अभेद्य हा विश्वास:-

What exactly trust is? Life is all about trusting isnt it?

अभेद्य हा विश्वास:-

विश्वास ही खूप नाजूक आणि अनमोल अशी गोष्ट आहे. मी तर म्हणेन की विश्वास सहज असा बसत नाही पण बसला की तो अभेद्य असतो.

आपल्या आयुष्यात खूप जण येतात, भेटतात आणि निघूनसुद्धा जातात.

जन्मतः काही नाती निर्माण झालेली असतात पण असे असूनही त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे याला बंधनकारक असतात असे नाही कारण तेवढे बंधही असावे लागतात.

मला कायम वाटते जे बंध बिना नात्याचे, स्वार्थाचे असे निर्माण होतात तिथे हा विश्वास आपोआप निर्माण होतो. तो इतका कणखर असा तयार होतो की त्याला प्रत्यक्षरुपी दिसण्यासारखे काहीच नसते पण तरीसुद्धा त्याचे अप्रत्यक्ष असे जे अस्तित्व बनते ते कोणत्या दैवतापेक्षा कमी नसते.

विश्व असे की जिथे तुझा निरंतर वास असा हा विश्वास! मी तर म्हणेन की हा व्यक्तीवर अवलंबून असतो आणि तो निर्माण करावा लागत नाही तर तो अनुभवाने निर्माण होतो.

कधी कधी संपूर्ण आयुष्य जगून होते पण हा विश्वास अस्तित्वात येत नाही आणि कधीतरी तो निर्माण होण्याला काही क्षण सुद्धा पुरेसे होतात.

बंध आपोआप जुळतात आणि त्याचे मूळ जे रुजत जाते तो म्हणजे विश्वास.

मी अशी काही लोक बघितली आहेत की जी कधीच कोणावर विश्वास ठेवत नाहीत आणि काही असे ही बघितले आहेत की ज्यांना फक्त विश्वास ठेवणे हेच कळते मग त्याचे फलीत काहीही असो.

ज्याला बघितले नाही अशा देव नावाच्या शक्तीवर आपण विश्वास ठेवतो ना कारण तर त्यामागे असलेली आपली विश्वास प्रणाली किंवा मान्यता!

ते सातत्याने करत राहणे हे तर आपले संस्कार!

मग जे डोळ्याने दिसते आणि आपल्यासोबत वावरते अशी कोणी व्यक्ती आणि त्याच्यावरील विश्वास हा तर पराकोटीचा भाग म्हणेन मी.

आपले मित्र, मैत्रिण, असो भाऊ बहीण असो की आणखी कोणी असो, पण त्या व्यक्तीचे आपल्यासोबत वागणे, त्याच्या आपल्याबद्दल असलेल्या भावना ह्या हळूहळू आपली बीजे रुजवायला सुरवात करतात.

मग आयुष्यात येतात ते अनुभव, असे काही क्षण की जे निर्णायक ठरतात आणि नकळत जे घट्ट नाते तयार होते तोच तर असतो विश्वास.

मग तुम्ही त्याला काही वेगळे नाव द्या अथवा नका देऊ पण ते आपले ठाम असे अस्तित्व हे बनवतंच!

त्या अस्तिवात अपेक्षा ह्यासुद्धा असतात नाही असे नाही पण त्या फार वेगळ्या असतात कारण त्यात स्वार्थापेक्षा काही देण्याचा आनंद हा खूप जास्ती असतो नाही का! मला हे अस्तित्व फार महत्वाचे वाटते.

जिथे तुम्ही बेधडक बोलू शकता त्याला तुम्ही म्हणता पारदर्शकता.

जिथे तुम्ही बेधडक वागू शकता त्याला तुम्ही तुमचा बिनधास्तपणा म्हणता.

जिथे शंका किंवा कुशंका येत नाहीत,

जिथे शब्द म्हणजे वज्र असे वाटते ते आणि त्या व्यक्तीचे स्थान हे खूप वेगळ्या स्थरावर असते त्याला तुम्ही परम विश्वास असे म्हणू शकता.

विश्वास हा टाकणे खूप सोपे असते पण आपल्यावर असलेला विश्वास हा टिकवून ठेवणे ही खरी कसरत! अर्थात त्याकरिता काही वेगळे करावे लागते असे मला नाही वाटत कारण जर व्यक्ती मॅटर होत असेल तर तुम्ही तो विश्वास कुठल्याही परिस्थितीत तुटू देणार नाही हे नक्की.

विश्वास जर तुटला तर फक्त विश्वास तुटत नाही तर त्याबरोबर ती व्यक्तीही आतवर तुटलेली असते.

आज मला तुझ्याबद्दल हे कळले!

तो तुझ्याबद्दल ते म्हणाला!

तू असे का केले ?

तू हे का वागलीस?

असे प्रश्न जेव्हा कोणत्याही संबंधात विचारले जातात तेव्हा वाटते की त्या विश्वासाची मुळे अजून पक्की व्हायची आहेत.

कोणी काहीही म्हणू देत, पण मला माहित आहे ती व्यक्ती कशी आहे आणि मला कोणाच्या काही सांगण्याची गरज नाही असे जेव्हा घडते किंवा असते तिथे तो विश्वास हा आपली मुळे खोलवर रुजवून असतो आणि अलगदपणे आपले संबंध सांभाळत असतो.

विश्वासाला असेही म्हणतात की तो आंधळा नसावा पण मग डोळे हे कशाला असतात?

मनाला की विचारांना?

शब्दांना की लिखाणाला?

मी तर म्हणेन की जे आहे ते असेच आहे आणि असेच राहील हा जो कॉन्फिडन्स ज्या नजरेत दिसेल तिथे हा विश्वास आपले घर करून आहे.

कणखर अशा शब्दात जिथे तो आपले अस्तित्व दाखवेल तिथे तो कायम आहे.

जिथे प्रेम आहे तिथे विश्वास नक्कीच आहे.

तर असा हा विश्वास ज्याला सुरवात कुठून झाली हे कळत नसते आणि ज्याला कुठेही अंत ही नसतो मग व्यक्तीचा अंत का होईना.

लहान बाळाला हवेत उंच फेकले की ते हसते पण त्याच्या हसण्यात असतो तो विश्वास की आपण पडणार नाही कारण आपल्याला अलगद झेलणार हे नक्की!

निरागस, अभेद्य असा हा विश्वास फार कमी ठिकाणी मिळतो हे पण नक्की. पण जिथे मिळतो तिथे त्याची किंमत समजून त्याचा रिस्पेक्ट ठेवणे हे खरे महत्वाचे.

आपल्यातील अभेद्य या विश्वासाला कायम ठेऊयात!

©®अमित मेढेकर