आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

Life Became Strong And Satisfied


आयुष्याचं गणित जमलं!


काळ माणसाचं वय वाढवतं..... आठवणी चिरतरुण असतात. अशा अनेक चांगल्या वाईट आठवणींना आठवून, अनेक अनुभव घेऊन व्यक्ती आपले आयुष्य जगत पुढे पुढे जात असतो.


नीलू ही साधी सरळ मार्गाने चालणारी मुलगी. शिक्षणात हुशार.. आई वडिलांनी तिच्या सर्व भावंडांना योग्य शिक्षण घेण्यास मदत केली. पण घरच्या जेमतेम आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा मर्यादा येत होत्या.
नीलू ला डॉक्टर व्हायचे होते. पण घरच्या परिस्थितीमुळे कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत करणे गरजेचे होतं.
त्यासाठी तिने शिक्षक होण्याचा मार्ग निवडला. त्याकाळी शिक्षकाला पदवी परीक्षेची अट नसल्यामुळे तिला शिक्षिका होण्यासाठी काही अडचण गेली नाही. पण पुढे अधिक शिक्षण घेण्यासाठी तिचा जीव कासावीस होत होता.
वडील लवकरच वारल्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी नीट बसवणे, आणि शिक्षिकेची नोकरी सांभाळणं यातच अनेक वर्षे निघून गेली.

कोणतंही ध्येय गाठण्यासाठी व्यक्तीला त्याची स्वतःची मानसिकता, सभोवतालची परिस्थिती आणि उत्तम मार्गदर्शकाची आवश्यकता असते. मग तो कोणत्याही स्वरूपात असो! त्याला कुणीतरी आश्वासक भेटायला हवा.
त्यासाठी मार्गदर्शकाच मार्गदर्शन हे होकायंत्र सारखं असावं लागतं. नेमकं आता कुठे जायचं असा विचार मनात आला की नेमका रस्ता दाखवणं हे मार्गदर्शका चं काम असतं. ते सुद्धा अगदी स्वच्छ आणि योग्य!
नीलू ला असाच एक उत्तम मार्गदर्शक नवऱ्याच्या रूपात मिळाला.
तिच्या नवऱ्याने तिला पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केलं. तिच्यावर तिच्या सासरची कोणतीच जबाबदारी पडू दिली नाही. तिने नोकरी सांभाळ त आपलं पदव्युत्तर पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे तिला शिक्षण विभागात पदोन्नती मिळून ती उच्च पदावर पोहोचली.
तिच्या जीवनाला अशी कलाटणी मिळाल्यामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं.
तिला तिच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी नव्या नव्या योजना राबविता आल्या.
शिक्षकांसाठी ती सुद्धा एक मार्गदर्शक बनली.
तिचा हा पदोन्नतीचा अविस्मरणीय प्रसंग ती कधीही विसरू शकली नाही.
या अविस्मरणीय प्रसंगामुळे तिच्या आयुष्याचं गणित जमलं.
म्हणतात ना! एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते! पण या यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष होता. हे सांगणे न लगे!

छाया बर्वे (राऊत)