Login

६) आत्म्याचा कैदखाना

भय कथा
धैर्यसिंहच्या कपाळावर थंडगार घामाच्या धारा वाहू लागल्या.खूप प्रयत्नानंतर त्याचा हाती मशाल लागली त्याने ती  तलवारीसारखी उगारली आणि जोरात आरोळी दिली आणि त्या क्षणी…त्या आकृतीने हात पुढे केला आणि धैर्यसिंहच्या गळ्याला स्पर्श केला.
त्याला एक जळजळीत वेदना जाणवली. डोळ्यासमोर अंधुक छायाचित्रं फिरू लागली.

स्मशानाच्या दिशेने वाहणारा गार वारा अनपेक्षित थंडावा देत होता. धैर्यसिंह अजूनही त्या भयप्रद अनुभूतीतून बाहेर आला नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही जळालेल्या आकृत्यांचे प्रतिबिंब उमटत होते.

तो धडपडत एका जुन्या वडाच्या झाडाजवळ पोहोचला. त्या झाडाची साल काळीठिक्कर पडली होती, आणि त्यावर अघोरी चिळकांडीसारखी कोरलेली काहीतरी विचित्र चिन्हं दिसत होती. तो निश्वास घेत उभा राहिला, पण अचानक जमिनीतून एखादी वेटोळी साखळी वर यावी तसे हात बाहेर आले! ते जमिनीतून सरपटत वर येत होते… कोणी तरी त्याला खेचत
असल्याची जाणीव झाली.

धैर्यसिंहने जोर लावून पाय सोडवायचा प्रयत्न केला, पण ते हात इतके थंडगार होते की त्याच्या शरीराला बधिरता येऊ लागली.

"माझ्या जीवावर बेतलंय!" त्याच्या मनात भीतीचा ठोका बसला. तो जोरजोरात ओरडू लागला, पण त्या भयाण जागेत त्याचा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही.

तेवढ्यात समोरून एक काळसर सावली पुढे सरकली. ती सावली थेट धैर्यसिंहच्या दिशेने चालत येत होती.
त्याने वळून पाहिलं… तो देवदत्त होता!

त्याचा डोळ्यांत भेसूर लालसर चमक होती.आता तो माणूस नव्हता, एक जळालेल्या राखेसारखा काळसर आत्मा झाला होता. त्या आत्म्याचे लालसर डोळे धैर्यसिंहकडे रोखले होते.

देवदत्त"तू… तर तू खरंच…"धैर्यसिंह अडखळत बोलत होता जणू त्याची जीभ जड झाली होती.

"हो, मी मरण पावलो, पण यातच माझं अस्तित्व जिवंत आहे."आणि आता… तुझंही."देवदत्तच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय क्रूर हास्य पसरलं.

धैर्यसिंहच्या चेहऱ्यावर प्राणांतिक भीती होती.त्याने देवदत्तच्या आत्म्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि
शेवटचा जोर लावला स्वतःला त्या थंड हाताचा विळख्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण… अचानक त्याच्या भोवती काळोख दाटू लागला.

या जागेतून कोणीही जिवंत जाऊ शकत नाही!"एक खोल, घोगरा आवाज साऱ्या वातावरणात घुमू लागला"

त्या भयाण रात्री स्मशानात घोंगावणारा वारा अजूनही दाट काळोखाला कुरतडत होता. धैर्यसिंह जमिनीत अडकलेल्या हातांपासून सुटण्यासाठी अजूनही झटत होता, पण त्याचा श्वास अडकू लागला. शरीर थंडगार होत चाललं होतं… जणू मृत्यूने त्याच्यावर सावट टाकलं होतं.

"तुला सांगितलं होतं… ही जागा सोडून जा," देवदत्तचा घोगरा आवाज पुन्हा  गूंजला.

"तू… तू खरंच आता… एक आत्मा आहेस?" धैर्यसिंहच्या तोंडून कसाबसा आवाज बाहेर पडला.

देवदत्तने फक्त हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून भयावह करकरीत आवाज निघाला. त्याच्या आजूबाजूला अनेक सावल्या हालू लागल्या ज्या खूप वर्षापासून या  स्मशानात अडकलेल्या आत्म्यांच्या होत्या.

