आयुष्याच्या या वळणावर

आजही संध्याकाळी जेवायला घरी कोणीच नव्हतं, राधिकाने तिच आणि सासूबाईंच्या ताट वाढून घेतलं, दोघीजणी टीव्ही बघत जेवायला बसल्या,आयुष्याच्या या वळणावर

©️®️शिल्पा सुतार
........

आजही संध्याकाळी जेवायला घरी कोणीच नव्हतं, राधिकाने तिच आणि सासूबाईंच्या ताट वाढून घेतलं, दोघीजणी टीव्ही बघत जेवायला बसल्या,

"काय झालं आज हे तिघेही नाहीत का जेवायला?",..आशा ताई

"नाही आई यांना उशीर होणार आहे ऑफिसहुन यायला, प्रीती पिकनिकला गेली आहे आणि सौरभ मित्रांबरोबर बाहेर जेवायला गेला आहे",.. राधिका

"अग पण आज तुझा वाढदिवस होता हे तरी लक्षात ठेवायचं ना त्यांनी, थांबू या का थोड्या वेळ आपण ",..आशा ताई

"जाऊद्या आई तुमच्या लक्षात आहे ना हेच खूप झालं, तुम्ही मला आज तुमची आवडती ठेवणीतली एवढी महाग बनारसी साडी प्रेझेंट दिली, नथ दिली, अजून काय हवं",.. राधिका

" अगं पण ती साडी जुनीच आहे आज फक्त मी तुला दिली, अजुन मी काय करू शकते ग मी, माझ्याकडे नसतात ग पैसे ",.. आशा ताई

" कौतुक केलं त्या गोष्टीला महत्त्व आहे आई ",... राधिका

दोघींचं जेवण झालं, रमेश ऑफिसहून आला, आशा ताई समोरच बघून टीव्ही बसून टीव्ही बघत होत्या, रमेश आवरून आला, राधीकाने त्याच ताट वाढुन आणलं

" अरे व्वा आज भरपूर प्रकार केले आहेत की जेवायला, श्रीखंड पुरी छोले, काय विशेष आज? कोणी आलं होतं का जेवायला? मुलं कुठे आहेत",...रमेश

"प्रीती पिकनिकला गेली आहे लक्षात नाही का तुमच्या? सौरभ मित्रांबरोबर बाहेर गेलेला आहे",... राधिका

"मुलांचं काय चाललय हे माहिती नसत तुला रमेश ? आता हल्ली काहीही लक्षात राहत नाही रमेशच्या",.. आशा ताई

" आई काय झालं आहे? काही चुकलं का माझं? ",.. रमेश

"हो चुकल आहे खूपच",.. आशा ताई

"काय झालं? ",.. रमेश

"आज राधिकाचा वाढदिवस होता हे विसरलास का तू, मूल ही तशीच, तुम्ही काय नीट वागयच नाही अस ठरवल का?, राधिका कधी काही बोलते का तुम्हाला, नेहमी तुमच आवरत असते तुमच कोडकौतुक करते, निदान तिचा आजचा महत्वाचा दिवस तरी विसरायला नको होता तू ",... आशा ताई

" जावू द्या ना आई",.. राधिका

रमेश राधीका कडे बघतच बसला... मुद्दाम केल का मी हे आई?

घरात कोणीच नाही नेमकं राधिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि राधिकाने पूर्वीपासून आमचे वाढदिवस किती जोरात साजरे केले आहेत, केक, खाण्याचे आवडते पदार्थ, गिफ्ट, घराची सजावट, सगळं सगळं, आई-बाबांचे वाढदिवसही जातीने साजरे केले आहेत आणि तिचा वाढदिवस मात्र कुणाच्याच लक्षात नाही

रमेश उठला राधिका जवळ गेला,.. "मला माफ कर राधिका, अगदी एक आठवड्या पर्यंत लक्षात होत मला, वाढदिवसाच्या नेमकं दोन दिवस आधी एवढा बिझी झालो मी विसरूनच गेलो, आपण या वीकेंडला नक्की तुझा वाढदिवस साजरा करू",

