अभी तो हम जवाँ है?

कथा त्यांच्या प्रवासाची


अभी तो हम जवाँ है?


" ते दोघे बघ कसे मस्त बाईकवर फिरतात, नाहीतर आपण.." अवनीने समीतला टोमणा दिला.

" अग त्यांचे वय आहे. फिरू दे की त्यांना." समीत पेपरचे पान उलटत म्हणाला.

" त्यांचे वय आहे आणि आपलं काय वय झालं आहे का? तो जयेश बघ.. तुझाच मित्र आहे ना? तो तर त्याच्या बायकोला घेऊन महाबळेश्वरला गेला ते ही बाईकवर." अवनी पेपर खेचत बोलली.

" तुला काय माहित?"

" फेसबुक.." ती हातातला मोबाईल समितसमोर नाचवत म्हणाली. "त्याची पोस्ट बघितली ना. फिलिंग हॅपी, विथ डिअर वाईफी."

" या लोकांना पण ना, काय खाज असते या अशा पोस्ट टाकायची? घासली भांडी टाकली पोस्ट, केला स्वयंपाक टाकली पोस्ट.. अरे त्या पोस्टखात्याचा सुद्धा पोस्टशी एवढा संबंध आला नसेल. किती आणि कसल्या कसल्या त्या पोस्ट? अरे सुखाने जगू द्या ना आमच्यासारख्यांना."

" आमच्यासारख्यांना म्हणजे अरसिक, बायकोवर प्रेम नसणाऱ्या, तिच्यासाठी काहिही करायची इच्छा नसणाऱ्या ना?"

" काहिही करायची इच्छा नसणाऱ्या? हे चुकीचे आहे.. मी केला आहे स्वयंपाक. फोटो काढला नाही म्हणून काय झाले?" समीत रागाने बोलला.

" स्वयंपाक आणि कधी?" अवनीने हनुवटीवर हात ठेवत विचारले.

" ते तू आजारी होतीस तेव्हा नव्हता का केला?"

" त्याला स्वयंपाक म्हणायचा म्हणजे.. शब्दच सुचत नाहीत."

" नशीब कबूल केलंस.."

" काय करणार न करून? ती बेचव पेज.. आणि खारट भाजी." वाकडं तोंड करत अवनी म्हणाली.

" काहिही हां.. पेज आणि भाजी एकत्र करून बरोबर लागत होतं."

" तू विषय का भरकटवतो आहेस?"

" मी काय विषय भरकटवला? " समितने निरागसपणे विचारले.

" विषय होता बाईकवर फिरायला जायचा. तो तू कुठल्या कुठे नेलास?"

" तुला फिरायचेच आहे ना? मग बाईकवर काय आणि शब्दांच्या राज्यात काय?"

" तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. माझेच नशीब फुटकं. बाकीच्यांना कसे हौशी नवरे मिळतात. आणि इथे हरतालिका म्हणू नका वटसावित्री म्हणू नका.. सगळं करून माझ्या नशिबी हा धोंडा." अवनीने रडायला सुरुवात केली.


" ए बाई.. रडून डोक्याला त्रास नको देऊस. जाऊ आपण. महाबळेश्वरला नाही पण माथेरानला नक्की जाऊ."


काय वाटतं, समीत घेऊन जाईल अवनीला बाईकवर माथेरानला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all