Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

अबला नाही ती सबला

Read Later
अबला नाही ती सबला
कथेचे नाव- अबला नाही ती सबला

विषय- स्री आणि परावलंबित्व.

फेरी- राज्यस्तरीय लघुकथा लेखन स्पर्धा.


"नाही जगायचं मला, सोडा जावू द्या, जगून तरी काय करु आता?? जिथे आपल्याच माणसाकडून इतका मोठा विश्वासघात केला जात असेल तर अशा जगण्याला काय अर्थ आहे?"

सगळं काही आता मीराच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. सोन्यासारखा एक गोंडस मुलगा, पैसा,अडका सारं काही होतं. कसली म्हणून कमी नव्हती. पण नव्हतं ते म्हणजे नवऱ्याचं सुख. त्याचं प्रेम, प्रेमाचे दोन शब्द. तिचं आयुष्यच जणू उध्वस्त झालं होतं. 
नवऱ्याच्या प्रेमाच्या दोन शब्दांसाठी, त्याच्या मायेच्या एका मिठीसाठी ती आसुसलेली होती. पण मीराचे नशीबच जणू फुटके.

महेश अत्यंत श्रीमंत घरातला मुलगा. आई वडील, दोन भाऊ आणि एक बहिण असा त्याचा परिवार. स्वतःच्या  मालकीचे हॉटेल, कापड दुकान, सात आठ एकर शेती, दोन भावांसाठी घेतलेले दोन फ्लॅट्स, आणि सद्ध्या राहत असलेले त्याचे भलेमोठे घर.अशी त्याची वडिलोपार्जित संपत्ती. घरची आर्थिक बाजू अगदी भक्कम होती.

अशातच मीराला महेशचे स्थळ सांगून आले. मीराचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते.
आता एवढी संपत्ती आहे म्हटल्यावर "आपली मीरा या घरात राणी सारखी राहील." त्यामुळे लगेचच होकार कळवून टाकला मीराच्या घरच्यांनी. महेशलाही मीरा पाहताच क्षणी पसंत पडली. त्यामुळे चारच दिवसांत साखरपुडा आणि पंधरा दिवसांत लग्नही झाले.

लग्नानंतर लगेचच महेश मीराला घेवून त्याच्या नव्या फ्लॅटवर शिफ्ट झाला. कापड दुकानाचे काम तो पाहायचा आणि हॉटेलवर त्याचा भाऊ असायचा.

लग्नानंतर एकच वर्षात बाळाची चाहूल लागली. मीरा एकटी होती. पण घरकामाला बाई असल्यामुळे मीराला काहीही करावे लागत नव्हते. स्वयंपाकाला देखील बाई होती.

पाहताक्षणी राजाच्या राणी सारखा थाट वाटायचा मीराचा.पण या दिवसांत मीराच्या स्वभावातील बदल, तिचे होणारे मुड स्विंग्ज जपायला महेशला मात्र वेळ नव्हता. त्याचे म्हणावे तसे तिच्याकडे लक्ष नव्हते. घरात आलं की फक्त मोबाईलमध्ये बिझी असायचा तो. मीराला खूप त्रास व्हायचा महेशच्या या वागण्याचा. पण शब्दाने शब्द वाढतो म्हणून मग तीही गप्प बसण्यातच शहाणपण मानायची. 

महेशचे दारुचे व्यसनही आता मीरापासून लपून राहिले नाही. मीरालाही त्याचा अनुभव दिवसागणिक येतच होता. पण सध्या ती फक्त आणि फक्त बाळाचाच विचार करुन स्वतःला आनंदी ठेवत होती. मनाला वारंवार समजावत होती. ह्या साऱ्या गोष्टी माहेरी, आजूबाजूला कोणाला समजू नये यासाठी ती धडपडत राहायची.

बघता बघता मीराचे नऊ महिने पूर्ण झाले नि गोंडस असा राजकुमार जन्माला आला. सगळं कसं अगदी मनासारखं घडत असल्याचं समाधान साऱ्यांच्याच चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
पण मीराला मात्र महेशच्या वागण्यात हळूहळू खूपच बदल होत असल्याचे जाणवत होते. असेल काही टेन्शन म्हणून तिनेही जास्त खोलात जाण्याचा कधी प्रयत्न केलाच नाही.

पण हळूहळू महेशचा संशयी स्वभाव साऱ्यांनीच हेरला. मीराला माहेरी जास्त दिवस राहण्याची महेश कधीच परवानगी द्यायचा नाही. आला तरी तो तिच्यासोबत यायचा आणि एक दोन तास थांबून लगेच मीराला सोबतच घेवून जायचा.

