आयुष्याच्या वळणावर..

आयुष्याच्या वळणावरचा एक प्रवास


आयुष्याच्या वळणावर..

सकाळी आठ वाजता अचानक स्टाफरूम मध्ये घोषणा झाली, "उद्या सकाळी सर्व शिक्षकांनी कॉन्फरन्स हॉल मध्ये हजर रहायचं आहे .विषय आहे
"Goodluck & Badluck.”


ज्यांना बोलायचं आहे त्या शिक्षकांची नावे बोर्ड वर लिहिली गेली. त्यामध्ये रणजितचं नाव आलं होतं. तो सुरुवातीला थोडा गडबडला. काय बोलणार आपण? काय होतंय? पण नंतर लगेच सावरला. मग डोक्यात अनेक विचारचक्र घुमू लागली. विचारांच्या वादळात आठवणींचे हजारो कागद उडू लागले. शेवटी एक एक कागद उलगडत गेला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील एका छोट्याशा सातशे लोकवस्तीच्या गावात रणजितचा जन्म झाला होता. गाव तसे छोटेच पण गावातील माणसं दिलदार, शांत, संयमी स्वभावाची आणि मोठ्या मनाची होती. गावाला शहराशी जोडणारा रस्ता बरा होता पण पक्का नव्हता. त्यावेळी तिथे ग्रामपंचायत नव्हती. त्यामुळे गावचा कारभार गावापासून तीन किलोमीटर दूर असणाऱ्या दुसऱ्या गावात चालायचा. गावात रणजितचे एकत्र कुटुंब होतं.

आजी, आजोबा ,आई ,वडील ,चुलते, चुलत भाऊ ,बहिणी असा खूप मोठा परिवार होता. रणजितच्या आजोबांचे गावात आदराचे स्थान होते.

घरात पाहुणे, गावकरी यांची नेहमी उठबस असायची. त्यामुळे सहाजिकच स्वयंपाक घरातील चुलीवरील चहाचे भांडे कधी खाली उतरत नव्हते. शेतातील कामे प्रत्येकाला वाटून दिली जायची. प्रत्येक जण स्वतःला दिलेली कामे चोखपणे पार पाडत होते. सर्व भावंडे गावातील शाळेत जात होतो. रणजितच्या गावात चौथीपर्यंत शाळा होती. रणजितला सुरुवातीला म्हणजे अंगणवाडीत असताना शाळा अजिबात आवडत नव्हती. घरात तो लपून बसायचा. मग काय गावातील मोठी मुलं त्याला पालखी करून घेऊन जायचे. एकदा अशी वेळ आली की त्याने बाईंच्या हाताचा चक्क चावा घेतला. (बाई म्हणजे रणजित च्या अंगणवाडी च्या शिक्षिका) अर्थातच त्यांनी रणजितच्या घरी जाऊन सांगितले. त्याचे चुलते त्याच्या वर ओरडले , रागावले, तोही खूप रडला.

त्याच्या आईने त्याला जवळ घेतले आणि शाळेचे महत्त्व समजावून सांगितले. म्हणाली,

" बाळ मी पहिली पर्यंत शिकली. इच्छा होती पुढे शिकावं. पण बाईच्या जातीला शिकवून काय उपयोग म्हणून नाव काढून घेण्यात आलं शाळेतून. मला बी ते तितकंच पुरे वाटलं. कारण बाकी पोरींना तर तेवढंही मिळालं नाही. पण तुला संधी मिळतेय तर तिचं सोनं कर.

तु शिकायला पाहिजे, माझी इच्छा आहे बघ. तू शिकून मोठा व्हायला पाहिजे. तुला छान शिकलेले बघितले कि मला वाटेल मीच शिकली." तेव्हा आईचे डोळे भरून आलेले अजूनही त्याला आठवतात.

एकत्र कुटुंब असल्याने जेवण पण एकत्र व्हायचं. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्या लोकांचे मार्गदर्शन मिळायचे. जेवणात नेहमी दूध ,दही ,ताक ,लोणी आणि तेही मातीच्या भांड्यातील असायचे. तरणी आईच्या हातचे माडगे म्हणजे रणजित आणि त्याच्या भावांसाठी पर्वणीच. (मोठ्या चुलतीला ते तरणी आई म्हणत कारण तिचे केस पंचाहत्तराव्या वर्षी पण काळेच आहेत).

उडीद डाळ दळून मातीच्या भांड्यात माडगे ( सूप) तयार केले जायचे. रणजितची आई आणि दोन नंबरची चुलती आऊ दोघी बाकीच्या सदस्यांसोबत शेतातील कामे सांभाळत होत्या. आजी-आजोबा घरातील सर्वांना मार्गदर्शन करायचे. जवळ - जवळ सतरा लोकांचे त्याचे एकत्र कुटुंब बघून कोणालाही सहाजिकच हेवा वाटायचा. शेतामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या पिकायच्या. भात मळण्यासाठी खळे (दगडी रोलर ने जमीन सपाट करून शेणाने सारवली जायची ) तयार केले जायचे. पहाटे चार वाजता बैल त्या दगडी रोलरला जुंपून भाताची मळणी केली जायची. मळलेले भात उन्हामध्ये वाळवले जायचे.

रणजितची म्हातारी आई (आजी) दिवसभर त्या भाताची राखण करत बसायची. चार दिवसानी भात वाळले की मग त्या भाताच्या राशी तयार करायच्या आणि दहीभाताचा नैवेद्य देवाला दाखवायचा. मग ते भात थंड झाले की तट्या, टोपलीमध्ये (चिव्या पासून तयार केलेल्या ) भरून त्यावर पिंजार पसरवायचे आणि मग त्यावर शेणाने सारवले जायचे . मग वर्षभर लागेल तसं त्यामधून भात काढायचं आणि गिरणीमध्ये जाऊन भरडायचं हा नियम होता.

