आठवणींचे गाठोडे! भाग -२

कथा एका सरप्राईज गिफ्टची!


आठवणींचे गाठोडे.
भाग- दोन.

खाली मध्ये बसलेली ती आणि सभोवताल विखूरलेल्या तिच्या साड्या. केलेल्या घड्या मोडून परत नवी घडी घालून तेच नव्याने ती रचून ठेवत होती. दरवेळीप्रमाणे आजही तिला नको असलेली साडी हवीशी वाटायला लागली. त्यामुळे प्रत्येक साडी कपाटात जात होती.

"आईऽऽ कुठे आहेस अगं तू?" शाळेतून परतलेली तिची मुलं आरोळी देत आत आली.

हातपाय धुवून लहानगा वैभव अंगणात खेळायला गेला.नववीत शिकणारी सानिका तिच्या खोलीत आली.
एवढया कपड्याच्या पसाऱ्यात आईला बसलेली बघून सानिकाला, म्हणजे तिच्या लेकीला हसूच आलं.

"थांब, एक सेल्फी काढूया आपण. मी अँड आई, विथ कपड्यांचा पसारा!" ती हसत म्हणाली.

"गप गं. पसारा नाहीय, आठवणींचे गाठोडे आहे हे." सेल्फी घेणाऱ्या मुलीला दटावत रेवा म्हणाली.

"भारीच साड्या आहेत गं तुझ्या!" आता लेकीनेही तिथेच ठाण मांडले.

रेवाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आले.

"ही साडी बघ, माझ्या आईची आहे." एका मऊसूत कॉटनच्या साडीवर हात फिरवत रेवा सांगत होती. "माझ्या आईला तिच्या आईने, म्हणजे माझ्या आजीने दिली होती. पण मलाच इतकी आवडली की ती मी स्वतःसाठी ठेऊन घेतली. लग्नाच्या आधीची गोष्ट आहे गं ही."
साडीबरोबर ती आजीच्या आठवणीत हरवली. सानिकाही तिच्या गोष्टीत रंगू लागली.

"ही साडी माझ्या लग्नात शालूच्या सोबतीला घेतलेली. किती वेगळा रंग आहे नाही? ही बघ, पहिल्या दिवाळीची साडी आणि ही पाहिली संक्रात होती ना, तेव्हाची."
ती भरभरून सांगत होती. कपाटातल्या प्रत्येक साडीची एक वेगवेगळी आठवण.

"ही साडी तू जन्माला आलीस तेव्हाची आणि ही तुझ्या पहिल्या वाढदिवसाची." रेवाचं अजूनही संपलं नव्हतं.

"ह्या दोन साड्या तुझ्या मावशीच्या लग्नातल्या. पाहिल्यांदा एवढया भारीतल्या घेतल्या होत्या.. त्यात दोन - दोन." ती हसून म्हणाली.

"ही साडी वैभवच्या मुंजेची आणि ही.. तुझ्या आत्याने मला पहिल्यांदा गिफ्ट केलेली." सांगत असतांना तिचा आनंद अजूनही तसाच होता.

"वॉव! आई किती आठवणी आहेत ग तुझ्या? भारीच की." तिला साडया ठेवायला मदत करत सानिका म्हणाली. आता कपाट बऱ्यापैकी आवरले होते.

"पण काय गं आई, तुझ्याकडे बाबांच्या आठवणीची अशी एकही साडी नाहीये का गं?" कपाट बंद करत सानिकाने विचारले.

"म्हणजे?" न उमगून रेवा म्हणाली.

"म्हणजे बाबांनी तुला खास अशी भेट दिलेली?" सानिका.

"अगं आहेत ना. माझ्या वाढदिवसाच्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या. लग्नाच्या एवढ्या वर्षांत त्यांनी दिलेल्या तर भरपूर साडया आहेत माझ्याकडे." ती हसून म्हणाली.

"हो गं. लग्नाला वीस वर्ष झालीत तुझ्या. तर चाळीस एक साडया जमा झाल्याच असतील." तिला चिडवत सानिका म्हणाली.

"पण अशा काही निमित्याव्यतिरिक्त कधी काही गिफ्ट केलंय का त्यांनी?"

तिने सहज विचारले, पण तिच्या या प्रश्नाने रेवाच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव अचानक बदलले.

"एवढ्या साडया काय कमी आहेत होय? पुन्हा त्यात भर कशाला?" चेहऱ्यावरचे भाव लपवत ती म्हणाली.

"साडी म्हणूनच नाही गं, पण अशी एखादी वस्तू, कधी एखादा दागिना.. हवं तर एखादा साधा रुमालच, असं कधी काही दिलंय का त्यांनी तुला?" सानिका.

काय असेल रेवाचे उत्तर? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

🎭 Series Post

View all