अभंगरंग : सुंदर ते ध्यान

सुंदर ते ध्यान


अभंगरंग : सुंदर ते ध्यान

ज्ञानदेवे रचिला पाया , तुका झालासे कळस .

संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलभक्तांच्या संप्रदायाचा पाया घातला, संत नामदेवांनी त्यावर भव्य इमारतीची उभारणी केली आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला असे म्हटले जाते.

आषाढी एकादशीची चाहूल लागताच सर्व वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरीचे. जणू एखाद्या सासुरवाशिणीला माहेराची ओढ लागावी, त्याप्रमाणे वारकऱ्यांना भिवरा म्हणजेच भीमा नदीतीरावर वसलेल्या पंढरीच्या विठूमाऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. वाटेवर लागणाऱ्या गावांमध्ये जेवणासाठी आणि विश्रांतीसाठी काही घटका थांबत, टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग , भजने गात ही दिंडी पंढरीच्या दिशेने पायी मार्गक्रमण करू लागते. गरीब-श्रीमंत, लहान-थोर असा कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता, प्रापंचिक जबाबदाऱ्या काही काळासाठी बाजूला ठेवून प्रत्येक जण भक्तिरसामध्ये चिंब भिजलेला असतो. वारीला जाऊ न शकणारे गावांतले स्थानिक लोकसुद्धा या वारकऱ्यांची आपापल्या परीने सेवा करून एक प्रकारे विठ्ठलभक्तीत सामील होण्याचा आनंदच घेत असतात.

विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले आणि तोच एक ध्यास असलेले भक्तगण विठ्ठलाच्या सगुण रूपाची आराधना करत भक्तिरसाने ओतप्रोत स्वरात आळवू लागतात,

सुंदर ते ध्यान | उभे विटेवरी |
कर कटावरी | ठेवोनिया ||

हे पांडुरंगा, दोन्ही हात कटावरी म्हणजेच कमरेवर ठेवून विटेवर उभे असलेले हे तुझे सगुण साकार रूप अतिशय सुंदर आहे.

तुळसी हार गळा | कांसे पीतांबर |
आवडे निरंतर | तेची रूप ||

गळ्यामध्ये तुळशीमाळ घातलेले , कमरेला पीतांबर म्हणजेच मंगल अशा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले हे पवित्र रूप मला निरंतर भावते.

मकरकुंडले | तळपती श्रवणी |
कंठी कौस्तुभमणी | विराजित ||

मकरकुंडले अर्थात मत्स्य आकार असलेली कर्णभूषणे तुझ्या कानामध्ये शोभून दिसतात. समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक असलेला कौस्तुभ मणी तुझ्या कंठामध्ये विराजमान आहे.

तुका म्हणे माझे | हेची सर्व सुख |
पाहीन श्रीमुख | आवडीने ||

तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता, अशा या श्रीमुखाचे दर्शन करणे, त्यात आवडीने रममाण होणे यातच माझे सुख सामावलेले आहे.

सुंदर ते ध्यान | उभे विटेवरी |
कर कटावरी | ठेवोनिया ||

सुंदर ते ध्यान


वारकऱ्यांची दिंडी मजल दरमजल करीत पंढरपुरास पोहचते. अर्धचंद्राकृती वाहणाऱ्या चंद्रभागा नदीमध्ये भाविक पवित्र स्नान करून पापक्षालन करतात. चंद्रभागेच्या वाळवंटात टाळ, चिपळ्या, मृदंगाच्या गजरात, संतांच्या कीर्तनरंगात , पवित्र नामघोषात पंढरपूर नगरी दुमदुमून जाते. तेथे क्रोध, वर्णाभिमान यांना थारा नसतो. 'अवघा रंग एकचि ' होतो आणि तो म्हणजे भक्तिरंग! असा अनुपम , सुंदर भक्तिसोहळा अनुभवत पुष्पवर्षावात, भक्तिरसात चिंब झालेले वैष्णवजन पांडुरंगाच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेतात. दर्शनाने चित्तवृत्ती प्रसन्न होतात.

विठ्ठलाच्या सगुण रूपाचे ' याचि देही याचि डोळा ' श्रद्धापूर्वक दर्शन करून समाधान पावलेले , तृप्त झालेले भक्तगण पुन्हा पुढच्या वर्षी वारीला येण्याचा मनात संकल्प करतात आणि परतीच्या मार्गाला लागतात.

संत तुकोबारायांच्या 'सुंदर ते ध्यान ' या अभंगरचनेला स्वरसाज दिला आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आणि संगीताचा साज चढवला आहे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. मधुर स्वरातला भक्तिरसाने ओथंबलेला हा अभंग ऐकताना डोळ्यासमोर विठ्ठलाचे सगुण सुंदर रूप साकार होऊ लागते, मन त्याच्या चरणी स्थिर होते आणि अवघे वातावरण भक्तिमय झाल्याशिवाय राहत नाही .

© स्वाती अमोल मुधोळकर