Feb 06, 2023
प्रेरणादायक

आयुष्य वडिलांच्या नजरेतून...

Read Later
आयुष्य वडिलांच्या नजरेतून...

             एकदा एक मुलगी तिच्या वडिलांकडे आपल्या आयुष्याबाबत तक्रार करत होती, की एक प्रॉब्लेम संपला, की दुसरा सुरू होतो. तिला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे. व्यवसायाने शेफ असलेले तिचे वडील तिला काही न बोलता स्वयंपाकघरात घेऊन येतात आणि काही न बोलता तीन पातेल्यांत पाणी उकळत ठेवतात. पाणी जरासे उकळल्यावर ते त्यातल्या एका भांड्यात बटाटा, एकात अंडे आणि एकात कॉफी घालतात. दुसरीकडे त्या मुलीच्या तक्रारी सुरूच असतात. साधारण वीस मिनिटांनंतर वडील गॅस बंद करतात आणि बटाट्याला एका भांड्यात, अंड्याला दुसऱ्या भांड्यात आणि कॉफीला एका कपामध्ये ओततात. मुलीकडे वळून विचारतात, 'बाळा, तुला समोर काय दिसते आहे?' ती मुलगीदेखील वडील हे काय विचारत आहेत, म्हणून जरासे चिडून उत्तर देते, 'बटाटा, अंडे आणि कॉफी.' ते मुलीला ती प्रत्येक वस्तू जवळून पाहायला सांगतात. ती बटाट्याला हात लावते, तर तो मऊ झालेला असतो. अंड फोडून पाहिल्यावर ते उकडून कडक झालेले असते. ते तिला कॉफी प्यायला सांगतात. ती चवदार कॉफी पिऊन तिच्या चेहऱ्यावर समाधान येते. वडील तिला समजावतात. यातील बटाटा, अंडे आणि कॉफी या तिघांनाही गरम पाण्यातून खडतर प्रवास करावा लागला; पण त्याच्याशी प्रत्येकाने प्रत्येक वेळी सामना केला. कडक आणि ताठ बटाटा गरम पाण्याला सामोरे गेल्यावर नरम पडला. आतून लिबलिबित, मऊ असलेले अंडे गरम पाण्यात पडताच बदलत गेले आणि बाहेर आले उकडलेले कडक अंडे; पण या सगळ्यात कॉफीची कमाल आहे. ती गरम पाण्यात टाकल्याबरोबर तिने पाण्यालाच बदलले आणि त्यातून काहीतरी नवे पेय तयार झाले. ते मुलीकडे वळून म्हणतात, 'आता विचार तू करायचा आहेस. या तिन्हीपैकी तू कोण आहेस?' आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात संकटे, अवघड प्रसंग येतच असतात. त्यांना सामोरे जाताना एकच महत्त्वाची बाब म्हणजे आपल्यावर त्यांचा कसा परिणाम होतो आणि त्या परिस्थितीला आपण कसे तोंड देतो. हे केवळ त्या मुलीच्याच बाबतीत नाही, तर आपल्या सर्वांनाही लागू पडते. आपण स्वतःला फक्त प्रश्न विचारायचा, 'या तिन्हीपैकी मी कोण?' जीवनात मागे बघाल तर, अनुभव मिळेल.. जीवनात पुढे बघाल तर, आशा मिळेल..… इकडे -तिकडे बघाल तर, सत्य मिळेल... आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर, आत्मविश्वास मिळेल. काय बरोबर ना? 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Adv. Shraddha Magar

Advocate

Happily life .. आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगते... जिथे जाऊ तिथे स्वतः ची छोटी ओळख निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न...