बाळंतपणात मीरा माहेरी आली. पण महेशने एक महिन्याच्या वर तिला तिकडे राहू दिले नाही. का कोण जाणे पण विनाकारण तो मीरावर संशय घ्यायचा. संशयाचे भूत असे काही त्याच्या मानगुटीवर बसले होते की त्यामुळे मीराचे जगणे मात्र मुश्किल झाले होते.

खरंच, "जसं दिसतं तसं अजिबात नसतं." हे काही खोटं नाही. पैसा, श्रीमंती हे जरी असले तरी माणूस जर समाधानीच नसेल तर त्याचा काय उपयोग?

"महेशचे नेमके काय सुरु आहे? हा अचानक एवढा कसा बदलला? इतका अविचाराने आणि विचित्र का वागत आहे हा?  की हा असाच आहे पण हे मला कळायला उशीर झाला?"

अखेर मीराचा संशय खरा ठरला. एकदा एका अनोळखी नंबर वरून फोन आला महेशच्या फोन वर. महेश आंघोळीला गेला होता. म्हणून मीराने तो कॉल उचलला.

"अरे मी पोहोचलिये इथे, तुला किती वेळ लागेल अजून?"

आता मीराचा संशय खात्रीत बदलला. "हा तर पुण्याला निघाला होता दुकानातील माल आणायला. मग ही बाई बोलतिये ती कोण?" मीरा विचारात पडली.

"कोण आपण .?" मीराने प्रतिप्रश्न केला?

तसा पलीकडून काहीही न बोलता फोन कट करण्यात आला.
तेवढ्यात महेश बाहेर आला.
" माझा फोन उचलायची हिम्मत कशी केलीस तू?"
एवढेच नाही तर त्याला राग इतका अनावर झाला की त्याने मीरावर हात उचलला.
हाच होता महेशचा मूळ स्वभाव. स्वतःच्या थोडं जरी मनाविरुद्ध झालं की लगेच आकांडतांडव करुन तो मोकळा व्हायचा. आणि त्यात तर आता त्याचे पितळच उघडे पडले होते मीरासमोर.

पण खरं सांगून स्वतःची चूक मान्य करणाऱ्यातला महेश नव्हता.

"एक बडे बाप की बिघडी हुई औलाद" असे महेशच्या बाबतीत म्हणायला हरकत नव्हते.

त्यात आतातर रोज महेशकडून मीराचा फोन चेक केला जायचा. "कोणत्याही पुरुषांशी जास्त बोलायचे नाही. मित्र असलेले, त्यांच्याशी बोललेले मला चालणार नाही." या अशा कडक शब्दांत मीराला धमकी द्यायलाही त्याने मागे पुढे पाहिले नाही.

पण त्याने स्वतः मात्र बाहेर अफेअर्स केली तरी त्याला मात्र कोणी काहीही बोलायचे नाही. स्वतः जेव्हा माणूस पाप करतो तेव्हा त्याला संपूर्ण जगही पापीच दिसत असते. असे काहीसे झाले होते महेशचे.
मीराची खूप चिडचिड व्हायची.पण छोट्या मिहिरकडे पाहून तिला धीर यायचा. त्याच्याकडेच पाहून तिला जगण्याचे नवे बळ मिळायचे.
"सुधारेल महेश आज ना उद्या." त्या एका दिवसाची ती आशेने वाट पाहत होती.

अशा परिस्थितीत एक स्री खूप हतबल होवून जाते. ती धड जगूही शकत नाही आणि मरुही शकत नाही. परंतु, पोटच्या गोळ्यासाठी तिला जगावेच लागते. मीरादेखील जगत होती फक्त आणि फक्त मीहिरसाठी. नाहीतर जगण्याची तिची आशा केव्हाच विरली होती.

महेशचे नेमके काय सुरु आहे बाहेर? आता तर आधीच्या प्रसंगामुळे तो सावध झाला होता. चुकूनही आता मोबाईल मीराच्या हातात पडणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत होता.  त्यामुळे मीराला काही अंदाजच येत नव्हता. रात्री उशिरापर्यंत घरीदेखील यायचा नाही तो. आणि आल्यानंतर मीरासोबत भांडण हे ठरलेलेच असायचे.

मीराचे एक मन म्हणायचे, "सरळ घटस्फोट घ्यावा नि मोकळं व्हावं या साऱ्या बंधनातून. तसंही या अशा नात्याला अर्थच काय आहे? पण मग मिहिरचे काय? त्याच्या भविष्याची काय तरतूद.? घरातील अशा सततच्या वादामुळे त्याच्यावर काय आणि कसे संस्कार करायचे?"
हे आणि असे अनेक मोठे यक्ष प्रश्न आ वासून पुढे उभे होते मीराच्या.

