Oct 26, 2020
प्रेम

आव्हान

Read Later
आव्हान

आव्हान:- 
 
शर्लि ! शर्लि! मोठमोठ्याने हाका ऐकायला येत होत्या, पण लांबवर कोणीही त्याला रिस्पॉन्स देताना दिसत नव्हते.
एक तरुण मुलगा बाईक वरून फ़िरत हाका देतच होता. गर्द झाडी होती -शेताचा बांध होता आणि जवळपास समुद्रकिनारा असल्याने खारट दमट वास पण येत होता.
दूर एक दगडावर कोणीतरी बसले आहे हे दिसत होते. बाईक कडेला लावून तो चालत वजा धावतच त्या दिशेने गेला, ती मुलगी म्हणजे शर्लि आपल्याच विचारात त्या दगडावर बसली होती.तिन्हीसांजेची वेळ होत आली असल्याने सगळीकडे संधीप्रकाश पडला होता.
" शर्लि, तू न सांगता इतक्या लांब का निघून आलीस? तुझा फोन पण बंद येतोय! चाललंय काय? बोलशील का जरा."
विनीत शर्लि चा भाऊ तिला तिथे शोधत आला होता आणि काळजीवजा रागानेच तिच्याशी बोलत होता. ती उत्तर देत नाही पाहिल्यावर आणखीच वैतागला, पण तिची थंड नजर बघून त्याच्या काळजात चर्रर्र झालं. तिला प्रेमाने जवळ घेत, डोक्यावर हात फिरवत तो शांत बसला.
थोड्याच वेळात ती त्याच्या कुशीत शिरून हमसाहमशी रडायला लागली, तिला मोकळं होण्याचा हाच एक मार्ग वाटल्याने त्याने ही तिला रडू दिले. थोड्या वेळाने ती जरा सावरली " विनू आपण इथून दुसरीकडे जाऊ यात का राहायला? मला वाटते आपण आपल्या गावातील  आपले घर दार सगळे विकून शहराकडे जाऊयात. तुझं कॉलेज च शेवटचं वर्ष संपत आलंय, तू पण नोकरी बघ आणि आयुष्य स्थिर करायचा प्रयत्न कर. मी तुला आयुष्याला पुरणार नाहीय, तुझं तुला शिकावं लागेल. कधीपर्यंत तू दुसऱ्याच्या भरवशावर असणार आहेस?" ही अशी विचित्र का बोलतेय हे त्याला कळत नव्हते. दोघेही भावंडे आपले आयुष्य एकमेकांच्या सोबतीने जगत होती, शर्लि मोठी आणि विनीत तिच्यापेक्षा दोन वर्षाने लहान होता. शर्लि एका शाळेत ऑफिस मध्ये कामाला होती आणि विनीत त्याच्या BBA च्या शेवटच्या वर्षाला.
 छोटसे घर होत त्यांचे.  अंगणात झोपाळा, छोटीसी पण सुंदर फुलबाग शर्लि ने तयार केली होती. तसे कामास काम इतकेच त्यांचा लोकांशी संबंध होता.काही वर्षांपूर्वी वडील गेले होते आणि आई ही तर त्यांच्या लहानपणीच गेली होती. आपले असे कोणीच नव्हते.
काही वेळ बसून " जायचं का घराकडे?" विनीत म्हणाला तशी ती उठली आणि त्याच्या हाताला धरून बाहेर आली.चालत रस्त्यापर्यंत पोचले पण ती काहीच बोलत नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ती अंतर्मुख होतेय हे त्याला जाणवत होते पण कारण मात्र काही कळत नव्हते.
" चल आज मस्त हक्का नूडल्स, शेजवान राईस आणि पनीर मंचुरीयन खाऊ यात" म्हणत त्याने त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट ला बाईक थांबवली. तिच्या आवडत्या जागी आली, आवडते फूड खाल्ले की ती फ्रेश होईल असेच त्याला वाटत होते.
त्याचे मन राखण्यासाठी तीने थोडेफार खाल्ले पण फारसा उत्साह त्याला जाणवत नव्हता. थोडा वेळ देऊयात या विचाराने तो शांत बसला.
त्या दिवशी त्यांचा डिनर असाच न बोलता पार पडला. 
दुसऱ्या दिवशी विनीत कॉलेज च्या लायब्ररी मध्ये होता तेव्हा अचानक त्याचा फोन वाजला," विनीत बोलताय का?
"हो" 
"असाल तसे निघून या! मी पत्ता पाठवतोय, एक मुलगी बेशुद्ध होऊन पडलीय. तिच्या मोबाइलला मध्ये शेवटचा कॉल झालेला नंबर तुमचा असल्याने फोन केलाय."
