अभंगरंग 2 : राजस सुकुमार

अभंगरंग : राजस सुकुमार मदनाचा पुतळा


अभंगरंग : राजस सुकुमार

राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥

कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥

मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ॥३॥

कांसे सोनसळा पांघरे पांटोळा ।
घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥

सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥

सुकुमार , राजस, तेजस्वी असे त्या विठ्ठलाचे रूप! नुसते सुंदरच नाही , तर मदनाचा पुतळा असून त्याच्या सौंदर्याचे तेज एवढे , की त्यापुढे सूर्य चंद्राचे तेजसुद्धा फिके पडावे. कस्तुरीचा सुगंधी मळवट ,चंदनाचा लेप लावलेला , गळ्यात वैजयंती माळ शोभून दिसते . मस्तकावर मुकुट, कानामध्ये किरिट कुंडले, असे हे श्रीमुख भक्तांच्या सर्व सुखाचे मूळ आहे. कमरेला सोनसळी पीतांबर म्हणजेच पिवळे वस्त्र नेसलेल्या आणि रेशमी वस्त्र पांघरलेल्या स्वरुपातील अशा या नीलवर्णी मेघाप्रमाणे सावळ्या पांडुरंगाचे दर्शन करण्यासाठी सर्वजण एकाग्रचित्त व्हा. मी तर अधीर झालो आहे , याच्या दर्शनास लागणारा थोडाही विलंब माझ्या जीवाला अधीर करतो आहे , असे संत तुकाराम म्हणतात. तुकाराम महाराजांच्या अभिव्यक्तीतील दर्शनाची कळकळ येथे दिसून येते.

आणखी एका अभंगामध्ये ते म्हणतात ,

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
कर कटावरी ठेवोनिया ||

हा सावळा मनोहर पांडुरंग एका विटेवर का उभा असावा बरे?

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर,
पुतळा चैतन्याचा ||

संपूर्ण सृष्टीतील चराचरामध्ये व्यापलेल्या त्या निर्गुण निराकार भगवंताला असे विटेवर का बरे प्रकट व्हावे लागले? त्याला पुंडलिकवरदा असे का म्हटले जाते? त्याच्या अशा विटेवर उभे असण्यामागे एक आख्यायिका आहे.

पुंडलिक नावाचा एक भक्त काशीला जाण्यासाठी मार्गक्रमण करीत होता. तो वाट चुकला. वाटेत ऋषी कुक्कुटस्वामींच्या आश्रमात तो थांबला. त्यांना त्याने काशीला जाण्याचा मार्ग विचारला . ऋषींनी ते तिथे कधी गेलेले नाहीत आणि त्यामुळे मार्ग माहीत नसल्याचे सांगितले. पुंडलिक यावर त्यांची थट्टा करीत उपहासात्मक स्वरात म्हणाला , की त्यांच्यासारख्या ऋषींनी, पवित्र व्यक्तींनी तर काशीला जायलाच हवे होते. परंतु ऋषी त्यांच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये असल्याने ते काशीला गेले नव्हते त्यामुळे ते काही न बोलता शांत राहिले.

त्यानंतर रात्री काही स्त्रियांचा आपसात बोलण्याचा आवाज त्याला आला. आश्रमात तर कोणी स्त्रिया नाहीत, मग आवाज कुठून येतोय ते बघण्यासाठी तो तिकडे आला. तेव्हा त्याला तीन स्त्रिया पाणी शिंपडून ऋषींचा आश्रम स्वच्छ करताना दिसल्या. चौकशीअंती त्या पवित्र नद्या गंगा, यमुना आणि सरस्वती असल्याचे त्याला कळले. त्याला आश्चर्य वाटले , की जरी ऋषींनी काशीला भेट दिली नव्हती, तरीसुध्दा या पवित्र नद्या स्वतः ऋषींचा आश्रम स्वच्छ करण्यासाठी आल्या आहेत. त्या आश्रमाची पवित्रता त्यांनी कायम ठेवली आहे . त्यावर त्यांनी पुंडलिकाला सांगितले, की ऋषींनी आपले जीवन आईवडिलांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे. त्यामुळे त्यांना मोठे पुण्य प्राप्त झाले आहे आणि ते मोक्षगामी आहेत . म्हणून आम्ही त्यांच्या सेवेसाठी आलो आहोत. त्यांनी त्याला समजावले , धर्म हा फक्त पवित्र ठिकाणी भेट देणे किंवा कर्मकांडाचे अवडंबर करणे असा नसून पवित्र कर्म करत राहणे हे धार्मिकतेचे लक्षण आहे.

त्यांचे बोलणे ऐकून पुंडलिकाला आठवले, की त्याने त्याच्या आईवडिलांची काशीला नेण्याची विनंती न मानता, त्यांना तिथेच ठेवून एकटाच काशीला जाऊन पुण्यसंपादन करायला निघाला होता. त्याला आपली चूक उमगली. त्याने परत जाऊन आईवडिलांना काशीला नेले आणि त्यांची प्रामाणिकपणे सेवा करू लागला. त्यात तो एवढा मग्न झाला की त्याच्यावर प्रसन्न होऊन श्रीकृष्ण त्याच्या भेटीला त्याच्या घरी आले आणि दरवाजात उभे राहिले . पण मात्यापित्यांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने सेवेपासून विचलित न होता त्यांच्याकडे बाजूलाच असलेली एक वीट फेकत त्यांना थोडा वेळ प्रतीक्षा करण्यास सांगितले. श्रीकृष्ण कमरेवर दोन्ही हात ठेवून त्या विटेवर प्रतीक्षा करीत उभे राहिले. अतिथी म्हणून कोणी माणूस आला आहे की साक्षात भगवान , हेसुद्धा बघण्यापलिकडे पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीची अवस्था पोचली होती.

काही वेळाने बाहेर येऊन त्याने प्रतीक्षा करावी लागल्याबद्दल क्षमा मागितली. श्रीकृष्णाने त्याच्या असीम भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला एक वर मागण्यास सांगितले. त्यावर पुंडलिक म्हणाला,

"साक्षात भगवंत मला भेटायला माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिल्यावर मला आणखी काही मागण्याची आवश्यकताही नाही. "

तरीही श्रीकृष्णाने आग्रह केल्यानंतर पुंडलिकाने वर मागितला, की देवा, तुम्ही इथेच पृथ्वीवर राहून तुमच्या भक्तांवर छत्रछाया ठेवा . तेव्हा श्रीकृष्णाने तो मान्य करत विठोबा या रूपामध्ये निवास करीन असे सांगितले. तेव्हापासून दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभे राहिलेले विठोबाचे स्वयंभू रूप अस्तित्वात आले आणि पुंडलिकवरदा असेही विठ्ठलाला संबोधण्यात येते.

© स्वाती अमोल मुधोळकर

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

🎭 Series Post

View all