आज खऱ्या अर्थाने एका स्त्रीची हतबलता, तिचे परावलंबित्व पुन्हा सिद्ध झाले होते. त्याच्याशिवाय ती काहीच करु शकत नाही हेच सिद्ध होत होते. अशावेळी "इकडे आड नि तिकडे विहीर अशीच काहीशी अवस्था होते स्रीची."

महेशसोबत राहण्याची इच्छा नसतानाही आज मीराकडे दुसरा पर्यायच नव्हता.
आणि घेतलाच जर महेशपासून काडीमोड तर "मला माझ्या मुलाला सरळमार्गी जगू देईल हा समाज? त्याबरोबरच जगण्यासाठी लागतो तो पैसा, तो कसा आणि कुठून आणायचा.? मिहिरच्या भविष्याची चिंता ही  सतत सतावीत होती मीराला. आज खरंच तिला स्वतःचाच खूप राग येत होता. का नाही मी पुढे शिक्षण घेतले.? का नाही दोन पैसे कमावण्यासाठी धडपड केली त्यावेळी?
नवरा पैसेवाला भेटला, आर्थिक सुबत्ता लाभली लग्नानंतर आता काही गरजच नाही स्वतः कमावण्याची या अशा सामाजिक विचारसरणीला मी खरंच स्वतःहून बळी पडले.

"आता मिहिरही हळूहळू मोठा होत होता. त्यालाही आता आई बाबांमधील भांडणाची जणू सवयच झाली होती. महेशबदल आता मिहिरच्या मनात खूप भीती निर्माण झाली होती.

त्याच्या शिक्षणाचा खर्चही दिवसागणिक वाढत होता. त्याला जर उत्तम शिक्षण द्यायचे असेल तर मला महेशशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. पण मग उत्तम शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कारांचीही गरज असते एक उत्तम नागरिक घडवायला. आणि फक्त शिक्षण दिले पण योग्य संस्कारच जर त्याला मिळाले नाहीत तर काय उपयोग मग त्या शिक्षणाचा.?"

विचार करुन करुन मीराचे डोके बंद झाले होते. "या अशा वातावरणात मी मिहिरला नाही घडवू शकत आणि बाहेर पडले तर समाजाच्या नजरेला, त्यांच्या प्रश्नांनादेखील नाही उत्तर देवू शकत मी." रात्रंदिवस फक्त आणि फक्त विचार करत होती मीरा. खूप दिवसांत तिला शांत झोप अशी लागलीच नाही.

महेशनेदेखील आता बायको म्हणून मीराचा खूपच तिरस्कार करायला सुरुवात केली होती. कारण दोघांमध्ये संवाद हा फक्त वादापुरताच मर्यादित होता. बायको म्हणून तिला तो आता कोणताच अधिकार देत नव्हता. रात्री उशिरा घरी आला की स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायचा. सकाळी आवरले की घराबाहेर पडायचा.
" कुठे जात आहात? " हे विचारायचा अधिकार देखील मीराला नव्हता. आणि चुकून जर विचारलेच तिने तर "तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही. मला अजिबात हे असे प्रश्न विचारायचे नाहीत."

"मी कुठे जातो? काय करतो? रात्री उशिरापर्यंत बाहेर कुठे असतो? हे विचारु पण नको आणि मी सांगणार पण नाही. तुम्हाला दोघांना काही कमी केलंय का मी? खाणं, पिणं, कपडे, दागदागिने, पैसा-अडका सारं काही अगदी भरभरून देतोय ना? मग जगण्यासाठी हे सगळं अति झालं. त्यामुळे खाता येत असेल तर खा नाहीतर चालू पड." अशा उद्धट आणि उर्मट भाषेत महेश तिचा मानसिक छळ करत होता. पण मिहिरमुळे मीराही हतबल झाली होती. एकटी असती तर कदाचित कोणताही विचार न करता तिने तिचे आयुष्य संपवलेही असते. पण फक्त लेकरासाठी तिला जगणे भाग होते.

