Nov 30, 2021
सामाजिक

आत्मत्राण व आत्महत्या

Read Later
आत्मत्राण व आत्महत्या

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आत्मत्राण  नावाची एक सुंदर  कविता दहावीच्या सीबीएसईच्या हिंदी पुस्तकात आहे.
रवींद्रनाथ टागोरांनी लिहीलेली  ही कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे.

२०१८ च्या डिसेंबर  मधे वर्गात ही कविता शिकवत होते.
गुरूदेवांचा विस्तृत परिचय दिला आणि मग कवितेचे वेगळेपण मुलांना समजून सांगितलं!
ही एक प्रार्थना आहे पण ती सर्व प्रार्थनांपेक्षा वेगळी आहे, कारण मनुष्य प्रार्थनेत देवाला काही ना काही मागतो पण या कवितेत कवी स्वतःसाठी काहीच मागत नाही!
संकट देऊ नकोस असे म्हणत नाही, तू मदत कर असे मागत नाही !
कवि म्हणतात की माझी स्वतःची शक्ती वाढू दे, माझा संघर्ष मला करू दे, तू फक्त पहात रहा!

कविता मी दरवर्षी खूप तन्मयतेने शिकवते आणि मुलांनाही ते खूप आवडतं. . पण  त्यात्या काही ओळी शिकवताना अचानक डोळ्यात पाणी आलं. .  समोर त्या दोघी जणी बसल्यात असं सारखं वाटायला लागलं.
मागच्या वर्षी किती तन्मयतेने माझी कविता ऐकत होत्या मग असं का झालं ?
एक शिक्षिका म्हणून मी कुठे कमी पडले का? जणु त्यांच्या जाण्याने  माझं मानसिक  नुकसान झालं होतं!
मी शिकवणं थांबवलं आणि मुलांना म्हटलं "एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. .  मी सांगते म्हणून गाठीशी बांधून ठेवा. .  कितीही वाईट वेळ आली किती संकटे आली तरीही माणसाने जगायचं, कारण जगण्यासारखं सुंदर काहीच नाही!

स्वतःचा जीव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. कुठलेही संकट मरणापेक्षा कधीच मोठे असू शकत नाही.

ती वेळ, ते संकट, निघून जाते आणि रस्ता निघतो , मार्ग मिळतो, मरणाने काहीच मिळत नाही!

मला प्रॉमिस करा की तुम्ही सगळे, ही गोष्ट अंमलात आणाल. ताणतणाव आला तर आपल्या लोकांशी बोला, मित्रांशी शेअर करा ,पण अविचार करू नका!

आत्मत्राण म्हणजे स्व -शक्ती  ! ती देण्याची प्रार्थना कवी करत आहे."

मनात वाटत होतं त्या सुंदर नाजूक गोड निष्पाप दोघीजणी  माझ्या विद्यार्थिनी ,मागच्या वर्षी दहावीचा माझ्या विषयांचा एक पेपर देवून महिला दिनाच्या दिवशी हे  जग सोडून गेल्या!
  त्यांनी यात्रा संपवली की ती संपली हे गूढच. . ते  ईश्वर जाणतो!
जर त्यांचं जाणं अपघात नव्हता  आणि त्यांनी अविचार केला असेल तर . . तशा कुठल्याही  त्या क्षणात दोघींनी मला एक फोन जरी केला असता तर कदाचित मी त्यांना समजावलं असतं अशी खंत मला वाटत राहिली.

स्वतःचं बळ जेव्हा कमी पडतं तेव्हा माणूस अविचार करतो.

मरणाच्या जवळ जाऊन पुन्हा वाचलेले कितीतरी लोक मी पाहिलेत. ते पुन्हा अगदी सामान्य जगतात म्हणजे ती वेळ जाऊ द्यायची. . कदाचित  त्यासाठीच कवी स्वशक्ती मागतो .

गुरुदेव म्हणतात- देवा तु काही करू नकोस ,मला कुठलाही मदतीचा हात नाही मिळाला तरी चालेल, सगळं जग  माझ्याविरुद्ध गेले तरीही चालेल अशा क्षणी ही मी तुझ्या असण्यावरती संशय नाही घ्यायला पाहिजे! 

बस तू रहा आणि मला शक्ती दे. .  की संकटामध्ये मी सुरक्षित बाहेर पडेन . . बस तू  सोबत रहा !"

आपलं आयुष्य स्वतः संपवण्या सारखा गुन्हा नाही असं मला वाटतं!

आपला जन्म कशासाठी झाला तेच आपल्याला माहित नसतं  . .असं करून आपण आपल्या निर्मितीचा अपमान करतो .

भाषेची शिक्षिका होण्याचा हा  एक  आनंद असतो की विषयाच्या आणि साहित्याच्या माध्यमातून मुलांना तुम्हाला जीवन शिकवता
येतं!
मुलांनी आयुष्यात कुठल्या तरी एका क्षणाला माझी आठवण केली आणि माझी शिकवण आठवूण त्यांचं भलं झालं तर बस्स! एक शिक्षिका म्हणून मी जगले असं मला नेहमी वाटतं.
   जेव्हा केव्हा कुणीतरी आत्महत्या केली असं मला कळतं त्यावेळी माझ्यात लपलेली एक मानसशास्त्रज्ञ जागी होते. विचार होत राहतो. . त्या नाजुक कठिण क्षणांचा !

शरीराची आत्महत्या  दिसून येते ,मनाच्या आत्महत्या कधी दिसत नाही !

शिक्षण ,करीअर ,नोकरी, छंद प्रेम ,जीवनसाथी लक्ष ,स्वप्न ,या सर्वांशी जीवन जेव्हा जेव्हां तडजोड करतं तेव्हा तेव्हा त्या क्षणापुरतं त्या व्यक्तिचं मन आत्महत्या करत असतं !

शरीराची आत्महत्या  जगाला दिसते मनाची आत्महत्या दिसत नाही पण म्हणून देवाकडे आत्मत्राण मागायचं आणि जे मिळेल त्यात आनंदाने जगायचं . . हे जीवन पुन्हा मिळेल  की नाही हे कोणी जाणत नाही!

समाप्त
© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे सखी
दिनांक - ०४.०३ . २०२१

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 24 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.