"ठीक आहे हो काही हरकत नाही, नाहीतरी काय विशेष गोष्ट आहे ही, आईंनी लक्ष दिलं म्हणून नाही तर मी सांगणारच नव्हती आणि आजचा अर्धाच्यावरती स्वयंपाक आईंनीच केला आहे",... राधिका

" अग मग काय झालं दुसर काय करणार मी तुझ्या साठी स्पेशल",. आशा ताई

जेवण झालं रमेशने प्रीती आणि सौरभला मेसेज केला की आज आईचा वाढदिवस होता, दोघांचे लागोपाठ फोन आले,.." सांगितलं का नाही आई वाढदिवस होता तर ",

" दरवर्षी काय सांगायचं तुम्हाला वाढदिवस आहे हे, तुम्ही सांगतात का मला तुमचा वाढदिवस आहे अस, मला बर लक्षात राहत सगळ आणि माझा असा हट्टच नाहीये की माझा वाढदिवस साजरा करा, कशाला टेन्शन घेत आहात",... राधिका

रमेशने लगेच ऑनलाइन केक बुक केला, रात्री साडे अकरा बाराला तो केक आला, तोपर्यंत राधिका झोपून गेली होती, तो केक तसाच फ्रिज मध्ये राहिला, दुसऱ्या दिवशी आवरून रमेश आणि सौरभ ऑफिसला निघून गेले, प्रीती अजून आलेले नव्हती

राधिकाने तयारी केली,.." चला आई आपण दोघे जात आहोत बाहेर फिरायला",

कुठे ग...

"आज माझ्या किटी पार्टीच्या मैत्रिणींकडून वाढदिवसाची पार्टी आहे",... राधिका

"अगं मी का येऊ का तुमच्या मैत्रिणींमध्ये, कर तू एन्जॉय",... आशा ताई

"चला हो आई मजा येते, फक्त माझ्या मैत्रिणींना सांगू नका की काल माझा वाढदिवस कोणाच्याच लक्षात नव्हता ",... राधिका

"ठीक आहे",... दोघीजणी वाढदिवसाला गेल्या, खूप मजा आली तिकडे, मैत्रिणी खूप चिडवत होत्या, काय केल मग काल? काय गिफ्ट मिळाल, राधिका हसुन उत्तर देत होती

मस्त लंच करून घरी आल्या,

संध्याकाळी प्रिती आली, तिने राधिका साठी गिफ्ट आणलं होतं, सौरभही लवकर आला ऑफिसहहुन बहुतेक त्या तिघांचं काहीतरी ठरलं असेल

"आई आज आपण सगळे डिनरला जात आहोत",.. सौरभ

"नको मी नाही येत, मी दुपारीच बाहेर जेवले",.. राधिका

"का ग तुला राग आला का आई ?",.. प्रिति

"नाही राग आला, आम्ही खरच दुपारीच बाहेर जेवलेलो आहोत, सारखं बाहेरचा आम्हाला पचत नाही",.. राधिका

"आजी पण आली होती का तुझ्यासोबत?",.. प्रिति

"हो त्यांनाही नेलं होतं मी सोबत, आपण विकेंडला जाऊ आणि मला खरंच राग आलेला नाही",.. राधिका

" अशी कशी ग तू सोशिक",.. आशा ताई

आपल्या माणसांचा काय राग करू, प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे मी, जर मी चिडले रुसले तर काय होणार आहे? त्याने मलाच त्रास होईल, नाही तरी पुढच्या वर्षी तुम्हाला कोणाला खरच माझा वाढदिवस लक्ष्यात रहाणार आहे का? त्या पेक्षा मी अस ठरवल की या पुढे कोणत्याही गोष्टीच टेंशन घ्यायच नाही, मी आणि सासुबाई मस्त राहणार आहोत, तुम्हाला तिघांना नाही वेळ तर it\"s ok, , सगळे इंडिपेनडंट आहेत मोठे आहेत, मस्त रहा, एन्जॉय करा