खरंच, आई वडील आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी एक चांगला, कमवता मुलगा पाहून तिचे लग्न लावून देतात. मुलाच्याही आधी त्याची प्रॉपर्टी पाहिली जाते.
पण यामुळे तिला स्वतः जगण्यासाठी धडपड करण्याची मग गरजच पडत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तिला नवऱ्यापुढे हात पसरावे लागतात.
आणि इथेच तिच्यावर जणू आपण उपकारच करत आहोत असा समज महेशसारखे काही नवरे करुन घेतात. "आपल्याशिवाय ही काहीच करु शकत नाही." हा समज मनात बाळगून तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जातो. आणि तिलादेखील हे सारं काही सहन करण्याशिवाय मग पर्यायच नसतो. कारण त्यावेळी ती फक्त एक बायको आणि त्या घरची सून नसते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक "आई" असते. आपल्या मुलांसाठी ती स्वतःला कितीही त्रास झाला तरी तो सहन करण्याची तयारी ठेवते.

ह्या गोष्टीसाठीदेखील आपल्या आजूबाजूचा समाजच जबाबदार असतो. कारण पुरुषाने कितीही चुका केल्या तरी त्याच्या चुका दुर्लक्षित ठरतात. पण स्त्रीने न केलेल्या चुकीची देखील तिला शिक्षा भोगावी लागते. पुन्हा मग हाच समाज उभा राहतो तिला नावे ठेवण्यासाठी. पण कुणी तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न तरी करतं का हो??

"स्री म्हणजे अबला."
"ही परिस्थिती तेव्हाच बदलेल जेव्हा प्रत्येक आईवडील आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसा गुंतवून न ठेवता तिला तिच्या पायावर उभे करण्यासाठी वाटेल तितका पैसा खर्च करण्याची तयारी ठेवतील."

जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी राहील तेव्हा मग तिलाही असे परावलंबी जीवन जगावेच लागणार नाही. आणि त्याबरोबरच फक्त आर्थिकदृष्ट्या तिला सक्षम करण्यासाठी पालकांनी शिक्षण न देता स्वसंरक्षणाचे धडेही लहान वयातच द्यायला हवेत. म्हणजे पुढे जावून तिच्यावर जर काही वाईट प्रसंग ओढवलाच तर ती स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वतः सक्षम असेल. तेव्हाही मग तिला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.

एके दिवशी नेहमीप्रमाणे मीरा आणि महेश मध्ये वाद झाले. आता मला तुझ्यासोबत राहायचेच नाही. मोकळं कर मला या बंधनातून म्हणत महेशने तिच्याकडे तगादा लावला. तिला मारहाण देखील केली. मीरा मिहिरला घेवून त्याच दिवशी माहेरी निघून गेली.

आता मीरा तर खूपच हतबल झाली होती. "सारं काही संपवून टाकावं एका क्षणात. जगून आता काहीच उपयोग नाही."
नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात सुरु होते. शेवटी आई वडिलांनी "आमचीच चूक झाली, चांगले स्थळ आहे म्हणून आम्हीच तुझ्या लग्नाची घाई केली नसती तर आज ही वेळच आली नसती. आम्हाला माफ कर मीरा" म्हणत त्यांनी मीरासमोर  हात जोडले.
"आमच्यासाठी नाही निदान ह्या लेकरासाठी तरी तुला पुन्हा उभे राहावेच लागेल. निदान त्याचा तरी विचार करुन टोकाचे पाऊल उचलू नकोस बाळा. आम्ही अजून इतकेही म्हातारे नाही झालोत. तुला सांभाळायची अजूनही धमक आहे या मनगटात."

आई वडीलांनी कशीबशी मीराची समजूत काढली. "वेळ आली होती पण काळ आला नव्हता."
त्याक्षणी परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की मीराने  स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करुन घेतले असते. पण आई वडिलांनी वेळीच प्रसंगावधान राखत तिचे मन वळवले.

महेशविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याच्याकडून घटस्फोट मिळवला. आणि मिहिरच्या भविष्याची तरतूद म्हणून त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आणि महेशच्या हिश्श्यातील अर्धी प्रॉपर्टी मिहिरच्या नावावर करण्याचे ठरले. पण मीराने "आता आणखी उपकार नको मला. आणि महेशचे तर नकोच नको." म्हणत सारं काही नाकारलं. माहित नाही तिच्यात हे बळ कुठून आणि कसं आलं? कदाचित परिस्थितीनेच तिला खूप काही शिकवलं होतं. नको आता हे परवलंबन. जे काही करील ते स्वतःच्या हिमतीवर असा निश्चय मनाशी पक्का केला.

