आठवणींचे गाठोडे. भाग -तीन (अंतिम भाग.)

कथा एका सरप्राईज गिफ्टची!


आठवणींचे गाठोडे.
भाग- तीन.

"नाही गं सानू. आणि खरं सांगू का, अशी कधी गरजच नाही पडली ना. माझ्याकडे तर त्यांनी दिलेले सारेच आहे." रेवा म्हणाली. पण तिच्या मनात मात्र कुठेतरी खंत जाणवत होती.

"खरंच खरं सांगत असशील तर हे सांग, की तुला कधी वाईट नाही वाटले या गोष्टीचे?" तिच्या डोळ्यांचा वेध घेत सानिकाने विचारले.

आजवर हा प्रश्न कधी रेवाला पडला नव्हता. उलट पापड लोणची विकून चार पैसे हातात आल्यावर तिच कधी मुलांना, तर कधी नवऱ्याला काही ना काही घेत असायची. पण त्याबद्दल्यात त्यानेही काही द्यावं असं तिच्या मनात आले नव्हते.

रेवाने नजर खाली केली. घरात काही कमी नव्हते, पण वीस वर्षाच्या संसारात नवऱ्याने प्रेमाने एखादी भेटवस्तू दिल्याचे तिला आठवत नव्हते.


"काय गुळपीठ चाललंय गं मायलेकीचं? चहा वगैरे मिळणार आहे की नाही आज?" सासूबाई आत येत म्हणाल्या.

"आजी, तुला कधी आजोबांनी एखादी भेटवस्तू दिली होती का गं?" आजीच्या गळ्यात हात टाकत सानिकाने विचारले.

"दोन जोडी कपड्यावर दिवस काढलेत गं बाई मी, तेव्हा कुठे आमचा संसार टिकला. तुमच्यासारखी उधळपट्टी करायला आमच्याकडे पैशाचे झाड नव्हते हो." सासूबाई नेहमीप्रमाणे म्हणाल्या.

"पैशाचं झाड नसेल तरी एखादयावेळेस गिफ्ट दिलं तर चालतं गं." सानिका आजीच्या गालाला गाल घासत म्हणाली.

"आजोबांनी तुला कधी काही दिले नाही, तेच नकळत बाबांच्या मनावर बिंबले आणि मग त्यांनी आईला गृहीत धरून आजवर असं काही दिलेच नाही. पुढे जाऊन आपला वैभवसुद्धा असाच वागला तर? तू कधी काही बोलली नाहीस. आईनेही बाबांना कधी काही मागितले नाही पण माझ्या पिढीच्या मुली तशा नाहीत गं, वैभवची बायको उगाच त्याच्याशी भांडत बसेल." सानिका हसून म्हणाली.

ऑफिसमधून आज लवकर परतलेला आकाश दारातच त्यांचा संवाद ऐकत होता. सानिकाचे म्हणणे हृदयात खोलवर पटले त्याला आणि आल्यापावली बाहेर खेळणाऱ्या वैभवला घेऊन तो बाजारात गेला.
दुकानात गेल्यावर गुलाबी रंगाचा एक सुंदर ड्रेस त्याने निवडला.

"बाबा हा ड्रेस कोणासाठी हो?" वैभव विचारत होता.

"अरे आईसाठी आहे. पण सीक्रेट आहे हं, घरी गेल्या गेल्या सांगू नकोस तिला."
आकाश.

"पण आज तर आईचा वाढदिवस नाही आणि ती ड्रेस पण घालत नाही, मग?"
त्याच्या छोटया चेहऱ्यावर मोठा प्रश्न होता.

"तिच तर खरी गंमत आहे. सरप्राईज आहे आईसाठी. ती आपल्या सगळ्यांना खूप काही घेत असते ना म्हणून आज तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट!"

बाबांचं म्हणणं पटलं त्याला. स्वारी खुश होऊन घराकडे परतली.


रात्री जेवणानंतर आकाशने रेवाच्या हातात ड्रेसची पिशवी दिली.

"काय आहे हे?" तिने आश्चर्याने विचारले.

"सरप्राईज गिफ्ट!" वैभव आनंदाने म्हणाला.

ड्रेस बघून रेवाच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले. कधी नव्हे ते सासूबाईंना देखील आज आनंद झाला.


"आई, कपाटातील तुझ्या आठवणीच्या गाठोड्यातील वापरात नसलेल्या साड्या गरजू लोकांना देऊन टाक गं."
सानिका म्हणाली.

"हो, म्हणजे आठवणीचे दुसरे गाठोडे ठेवायला जागा होईल." सासूबाईंनी सानिकाला टाळी देत साथ दिली, आणि सगळे हसायला लागले.
**समाप्त.**
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.

एकदा का संसार सुरू झाला की मग आपण त्यात गुंतत जातो. कधी तडजोड, कधी फरफट सुरूच असते. पण परस्परावरचे प्रेम आणि विश्वास याच्या साथीने हळूहळू ह्या संसाराचा मुरांबा आणखीनच मुरत जातो.
संसाराचा हा गाढा ओढताना प्रेमाबरोबर कधीकधी निमित्त नसताना देखील आपल्या पार्टनरला एखादी भेटवस्तू द्यायला हवी.सानिका म्हणाली तसे सरप्राईज गिफ्ट? त्याने प्रेम आणखी वाढते आणि संसाराची लज्जत देखील!

तुम्हाला काय वाटते?

🎭 Series Post

View all