"अरे आई ला काय झालं? एकदम कूल एटीट्यूड",.. प्रिति

" हर्ट झाली का ती आपल्या वागण्यामुळे ? काही समजत नाही",.. सौरभ

"चिडलेली तर वाटत नाही ती",. प्रिति

थोड्या वर्षापूर्वी राधिका अशी नव्हती प्रत्येक गोष्टीचा टेन्शन घ्यायची ती, सगळ्या गोष्टी मनाला लावून घ्यायची ती, अगदी थोड जरी कोणी काही बोललं तर डोळ्यातलं घळाघळा पाणी तयार असायचं तिच्या, बऱ्याच वेळा ती हास्याचा विषय बनायची यामुळे, काहीही टीव्हीवर इमोशनल सीन असू दे हीच रडणं ठरलेलंच असायचं, घरातील सगळ्यात वीक कॅंडिडेट म्हणून तिचं नामकरण झालं होतं आत्तापर्यंत,

प्रीती सौरभ यांच्या आसपास तिचं जग होतं, सकाळी मुलं शाळेत गेले की नवर्‍याला काय हवे नको ते बघायच, नंतर सासू-सासरे यांच बघण, तिचं जेवण, संध्याकाळी मुल आले की त्यांचा अभ्यास, सगळ्यांचा स्वयंपाक, सगळ्यांच जेवण हेच तिचं जग होतं, त्यात तिने स्वतःला गुरफटून घेतलं होतं, घरात सगळ्यांना वरून जीव ओवाळून टाकला होता तिने,

मुलं मोठी झाली तसे मुलं प्रॅक्टिकल होत गेले, आपल्यावर कोणीही अवलंबून नाही आहे ही गोष्ट सुरुवातीला राधिकाला पचायला खूप जड गेली, मुल पुढच्या शिक्षणासाठी होस्टेलला चालले गेले, तेव्हा किती तब्येत खराब करून घेतली होतो तिने, रडून रडून त्रास करून घेतला होता, सगळे समजवून थकले होते

वयामानाने सासरे वारले, घरात त्या दोघी असायच्या आता, सासू सुना, राधिका आणि आशा ताई यांची गट्टी जमली होती, आशा ताई होत्या तश्या चांगल्या, खूप छान समजून घ्यायच्या राधिकाला

मुलांच शिक्षण झाल त्यांना नोकऱ्या लागल्या, आता बऱ्यापैकी ते त्यांचा वेळ स्वतः घालवत होते, राधिकाला हे समजून चुकलं होतं की मुलांमध्ये जास्त जीव टाकण्यात काही अर्थ नाही, तिने तिचा छंद जोपासला होता , बर्‍याच मैत्रिणी मिळाल्या होत्या तिला, आता ती खुश होती, घरच्यांना तेही खूप आश्चर्य वाटत होत, मोकळ राहूच नाही का आईने, ती आनंदी असली तरी प्रॉब्लेम, दुःखी असली तरी प्रॉब्लेम,

प्रीतीने ऑफिस मध्ये मुलगा पसंत केला लग्नासाठी, तिने येवून राधिकाला सांगितल, तिचा होकार होता, आक्षेप घ्यायचा प्रश्न नव्हता, जरी आक्षेप घेतला असता तरी प्रीती थोडी ऐकणार होती तीच, रमेश जरा चिडले, खूप बोलले प्रीतीला, राधिकाने त्यात भाग घेतला नाही नंतर ते दोघ एकत्र होतील आपण वाईट ठरू, करू दे त्यांचे प्रॉब्लेम त्यांना साॅल्व

सौरभ प्रीती प्रमाणे वागत होता, आता हल्ली वडिलांच ऐकत नव्हता तो , त्याने त्याच्या सॅलरीचे पैशांची गुंतवणुक सुरू केली, रमेश त्याला सल्ला देत होते, मी सांगतो ते ऐक

"बाबा पुरे झाल तुम्ही मला काहीही सांगू नका, मी बरोबर करतो आहे, तुमच्या आयडिया जुन्या झाल्या आता" ,.. सौरभ

एका महिन्यात सौरभने अमेरिकेत नौकरी बघितली, तो तिकडे निघून गेला

राधिका, आशा ताई, रमेश एअरपोर्टवर गेले होते या वेळी रमेश सगळ्यात जास्त भावूक झाले होते, ठीक आहे हो मुलांच्या प्रगतीच्या आड आपण नाही यायला पाहिजे, नका त्रास करून घेवू