पुढची लढाई मात्र आता मीराला एकटीनेच लढायची होती. एवढ्या मोठ्या प्रसंगातून मीराला आयुष्यभराची शिकवण  मिळाली होती. आता मात्र तिचे डोळे खाडकन उघडले होते. मीराला आता आई वडिलांशिवाय दुसरा कोणाचाच आधार नव्हता. पण पुन्हा आता तिला तीच चूक करायची नव्हती. नकोच ते परावलंबी जीवन. आई वडील थोडीच ना आपल्या आयुष्याला पुरणार आहेत. आणि भावाच्या संसारात आपली अजिबात लुडबुड नको. असे तिला मनापासून वाटत होते.

"स्री म्हणजे अबला" हे वाक्य आता तिला खोडून काढायचे होते. तिने माहेरी न राहता मिहिरच्या शाळेजवळ एक खोली भाड्याने घेतली. शाळा अगदी जवळ असल्याने मिहिरचा बसचा खर्चही वाचणार होता.
उदरनिर्वाहासाठी सकाळ संध्याकाळ मग तिने मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. बघता बघता पाच, दहा, चाळीस, पन्नास आणि दोन महिन्यातच हा आकडा शंभर ते दीडशे मुलांपर्यंत पोहोचला होता. हळूहळू का होईना पण तिला जगण्याचे साधन मिळाले होते. स्वतःचे आणि मिहीरचे पोट भरण्याइतपत ती आता सक्षम झाली होती. पाण्यात पडल्यावर माणूस आपोआपच पोहायला शिकतो. याचा प्रत्यय आता मीराला येत होता.

त्याबरोबरच मीराने स्पर्धा परीक्षांचा अभ्यासदेखील सुरु केला. सुरुवातीला खूप कठीण प्रसंगातून तिला जावे लागले. कारण पुन्हा एकदा हाच समाज तिला पुढे जाण्यापासून रोखू पाहत होता. एकटी स्री म्हटलं की खूप साऱ्या अग्निपरीक्षांचा सामना करावा लागतो. पण आयुष्याने आणि तिच्या मातृत्वाने तिला आता जगण्याचे नवे बळ दिले होते.

एकीकडे मुलांची शिकवणी आणि दुसरीकडे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ती मनापासून करत होती. म्हणतात ना मनापासून केलेल्या प्रत्येक गोष्टीचे फळ हे मिळतेच. ते मीरालाही मिळणार यात आता शंकाच नव्हती. कारण कष्ट करण्याची तिची मनाची पूर्ण तयारी होती. रात्र रात्र जागून तिचा अभ्यास सुरु होता. शिक्षणात खूप गॅप झाल्यामुळे तिला शून्यातून सुरुवात करावी लागली खरी पण आता कोणतेही आव्हान जिद्दीने पेलण्याचं सामर्थ्य मात्र परिस्थितीने तिच्यात निर्माण केलं होतं. दोन वर्ष तिचा हा संघर्ष सुरु होता.

शेवटी प्रामाणिक यशाचे गोड फळ मीराच्या पदरी पडलेच. मंत्रालयात "सहाय्यक लिपिक" या पदावर तिची नियुक्ती झाली. आणि जिद्दीने तिचा संघर्षमय प्रवास तिने आज यशाच्या द्वारी पोहोचवला होता.

कोण म्हणतं स्री परावलंबी असते.?
एका संपूर्ण पिढीला घडवणारी खरी सबला तर तीच असते.
समाजाने आखून दिलेल्या एका चौकटीत तिचे जीवन बंदिस्त  असते पण तरीही मातृत्वाच्या तसेच कुटुंबाच्या एका अनोख्या बंधनात ती जगभराचा आनंद शोधते. आज ती आहे म्हणून घराला घरपण आहे अन्यथा तिच्याशिवाय सारे काही व्यर्थ आहे.
जेव्हा तिच्या लेकरावर वाईट वेळ येते तेव्हाच तिच्यातील खरी आई जागी होते. येणाऱ्या संकटांना मग धैर्याने सामोरे जाण्याचे बळ आपसूकच तिच्यात निर्माण होते.

बायकोच्या मृत्यूनंतर नवरा एकवेळ दुसरं लग्न करेल पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर कोणतीही स्री दुसरे लग्न करण्याचा विचारही मनात आणत नाही. जिद्दीने पुन्हा ती उभी राहते. प्रत्येक आव्हान धैर्याने पेलते. आणि एवढेच नाही तर आपल्या लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवते. रडते, पडते, धडपडते पण मनाचा निर्धार करुन जिद्दीने पुन्हा उभी राहतेच.मग खरंच तिला अबला म्हणता येईल का??

समाप्त.

धन्यवाद..

©® कविता सुयोग वायकर
(टीम पुणे)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//