Aug 09, 2022
General

आत्म्यांचा वास

Read Later
आत्म्यांचा वास

#आत्म्यांचा_वास

 ऋषी रुताचा बॉस. सहा फुटी,सावळा वर्ण,डोळ्यात कोणालाही आकर्षित करणारी चमक,लाघवी बोलणं यामुळे नवीनच कामावर रुजू झालेली रुता ऋषीच्या प्रेमात पडली. 

काही भेटीगाठींतच दोघं अगदी जवळ आले.  रुता गावातली मुलगी. इथे शहरातल्या वसतिगृहात राहून तिने शिक्षण घेतलं. पुढे नोकरीही छान मिळाली. आई सारखी फोन करायची,लग्नाचं बघुया म्हणून पण ती विषय मनावर घेत नव्हती. तिला लवकर श्रीमंत व्हायचं होतं. त्याद्रुष्टीने तिला ऋषी योग्य वाटला कारण ऋषीने फार कमी वयात बिझनेसमध्ये जम बसवला होता. शहरात मोक्याच्या ठिकाणी बंगला,बंगल्यासभोवती लॉन,क्रुत्रिम धबधबा..सगळं तिला हवंहवंस होतं. ही माहिती रुताने ऋषीच्या जवळच्या मित्राकडून काढली होती.

ऋषीने रुताला प्रपोज केले तेंव्हा तर अर्धी लढाई जिंकल्याचा भास झाला होता तिला. आत्ता फक्त लग्न करायचं बाकी होतं.

रुताने त्याला विचारलं,"सांगना रे ऋष,कधी करायचं आपण लग्न?"

ऋषी तिच्या गालाचा किस घेत म्हणाला,"लग्न वगैरे सावकाश करुया राणी. आधी आपण एकत्र राहू. एकमेकांना समजून घेऊ. मग लग्न काय कधीही करता येईल."

रुता म्हणाली,"यु मीन, आपण लिव्ह इनमध्ये रहायचं! हाऊ फेन्टास्टीक. मलापण नं असंच काहीतरी थ्रीलींग आवडतं. त्या ओल्ड कस्टम्सपेक्षा लिव्ह इन किती बरं न ऋष."

आणि काही दिवसांत रुता व ऋषी बिनालग्नाची एकत्र राहू लागली त्या बंगल्यात. रुताने गावी आईबाबांना काही कळवलं नव्हतं याबद्दल कारण तिला ठाऊक होतं की हे समजताच तिचे बाबा तिला फरफटत गावी घेऊन जातील व कोणातरी सोम्यागोम्यासोबत तिचं लग्न लावून देतील. ऋषीच्या घरचं कोणी नव्हतं असं त्याने तिला सांगितलं होतं.

ऋषी आज सकाळीच ऑफीसला गेला होता. रुताचं डोकं जरा जड होतं म्हणून तिने सुट्टी घेतली होती. सदाकाकाने रुताच्या सांगण्यानुसार घर झाडायला घेतलं होतं. घर तसं बऱ्यापैकी स्वच्छ होतं पण कालच्या वादळाने घरात बरीच धूळ जमा झाली होती. शेवंताक्काने नाश्ता,जेवण,धुणं उरकलं व ती जायला गेली. सदुकाकाही काम आवरल्यावर आऊटहाऊसमध्ये गेला. 
रुता टेरेसमध्ये फिरत असताना एका बंद खोलीकडे तिचं लक्ष गेलं.

"अरे,ही रुम साफ करायची राहूनच गेली की. इथे रात्री झोपायला किती मजा येईल या विचारात तिने खालून चाव्यांचा जुडगा आणला व कुलुप उघडू लागली. बऱ्याच प्रयत्नानंतर एक चावी बरोबर लागली. कुलुप उघडलं. आतमध्ये एक बेड होता. ड्रेसिंग टेबलही होतं. रुता त्या बेडवर बसली. बेडवरची चादर अगदी आजच धुतल्यासारखी शुभ्र,नितळ होती. कोठेही चुण्या पडल्या नव्हत्या. रुताने हलकेच उशीवर डोके टेकले व जरा पहुडली. क्षणभरात तिचा डोळा लागला.

