांशी मैत्री आणि कर त्यांना आपलेसे... भूतकाळ विसर असं मी चुकूनही म्हणणार नाही पण त्या भूतकाळाला अवाजवी महत्त्व देण्याची गल्लत करू नको. तुझे असे भूतकाळात गुंतून राहिल्याने वर्तमानात तू खस्ता खाल्लेल्या मला रूचणार नाही. 


                  तू जगापुढे स्वतःला सिद्ध कर, असं मला म्हणायचंच नाहीये कारण जगापुढे स्वतःला सिद्ध करण्याची काही एक गरज नाही पण तू कोण आहेस हे जगाला ओरडून न सांगता फक्त तू स्वतःला आणि तुझ्या कर्तृत्वाला संधी दे मग जग आपसूकच जे समजायचे ते समजून जाईल. 


                   हे कठीण प्रसंग येतीलच गं पावलोपावली.. अजून उभं आयुष्य बाकी आहे तुझ्याकडे म्हणून याहून बिकट प्रसंगांचे अनुभव येतीलच तुला, त्यासाठी सज्ज हो! खंबीर राहा, खचून जाऊ नको. जगाची केलीस खूप फिकीर आता स्वतःची पर्वा कर. भयाण वास्तवाला घाबरली नाहीस ना मग आतापासून अफवांनाही घाबरू नकोस. यशाच्या वाटेवर चालताना वा स्त्री आणि परावलंबित्व याविषयी लोकांची धारणा बदलण्याची क्रांती घडविताना तुझ्याविषयी अन् तुझ्या चारित्र्याविषयी अफवा या पसरतीलच तर अशा परिस्थितीत बहिरे व्हायला शिक. तू स्वतःशी प्रामाणिक आहेस ना, बास! एवढंच पुरेसे आहे.


                  जगाला प्रामाण्य देण्यासाठी तू बांधील नाहीस. म्हणूनच तुझं अस्तित्व तू स्वतः निर्माण करशील यात वाद नाही पण तुझ्या अस्तित्वावर कुणी प्रश्न निर्माण केला तर त्याला सडेतोड उत्तर देणे तेवढे शिकून घे! स्वतःसाठी स्वतःचा स्वाभिमान जपून चुकीच्या व्यक्तीपुढे गुडघे न टेकणे म्हणजे तुझा अहंकार नव्हे! एखाद्याला तुझा स्वाभिमान जर तुझा अहंकार वाटत असेल तर दोष पुढच्या व्यक्तीत आहे कारण लक्षात असू दे, स्वाभिमान जपण्यात काहीच गैर नाही. 


                  कसं आहे ना, लोकांची धारणाच झालीय गं, स्त्री आणि परावलंबित्व जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची म्हणूनच तर ते स्त्रियांना परावलंबित्वाच्या पारड्यात ठेवूनच त्यांना त्या रितीने वागणूक देतात अन् तुझा लढा याच विरोधात आहे. तुझे असे आजीवन अविवाहित राहून स्वतःचा 'मी'पणा जपणे, स्वतःचे अस्तित्व निर्मिणे अन् त्यासाठीच कायम चढाओढ करणे, एकटीने ग्राफिक्स क्षेत्रातलं हे उभं साम्राज्य निर्मिणे खुपतंय गं समाजाला! म्हणून तर कायम तुला नाउमेद करण्याचे प्रयत्न असतात पण तू तुझा उत्साह कायम ठेव.


                  लाख येतील आणि तुझ्या धीराचं अन् तुझ्या सामर्थ्याचं खच्चीकरण करतील पण तू कायम स्थिर राहा, जमीनीत पाय रोवून! मग बघ, कुणाचीच हिंमत होणार नाही तुझ्या स्वाभिमानाची फरफट करण्याची! कसं आहे बाळा, प्रत्येकवेळी स्पष्टीकरण देणे निःसंशय गरजेचे नसतेच पण प्रत्येकवेळी मौन साधणेही योग्य नाहीच ना! म्हणून वेळोवेळी स्वतःचे मत मांडण्यासाठी स्वतःचाच आधार व्हायलाही शिक!


                   हो, आता स्वतःसाठी स्टॅंड कसा घ्यायचा तो सर्वस्वी तुझा निर्णय आहे म्हणजे तू बोलूनही मत व्यक्त करू शकतेस किंवा मग तुझ्या कर्तृत्वाला तशी संधी देखील देऊ शकते. यापैकी जे करायचे असेल ते सगळंच तुझ्यावर अवलंबून आहे. 