रमेश साठी हा धक्का मोठा होता, घरातील महत्वाच पद त्याच्या हातातून जात होत, कोणीही आपल ऐकत नाही, ऑफिस मध्ये ही आता वयस्कर लोकांना आता विशेष काम नव्हत,

घरी ही तेच झाल राधिका आपली आधी सारखी वाट बघत नाही, आपल्याला लवकर घरी ये म्हणत नाही, त्यामुळे रमेश जरा रागवलेलाच होता, जेवण झाल्यावर तो बेडरूम मध्ये जाऊन बसला, राधिकाच आवरलं, ती खोलीत आली,

"राधिका इकडे ये मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, तू मला आता हवा तेवढा वेळ देत नाही",.. रमेश

"हे तुम्ही बोलत आहात का? मी पुर्वी जेव्हा बोलायची मला थोडा वेळ द्या समजून घ्या, तेव्हा तुम्ही मला स्पष्ट सांगून टाकलं होतं की मी आता ऑफिसमध्ये लक्ष देणार आणि मला ऑफिसच काम जास्त महत्त्वाचं वाटत आहे, तु माझ्यातुन थोडं लक्ष कमी कर, तुझ रडंगाण पुरे आता, मग मी आता माझी एकटी राहायची सवय करून घेतली आहे, तर याचा ही तुम्हाला त्रास होतो आहे जे चाललं आहे ते असं चालू द्या, आता उगाच परत ते एकत्र राहण नकोच, परत तुम्हाला तुमचं काम आठवलं तर तुम्ही बिझी होवुन जाणार, मी काय करू",.. राधिका ने झोपून घेतल

रमेश बर्‍याच वेळ विचार करत होते काय झाल हे, राधिका यातून गेली आहे, किती त्रास झाला असेल तिला, मी समजून घ्यायला हव होत तिला, चुकल माझ आता मी न सांगता नीट वागेन

रमेश बर्‍या पैकी वेळेत घरी येत होते आता, आल्यावर ते राधिकाला वेळ द्यायचे, आशा ताईंशी बोलत बसायचे, तिघ पिक्चरला जायचे, कधी राधिका रमेश वॉकला जायचे, रमेश मधला बदल राधिकाला दिसत होता, बर्‍यापैकी शांत स्वभाव झाला होता त्यांचा, रुबाब करण कमी केल होत त्यांनी , राधिकाची जर चीड चीड झाली तर ते शांत बसत होते, बदल स्विकारला होता त्यांनी,

आज प्रीतीच लग्न झाल रजिस्टर पद्धतीने, नंतर लगेच ती सासरी निघून गेली, राधिका खूप भावुक झाली होती, आज तिचे आसू थांबत नव्हते, ती एकटी रूम मध्ये येवून बसली,
रमेश आत आले त्यांनी राधिकाचा हात हातात घेतला, मला अगदी समजत आहे राधिका तुला काय वाटत असेल ते, पण तू स्वतःला एकटी समजु नकोस मी आहे तुझ्या सोबतीला, राधिकाला आज रमेश चा खुप आधार वाटत होता, दोघांनी ठरवल आपण आता एकमेकांना वेळ द्यायचा,

"वयाच्या ठराविक टप्प्याचा आधाराची खूप गरज असते ते मला आजिबात समजलं नाही आधी, मला माफ करशील का राधिका, मनात काही ठेवू नको, तू म्हणशील तसं राहू आपण, एकमेकांना जेवढा जमेल तेवढा वेळ देऊ, खुल्या मनाने एकमेकांसोबत राहू, पूर्वी माझं चुकलं जरा स्वभाव तापट होता, तू हे विसरू शकशील का? ",.. रमेश

" हो मी विसरू शकेल, काही हरकत नाही, पण आता आपण फक्त दोघंच नाही तर सासुबाई पण आपल्या सोबत आहेत, त्याही एकट्या आहेत, त्यांना सुद्धा आपल्यात सामावून घ्यायचं, फिरायला जायचं असेल तर त्यांनाही घेऊन जायचं, मी आता त्यांना एकटं सोडणार नाही, त्यांनीच मला सगळ्यात जास्त आधार दिला आहे",... राधिका

रमेश हो बोलले...

राधिका रमेशच्या खांद्यावर डोके ठेवून निश्चित झाली होती.