स्वप्नात तिला गच्चीतल्या झोपाळ्यावर ऋषीसोबत एक मुलगी बसलेय असं दिसलं. दोघंही हसत होते. त्या मुलीने पांढराशुभ्र गाऊन घातला होता. दोघांनी हातात हात गुंफले होते. थोड्याच क्षणांत तिला ती मुलगी कोपऱ्यात बसून रडतेय असं दिसलं. गुडघ्यात पाय दुमडून त्यात तीने डोकं खुपसलं होते. "मला अजून जगायच होतं. ऋषीसाठी मी घरदार सोडून आले. माझा जॉबही सोडला आणि..हूं..हूं..हूं"

रुताला सगळं ऐकू येत होतं. तिला घाम फुटला होता. तिला ओरडावसं वाटत होतं. ती मोठ्याने ओरडून विचारत होती,"तू कोण आहेस? तुझा माझ्या ऋषीशी काय संबंध?" पण तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. तिचे पाय अगदी ताठ झाले होते. पाचेक वाजता रुता शुद्धीवर आली. ते दुपारचं स्वप्न तिला जसंच्यातसं आठवत होतं. 'कसलं भयाण स्वप्न पडलं यार! मीपण ना स्वप्नात हॉरर मुव्ही बघते न् त्यातही हिरो माझा ऋष,' रुता स्वतःशीच म्हणत गालातल्या गालात हसली.

रुता खोली बंद करुन खाली आली. तीने जरा वॉश घेतला. तितक्यात सदूकाका आला.

"बाई,ते गावी म्हातारी आई आजारी हाय. जाईन म्हनतो. लई शीक झालीया."

"अरे पण ऋषीला सांगून जा की."

"नाय,म्हंजी सांगाया पायजेल पन सायबांची वाट बघीत राह्यलो तर गाडी चुकायची बगा. शेवंतालाबी घिऊन जातो. माज्या मायचा लई जीव हाय बघा सुनेवर." 

"बरं जा तू मी बघते काय करायचं ते."

सदाकाका निघून गेला तसा रुताने वरणभाताचा कुकर लावला व कॉफी पीत ग्यालरीत बसली. थोड्याच वेळात अंधारुन आलं. रुताला कसंसच वाटत होतं.

रुताने दिवाबत्ती केली व भांडी विसळू लागली तेंव्हा मागच्या पडद्याकडे तिला हालचाल जाणवली. रुताच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. कोण आहे तिकडे असं ती ओरडणार होती तोच ऋषी पडद्यामागून बाहेर आला.

"हे सोना,कसली किंचाळलीस! मी तुला सरप्राईज देणार होतो. सॉरी डार्लिंग." ऋषीने तिच्या गालांवर आपले ओठ टेकवले. 

ऋषी मग आंघोळीला गेला. बाथ घेऊन आलेला ओलेता तो रुता बघतच राहिली..'कसला हँडसम दिसतो हा असा." तीने मनाशीच म्हंटल. तिने त्याच्या छातीवर रुळणाऱ्या कुरळ्या केसांत हळुवार बोटं फिरवली. रात्रीसाठी ठेव काहीतरी,ऋषी म्हणाला तसं ती त्याच्या गालावर गाल घासत किचनकडे वळली.

रुताने पानं वाढून घेतली. दोघांची जेवणं झाल्यावर ऋषीने सदुकाका व शेवंताक्काबद्दल विचारलं तेंव्हा रुताने त्याला सदुकाकांच्या आईच्या आजारपणाबद्दल सागितलं. रात्री ऋषीने रुताला कुशीत घेतलं. रुताच्या गुलाबीसर ओठांवर त्याचे ओठ टेकवले. तिच्यावर नखशिखांत चुंबनांचा वर्षाव केला. रुता मोहरून गेली. त्याच्या पीळदार बाहूंचा विळखा तिला हवाहवासा वाटत होता. दोघं एक झाले. रुताच्या देहात त्रुप्तीची लाट पसरली. 