                  सखे, या छोट्या छोट्या अनुभवांना अस्तित्व निर्मितीसाठी चढाव्या लागणाऱ्या पायऱ्या आहेत, असं समजून तू वाटचाल करत राहा गं! आत्मविश्वासाने तू तुझी पायवाट चालत राहा अगदी न डगमगता! नको बाळगू मनात खाली पडण्याची भीती वा नको घेऊस हृदयाशी कवटाळून यशोशिखर गाठण्याची महत्त्वाकांक्षा देखील! पण तू फक्त प्रयत्न करत राहा. 


                 जगापुढे काही सिद्ध करू नको ना तुझे अस्तित्व ना तुझ्या चारित्र्याचे पावित्र्य! फक्त स्वतःला कमी लेखण्याची घोडचूक करू नकोस. विश्वास ठेव स्वतःवर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर! तोडून टाक बंधने सारी अन् तोड बेडीही स्त्री आणि परावलंबित्व या एकत्रित केल्या जाणाऱ्या समीकरणाची! झाले गेले विसरून तू चाल पुढं! कळले ना! थोडक्यात, मला म्हणायचंय की.... 


तू कर गं नव्या साम्राज्याची रुजुवात, 

जे होईल ते बघून घेऊ नंतर 

पण तू कर जोमाने नवी सुरुवात.. 

तुला सांगायचंय, बस इतकंच! 


तू पायवाट चालत राहा, 

भुंकणाऱ्या कुत्र्यांना अन् पोकळ अफवांना

फक्त एकदाच कर्तृत्वाने चापट मारून पाहा.. 

तुला सांगायचंय, बस इतकंच! 


जग शोधतंच आलंय गं स्वार्थ, 

पण तू जगावेगळे काही तरी कर 

अन् त्यासाठीच प्रयत्न तुझे असू दे निस्वार्थ.. 

तुला सांगायचंय, बस इतकंच! 


स्त्री आणि परावलंबित्व, 

नाहीच एका नाण्याच्या दोन बाजू 

सांगेल जगाला एकदिवस निक्षून तुझेच हे अस्तित्व.. 

तुला सांगायचंय, बस इतकंच! 


                  मला जे म्हणायचंय ते तुला कळलं असेलच म्हणून आता आवरते बरं माझं! बऱ्याच सुचना दिल्या ना मी तुला आज आणि बरंच काही सांगितलं सुध्दा! जे तुला आधीच ठाऊक होतं त्याचीच उजळणी देखील करवून दिली मी! आता थांबते इथेच! परत एकदा आवर्जून सांगतेय बरं, काळजी घे स्वतःची! तुझ्यासाठी योग्य असणारी पायवाट आणि तुझं गंतव्यस्थान तुला माहीत आहे आणि तू त्यावरच वाटचाल करीत आहेस म्हणून तू तुझं साम्राज्य अबाधित ठेव. 


                  क्षुल्लक अफवांमुळे स्वतःच्या निर्णयावर अविश्वास न दाखवता फक्त लढत राहा. झुगारून संकोच अन् अविश्वासाच्या बेड्या उभी राहा निर्धाराने! बरं, आता शब्दांना विराम लावतेय इथेच तू मात्र काळजी घे! - तुझ्यातलीच मी. 


                   अबोलीने ते पत्र स्वतःलाच लिहिले अन् लिहिल्यानंतर परत एकदा वाचले. पत्रातील एकूण एक शब्द वाचताच तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. चेहऱ्यावरही तेज पसरले. सारी नकारात्मकता खूप दूर पळून गेली आणि ती परत नव्याने उभी राहिली. सकारात्मक ऊर्जेची लहर तिच्या रोमारोमांत शिरली. सकाळपासून तिच्याचविषयी असंख्य अफवा ऐकून तुडुंब नैराश्यात बुडालेली अबोली परत एकदा उभी ठाकली, नव्या आत्मविश्वासाने! 


                 ' स्त्री आणि परावलंबित्व ' या समीकरणाची बेडी तोडून ' स्त्री आणि स्वावलंबन ' या वास्तविक समीकरणाची जगाला अन् उभ्या समाजाला जाणीव आणि ओळख करवून देण्यासाठी अबोलीने आज परत वाटचाल सुरू केली. 


समाप्त.


©®

सेजल पुंजे.  

०८/०८/२०२२.

टीम नागपूर. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//