अचानक, त्या जमिनीतून बाहेर आलेल्या थंडगार हातांनी धैर्यसिंहला पुन्हा खेचायला सुरुवात केली! त्याला आत ओढलं जात होतं.

"माझी मदत कर!" तो किंचाळला.

"तुला इथून बाहेर जायचंय? मग मला उत्तर दे.... देवदत्तची आत्मा म्हणाली.

उत्तर कसलं उत्तर,.....धैर्यसिंह गोंधळुन म्हणाला.

जिवंत असलेल्यांचा मृत्यूपर्यंत प्रवास कोण ठरवतं?
देवदत्ताच्या आत्म्याने काळजाला भिडणाऱ्या स्वरात विचारलं.

इतक्यात धैर्यसिंहच्या नजरेसमोर अंधार गडद होत गेला… आणि अचानक समोर एक अस्पष्ट आकृती उमटली. तिच्या भोवती धूसर प्रकाश पसरला होता.

ही कोण?आहे तो स्वतःशी पुटपुटला.

तेवढ्यात काहीतरी भयंकर घडलं. धैर्यसिंह जमिनीत ओढला जात होता! त्याच्या हातांनी जमिनीत घट्ट पकड घेण्याचा प्रयत्न केला, पण ती नरकासारखी काळी चिखलासारखी त्याला गिळंकृत करत होती. तो आकांताने ओरडला, पण आजूबाजूला फक्त असंख्य मृतात्म्यांचे अस्फुट आवाज घुमत होते.

सोडा मला!.त्याचा आक्रोश हवेत विरून गेला… त्या स्मशानाच्या काळोख्या पोकळीत हरवला.

देवदत्तची आत्मा अजूनही समोर उभी होती.त्याच्या मृत, काळसर चेहऱ्यावर एक भयाण शांतता होती.

उत्तर दे ...जिवंत असलेल्यांचा मृत्यूपर्यंत प्रवास कोण ठरवतं?देवदत्तची आत्मा पुन्हा म्हणाली.

धैर्यसिंहचा मेंदू गोंधळला. हृदय वेगाने धडधडत होतं. तो उत्तर शोधत होता, पण समोरचा काळोख त्याचं भान हरवत होता.

त्या क्षणी, अचानक जमिनीखालून एक थंडगार हसू उमटलं अंगावर काटा आणणारं, वेडसर हसू.

मृत्यू ठरवतो… पण तोच शेवट नसतो!ती आकृती
भयाण आवाजात म्हणाली.!

धैर्यसिंहने नजर वर केली. समोर एक भयाण आकृती उभी होती तिच्या चेहऱ्यावर कातडी नव्हती, केवळ कोरडी हाडं आणि लालसर डोळे! त्या डोळ्यांत एक अतृप्त भूक होती… जिवंत रक्ताच्या आसक्तीची!

त्या आकृतीने हात पुढे केला.मृत्यूच्या आधीच जिवंतपणा शोषून घेणाऱ्या आत्म्यांचा खेळ सुरू झाला होता.

क्षणातच असंख्य आत्म्यांचे थंडगार, बोचणारे हात धैर्यसिंहच्या शरीरावर फिरू लागले… जणू त्याचा जीव त्या स्पर्शातूनच ओढून घेत होते. त्याचा श्वास अडू लागला. हृदयाचा ठोका चुकत चालला होता.

उत्तर दे…एक अस्फुट, भयाण आवाज त्याच्या कानात घुमला. देवदत्तच्या चेहऱ्यावर वेडसर भीती उमटली.

त्या जीवघेण्या क्षणी, धैर्यसिंहने शेवटचा जोर लावला आणि ओरडला—

मृत्यू ही फक्त एक सुरुवात आहे!

क्षणात संपूर्ण वातावरण हादरलं! आकाश कडाडलं, जमिनीतून एक प्रचंड किंकाळी उमटली, आणि तो अंधाराचा पट सैल होऊ लागला. एकामागोमाग आत्मे वेगाने विरत गेले.

देवदत्तची आत्मा ही.डळमळू लागली होती त्याच्या मृत, काळसर चेहऱ्यावर अनिश्चिततेची छाया उमटली. त्याने धैर्यसिंहकडे पाहिलं आश्चर्य आणि शंका दोन्ही त्याच्या डोळ्यांत स्पष्ट होतं.