मध्यरात्री साडेतीनच्या मानाने रुताला जाग आली. बाजूला सुडौल देहाचा ऋषी पहुडला होता.  तिच्या वक्षस्थळांवरचा त्याच हात तिने हलकेच बाजूला केला. बेडवरून उतरून नाईटी घातली. तिला प्रचंड तहान लागली होती. तिचा घसा सुकला होता. 

पाणी पिण्यासाठी ती किचनमध्ये गेली. तिथे डायनिंग टेबलच्या बाजूला तिला तीच मुलगी दिसली जी तिने दुपारी पाहिली होती. ती मुलगी चालू लागली तशी रुताच्याही नकळत रुता तिच्या मागोमाग जाऊ लागली. दोघी गच्चीवरच्या खोलीत गेल्या. तिथे या मुलीसारख्याच अजून दोन स्त्रिया बसल्या होत्या.  त्याही पांढऱ्या वस्त्रात होत्या. रुताला त्या मुलीने त्यांची कहाणी सांगितली. पहिली शर्मिला,ऋषीच्या शेजारीच बंगला होता तिचा. गच्चीतून खाणाखुणा झाल्या. प्रेम जुळलं पण ऋषीचा लग्नाला नकार..लिव्ह इनमध्ये राहिले दोघे,तब्बल वर्षभर. मग ऋषीला दुसरी अर्पणा आवडली. ती एक शिक्षिका होती. बसस्टॉपवर त्यांची ओळख झाली. ऋषीच्या तारुण्याने तिलाही भुरळ घातली. लिव्ह इनची कन्सेप्ट तिला विशेष आवडली नव्हती पण तिला ऋषीला सोडवत नव्हतं. अपर्णा घरात यायच्या आधी ऋषीने गीझरमध्ये छेडछाड केली. बाथरुममध्ये शर्मिलाचा जळालेला म्रुतदेह सापडला. पोलिसांनी पोस्ट मार्टम करुन अकस्मात म्रुत्यु म्हणून नोंद केली.

नंतर चारेक महिन्याने ऋषी अपर्णाला  घेऊन आला. शर्मिलाचा आत्मा त्या घरातच तळमळत होता. एके दिवशी संध्याकाळी अपर्णा गच्चीवरुन खाली वाकून पहात होती. तेंव्हाच जोराचं वादळ आलं. गच्चीला तेंव्हा कठडा बांधलेला नसल्याने अपर्णाचा तोल गेला व जागीच म्रुत्यु झाला. यावेळीही पोलिस आले. संशयाला कोठे जागा नव्हती. अपघाती म्रुत्यु अशी नोंद घेण्यात आली.शमिका व अपर्णाचे आत्मे त्या घरात राहू लागले. ऋषीच्या गळ्यातल्या गंड्यामुळे ऋषी प्रत्येक वेळी वाचत होता. 

मग तिसरी रोझी आली. ही तर नुकतीच अठरा वर्ष पुर्ण झालेली होती. रोझीला घरकामाची सवय नसल्याने सदाकाकाला ठेवण्यात आलं. त्यानेच मग त्याच्या बायकोला,शेवंताक्काला स्वैंपाकासाठी आणलं. रोजीसोबत ऋषीचा महिनाभर चांगला गेला. ऋषीला शर्मिला व अपर्णाच्या वास्तव्याची कल्पना आल्याने ऋषीने मांत्रिकाकरवी त्यांना वरच्या खोलीत डांबूत ठेवले होते. 

