Login

९) आत्म्याचा कैदखाना

भय कथा
धैर्यसिंहच्या हातातल्या शंखातून आता चांदण्यासारखी प्रकाश लहरी निघत होत्या.त्या तेजात देवदत्तची खरी आत्मा दिसू लागली गोंधळलेली, पण मुक्तीसाठी तळमळणारी. त्याने धैर्यसिंहकडे पाहिलं… आणि पुटपुटला…

"धन्यवाद… माझी कहाणी आता संपली."क्षणात देवदत्तचा आत्मा प्रकाशात विरून गेला.पण खेळ अजून संपलेला नव्हता

"मी हजार आत्म्यांचा ग्रास आहे… तुझं एकट्याचं तेज मला संपवू शकत नाही!"त्या काळ्या सावलीचा आकृतीकडून एक चिंघाड उठली.

त्याक्षणी, संध्येच्या स्वरात एक मंत्र गुंजला.

"नम: शंकराय मृत्युञ्जयाय…!"

आकाशात चंद्र प्रकट झाला. त्या प्रकाशात धैर्यसिंहचा देह तेजाने न्हाऊन निघाला.

"तू विसरतोस… मी एकटा नाही."

आता धैर्यसिंहच्या मागे हजारो शांत झालेल्या आत्म्यांचे स्वर होते. त्यांच्या निःशब्द प्रार्थनांनी स्मशान उजळलं. त्या अंधाराच्या आकृतीवर प्रकाशाचा एक स्फोट झाला!

किंकाळ्या, तेज आणि शांतता…आणि एक एक आत्मा, मुक्त होत गेली.

स्मशानात शांतता होती… पण ती सामान्य नव्हती.

ते तीव्र तेज, ती किंकाळी, आणि आत्म्यांची मुक्ती यानंतर उरले होते फक्त राख… आणि एक जळत राहिलेला प्रश्न.

धैर्यसिंह जमिनीवर विसावला होता, संध्येचा हात त्याच्या खांद्यावर होता. दोघांच्याही श्वासात थरथर होती, पण डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं—अश्रू नव्हते, भय नव्हतं… फक्त एक खोल जाणीव.

"आपण संपवलं का हे?" संध्या कुजबुजली.

धैर्यसिंहने डोळे मिटले. "काही संपत नाही… फक्त रुपं बदलतात."

तेवढ्यात स्मशानाच्या टोकाला एक कुंद प्रकाश दिसू लागला. तो प्रकाश स्थिर नव्हता… तो एका आकृतीत बदलत होता एक स्त्री, शुभ्र वस्त्रात, केसांमध्ये अबोली अडकवलेली, चेहऱ्यावर अपार वेदना.

"आई…?" धैर्यसिंहचा स्वर थरथरला.

ती आकृती हळूहळू पुढे आली. "धैर्य… माझं अपूर्ण राहिलेलं कर्म या भूमीशी जोडलं गेलं होतं. तू त्या बंद पानांचं ग्रंथ फोडलं… माझ्या आत्म्याला शांतता दिलीस."

संध्येचं हृदयही धडधडलं. "ही… तुमची आई…?"

"हो." धैर्यसिंहच्या डोळ्यांत पाणी आलं. "मी वर्षानुवर्षं वाट बघत होतो या क्षणाची."

आईचा आत्मा समोर झुकला. तिच्या स्पर्शाशिवायच एक उबदार लहर त्यांच्या दोघांच्या मनात भरून गेली. "माझा मार्ग आता मोकळा आहे… पण तुझा अजून आहे… खूप काही उरलंय, धैर्य."

क्षणात ती प्रकाशात विरून गेली.

संध्येने त्याचा हात हातात घेतला. "आपण दोघं एकत्र आहोत… आपण लढू, अजून वाटा पार करू."

आणि त्याक्षणी, स्मशानाच्या बाहेरून पुन्हा एक कुजबुज ऐकू आली सावध करणारी… आणि अंधारात डोकावणारी…

"तुम्ही अजून सगळं पाहिलेलं नाही…"

धैर्यसिंहने मागे वळून पाहिलं… आणि काळोखात एक नवीन छाया हलताना दिसली.

