अभी तो हम जवाँ है.. भाग २

कथा त्या दोघांच्या प्रवासाची


अभी तो हम जवाँ है.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की बाईकवर फिरण्यासाठी अवनी समितच्या पाठी लागते. आता बघू पुढे काय होते ते.


" पार्थ आणि प्रिशा, उद्या आम्ही दोघं बाहेर जाणार आहोत. चालेल ना?" अवनीने दोन्ही मुलांना विचारले.

" कमॉन आई.. आम्ही काय लहान आहोत का?" प्रिशाने विचारले.

" तसं नाही. आपण सगळे नेहमी सोबत जातो ना? पण बाईकवर चौघे कसे बसणार म्हणून?"

" आई, डोन्ट वरी. आम्ही करू मॅनेज. पण ताईला सांग जास्त ताईगिरी नाही करायची. " पार्थ खडूसपणे बोलला.

पार्थ आणि प्रिशाची नोकझोक सुरू झाली. आज अवनीने तिथे लक्ष दिले नाही. तिला वेध लागले होते बाईक राईडचे. तिला शाळेत असल्यापासून वाटायचे तिच्या स्वप्नातला राजकुमार यावा. घोड्यावर नाही बाईकवर बसून. त्याने हिच्याकडे हात मागावा. तिने लाजत त्याच्या हातात हात द्यावा. तिने बाईकवर बसावे. मग दोघांनी लॉंग ड्राईव्हला जावे. तो छान शिटी वाजवणार. ती त्याला घट्ट धरून बसणार. तिचे वार्यावर भुरभुरणारे केस त्याच्या मानेवर गुदगुल्या करणार.. मग तो हलकेच मागे वळून बघणार...
कसलं रोमँटिक. तिने सुहास शिरवळकरांच्या अनेक कथा वाचल्या होत्या. त्यातली ती वर्णने वाचून तिला नेहमी वाटायचे की त्यांच्या कथांची नायिका तिच आहे. कमी आहे ती फक्त नायकाची. लग्न झाल्यावर तिचा हा भ्रमाचा भोपळा फुटून गेला. प्रवास आवडणारी ती. आणि तिचा नवरा समीत प्रवासाचा शत्रू. प्रवास म्हटलं की त्याला मळमळायला लागायचं. एसटीचा प्रवास त्यामुळे वर्ज्य. ट्रेनमध्ये गर्दी आणि आवाज असतो, रात्री झोप लागत नाही या कारणाने त्यावर बहिष्कार. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरायला जायला काय विमान वापरायचे? या सगळ्यात बाईकवर बसून तो रोमँटिक प्रवास कधी झालाच नाही. मग गरोदरपण, बाळंतपण आणि झालेली दोन लेकरं. तोपर्यंत दारात गाडीही आली होती. मग काय ते स्वप्न, स्वप्नच राहिलं.

त्या जयेशच्या पोस्टने तिच्या बकेटलिस्टमधली ही इच्छा उफाळून वर आली होती. त्यात समीतने दिलेला होकार. आता ही संधी सोडायची नाही म्हणजे नाही असा विचार करून पदर सॉरी ओढणी कमरेला खोचली आणि ती लागली तयारीला.


" परत विचार कर.. बाईकवर नक्की जायचे का? नाहीतर आत्ता गाडी काढतो आपण चौघे मस्त गावी जाऊन आईबाबांना भेटून येऊ." समीतने निघायच्या आधी शेवटचा प्रयत्न केला. यावर उत्तर न देता अवनी थेट बाईकजवळ जाऊन उभी राहिली. केसांचा बांधलेला पोनी, डोळ्यावर चढवलेला गॉगल, ओठांवर लावलेली पुसटशी लिपस्टिक, घातलेली जीन्स.. दिसत तर ती तिच्या वयापेक्षा दहा वर्षाने लहान होती. ते बघून समितने गाडीला किक मारली.


काय वाटते, कशी होईल यांची बाईकराईड? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all