विनीत एकदम घाबरून धडपडत बाहेर आला.  थोड्या वेळापूर्वी शर्लि शी त्याच बोलणं झालं होतं. शक्य तितक्या वेगाने तो दिलेल्या पत्त्यावर पोचला, थोडा लोकांचा घोळका दिसला. पटकन बाईक तशीच फेकून तो धावत आला तर एक स्त्री शर्लि ला आधाराने बसवत होती आणि तिला शुद्ध नसल्यासारखी भासत होते.
पटकन तिला जवळ घेत " मी विनीत, हीचा भाऊ! खूप धन्यवाद मला फोन केल्याबद्दल "असे म्हणून लगेच रिक्षात तिला बसवले तो ही बसला आणि मित्राला फोन करून माझी बाईक आण असे सांगितले. रिक्षा सरळ थांबली ती त्यांच्या फॅमिली डॉक्टर च्या क्लिनिक समोर.
तिला चालवत नसल्याने हातावर उचलून त्याने दवाखान्यात आणले आणि टेबलवर निजावले.
" अंकल मला नाही माहीत नक्की काय ते, पण गेली काही दिवस ही खूप बेचैन आहे आणि काहीशी विचित्र वागते आणि बोलते सुद्धा. मनातले सांगत नाही पण आपण इथून जाऊ असे कायम म्हणते. Plz बघा ना, आपण हिला मोठ्या दवाखान्यात नेऊ हवे तर पण तुम्ही आधी बघाल का?"
" शांत हो विनीत, जा बस बाहेर आणि पाणी पी जरा." असे म्हणून डॉक्टर तपासायला गेले.
विनीत चा जीव वरखाली होत होता, 15 मिनिटाने डॉक्टर बाहेर आले " तिला इंजेकशन दिलंय, थोड्या वेळात ती नॉर्मल येईल. मला वाटत की ती खूप स्ट्रेसड आहे. तिला घेऊन कुठे बाहेर जा त्यापूर्वी मी काही टेस्ट देतोय त्या करून घे. माझ्या अंदाजाप्रमाणे ती प्रेग्नेंट आहे!"
विनीत ला एकदम शॉक बसला, काही ही न बोलता  तसाच तिची शुद्धीवर यायची वाट पाहत राहिला.
ती शुद्धीवर आल्यावर शर्लि ला घेऊन तो घरी आला. तिला ज्यूस दिले, आणि शांत पडून राहायला सांगितले.
" विनू मला तुझ्याशी बोलायचे आहे!"
"शर्लि आपण नंतर बोलू, आधी तू थोडा आराम कर. मी तुझ्या सोबत आहे, काही काळजी करू नकोस."
लहान मुलासारखे तिने ऐकले, औषधांचा इफेक्ट असेल, तिला गाढ झोप लागली. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली तसा विनीत ने तिला गरम चहा आणून दिला.
"कस  वाटतंय माझ्या शरू ला?"
ती फक्त हसली," विनू मी आई होणार आहे. मी वाईट नाहीय रे!" इतकेच म्हणून ती पुन्हा ओक्षाबोक्शी रडली. 
त्यानेही तिला काही विचारले नाही, त्या दिवशी तो कॉलेज ला गेला नाही तिच्या ऑफिस मध्ये रजेंचा अर्ज फक्त द्यायला गेला, आणि घरी आला . शर्लि रूम मध्ये निपचित पडून होती ती जेवलीही नाहीय हे माहीत असल्याने तो स्वतः ताट घेऊन आला आणि स्वतःच्या हाताने तिला भरवायला गेला. ती नको नको म्हणत असताना त्याने प्रेमाने तिला थोडं भरवलं आणि मग स्वतःही थोडं जेवला.तो काहीच विचारत नाही हे पाहून ती जास्तीच बेचैन होत होती.
" या कारणाने तुला दुसरीकडे राहायला जायचे होते का?" एवढेच तो बोलला.
मानेनेच "नाही" असे तिने दर्शवले.
त्याने एक बॅग घेतली ज्यात तिचे कपडे भरले आणि एक छोट्या बॅग मध्ये स्वतःचे.  ती फक्त बघत होती पण काहीच बोलत नव्हती, नक्की काळजी की भीती हेच तिच्या वागण्यावरून कळात नव्हते.
त्याने तिला आवरायला सांगितले, थोड्याच वेळात एक कार दारात येऊन थांबली. त्याने दोन्ही बॅग, तिची औषधे वगैरे सगळे समान नीट त्यात ठेवले आणि तिला घेऊन कार मध्ये बसवले. दाराला कुलूप लावून तोही तिच्या शेजारी मागेच बसला.