धैर्यसिंह आणि संध्या अजूनही त्या क्षणाच्या भारातून बाहेर आले नव्हते. त्यांच्या मागे स्मशानाच्या राखेतून उडणारा धूर हळूहळू विरत होता. शांततेतही एक बेचैनी होती… जणू हवेत काहीतरी अघटित घडण्याच्या अधांतरीपणाचं वजन दाटलं होतं.

तेवढ्यात, मागून एक घाणेरडा, कुजक्या शवासारखा वास येऊ लागला.

धैर्यसिंहने वळून पाहिलं… आणि एक थंड लहर त्याच्या मणक्यावरून सरकली.

स्मशानाच्या एका कोपऱ्यात जमिनीवर एक जुनी समाधी उघडत होती… कुणीतरी आतील बाजूनं ढकलल्यासारखी. आणि त्यातून बाहेर सरकत होती एक अर्धवट जळालेली आकृती… अंगभर राख, चेहरा अर्धा वितळलेला… डोळे नसलेले, पण जिवंतपणाचा आभास देणारे.

"हा… कुणाचा आत्मा आहे?" संध्या जवळ सरकली.

धैर्यसिंहने तिला मागे ढकललं. "हा… हा त्या ग्रंथाच्या आधीचा आहे. जो मुक्त झाला नाही… आणि आता रागानं पुन्हा जागा झालाय!"

ती आकृती आपसूकच वर सरकत होती, जणू कोणी तिला खेचत नव्हतं, तर स्वतःच हवेच्या विरुद्ध उभी राहत होती. तिच्या शरीरातून येणाऱ्या सळसळाटात अनेक आत्म्यांचे आवाज मिसळले होते.

"माझं अंतिम सत्य… कुणी लिहिलं नाही!" ती आकृती फुसफुसली. "माझ्या मृत्यूचा कोणताही शाप निघाला नाही… म्हणून मी अजून अडकलेलो आहे!"

धैर्यसिंहने मशाल उचलली, पण त्याची हातांची बोटं थरथरत होती.

आकृती हसली… एक वेडसर, बधिर करणारा हास्य.

"हे अजून काहीच नाही… खरं भय आता सुरू होणार आहे!"

क्षणात वाऱ्याचं रुद्ररूप सुरू झालं. झाडं उलटी वाकली, राख हवेत उडू लागली, आणि तेवढ्यात जमिनीवर एक भेग फुटली… आणि त्या भेगेतून बाहेर आले.एक गोंगाट… जणू असंख्य आत्म्यांचा शाप एकत्रित होऊन जन्म घेत होता.

त्या क्षणी वेळ थांबलेली वाटली. धैर्यसिंह आणि संध्या त्या उघडलेल्या भेगेकडे पाहत होते जणू पृथ्वीच्या खोल गर्भातून काहीतरी भयाण जन्म घेणार होतं.त्या फाटलेल्या जमिनीमधून उठणाऱ्या काळ्या धुरामध्ये हळूहळू एक आकृती स्पष्ट होत गेली.ती न पुरुषस दृश होती, ना स्त्रिसदृश… तिच्या अस्तित्वात केवळ पीडा, घृणा आणि अपूर्णतेचा आक्रोश मिसळलेला होता. शरीरावर रक्ताचे ओघळ, चेहऱ्यावर काळ्या पाण्यासारखी झाक… आणि नजरेत एकटेपणाची हजार वर्षांची सल.

"शोधायचं होतं ना सत्य? "मग आता भोगा… ते असत्य जे जन्माला घातलं तुम्हा सगळ्यांनी!"ती आकृती गुरगुरली.

धैर्यसिंहचं हृदय धडधडू लागलं. तो संध्याकडे वळून म्हणाला, "हे… हे त्या ग्रंथाच्या आधीचं काहीतरी आहे. या आत्म्याचा कुठेच उल्लेख नाही. तो विसरला गेला… म्हणून त्याचा राग आता अमर झाला आहे!"

संध्याचं शरीर थरथरत होतं. "आपण काय करू शकतो आता?"

आकृतीने हात उचलले आणि हवेतून जणू हजारो अस्फुट आत्मे पुन्हा एकत्र आले.