घरात कशाचीही कमी नव्हती. भात पेरणी साठी घरातील सगळे सदस्य जायचे. रेगाळे (भात पेरणी अगोदर तयार केलेल्या रानातून फिरवायचे लाकडी अवजार) फिरवून झाल्यानंतर भात हाताने पेरायचं. दुपारी कडकडून भूक लागायची. मग काय? पांढरा साधा उकडलेला भात ,डाळीची आमटी,सांडगे , भाकरी ,कांदा यावर ताव मारायचा आणि झाडाखाली मस्त ताणून द्यायची. रणजितला खूप मज्जा यायची. दिवस खूप मस्त होते ते.

रणजितच्या मोठ्या चुलत भावांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वडिलांनी त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी खूप प्रयत्न केले .त्यांच्या प्रयत्नांना यश आले .एक भाऊ पोलीस खात्यामध्ये भरती झाला आणि दुसरा भाऊ चित्रकला शिक्षक झाला .घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले . दोघेही शहराच्या ठिकाणी रुजू झाले.

रणजितच्या वडिलांची बहिण म्हणजे त्याची आत्या .ती शहरात राहत होती .तिच्याकडे दोघे भाऊ राहू लागले .खरं सांगायचं तर आत्तीचा रणजित आणि भावांना खूप आधार मिळाला. त्याच्या वडिलांपासून ते पोलीस आणि शिक्षक झालेल्या भावा पर्यंत सर्वांना आधार देण्याचे काम त्याच्या आत्तीने केले .दिवस असेच पुढे पुढे सरकत जात होते. रणजित पहिली दुसरी करत चौथी मध्ये गेला. आजोबांचे म्हणजे बाबांचे (आजोबांना बाबा म्हणायचे ते ) रणजित वर खूप प्रेम होते. शाळेत जाताना ते नेहमी दहा पैसे, विस पैसे त्याच्या हातात ठेवायचे. त्यामधून ते श्रीखंडाच्या गोळ्या, नळ्या (नळ्यांना ते फुकण्या म्हणायचे) आणून खात होते.

रणजितच्या दोन भावांची ( पोलीस ,शिक्षक) लग्न झाली होती. दोघेही शहरात आपल्या बायकांना घेऊन गेले. एकत्र कुटुंब हळूहळू विभक्त व्हायच्या विचारांना जन्म देत होते आणि शेवटी तो दिवस उजाडला. त्यांचं कुटुंब वेगळं झालं. मुलांची शिक्षणं, लग्न या सगळ्यांच्या विचाराने सर्वजण विभक्त झाले.

आता रणजितचं जग म्हणजे त्याचे आई - वडील आणि त्याच्या दोघी बहिणी व तो एवढंच उरलं.

रणजितच्या वडिलांचा संघर्ष त्याच्या आईने आणि त्याच्या दोन मोठ्या बहिणींनी जवळून पाहिला होता. रणजित सर्वात छोटा त्यामुळे त्याचे नेहमी लाड व्हायचे. आई वडील शेती करायचे. संघर्ष काय असतो ना ते रणजित जसा मोठा होत गेलो तसा तो समजत गेला.

आज त्याला तो खूप भाग्यवान वाटतोय की, देवाने त्याला अशा माता-पित्याच्या पोटी जन्माला घातलं .कारण आयुष्य कसं जगायचं ? हे या दोघांनी त्याला शिकवलं.

रणजितचे वडील म्हणजे त्याचे प्रेरणास्थान. त्याच्या वडिलांना दोन भाऊ. त्याचे वडील सर्वात लहान. त्यांचं शिक्षण म्हणजे जुनी मॅट्रिक.( स्पेशल संस्कृत आणि गणित) गणित तोंडपाठ. संस्कृत विषय असल्याने त्यांना ग्रंथ वाचनाची खूप आवड होती. त्यामुळे श्रावण महिना आला की त्याच्या घरात दररोज संध्याकाळी ग्रंथ वाचन व्हायचं. गल्लीतील सर्व लोक ग्रंथ ऐकायला यायचे. संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत वाचन झाले की त्याची आई सर्वांना प्रसाद म्हणून शिरा द्यायची. खूप समाधान वाटायचं. त्यामुळे त्या भक्तीपूर्ण वातावरणाचा परिणाम रणजित आणि त्याच्या बहिणींच्या मनावरती सहाजिकच झाला होता.

रणजितला सुद्धा वाचनाची आवड लागली होती. त्याच्या दोघी बहिणीच्या बद्दल सांगायच झालं तर त्या त्याच्या मैत्रिणी होत्या. कधी कधी भांडायचे पण त्याच त्याला समजून घ्यायच्या. दिवस असेच पुढे पुढे जात होते.

रणजित आता गावातून चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण करून बाहेरगावी पाचवीच्या वर्गात गेला. गावापासून सहा किलोमिटर अंतरावर ती शाळा होती. आता त्याच्या आई-वडिलांना काळजी लागली होती की हे पोरगं गावाबाहेर कधी गेलं नाही. बाहेरचे जग सुद्धा माहित नाही याला. याचं कसं होईल? इतर मुलांच्या संगतीत हा बिघडेल का? वयात येणारं पोर असं दिवसभर सोडून देणं बरं होईल का?


क्रमश :

तळटीप : कथा एका गावातील लहान मुलाच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद ?

🎭 Series Post

View all