साधारण 2 तास प्रवास करून एक शांत ठिकाणी असलेल्या रिसॉर्ट च्या गेट मधून कार आत आली. त्याने आधीच बूक केले असल्याने वेटरने त्यांचे सामान त्यांच्या खोलीत नेऊन ठेवले. 
 हाताला धरूनच विनीत ने शर्लि ला रूम मध्ये नेले . गॅलरी च दरवाजा उघडला तशी स्वच्छ हवेचा झोक आत आला आणि तिथून छान देखावा दिसत होता तो
 निरखून बघत शर्लि उभी राहिली.
छान गरम गरम चहा मागवला, तो त्याने  गॅलरी मध्ये बसत तिच्या हातात दिला. निर्विकार पणे ती सगळं ऐकत होती आणि करत होती, हे बघून विनीत आतल्या आत पिळवटून निघत होता. 
थोड्या वेळाने फ्रेश होऊन त्याने तिला आराम करायला सांगितले आणि तो पुन्हा बाहेर येऊन बसला. 
" आता मला खचून चालणार नाही. शर्लि चे विचार मला माहित आहेत, ती काहीच चूक कधी करणार नाही. मला तिला भक्कम पाठबळ द्यायचे आहे आणि सोबत पण करायची आहे. ती हसली पाहिजे हे माझ्यापुढचे आव्हान आहे." स्वतःच्या मनाशी तो बोलत होता. आत जाऊन बघितले तर ती शांत डोळे मिटून पडून होती.
" शरू चल उठ, बघ मी तुला कुठे नेतो. तू आवाक होशील आणि मला थँक्स म्हणशील बघ." बळेच तिला उठवले, स्वतः तिची जीन्स आणि छानसा टॉप तिच्या हातात देत" हेच घालायचे,माझी शरू कशी छाप पडेल सगळ्यांवर बघ" म्हणत हसत तो रूम बाहेर गेला आणि 10 मिनिटे झाल्यावर नॉक केलं आणि आत आला तर ती तशीच बसली होती.
"तुला कळतंय का,मला तू आधीसारखी हवी आहेस आणि हो तू जर नाही ऐकलं तर मला खूप वाईट वाटेल."
पुन्हा तो बाहेर गेला आणि 10 मिनिटे झाली तास पुन्हा नॉक करून आत आला तर तिने कपडे बदलले होते.मग त्यानेच तिच्या चेहऱ्यावर क्रीम लावले,छान केसांचा पोनी बांधला तिची पर्स तिच्या खांद्यावर अडकवली आणि तिला हातात हात घालून छान हसत बाहेर आणले. 
बाहेर कार होतीच, त्याने छान मोठी फेरी मारत एक जुन्या चर्च जवळ गाडी थांबवली. चर्च मध्ये जायला तिला आवडते हे माहीत असल्याने तो प्रत्येक प्रयत्न करत होता ज्याने ती नॉर्मल व्हावी.
चर्च बघून ती आपोआप कार मधून उतरली आणि पायऱ्या चढायला लागली. विनीत तिला follow करत होता पण आता हाताला धरले नव्हते. त्याला हवे होते की ती आधीसारखी स्ट्रॉंग बनवावी.
ती हळू हळू चालत होती, तिथली शांतता तिला दिलासा देत होती. तिथे कँडल लावून ती आत आली  तिथल्या लाकडी बेंचवर jesus समोर बसली आणि डोळे मिटून घेतले. काही क्षण,मिनिटे अशीच शांत गेली तिच्या मागच्या बेंचवर बसलेला विनीत फक्त न्याहाळत होता आणि मनोमन " माझ्या शर्लि ला पुन्हा पाहिल्यासारखे बनव" इतकेच बोलत होता.
बराच वेळ ते तिथे बसले होते, ती ऊठेपर्यंत हलायचे नाही हे त्याने मनोमन ठरवले होते.
तासाभराने ती उठली आणि "विनू मला भूक लागली" इतकेच म्हणाली, तिच्या तोंडून इतके शब्द सुद्धा त्याला दैवी संकेत वाटला " जैसी आपकी मर्जी मॅडम" तिला हसवण्याच्या प्रयत्नात वाकून कुर्निसात करत तो म्हणाला आणि तिला घेऊन निघाला.
रिसॉर्ट च्या अलीकडे  असलेल्या एका बांबू हाऊस रेस्टॉरंट ला कार थांबवली. तिथले सगळे वातावरण खूप आल्हाददायक होते. तिच्या आवडीचे असे सगळे फूड ऑर्डर केले. आज बऱ्याच दिवसांनी ती बऱ्यापैकी जेवली, आणि बोलण्याला हावभावाने थोडं रिस्पॉन्ड करत होती.