एका रात्री अतिपावसामुळे ऋषीला घरी जाता आलं नाही. सदाक्का शेवंताक्काला रोझीच्या सोबत ठेवणार होता पण रोझी म्हणाली की ती घाबरत नाही. शेवंता आऊटहाऊसमध्ये गेली. रात्री रोझीला जोरजोरात दार वाजवल्याचा आवाज ऐकू आला. तीने साऱ्या दारं,खिडक्या चेक केल्या. मग ती वरती आली. तिला जाणवले की कुणीतरी त्या बंद दाराच्या आतून ओरडत
आहे,साद घालत आहे. तीने खालून चाव्या आणल्या व दार उघडलं. आत शर्मिला व अपर्णाच्या पांढरट आक्रुत्या इकडून तिकडे फिरत होत्या. रोझी भयभीत झाली. त्यांच्या भेसुर रडण्याचे आवाज तिच्या कानात घुमू लागले. वटवाघळं तिच्याभोवती घिरट्या घालत होती. रोझीचा धीर संपला. ती तिथेच बेशुध्द होऊन पडली. ऋषी सकाळी घरी आला. त्याने दार खोललं. त्याला वाटलं रोझी झोपली असेल.

रोझी..रोझी..करुन हाक मारु लागला. पण छे! त्याने बेडरुममध्ये पाहिलं..बेडवर कोणीच नव्हतं.  ग्यालरीत पाहिलं..बाथरुम..छे..रोझी गेली कुठे? अचानक त्याच्या मनात काय आलं..तो झरझर पायऱ्या चढत गच्चीवर गेला. रात्री हवेने खोलीचं दार बंद झालं होतं पण कुलुप नव्हतं. ऋषीने दार उघडलं. खोलीत कोणीच नव्हतं. बेड,ड्रेसिंग टेबल..नेहमीसारखीच खोली..पण एका कोपऱ्यात त्याला रोझी निजलेली दिसली. ऋषीने तिची नाडी पाहिली. तिचं अंग बर्फासारखं गार झालं होतं. ऋषी ओरडला,"मला माहिती आहे,तुम्ही दोघींनी मिळून मारलय रोझीला. पण मी तुमचं काहीच वाकडं करु शकत नाहीए." ऋषीने संतापाने मुठी आवळल्या. पोलिस येऊन नैसर्गिक म्रुत्युची नोंद करुन गेले.

ऋषीने रोझीवर ख्रिश्चन धर्मानुसार अंत्यसंस्कार केले. रोझीचा आत्मा ऋषीसोबत परत आला होता. पण ऋषीला तिचं अस्तित्व जाणवत नव्हतं. वरच्या दोघींचा बंदोबस्त ऋषीने परत एकदा मांत्रिकाकडून करून घेतला होता रोझीच्या आत्म्याला मात्र त्या खोलीत जाता येत होतं. 

रुता घरात आल्यापासून रोझी नाखूष होती. म्हणूनच शर्मिला,अपर्णा व रोझी तिघींनी मिळून रुताला वरती बोलावलं होतं.

रोझीच्या कथनावरुन रुताला ऋषीच्या सुडौल देहापाठी लपलेला मनोविक्रुत कळला. तिघीही रुतासोबत खाली आल्या. ऋषी गाढ झोपेत होता. रुताने त्याच्या नाकावर उशी दाबली. तो घुसमटू लागला. त्याने डोळे उघडले तेंव्हा त्याला समोर रुता दिसली जी त्याचे नाकतोंड दाबत होती व तिच्या पाठीमागे शर्मिला,अर्पणा व रोझीच्या पुसटशा आक्रुत्या गोलाकार फिरत होत्या व खदाखदा हसत होत्या. ऋषी रुताला नजरेने गयावया करत होता पण ती आत्ता त्याच्या ढोंगीपणाला शरण जाणार नव्हती. 

थोड्याच वेळात ऋषीचा अंत झाला. रुता स्वतः पोलिसांना सरंडर झाली. आत्ता ऋषीचा आत्मा शर्मिला,अपर्णा व रोझीच्या ताब्यात..

(समाप्त)

सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now