तू… उत्तर दिलंस? पण… आता पुढे काय? देवदत्तच्या आवाजात एक अनामिक भीती होती.

धैर्यसिंह काही बोलणार इतक्यात, एक विकृत हसण्याचा आवाज अंधारात घुमला.

हाहाहा…! तुम्हाला वाटलं की हे संपलं?&

समोर धुक्यातून एक अजून भयंकर आकृती पुढे सरकत होती एक अंधारी, विकृत सावली! तिचा आकार मानवी नव्हता, तिच्या अस्तित्वातच एक अमानवी भय दडलेलं होतं.

ती सावली हळूहळू स्पष्ट होत गेली.धैर्यसिंह आणि देवदत्तच्या नजरेसमोर ती अंधारलीली आकृती अधिकच भयंकर होत गेली. ती माणसासारखी नव्हती. काळोखातून जन्मलेलं काहीतरी वेगळंच होतं ते!

"हा खेळ अजून संपलेला नाही…" तिचा घोगरा आवाज स्मशानात घुमला आणि अचानक हवा दाट झाली, श्वास गुदमरू लागला.

धैर्यसिंह मागे सरला. "तू कोण आहेस?"

त्या आकृतीने अंधारात हात फिरवला, आणि एक जुनाट, रक्तानं माखलेला ग्रंथ हवेत उमटला. त्याच्या पानांवर कोरीव अक्षरं चमकू लागली.

"मी काळ आहे. आणि या ग्रंथात तुमच्या मृत्यूची कथा आधीच लिहिली गेली आहे!"

धैर्यसिंहच्या पाठीवर सर्रकन काटा आला.

"आणि जर आम्ही त्या कथेला बदलायचा प्रयत्न केला तर?"देवदत्तने कंपित स्वरात विचारले,

त्या आकृतीने भयाण हसू हसत ग्रंथ उघडला. अक्षरं आपोआप बदलली. आणि…त्यांच्या समोर स्वतःच्याच मृत्यूचं वर्णन उमटलं!

देवदत्त—"आगीनं वेढलेला, कधीही बाहेर न पडू शकणारा…"धैर्यसिंह"अंधाराच्या गर्तेत ओढला गेलेला.,

त्या ओळी वाचताच आकाश कडाडलं, जमिनीखालून आगीचे जळजळीत प्रवाह उफाळले! स्मशान आगीच्या वेढ्यात सापडलं.

"हे सत्य बदलता येईल?" धैर्यसिंह ओरडला.

त्या आकृतीने डोळे मिटले… आणि ग्रंथाचा शेवटचा पान उलटला.

आकाश अजूनही कडाडत होतं. स्मशानाच्या आगीत धगधगणाऱ्या त्या ग्रंथाच्या पानांवर धैर्यसिंह आणि देवदत्तच्या मृत्यूचे शब्द कोरले जात होते—अक्षरशः जळत्या निखाऱ्यांनी!

हे सत्य आहे!घोगऱ्या, कंपित आवाजात ती आकृती ओरडली. तिच्या डोळ्यात रक्तासारखा लालसर प्रकाश चमकला, जणू त्यातून एक असह्य क्रोध बाहेर पडत होता.

धैर्यसिंह भानावर आला, घामाने डबडबलेला, हृदयाचा ठोका वाढलेला.नाही! आपण मरणार नाही! तो जरा कापऱ्या आवाजात म्हणाला.तसाच तो पुढे झेपावला, मशाल उचलली आणि ती जोरात हवेत फिरवली आणि  ती आकृतीच्या दिशेने फेकली

मशालीचा प्रखर प्रकाश त्या अंधकाराला भेदला असं वाटलं… पण!ती आकृती तिथेच स्थिर उभी होती अजिबात हलली नाही.

ही आग मला जाळू शकत नाही...त्या आकृतीचा आवाज गडगडाटासारखा घुमला, जणू आकाशातले मेघ एकत्र कोसळले होते.

त्याच क्षणी मशालीच्या ज्वाळा त्या आकृतीच्या सावलीत शिरल्या आणि क्षणात काळसर धुरात विलीन झाल्या! ती आग जणू अंधारानेच गिळंकृत केली होती!