 रात्री परत आले , तिच्या गोळ्या औषधे विनीत ने तिला दिली आणि तिच्या अंगावर टाकून तिला झोपवले. तोही तिच्या बाजूला शांत पडला, थकल्याने त्याचाही डोळा लागला.
सकाळी जाग आली तर शर्लि बाजूला दिसली नाही तसा तो थोडा घाबरला, पण उठून थोडा पुढे येऊन बघितले तर ती गॅलरी मध्ये खुर्चीत बसली होती. तो तसाच फ्रेश व्हायला गेला, आणि मस्त चहा, एग व्हाईट ऑम्लेट्स आणि टोस्ट बटर ऑर्डर केले. ते घेऊनच तिच्यासमोर गेला तर तिने थोडे हसत रिप्लाय केले, त्याला मनापासूनबरे वाटले. खाद्य टवाळ गप्पा मारत त्याने तिचा मूड नीट करायला प्रयत्न केला.
तोही दिवस थोडं फिरून, तिच्या मनासारखे फुलांचे गार्डन ला जाऊन पुरा झाला.
त्याच्या दुसऱ्या दिवशी ते चहा पित असताना तीच म्हणाली "विनित तुला आश्चर्य वाटत असेल ना हे सगळे कळल्यावर?"
"शरू, जेवढे मी तुला ओळखतो तू कधीच काही चूक करणार नाही.काहीतरी नक्कीच आहे त्यामुळे तू इतकी खचलीस. मी तुझ्या सोबत कायम आहे, plz बोल ना!"
" विनीत माझ्या एकट्या आयुष्याच्या वळणावर मला ते भेटले, नाव सांगण्याची गरज मला वाटत नाही कारण तसे करून मला त्यांना दुखवयाचे नाही. आयुष्य खूप भरकटले होते, त्यांच्या सोबतीने ते बरेच मार्गावर आले पण त्या दरम्यान मी गुंतत गेले. का, केव्हा, कशी मला नाही माहीत पण हो खूप सुंदर झाले होते माझे आयुष्य. एक अस्तित्व किती आनंद देऊ शकते,भरभरून प्रेम देवू शकते याचा मला प्रत्यय आला. सगळं कसं जादूमय झालं होतं किंबहुना आजही आहे. ते क्षण माझे सोबती आहेत. मन ,शरीर हे एकच झाले होते दोघांच्याही भावना एकच होत्या.
अशाच एका क्षणाला बरेच काही घडून गेले, मला आधीच कल्पना होती की हे नातं जगाच्या पूर्णत्वाच्या भाषेत बसणार नाही पण मला त्यानी काही फरक पडणार नव्हता कधी. आजही ते आहेत पण मला त्यांच्यापाऊन दूर जावे लागणार याच विचारात मी मलाच नकोशी झाले. आज जे तुला कळले ते त्यांना माहीत नाही आणि कळले तर ते सहन ही करू शकणार नाहीत. पण जे आहे ते माझे स्वतःचे आहे, त्यात कोणताही स्वार्थ नाही आणि नव्हता. मग मी ते का नाकारू? मला हे हवे आहे जे माझ्या आयुष्याच्या पुर्ततेला मलालागतंय, जगायला एक उद्देश आणि ती कायमची सोबत सुध्दा. तो अंश, ती साक्ष जी मला कधीच नाकारायची नाही. मला फक्त तुझी साथ हवी माझ्या या निर्णयाला, ते कायम माझ्या सोबत आहेत, पण आज मला लांब जाण्याशिवाय पर्याय नाही.तू आहेस माझ्या सोबत?"
तिची ती ठाम पण भावनिक नजर खूप काही बोलत होती.
" शरू, तू कधीच काही विनाकारण करणार नाहीस याची मला खात्री आहे. मला जाणून घेतले नाही तरी  माझा तुझ्या विश्वासावर विश्वास आहे. तू निर्णय घेतला आहेस आणि हे आव्हान पेलायला मी तुझ्या कायम सोबत आहे."
भावनिक होऊन तिने लगेच त्याला मिठी मारली, पुढील काही दिवसात त्यांनी काहीसे प्लॅन करून ते गाव सोडले. नवीन ठिकाणी जाऊन ते दोघेही आयुष्याचे नवीन 'आव्हान' पेलायला तयार झाले.
या आव्हानात होती एक खंबीर साथ 'लोकां' च्या  नजरेला पेलण्याची, नवीन निर्माण होणाऱ्या जीवाला कायम समाधानात ठेवण्याची. 
मामा रूपा मध्ये राहून आपल्या बहिणीच्या बाळाला पुढे न्यायची आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याच्या 'शर्लि' ला जीवनाच्या या वाटेवर कधीही एकटे न सोडण्याची.
या सगळ्याच 'आव्हानासाठी' विनीत मनापासून सज्ज झाला होता!
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!