"माझं नाव कोणी लिहिलं नाही… म्हणून मी प्रत्येक नाव मिटवणार आहे!"त्यांचा आवाज वेदनेचा नव्हता, तो होता प्रतिशोधाचा.

तेवढ्यात स्मशानात असलेली शेवटची मशाल विझली.
आणि अंधारात उरली फक्त ती आकृती…आणि तिच्या मागे उभा असलेला मृत्यूचा नावाचा चेहरा.

अंधारात काही क्षण काहीच ऐकू येत नव्हतं.ना आवाज, ना श्वास… फक्त त्या उपस्थितीचा भार जणू संपूर्ण वातावरणावर पसरलेला होता.धैर्यसिंह आणि संध्या दोघेही एकमेकांच्या श्वासांवर जिवंत होते. पण त्या अंधारात त्यांच्या भोवती काहीतरी हलत होतं. जणू मृत आत्म्यांची सावली त्यांच्याभोवती वलय करून फिरत होती.

आकृतीचे डोळे चमकले तेवढ्यात, जमिनीखालून एक भयंकर किंकाळी उसळली. त्या फाटलेल्या जमिनीच्या भोकातून एक जुनं मुखवटं वर येत होतं झाकलेलं, धूळ खात पडलेलं, पण त्याच्या डोळ्यांत अजूनही भयाचं सौंदर्य जिवंत होतं.

संध्याच्या लक्षात आलं, "हे… हे मुखवटं त्या विसरलेल्या आत्म्याचं खरं रूप आहे. त्याचा चेहरा कोणालाही कधी दिसला नाही, म्हणून तो चेहरा आता प्रत्येकावर लादणार आहे!"

"जर त्याला चेहरा दिला, ओळख दिली… तर कदाचित तो शांत होईल."तो म्हणाला. आणि पुढे सरसावला आपल्या रक्ताने माखलेले बोट त्याने त्या मुखवट्यावर टेकवलं… आणि पुटपुटला"तुला विसरले, ही आमची चूक होती. पण आता… आम्ही तुला नाव देतो"अनाम"!"

क्षणात त्या मुखवट्यातून अंधार उसळला… पण तो आता धैर्यसिंहच्या भोवती वळत नव्हता तो विरत होता.

संध्या ओरडली, "तू त्याला शांत केलंस! तू त्याला नाव दिलंस… ओळख दिलीस!"पण…त्या ओळखीच्या बदल्यात काय झालं तर....

धैर्यसिंहची नजर शून्यात हरवली होती.

आणि त्याच्या शरीराभोवती आता हलकेच काळसर वलय फिरू लागलं होतं…

धैर्यसिंहच्या भोवती फिरणाऱ्या त्या काळसर वलयात काहीतरी विचित्र घडत होतं. संध्या त्याच्याकडे धावत आली, पण तिच्या पायांखालची जमीनच थरथरू लागली. तिच्या नजरेसमोर धैर्यसिंहचा चेहरा मंद प्रकाशात हरवताना दिसू लागला.

"धैर्यसिंह! थांब! तुझं अस्तित्व पुसलं जातंय!" ती ओरडली, पण आवाज तुटक झाला.

तो वलय आता धैर्यसिंहच्या आठवणी खायला लागला होता… त्याने भूतकाळ पुसायला सुरुवात केली होती.
त्याचं बालपण, त्याचे स्वप्नं, त्याच्या आईचा चेहरा – सगळं विस्मरणात झाकलं जात होतं.

धैर्यसिंहची नजर संध्यावर स्थिर झाली. "माझं नाव काय आहे…?" त्याने विचारलं.

संध्याच्या डोळ्यांत अश्रू आले. "तू धैर्यसिंह आहेस… तुझा आत्मा अजूनही जिवंत आहे!"

तेवढ्यात, जमिनीखालून परत एक प्रकाश उठला. एक जुना ग्रंथ, जो आता जळूनही पूर्ण नष्ट झाला नव्हता, त्याचं शेवटचं पान स्वतःच उलटलं…तर त्यावर लिहिलं होतं

"ज्याने मृत्यूलाही नाव दिलं… तो विस्मरणाच्या पार जातो."

त्या क्षणी, संध्याने काही तरी पुटपुटलं… एक प्राचीन श्लोक, जो तिच्या आजीने कधीतरी सांगितला होता.